अखेर राजेश काटकर यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार सुपूर्द
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
नुतन जिल्हाधिकारी आंचल गोयल या परभणी जिल्हाधिकारी म्हणून शनिवारी (ता.31) रुजू होऊ नयेत म्हणून या जिल्ह्यातील काही सत्तारूढ पक्षाच्या नेतेमंडळींनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून श्रीमती गोयल यांच्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला आहे.
जिल्हाधिकारी मुगळीकर हे शनिवारी सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या या जागी नुतन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती गोयल या रुजू होणार होत्या. शनिवारी दुपारी त्या जिल्हाधिकारी या पदाचा पदभार स्वीकारतील असे अपेक्षित होते. त्यादृष्टीने त्या गेल्या दोन दिवसापूर्वी परभणीत दाखल झाल्या. प्रशासकीय स्तरावर सुद्धा अधिकारी-कर्मचार्यांनी मुगळीकर यांना भावपूर्ण निरोप तसेच श्रीमती गोयल यांच्या स्वागताकरीता भक्कम तयारी सुरु केली होती. परंतु शनिवारी सकाळपासून नूतन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल या रुजू होऊ नयेत म्हणून या जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली. शुक्रवारी रात्रीपासूनच या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले होते. विशेषतः शासकीय स्तरावरून श्रीमती गोयल यांच्यावर पदभार स्वीकारू नये म्हणून दबावतंत्राचा प्रकार सुरू होता. परिणामी सायंकाळी चार वाजेपर्यंत गोयल यांनी पदभार स्वीकारला नाही. त्यांच्याऐवजी कनिष्ठ अधिकार्यास जिल्हाधिकारी पदाचा पदभार सुपूर्त व्हावा या दृष्टीने काहींनी केलेल्या प्रयत्नांमुळे सायंकाळी मुंबईतून श्रीमती गोयल यांच्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी काटकर यांना पदभार सोपवावा, असा आदेश धडकला. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार काटकर यांना सुपूर्द केला.
दरम्यान, पालकमंत्री मलिक हे दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात होते. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मलिक यांना या हालचालींसंदर्भात विचारणा केली. परंतु, या प्रकाराबाबत आपणास काहीही माहिती नाही, असे नमूद करीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळेच श्रीमती गोयल ह्या पदभार स्विकारणार नाहीत, त्यांच्या ऐवजी अन्य कनिष्ठ अधिकार्यास पदभार दिला जाईल, असे स्पष्ट संकेत दिसू लागले होते. दैनिक दिलासाने या संदर्भात माध्यमांमधून वृत्त व्हायरल केल्यानंतर काही जागरुक नागरीकांनी या हालचालींबद्दल व प्रकाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. काहींनी प्रतिक्रिया नोंदविल्या. प्रशासकीय स्तरावर सुध्दा अधिकारी - कर्मचार्यांनी या नाट्यमय घडामोडींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. परंतु, काही नेतेमंडळींच्या धास्तीपोटीच्या एकंदरीत हालचालींमुळे व वरिष्ठ पातळीवरुन त्यास मिळालेल्या प्रतिसादाने, प्रोत्साहनाने या नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम मिळाला.
दरम्यान, आयएएस अधिकारी असणार्या श्रीमती गोयल या प्रकाराने प्रचंड अस्वस्थ असल्याची व त्या लगेचच माघारी परतणार असल्याची माहिती हाती आली आहे.

No comments:
Post a Comment