जिल्हा टास्क फोर्सची बैठक संपन्न
*कोरोनाने पालकत्व गमावलेल्या बालकांची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत*
- जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर
परभणी, दि.16 (जिमाका) :- कोविड-19 या आजारामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दलाची स्थापना झाली असून कोरोना या आजारामुळे एक अथवा दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील बालकांची संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून स्वत: त्या कुटुंबाशी संपर्क साधून माहिती जाणून घ्यावी तसेच कागदपत्रांची पुर्तता करुन प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. असे निर्देश जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिले.
जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची आढावा बैठक शुक्रवार दि.16 जुलै 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव एफ.के. शेख, महापालिका आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जी.आर.अंधारे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर म्हणाले की, कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, संजय गांशी निराधार पेंशन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना आदि योजनांचा ताबडतोब लाभ देण्यासाठी तात्काळ कार्यवाही सुरु करावी असे निर्देश दिले. तसेच एक व दोन्ही पालक गमावलेली बालके, विधवा महिला यांची माहिती घेवून सर्व प्रस्ताव सादर करावेत. ग्रामपंचयातीमधून रहिवाशी प्रमाणपत्र तर आधारकार्डवरील जन्म दिनांक ग्राह्य धरुन योग्य ती कार्यवाही वेळेत करावी असेही सांगितले.
या बैठकीपुर्वी जिल्हास्तरीय कृतीदलातील सदस्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा, कोविड-19 या आजारामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील शुन्य ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची व त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा, विधवा महिलांविषयक माहितीचा आढावा, कोविड-19 च्या कालावधीत विधवा झालेल्या महिलांकरीता शासकीय योजनेअंतर्गत मदत आदी विषयक सविस्तर माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जी.आर.अंधारे यांनी दिली. या बैठकीस जिल्हा बाल कल्याण समिती, चाईल्डलाईन व इतर संबंधित विभागाचे अधिकारी आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*कोरोनाने पालकत्व गमावलेल्या बालकांसाठी तीन दिवसीय शिबीराचे आयोजन*
परभणीचे जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांच्या आदेशानूसार बाल कल्याण समितीने दि.19, 20 आणि 21 जुलै 2021 या रोजी परभणी शहर येथील जुना पेडगाव रोडवरील सहकार पाटीजवळील बाल कल्याण समितीच्या कार्यालयात तीन दिवसीय शिबीराचे आयोजन केले असून कोरोनामुळे एक पालक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या नातेवाईकांनी बालकांचे आधारकार्ड, मृत्यू झालेल्या व्यक्तींचा मृत्यू दाखला, बोनाफाईड, रहिवासी दाखला, संपत्तीबाबतची कागदपत्रे, सातबारा, मालमत्तेची कागदपत्रे आदीची पुर्तता करुन परिपुर्ण प्रस्ताव करण्यात येणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment