नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल या रुजू होऊ नयेत म्हणून प्रयत्न सुरू
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
नुतन जिल्हाधिकारी आंचल गोयल या परभणी जिल्हाधिकारी म्हणून शनिवारी(ता.31) रुजू होऊ नयेत म्हणून या जिल्ह्यातील काही सत्तारूढ पक्षाच्या नेतेमंडळींनी सरकार दरबारी स्वतःची प्रतिष्ठा पणास लावून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासकीय क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. जिल्हाधिकारी मुगळीकर हे शनिवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या जागी नुतन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती आंचल गोयल या रुजू होणार आहेत.शनिवारी दुपारी त्या जिल्हाधिकारी या पदाचा पदभार स्वीकारतील असे अपेक्षित होते. त्यादृष्टीने त्या गेल्या दोन दिवसापूर्वी परभणीत दाखल झाल्या.प्रशासकीय स्तरावर सुद्धा अधिकारी-कर्मचारी अलर्ट होते. परंतु शनिवारी सकाळपासून नूतन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल या रुजू होऊ नयेत म्हणून या जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी जोरदार मोर्चेबांधणी करीत शासकीय स्तरावरून श्रीमती गोयल यांच्यावर पदभार स्वीकारू नये म्हणून दबावतंत्राचा प्रकार सुरू केला. परिणामी दुपारी तीन वाजेपर्यंत गोयल यांनी पदभार स्वीकारला नाही.दरम्यान त्यांच्याऐवजी कनिष्ठ अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी पदाचा पदभार सुपूर्त व्हावा असा कुटीर उद्योग या जिल्ह्यातील काही नेते मंडळींनी सुरू केला आहे विशेष म्हणजे नूतन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल या गेल्या दोन दिवसापासून परभणीत दाखल झाल्या आहेत.

No comments:
Post a Comment