Saturday, July 31, 2021

अखेर राजेश काटकर यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार सुपूर्द

अखेर राजेश काटकर यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार सुपूर्द



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

नुतन जिल्हाधिकारी आंचल गोयल या परभणी जिल्हाधिकारी म्हणून शनिवारी (ता.31) रुजू होऊ नयेत म्हणून या जिल्ह्यातील काही सत्तारूढ पक्षाच्या नेतेमंडळींनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून श्रीमती गोयल यांच्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला आहे.
      जिल्हाधिकारी मुगळीकर हे शनिवारी सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या या जागी नुतन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती गोयल या रुजू होणार होत्या. शनिवारी दुपारी त्या जिल्हाधिकारी या पदाचा पदभार स्वीकारतील असे अपेक्षित होते. त्यादृष्टीने त्या गेल्या दोन दिवसापूर्वी परभणीत दाखल झाल्या. प्रशासकीय स्तरावर सुद्धा अधिकारी-कर्मचार्‍यांनी मुगळीकर यांना भावपूर्ण निरोप तसेच श्रीमती गोयल यांच्या स्वागताकरीता भक्कम तयारी सुरु केली होती. परंतु शनिवारी सकाळपासून नूतन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल या रुजू होऊ नयेत म्हणून या जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली. शुक्रवारी रात्रीपासूनच या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले होते. विशेषतः शासकीय स्तरावरून श्रीमती गोयल यांच्यावर पदभार स्वीकारू नये म्हणून दबावतंत्राचा प्रकार सुरू होता. परिणामी सायंकाळी चार वाजेपर्यंत गोयल यांनी पदभार स्वीकारला नाही. त्यांच्याऐवजी कनिष्ठ अधिकार्‍यास जिल्हाधिकारी पदाचा पदभार सुपूर्त व्हावा या दृष्टीने काहींनी केलेल्या प्रयत्नांमुळे सायंकाळी मुंबईतून श्रीमती गोयल यांच्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी काटकर यांना पदभार सोपवावा, असा आदेश धडकला. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार काटकर यांना सुपूर्द केला.
      दरम्यान, पालकमंत्री मलिक हे दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात होते. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मलिक यांना या हालचालींसंदर्भात विचारणा केली. परंतु, या प्रकाराबाबत आपणास काहीही माहिती नाही, असे नमूद करीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळेच श्रीमती गोयल ह्या पदभार स्विकारणार नाहीत, त्यांच्या ऐवजी अन्य कनिष्ठ अधिकार्‍यास पदभार दिला जाईल, असे स्पष्ट संकेत दिसू लागले होते. दैनिक दिलासाने या संदर्भात माध्यमांमधून वृत्त व्हायरल केल्यानंतर काही जागरुक नागरीकांनी या हालचालींबद्दल व प्रकाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. काहींनी प्रतिक्रिया नोंदविल्या. प्रशासकीय स्तरावर सुध्दा अधिकारी - कर्मचार्‍यांनी या नाट्यमय घडामोडींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. परंतु, काही नेतेमंडळींच्या धास्तीपोटीच्या एकंदरीत हालचालींमुळे व वरिष्ठ पातळीवरुन त्यास मिळालेल्या प्रतिसादाने, प्रोत्साहनाने या नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम मिळाला.
दरम्यान, आयएएस अधिकारी असणार्‍या श्रीमती गोयल या प्रकाराने प्रचंड अस्वस्थ असल्याची व त्या लगेचच माघारी परतणार असल्याची माहिती हाती आली आहे.

नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल या रुजू होऊ नयेत म्हणून प्रयत्न सुरू

नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल या रुजू होऊ नयेत म्हणून प्रयत्न सुरू 



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
नुतन जिल्हाधिकारी आंचल गोयल या परभणी जिल्हाधिकारी म्हणून शनिवारी(ता.31) रुजू होऊ नयेत म्हणून या जिल्ह्यातील काही सत्तारूढ पक्षाच्या नेतेमंडळींनी सरकार दरबारी स्वतःची प्रतिष्ठा पणास लावून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासकीय क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. जिल्हाधिकारी मुगळीकर हे शनिवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या जागी नुतन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती आंचल गोयल या रुजू होणार आहेत.शनिवारी दुपारी त्या जिल्हाधिकारी या पदाचा पदभार स्वीकारतील असे अपेक्षित होते. त्यादृष्टीने त्या गेल्या दोन दिवसापूर्वी परभणीत दाखल झाल्या.प्रशासकीय स्तरावर सुद्धा अधिकारी-कर्मचारी अलर्ट होते. परंतु शनिवारी सकाळपासून नूतन जिल्‍हाधिकारी श्रीमती गोयल या रुजू होऊ नयेत म्हणून या जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी जोरदार मोर्चेबांधणी करीत शासकीय स्तरावरून श्रीमती गोयल यांच्यावर पदभार स्वीकारू नये म्हणून दबावतंत्राचा प्रकार सुरू केला. परिणामी दुपारी तीन वाजेपर्यंत गोयल यांनी पदभार स्वीकारला नाही.दरम्यान त्यांच्याऐवजी कनिष्ठ अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी पदाचा पदभार सुपूर्त व्हावा असा कुटीर उद्योग या जिल्ह्यातील काही नेते मंडळींनी सुरू केला आहे विशेष म्हणजे नूतन जिल्‍हाधिकारी श्रीमती गोयल या गेल्या दोन दिवसापासून परभणीत दाखल झाल्या आहेत.


महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांच्याकडिल शासन निर्णय क्रमांक / संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१३/मातंक दि. २२ फेब्रुवारी २०१९, भारतीय सर्वेक्षण विभाग,डेहराडून व भूमि अभिलेख विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोनपेठ तालुक्यातील सर्व महसुली गावांचे गावठाणातील मिळकतीचे ड्रोनव्दारे मोजणी म्हणून गावातील सर्व मिळकत धारकांनी आपल्या मिळकतीचे अचुक सिमांकन
चुना अथवा कलर द्वारे पूर्वतयारीत करून घ्यावे असे आवाहन गावठाण जमाबंदी प्रकल्पाचे जिल्हा स्तरीय संनियंत्रण समितीचे सदस्य अचुक सिमांकन तथा जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख,परभणी,तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी मा.दर्शन निकाळजे,तहसिलदार मा.डॉ.आशिषकुमार बिरादार,गटविकास अधिकारी मा.सचिन खुडे व मा.राम सिध्दराम सदस्य सचिव उपअधीक्षक भूमि अभिलेख यांचेकडून तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत आहे.

Thursday, July 29, 2021

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्‍हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्‍हा दौरा कार्यक्रम



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्‍ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          शुक्रवार दि. 30 जुलै 2021 रोजी औरंगाबाद येथून मोटारीने देवगाव फाटा ता.सेलू येथे दुपारी 1:45 वाजता आगमन व अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी, दुपारी 2 वाजता जिंतूरकडे प्रयाण, दुपारी 2:30 वाजता जिंतूर येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता नगरपरिषद जिंतूर येथील मौलाना हुसेन अहेमद मदनी कम्युनिटी हॉल लोकार्पण सोहळा व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता कम्युनिटी हॉल येथून प्रयान व श्री संत भगवान बाबा चौक येथे नगर परिषदेचे स्ट्रीट लाईट व हायमास्क विकास कामांचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 4:15 वाजता जिंतूर येथून चांदजकडे प्रयाण, सायंकाळी 4:25 वाजता आगमन व करपरा नदी काठी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करतील. सायंकाळी  4:40 वाजता बोरीकडे प्रयाण करतील. सायंकाळी 4:50 वाजता बोरी येथे आगमन व बोरी बसस्थानक ते करवली टी पॉईंट मेन रोड बोरी येथे सी.सी. रोड व नाली बांधकाम शुभारंभास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता ग्रामपंचायत बोरी नूतन इमारतीचा व इतर कामांचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 5:45 वाजता राखीव. सायंकाळी 6:15 वाजता डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहाचे लोकार्पण करतील ( स्थळ :- परभणी रोड बोरी). सायंकाळी 6:45 वाजता बोरी येथून परभणीकडे मोटारीने प्रयाण, सायंकाळी 7:30 वाजता परभणी येथे आगमन राखीव व मुक्काम करतील. 
          शनिवार दि. 31 जुलै 2021 रोजी सकाळी 9 वाजता परभणीचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा ( स्थळ-  जिल्हाधिकारी कार्यालय परभणी). सकाळी 10 वाजता जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती  ( स्थळ-  जिल्हाधिकारी कार्यालय परभणी). दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद  ( स्थळ-  जिल्हाधिकारी कार्यालय परभणी).  दुपारी 1:30 वाजता पाथरी येथे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत परभणी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्यासमवेत बैठकीस उपस्थिती ( स्थळ-  जिल्हाधिकारी कार्यालय परभणी). दुपारी 2 ते 3 वाजता राखीव. दुपारी 3 वाजता परभणी येथून मोटारीने पाथरीमार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.
                -*-*-*-*-

सेलूतील प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक निलंबित, अन्य कर्मचार्‍यांवर गंडांतर

सेलूतील प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक निलंबित, अन्य कर्मचार्‍यांवर गंडांतर



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांच्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंध विभागाने केलेल्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी बुधवारी (दि.28) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी रामभाऊ वायाळ यांच्याविरुध्द निलंबनाची कारवाई केली.
     दरम्यान, या प्रकरणात पोलिस अधिक्षक मीना यांनी अन्य काही कर्मचार्‍यांच्या संयशास्पद भूमिकांबद्दलही चौकशी सुरु केली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वायाळ हे सेलू उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात लेखनिक म्हणून कार्यरत होते. तपासी अंमलदार यांना संपर्क साधून वायाळ यांनी त्या गुन्ह्याबाबत कागदपत्रे मागवून चौकशी केली. तसेच काहींचे जवाबही नोंदविले. या प्रकरणातील त्यांचे हे बेकायदेशीर कृत्य पोलिस अधिक्षक मीना यांनी हेरून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल वायाळ यांना निलंबित केले.
दरम्यान, पूर्णा पोलिस ठाण्यातील एक चालक, तसेच सोनपेठ पोलिस ठाण्यातील एक पोलिस हवालदार यांनाही अन्य प्रकरणात निलंबित करण्यात आले असल्याची माहिती हाती आली आहे.

Wednesday, July 28, 2021

पूर्णा तालुक्यात गांजाची झाडे व साठा जप्त ;दोन शेतकरी ताब्यात

पूर्णा तालुक्यात गांजाची झाडे व साठा जप्त ;दोन शेतकरी ताब्यात



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

पूर्णा तालुक्यातील आव्हई शिवारात मंगळवारी (दि.27) दुपारी एका शेतात गांजा पिकवणार्‍या 2 शेतकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेवून झाडे व गांजाचा साठा जप्त केला.
     पोलिस निरीक्षक सुभाष मारकड, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे, पोलिस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे, गुट्टे महेंद्र पोपलवर सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक नितीन वडकर, पोहेकॉ अर्जुन रनखांब, विजय जाधव, मनोज नलगिरकर जमादार, पो ना शेख जुबेर, नागनाथ पोटे, किशोर कवठेकर, दत्ताजी काकडे, पोलीस कॉन्टेबल समीर अख्तर पठाण, समीर साबीर पठाण, मंगेश जुकटे, विष्णू भिसे, देविका मनवर आदींनी या कारवाईत सहभाग नोंदविला.
आव्हई गावाच्या पूर्वेस शेतात गांजाची पूर्ण वाढ झालेले एक झाड व कोरडा गांजा जप्त करीत पोलिसांनी शेतकर्‍यास ताब्यात घेतले. तसेच पश्‍चिमेस असणार्‍या एका शेतातूनही कोरड्या गांजाचा मोठा साठा जप्त केला. पुढील कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे समजते.

Monday, July 26, 2021

खोटा फेरफार प्रकरणी सेलू पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल ; मंडळ अधिकारी,तलाठी व सहायक चा प्रताप

खोटा फेरफार प्रकरणी सेलू पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल ; मंडळ अधिकारी,तलाठी व सहायक चा प्रताप


सेलू / सोनपेठ (दर्शन) :-

खोटे  व बनावट कागदपत्रे तयार करून खोटा फेरफार केल्या प्रकरणी तालुक्यातील रायपूर येथील मंडळ अधिकारी अमर जोरगेवार,तलाठी सचिन नवगिरे, व त्यांचा सहायक ऑपरेटर गटकळ यांच्या विरोधात भगवान कोंडीबा काकडे याच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास स पो नी संतोष माळगे करीत आहेत तालुक्यातील रायपूर येथे सर्व्हे नंबर २७७ मध्ये २ हेक्टर ९८ जमीन आहे .आपसातील भाऊवाटण्यानुसार भगवान कोंडीबा काकडे व प्रकाश कोंडीबा काकडे यांच्या हिश्यास आली आहे .परंतु ही जमीन भाऊसाहेब कोंडीबा काकडे यांच्या नांवे आहे .सदरील जमीन आपल्या नांवे करावी यासाठी प्रकाश कोंडीबा काकडे यांनी सेलू न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे . प्रकरण सेलू न्यायालयात दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर दावा क्रमांक २०/२०१८ प्रलंबित आहे .व याची पूर्ण कल्पना मंडळ अधिकारी व तलाठी व सहायक यांना असतांना देखील त्यांनी संगनमताने भावा भावात वाद घडवून आणण्याच्या उद्देशाने साहेब कोंडीबा काकडे यांच्या ताब्यात नसलेल्या व फक्त नांवावर असलेल्या जमिनीचा फेरफार क्रमांक ५४७६ नुसार त्यांच्या दोन मुलांच्या नांवाने केला आहे .यासाठी त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय सेलू येथील दस्त क्रमांक ६३५ दाखवला आहे .परंतु दुय्यम निबंधक कार्यलयात मात्र हा दस्त संतोष तातेराव काकडे यांच्या नांवे तारण मुक्त नोंद आहे .मंडळ अधिकारी,तलाठी व त्यांचा सहायक ऑपरेटर यांनी खोटे व बनावट कागदपत्रे दाखवून आपली फसवणूक केली अशी फिर्याद भगवान कोंडीबा काकडे यांनी सेलू पोलिसांत दिली आहे .या फिर्यादी नुसार सबधितांच्या विरोधात भारतीय दंड  संहिता अधिनियम नुसार कलम ४२०,४६७,४६८,३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

Friday, July 23, 2021

सेलूच्या त्या पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांनी मागितली दोन कोटीची लाच झाला आरोपी

सेलूच्या त्या पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांनी मागितली दोन कोटीची लाच झाला आरोपी



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल व पोलीस नाईक गणेश लक्ष्मणराव चव्हाण या दोघांनी एका तक्रारदार यांच्याकडून दोन कोटी रुपयांची लाच मागितली,तडजोडीअंती एक कोटी 50 लाख रुपयांची मागणी केली.त्यापोटी दहा लाख रुपयांची लाजेची रक्कम स्वीकारली असे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या दोघांविरुद्ध सेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाबाबत माहिती अशी तक्रारकर्ता त्यांच्या मित्राचा अपघाती मृत्यू झालेला होता. 3 मे 2019 रोजी सेलू पोलीस ठाण्यात त्यानुषंगाने गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातील मयत याचे पत्नी सोबत तक्रारकर्ता यांचे झालेले मोबाईलवरील संभाषण व्हायरल झाले, तेव्हा 9 जुलै 2021 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी पाल यांनी तक्रारकर्ता  यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून तुझी व्हायरल झालेली क्लिप मी ऐकली असून त्यातून तुला बाहेर पडावयाचे असेल तर मला दोन कोटी रुपये द्यावे लागतील असे सुनावले.या तक्रारकर्ता यास वारंवार फोन करून अर्वाच्य शिवीगाळ केली. तसेच दोन कोटी रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारकर्त्याने या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्याकडे 22 जुलै रोजी प्रत्यक्ष येऊन लेखी तक्रार दिली.त्या तक्रारीच्या आधारे मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने 23 जुलै रोजी पडताळणी केली, तेव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी पाल यांनी दोन कोटी रुपयांची मागणी करीत तडजोडीत एक कोटी 50 लाख रुपये इतकी रक्कम मागितली. त्यापाठोपाठ या विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाई दरम्यान पोलीस नाईक चव्हाण याने तक्रारकर्त्याच्या भावाकडून त्यापोटी दहा लाख रुपयांची लाजेची रक्कम स्वीकारली. त्यास रंगेहात पकडण्यात आले.दरम्यान मुंबईच्या  प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईने पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे

परभणी शहरातील परळी गेट येथे भुयारी रस्ता करण्याची मागणी

परभणी शहरातील परळी गेट येथे भुयारी रस्ता करण्याची मागणी



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा परभणीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की परभणी रेल्वेस्थानकातून परळी व औरंगाबादकडे जाणारा रेल्वे मार्ग हा परभणी शहरातील वस्तीतून जातो  दिवसभरात अनेक रेल्वे याठिकाणाहून जात असल्याने या ठिकाणी वाहतूकीची नेहमीच कोंडी होत आहे या मार्गावर परभणी - परळी व परभणी - औरंगाबाद या मार्गावर साखला प्लॉट , भीम नगर , पारवा गेट जवळ असे तीन रेल्वे फाटका आहेत . येथील नागरीकांना रहदारीसाठी हा एकमेव रस्ता असल्याने या ठिकाणी रहदारी , वाहतुक बऱ्याच प्रमाणात असल्याने तसेच या तीन्ही फाटका जवळ भरगच्च वस्ती ( प्रत्येकी भागात 20-25 हजार लोकसंख्या ) आहे . मात्र या मार्गावरून सतत रेल्वे गाड्या जात असल्याने सदर तीन्ही रेल्वे फाटक बंद असते या ठिकाणाहून शहरातील मुख्य ठिकाणी म्हणजे दवाखाना , रेल्वे स्टेशन , बस स्थानक , शाळा - कॉलेज तसेच बाजारपेठेत जाण्यास नेहमीच रहदारीचा प्रश्न निर्माण होत आहे एखादा सिरीयस पेशंट दवाखान्यात घेऊन जायचा असेल , विद्यार्थ्यांना शाळा - महाविद्यालयत जायचे असेल , या परिसरात कोणाचा मृत्यू झाला व त्यास अंत्यविधीसाठी घेऊन जायचे असेल किंवा कोणास इतर कुठे जायचे असेल तर त्यांच्यासाठी हे रेल्वे फाटक अतिशय अडचण निर्माण करणारा ठरत आहे बऱ्याचवेळी या ठिकाणी या समस्येमुळे अनेक वाद निर्माण झालेले आहेत या गंभीर समस्येचा सहानूभुतीपूर्वक विचार करून परभणी - परळी व परभणी - औरंगाबाद या मार्गावर साखला प्लॉट , भीम नगर , पारवा गेट या तीन्ही रेल्वे फाटकावर भूयारी पुल , लोखंडी पुल किंवा इतर पर्यायी व्यवस्था करून येथील हजारो लोकांची अडचण दूर करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका शाखेच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर अब्दुल रहीम,के.बि.शिंदे,धाराजी भुसारे, सय्यद रफीक पेडगावकर,गोपाळ कच्छवे, विजय सोपानराव चट्टे , बाबासाहेब भोसले,लक्ष्मण पवार योगीराज वाकोडे, मुजीब खान,चंद्रकांत घाडगे यदि आदिंच्या स्वाक्षरी आहेत.

सरकारी कामगार अधिकारी टी.ई.कराड यांनी पदभार स्वीकारला

सरकारी कामगार अधिकारी टी.ई.कराड यांनी पदभार स्वीकारला



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी येथील सरकारी कामगार अधिकारी रिक्त असलेल्या पदावर जालना येथील सरकारी कामगार अधिकारी टी.ई.कराड यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील कामगार अधिकारी रोहन घनश्याम रुमाले च्या विरोधात कामगारांच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणी न करता कामात अनियमितता दप्तर दिरंगाई केल्या बाबतचे अनेक तक्रारी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, संघटनेच्यावतीने पुराव्यानिशी वरिष्ठांकडे करण्यात आले होते या अनुषंगाने कामगार आयुक्त मुंबई यांनी या तक्रारीची दाखल घेऊन या विषयी चौकशी समिती गठीत करून चोकशी सुरु असल्याने उपाआयुक्त औरंगाबाद यांनी सरकारी कामगार अधिकारी रोहन रुमाले यांचे कार्यरत असलेले पद काढून घेतले असून सध्या चोकशीचा अहवाल येने बाकी आहे सदर जागा रिक्त असल्याने कामगार कार्यालयात बांधकाम कामगारांना अनेक विविध योजनेच्या कामात अडचणींचा, सामना करावा लागत आहे रिक्त पद तात्काळ भरण्यासाठी एमडिओ संघटनेने वरिष्ठांकडे मागणी केली होती या अनुषंगाने दिनांक १३.०७.२०२१ रोजी अतिरिक्त कार्यभार म्हणून कामगार उप आयुक्त औरंगाबाद कार्यालयाच्या एका पत्राद्वारे टी.ई.कराड सरकारी कामगार अधिकारी ,जालना कार्यरत असलेले यांना संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने सरकारी कामगार अधिकारी परभणी या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रस्तावित केले आहे त्यानुसार टी.ई.कराड सरकारी कामगार अधिकारी परभणी या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेशापर्यत तात्पुरत्या स्वरुपात सोपविण्यात आले आहे टी.ई.कराड यांनी सदर कामकाज त्यांचे स्वतचे कामकाज सांभाळून पहावे सदरहु आदेश तात्काळ अमलात येतील कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे मान्यतेने नवीन (भा.भा.मोरडे) कामगार उप आयुक्त ( प्रशासन ) मुंबई  यांच्या आदेशानुसार संबंधितांना कळविले आहे आज दिनांक २३.०७.२०२१ रोजी परभणी सरकारी कामगार अधिकारी म्हणून टी.ई.कराड यांनी पदभार स्वीकारला आहे या आदोगर टी.ई.कराड हे परभणी येथील सरकारी कामगार अधिकारी म्हणून अनेक वर्षं कार्यरत होते.

Wednesday, July 21, 2021

प्रत्येक शिवसैनिकांनी जनसेवा करत नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे-राजेश विभूते

प्रत्येक शिवसैनिकांनी जनसेवा करत नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे-राजेश विभूते





परळी वैजनाथ / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

विश्व हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, युवा सेनेचे प्रमुख ना.आदित्य साहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी परळी शहरातील प्रत्येक शिवसैनिकांनी जनसेवा करत कामाला लागून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत असे प्रतिपादन शिवसेना परळी शहरप्रमुख राजेश विभूतेे यांनी केले. श्री.राजेश विभूते यांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि.11 जुलै पासून शिवसंपर्क अभियानच्या रथाचे पुजन करून परळी शहरातील विविध प्रभागात राबवित आहेत. 
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि.11 जुलैपासून राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत मराठवाडा संपर्क नेते. मा.चंद्रकात खैरे साहेब 
बीड जिल्हा. संपर्क प्रमुख. मा.अनंदजी जाधव साहेब,  बीड जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, यांच्या आदेशाने व तालुका प्रमुख व्यंकटेश भैय्या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच परळी शिवसेनेचे शहरप्रमुख तथा आयोजक राजेश विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंपर्क अभियान सुरू आहे. या अंतर्गत परळी शहरातील विविध प्रभागातील वडार कॉलनी, माणिकनगर, पेठ गल्ली, किर्तीनगर, सिद्धेश्वरनगर, गणेशपार, नरहरी महाराज मंदिर परिसर, गंगासागर नगर या भागात भेटी देत आहेत. यावेळी जेष्ठ शिवसैनिकांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी घेवून यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला. तसेच विविध प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्या तात्काळ सोडविल्या जात आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे उपस्थित होते.या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक वैद्यनाथ बँक संचालक नारायणराव सातपुते, विधानसभा प्रमुख राजा भैय्या पांडे , बीड जिल्हा समन्वयक. रमेश चौंडे युवासेना तालुका आधिकारी संतोष चौधरी, माजी शहर प्रमुख भोजराज पालीवाल , जेष्ठ नेते शिवाजीराव शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे म्हणाले की, शिवसेना ही एक चळवळ आहे, पक्षातील पदाधिकार्‍यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे, गावातील लोकांचे कामे करून त्यांचा विश्वास संपादन करणे गरजेचे असूनपरळी तालुक्यात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी करावी, आगामी काळ हा शिवसेनेचाच आहे असे आवाहन व्यंकटेश शिंदे यांनी केले.
यावेळी बोलतांना श्री विभूते म्हणाले की, राज्यात सत्ता शिवसेनेचे आहे, प्रत्येक शिवसैनिकांनी जनसेवा करत नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे सांगून शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परळी शहर व तालुक्यात शिवसेनेेची ताकद वाढणार असून आगामी काळ हा शिवसेनेचाच राहणार असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  उपशहर प्रमुख मोहनराव राजमाने  वैजनाथ माने सुदर्शन यादव दिपक शिंदे तुकाराम नलवडे अमोल गायकवाड युवराज सोळंके सतिश कदम नवनाथ विभुते अनिल अप्पा शिंदे मुंजा पोटे दत्ता भोयटे रमेश अप्पा काळे शिवाजी केसापुरे प्रकशा पोरे  बदने व शिवसैनिक होते.

दोन अत्याधुनिक कार्डिअक अम्ब्युलन्स चे उद्या पाथरी नगरपरिषदेस लोकार्पण सोहळा

दोन अत्याधुनिक कार्डिअक अम्ब्युलन्स चे उद्या पाथरी नगरपरिषदेस लोकार्पण सोहळा




पाथरी / सोनपेठ (दर्शन) :-

मा.ना. श्री. अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या वाढदिवसानिमित्त आमदार श्री बाबाजानी दुराणी यांच्या आमदार फंडातुन घेतलेल्या दोन अत्याधुनिक कार्डिअक अम्ब्युलन्स चे उद्या पाथरी नगर परिषदेस लोकार्पण करण्यात येणार आहेत. हृदयविकार, मेंदू व इतर गंभीर रुग्णांना अनेकदा मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद अश्या ठिकाणी हलवावे लागत असल्याने अश्या प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कार्डिअक अम्ब्युलन्सची गरज आहे हे लक्षात घेऊन आमदार श्री बाबाजानी दुराणी यांनी आपल्या आमदार विकास निधी मधून सुमारे 60 लक्ष खर्च करून अश्या अत्याधुनिक दोन कार्डियक अम्ब्युलन्स आणल्या आहेत. या अम्ब्युलन्स उद्या दि. 22 जुलै 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता पाथरी नगरपरिषदेस या अम्ब्युलन्स चे लोकार्पण करण्यात येणार आहे. पाथरी शहर व पाथरी तालुक्यातील जनतेला तात्काळ आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. गरजेप्रमाणे जिल्ह्यातील रुग्णालये, हॉस्पिटलमधील रुग्णासाठी यांनाही ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.त्याअनुषंगाने या लोकार्पण सोहळ्यासाठी आमदार श्री बाबाजानी दुराणी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास पाथरी शहरातील सर्व नगरसेवक, व्यापारी, डॉक्टर्स व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत. बुधवार दि 22 जुलै रोजी रोजी दुपारी 1.00 वाजता पाथरी नगर परिषद येथे हा सोहळा पार पडणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास सर्व जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन सौ. मीना नितेश भोरे, अध्यक्ष, नगर परिषद पाथरी यांनी केले आहे.

Friday, July 16, 2021

जिल्हा टास्क फोर्सची बैठक संपन्न
*कोरोनाने पालकत्व गमावलेल्या बालकांची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत*
-         जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर
 
            परभणी, दि.16 (जिमाका) :-  कोविड-19 या आजारामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दलाची स्थापना झाली असून कोरोना या आजारामुळे एक अथवा दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील बालकांची संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून स्वत: त्या कुटुंबाशी  संपर्क साधून माहिती जाणून घ्यावी तसेच कागदपत्रांची पुर्तता करुन प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. असे  निर्देश जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी  दिले.
            जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची आढावा बैठक शुक्रवार दि.16 जुलै 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव एफ.के. शेख, महापालिका आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जी.आर.अंधारे,  यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर म्हणाले की, कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना  इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, संजय गांशी निराधार पेंशन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना आदि योजनांचा ताबडतोब लाभ देण्यासाठी तात्काळ कार्यवाही सुरु करावी असे निर्देश दिले. तसेच एक व दोन्ही पालक गमावलेली बालके, विधवा महिला यांची माहिती घेवून सर्व प्रस्ताव सादर करावेत.  ग्रामपंचयातीमधून रहिवाशी प्रमाणपत्र तर आधारकार्डवरील जन्म दिनांक ग्राह्य धरुन योग्य ती कार्यवाही वेळेत करावी असेही सांगितले.
            या बैठकीपुर्वी जिल्हास्तरीय कृतीदलातील सदस्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा, कोविड-19 या आजारामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील शुन्य ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची व त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा, विधवा महिलांविषयक माहितीचा आढावा, कोविड-19 च्या कालावधीत विधवा झालेल्या महिलांकरीता शासकीय योजनेअंतर्गत मदत  आदी विषयक सविस्तर माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जी.आर.अंधारे यांनी दिली. या बैठकीस जिल्हा बाल कल्याण समिती, चाईल्डलाईन व इतर संबंधित विभागाचे अधिकारी आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*कोरोनाने पालकत्व गमावलेल्या बालकांसाठी तीन दिवसीय शिबीराचे आयोजन*

        परभणीचे जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांच्या आदेशानूसार बाल कल्याण समितीने दि.19, 20 आणि 21 जुलै 2021 या रोजी परभणी शहर येथील जुना पेडगाव रोडवरील सहकार पाटीजवळील बाल कल्याण समितीच्या कार्यालयात तीन दिवसीय शिबीराचे आयोजन केले असून कोरोनामुळे एक पालक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या नातेवाईकांनी बालकांचे आधारकार्ड, मृत्यू झालेल्या व्यक्तींचा मृत्यू दाखला, बोनाफाईड, रहिवासी दाखला, संपत्तीबाबतची कागदपत्रे, सातबारा, मालमत्तेची कागदपत्रे आदीची पुर्तता करुन परिपुर्ण प्रस्ताव करण्यात येणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

अपयश आले म्हणून घाबरून न जाता यशासाठी पुन्हा प्रयत्न करावेत - दर्शन निकाळजे

अपयश आले म्हणून घाबरून न जाता यशासाठी पुन्हा प्रयत्न करावेत - दर्शन निकाळजे


सोनपेठ (दर्शन) :- 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संलग्न कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात दीक्षांत समारंभाचे दि.16 जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उप विभागीय अधिकारी दर्शन निकाळजे हे होते, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम, अप्पर तहसीलदार ऐश्वर्या गिरी तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वसंत सातपुते होते.अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.डाॅ.मुकुंदराज पाटील, परीक्षा प्रमुख प्रा. डॉ.शिवाजी वडचकर हे मंचावर उपस्थित होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून दर्शन निकाळजे उप विभागीय अधिकारी  मार्गदर्शन करताना त्यांनी कुठल्याही सजीवाला आपले आयुष्य यशस्वी जगण्यासाठी सक्षमता मिळवावी लागते, मानवासाठी ही सक्षमता शिक्षणा मधून आत्मसात करता येते, अलीकडच्या काळात विकसित जगामध्ये करियर ही महत्त्वाची बाब आहे परंतु त्याचबरोबर आपले जीवन अनमोल आहे त्यामुळे करिअर कडे गंभीरपणे पहा पण आयुष्यात गंभिर बनून चुकीच्या बाबी करू नयेत, अपयश आले म्हणून घाबरून न जाता यशासाठी पुन्हा प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन केले.या प्रसंगी अप्पर तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी आपल्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान या बाबी माणसांने इतरांना त्यांच्या चांगल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण केलेली मदत त्यांच्या चेहर्‍यावर हास्य निर्माण करते त्यावेळी मिळतात म्हणून माणसांनी एकमेकांना चांगल्या कामात सहकार्य केले पाहिजे, आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग मानवी समाजाच्या हितासाठी केला पाहिजे, असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ वसंत सातपुते यांनी अनेक लोक यशस्वी होतात, ते आपण पाहतो पण अनेक वेळा अपयशी झाल्यानंतरही प्रयत्न न सोडता, शेवटी यशाचे अत्युच्च शिखर गाठणारे, अनेक यशस्वी लोक या जगामध्ये आहेत. त्याप्रमाणे ध्येय निश्चित करून यशासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सखाराम कदम, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ शिवाजी वडचकर तर आभार आयक्यूएसी समन्वयक प्रा डॉ मुकुंदराज पाटील यांनी मानले, कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. संदीपकुमार, देवराये  यांच्यासह महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचा सहभाग होता.

Thursday, July 15, 2021

आ.सुरेश वरपुडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुमित पवार यांच्या वतीने ग्रंथ भेट

आ.सुरेश वरपुडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुमित पवार यांच्या वतीने ग्रंथ भेट



सोनपेठ (दर्शन)  :-

पाथरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांचा वाढदिवस जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सर्वत्र विविध उपक्रमाचे आयोजन करीत उत्साहाने साजरा केला.सोनपेठ येथे सुमित भैय्या मित्र मंडळाच्या वतीने ही ग्रंथदान करून आ.वरपुडकर यांचा वाढदिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला.सोनपेठ युवा नेते सुमित भैय्या पवार यांच्या संकल्पनेतून सोनपेठ शहरातील वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ग्रंथ वाचन चळवळीस ग्रंथदान करण्याचे ठरविले.यासाठी त्यांनी तातडीने दर्जेदार पुस्तके मागवली व दि.14 रोजी त्यांच्या राहत्या घरी सोनखेड येथे सेवानिवृत्त सनदी अधिकारी बळीराम पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सिरसाठ, राजकुमार अंभुरे, सुमित भैय्या पवार यांच्या हस्ते ग्रंथदान करण्यात आले तर सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे संस्थापक अध्यक्ष राजेश खेडकर, सदस्य तथा पत्रकार राधेश्याम वर्मा यांनी सदरील ग्रंथ भेट स्विकारली.यावेळी सुमित भैय्या पवार, सरपंच सुशांत पवार, राजुभाई सौदागर, सा.सोनपेठ दर्शन चे संपादक किरण स्वामी,कलीम कुरेशी,बळीराम उपाडे, मुन्शीभाई कुरेशी, अच्युत राठोड, बाळासाहेब मस्के, अनील पवार, धनंजय घुगे, बंडु गिरी, बिलाल शेख, राजेभाऊ चव्हाण आदींसह सुमित भैय्या मित्र मंडळांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
         शनिवार दि.17 जुलै 2021 रोजी रात्री 7 वाजता माजलगाव येथून शासकीय विश्रामगृह परभणी येथे  आगमन व मुक्काम करतील.
        रविवार दि.18 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता गृह, वित्त व नियोजन, रा.ऊ.शु, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता, पणन विभागाची परभणी जिल्हा आढावा बैठक (स्थळ: शासकीय विश्रामगृह, परभणी), दुपारी 12.15 वाजता परभणी जिल्हा शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत बैठक, दुपारी 1.30 ते 2 वाजेपर्यंत राखीव, दुपारी 2 वाजता मोटारीने औंढा नागनाथमार्गे हिंगोलीकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

Tuesday, July 13, 2021

मुगळीकर यांच्या सेवानिवृत्त नंतरच आंचल गोयल पदभार स्विकारणार

मुगळीकर यांच्या सेवानिवृत्त नंतरच आंचल गोयल पदभार स्विकारणार

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली;खरी परंतु त्या परभणी येथील जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या सेवानिवृत्त नंतर म्हणजे 31जूलै रोजी दुपारी  पदभार स्विकारणार अशी माहिती सुत्रांनी दिली.
राज्यातील काही जिल्हाधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने मंगळवारी सायंकाळी बदल्या केल्या या यादीत परभणीच्या जिल्हाधिकारीपदी गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे नमूद केले, त्यामुळे प्रशासकीय पातळीवर तसेच अन्य क्षेत्रात आश्चर्यव्यक्त केले गेले, कारण जिल्हाधिकारी मुगळीकर हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत, त्याआधीच नूतन जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती  संभ्रमावस्थेत टाकणारी ठरली, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी मुगळीकर हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतरच नूतन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल हा पदभार स्वीकारतील 
दरम्यान नुतन जिल्हाधिकारी म्हणून गोयल यांची नियुक्ती करण्यात आली , मंगळवारी सायंकाळी या संदर्भात आदेश लागू झाले आहेत श्रीमती गोयल या सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य फिल्म, सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे पिक विमा संदर्भात आवाहन ;शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची तक्रार नोंदवावी

जिल्हाधिकाऱ्यांचे पिक विमा संदर्भात आवाहन ;शेतकऱ्यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची तक्रार नोंदवावी


परभणी / सोनपेठ (दर्शन):- 
प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून राबविण्यात येत आहे.  शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यास सुरुवात केली असून पिक विमा भरण्याची अंतिम मुदत दि.15 जुलै 2021 ही आहे.  रविवार दि.11 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा पिक विमा काढलेला असून त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा संबंधितांनी गुगल प्ले स्टोअरवरुन ‘क्रॉप इन्शुरन्स’ हे ॲप डाऊनलोड करावे व त्यामध्ये पिक विमा संरक्षण घेतलेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती स्थानिक आपत्तीअंतर्गत नुकसानग्रस्त फोटोसह अपलोड करावी किंवा 18001024088 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.
            ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन तक्रार नोंदवणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हा अथवा तालुका कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह तक्रार नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीची नोंद करणे आवश्यक आहे. सध्या पिकाचे नुकसान हे अतिवृष्टीमुळे झाले असल्याने अतिवृष्टी हेच कारण नमुद करुन नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या नुकत्याच पेरण्या होवून काही पिकांची उगवण सुरु असून काही ठिकाणी पिक वाढीच्या अवस्थेत आहेत हे लक्षात घेवून स्थानिक आपत्ती अंतर्गत जोखमीचा धोका घडेपर्यंत पिक विमा काढलेल्या पिकाच्या लागवडीसाठी झालेल्या निविष्ठांच्या खर्चाच्या प्रमाणात नुकसान भरपाई विमा संरक्षित क्षेत्राच्या अधिन राहून मंजूर करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तक्रार नोंदवतांना योग्य ती खबरदारी घेवूनच नुकसानग्रस्त क्षेत्राची नुकसानीची तक्रार विमा कंपनीकडे नोंदवावी. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.


Thursday, July 8, 2021

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करावेत

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करावेत


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगिन कल्याणाकरीता बेरोजगारांना स्वयंम उद्योगासाठी विविध योजना राबविण्यात येतात. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू व कुशल व्यावसायिकांना कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रम, लघु उद्योग, मध्यम उद्योग उत्पादन, व्यापार, विक्री, सेवाक्षेत्र इत्यादीतील व्यवसायाकरीता लाभ दिला जातो. तरी इच्छुकांनी महामंडळाच्या विविध योजनांसाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे.
            योजनेमध्ये 1 लाखापर्यंत थेट कर्ज योजना, 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा 10 लाखापर्यंतची योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना या चार योजनांच्या माध्यमातून इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. कर्ज योजना ही बँकेमार्फत राबविण्यात येत असून लाभार्थ्यांने महामंडळाच्या www.msobcfdc.org संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज  करावेत. तसेच या योजनांचा लाभ  इतर मागासवर्गीय समाजातील जास्तीत जास्त व्यक्तींनी घ्यावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी येथे संपर्क साधावा. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

Tuesday, July 6, 2021

परभणी जिल्हा प्रशासनाला नामांकित “स्कॉच” संस्थेचे प्रतिष्ठीत “ऑर्डर ऑफ मेरीट” प्रमाणपत्र

परभणी जिल्हा प्रशासनाला नामांकित “स्कॉच” संस्थेचे प्रतिष्ठीत “ऑर्डर ऑफ मेरीट” प्रमाणपत्र 



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेचे मानले जाणार्‍या सन २०२१ वर्षाच्या ७४व्या स्कॉच अवार्डची घोषणा नुकतीच करण्यात आली. परभणी जिल्हा प्रशासनातर्फे सादर केलेल्या “इफेक्टीव यूज ऑफ इनफोर्मेशन टेक्नोलॉजी ड्युरींग कोव्हीड-१९” अर्थात “कोव्हीड-१९ कालवधीत माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर” या उपक्रमाला उपविजेत्यापर्यंत मजल गाठली असून “स्कॉच” संस्थेचे प्रतिष्ठीत “ऑर्डर ऑफ मेरीट” प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. 
सन २०२१च्या पुरस्कारासाठी टेक्नॉलॉजी, पावर, गव्हर्नन्स, स्कील, रीसपॉन्स टू कोव्हीड अशा  गटात राष्ट्रीय स्तरावर  नामांकणे मागविण्यात आली होती. कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करतांना राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील प्रकल्पांची यशस्वीरित्या अंमंलबजावणी करण्यासोबतच मा. जिल्हाधिकारी श्री दिपक मुगळीकर यांनी परभणी जिल्ह्यात अनेक नाविन्यपुर्ण उपक्रमाद्वारे माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर केला. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री सुनिल पोटेकर व त्यांच्या संपूर्ण टीमने संपूर्ण तांत्रिक सहकार्य दिले. या कालावधीत राबवीलेल्या प्रकल्पांच्या आधारे मार्च २०२१ महीन्यात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत स्कॉच संस्थेस “रीस्पॉन्स टू  कोव्हीड” या गटात नामांकन दाखल करण्यात आले होते. 

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या सहाय्याने परभणी जिल्ह्यात कोव्हीड-१९ अंतर्गत अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात जिल्हाप्रशासनास यश आले. मागील वर्षी लॉकडाऊन काळात कापूस खरेदीसाठी शेतकर्‍यांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून ऑनलाईन प्रणालीचा वापर करून सुमारे पन्नास हजार शेतकऱ्यांची गर्दी कमी करण्यात जिल्हा प्रशासनास यश आले. याच धर्तीवर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी होणारी गर्दी नियंत्रीत करण्यासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली वापरण्यात आली. हॉस्पिटल इन्फॉरमेशन कलेक्शन सिस्टीम (एचआयसीएस) प्रणालीद्वारे रुग्णालयांमार्फत दैनंदिन बाह्य रुग्ण आणि आंतररुग्ण यांची माहिती संगणक प्रणालीत घेऊन कोणत्याही वेळी जिल्ह्यात कोविड रुग्णांसाठी किती खाटा उपलब्ध आहेत ही माहिती नागरीकांना  प्रदर्शित करण्यात आली. लॉकडाऊन कालावधीत नागरीकांना घरबसल्या किराणा माल मिळण्याच्या उद्देशाने “पीबीएन शॉप” हे मोबाईल ऍप विकसित करून त्यात भाजी-पाला खरेदीचीपण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याशिवाय दिव्यांग व्यतींचा डाटाबेस आणि  रेमेडीसीवीअर इंजेक्शनचा वाटप नियमित करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा प्रभावीपणे वापर करण्यात आली.

राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ समितीच्या मुल्यमापनाच्या आधारे प्रथम फेरीत उत्तीर्ण होऊन परभणी जिल्ह्याची दुसर्‍या फेरीसाठी निवड करण्यात आली. संस्थेच्या पुरस्कार निवड समीतीसमोर दिनांक२४ एप्रील २०२१रोजी एक  सादरीकरण करण्यात आले. त्या सादरीकरणानंतर परभणी जिल्ह्याचा उपविजेता म्हणुन निवड होऊन दिनांक ३जुलै २०२१ रोजी झालेल्या अंतिम फेरीसाठी परभणी जिल्हा पात्र ठरला. परभणी जिल्ह्याचे सादरीकरण संस्थेच्या वेबसाईटवर प्रदर्शन स्वरूपात प्रदर्शित करण्यात आले. अंतिम फेरीत पुरस्कार समितीने दीलेल्या गुणांकनासोबत  दर्शकांनी कळवलेल्या मताधिक्याचा समावेष करण्यात आला. अंतिम गुणाकंनानुसार विजेत्यांना सुवर्ण आणि रौप्य पुरस्कार देण्यात आले. “रीस्पॉन्स टू  कोव्हीड” या गटात वारानसी स्मार्ट सीटी प्रकल्पास सुवर्ण तर सॅम्पल मॅनेजमेंट सिस्टीम – हिमाचल प्रदेश यांना रौप्य पुरस्कार देण्यात आले. 
"माहिती व तंत्रज्ञानाचा लोकाभिमुख योजनांसाठी प्रभावीपणे कसा वापर करता येईल या दृष्टीने जिल्ह्यात अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आले. “स्कॉच” संस्थेचे प्रतिष्ठीत याची दखल घेऊन अवार्ड ऑफ मेरीट प्रमाणपत्र प्रदान करणे ही  निश्चीतच आनंदाची गोष्ट आहे. या करीता स्कॉच संस्थेचे धन्यवाद आणि आमच्या एनआयसी टीमचे अभिनंदन "-दिपक मुगळीकर, जिल्हाधिकारी,परभणी
“अंतिमफेरीत आमची स्पर्धा अत्यंत बलाढ्य प्रकल्पांसोबत होती. जिल्हाधिकारी महोदयांच्या कल्पकतेने साकारलेल्या या प्रकल्पातील  नाविण्यापूर्णतेमुळे आणि त्यांची उपयुक्तता सिद्ध झाल्यामुळे आम्ही उपविजेत्या फेरीपर्यंत जावू शकलो. या सन्मानाचे संपूर्ण श्रेय मा. जिल्हाधिकारी यांचे यांचे आहे.”
- सुनिल पोटेकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, एनआयसी,परभणी

Monday, July 5, 2021

इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास राज्य सरकारद्वारे मान्यता

इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास राज्य सरकारद्वारे मान्यता




परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 

राज्यातील कोविडमुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावांच्या आधारे तसेच काही निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरु करण्यास राज्य सरकारने सोमवारी (दि.05) एका परिपत्रकाद्वारे मान्यता बहाल केली आहे.
        ग्रामीण भागात कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारित असलेले गावातील, शाळेतील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा. शाळा सुरु करतांना मुलांना टप्प्या टप्प्याने शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदलाबदलीच्या दिवशी, सकाळी-दुपारी, ठरावीक कोर विषयासाठी प्राधान्य ठेवावे. तसेच सोबत दिलेल्या संकेतांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बांकांमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत हात साबनाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षणे असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करुन घेणे इत्यादी बाबींचे काटेकोरपणे पालन केले जावे. संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.

किसानपुत्र आंदोलनाच्या राज्य स्तरीय चिंतन शिबिरात ठरणार लढ्याची रणनीती

किसानपुत्र आंदोलनाच्या राज्य स्तरीय चिंतन शिबिरात ठरणार लढ्याची रणनीती



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

किसानपुत्र आंदोलनाचे दोन दिवसांचे राज्य स्तरीय चिंतन शिबीर 17 व 18 जुलै रोजी परभणी जिल्ह्यातील पोखर्णी (नृसिंह) येथे आयोजित करण्यात आले आहे.
शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण) कायदे रद्द व्हावेत यासाठी किसानपुत्र आंदोलन ही एक चळवळ आहे. या चिंतन शिबिरात शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी रणनीती ठरवणार आहेत. 
किसानपुत्र आंदोलनाच्या कामाचा व्याप वाढल्यामुळे विविध आघाड्या उघडण्यात आल्या आहेत. या शिबिरात या आघाड्याची पुनररचना केली जाणार आहे. न्यायालयीन, संसदीय, जनआंदोलन आदी आघाड्यांचे प्रमुख चर्चेत भाग घेणार आहेत.
शिबिरात राज्यातील विविध जिल्ह्यातील साठ प्रमुख आंदोलक भाग घेणार आहेत. परभणी जिल्ह्यातील सुभाष कच्छवे हे निमंत्रक असून मोहन लोहट शिबीर संयोजक आहेत. नितीन राठोड (पुणे), अमर हबीब (आंबाजोगाई), अमीत सिंग (सातारा-पुणे), ऍड महेश गजेंद्रगडकर (पुणे), असलम सय्यद (पुणे) संदीप धावडे (वर्धा), डॉ आशिष लोहे (अमरावती) राजीव बसरगेकर (नवी मुंबई), अनंत देशपांडे (लातूर-पुणे), शिवाजीराव गावंडे (हिंगोली), दीपक नारे (नागपूर) गजानन वाघमारे (यवतमाळ) आदी मान्यवर विविध सत्रात भाग घेणार आहेत.
शेतकऱयांच्या आत्महत्याना राष्ट्रीय आपत्ती मानून सरकारने त्यावर अग्रक्रमाने विचार करावा शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे रद्द करणे हा देश बळकट करण्याचा कार्यक्रम आहे, अशी किसानपुत्र आंदोलनाची भूमिका आहे. 
-----

Thursday, July 1, 2021

अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने विशेष व्यक्तींचा सन्मान

अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने विशेष व्यक्तींचा सन्मान


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने विशेष व्यक्तींचा सन्मान स्टेट बँक ऑफ इंडिया, स्थापण दिन, कृषी दिन व डॉक्टर्स डे दिनानिमित्त परभणी येथील बॅंकेत मुख्य शाखेचे प्रबंधक व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देवून सन्मान करण्यात आला. तसेच कृषी दिनानिमित्त जिल्हा कृषी अधीक्षक आळसे साहेब व इतर अधिकारी यांना शुभेच्छा देवून सन्मान करण्यात आला.आणि डॉक्टर्स डे दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, निवासी आरोग्य अधिकारी डॉ.सुर्यवंशी तसेच प्रत्यक्षात रुग्णांची तपासणी करत असलेल्या डॉक्टर्स वृंदाचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा व सन्मान करण्यात आला तसेच संघटनेचेे जिल्हा अध्यक्ष डॉ.विलास मोरेे यांनी  शुभेच्छा देवून शब्द सुमनाणे गौरविण्यात आले.या वेळी कोरोनाच्या गंभीर परिस्थिती अनेक गोरगरीब जनतेला विनामूल्य औषधे वाटणारे संघटनेचे सचिव डॉ.संदिप चव्हान यांचे व डॉ.सौ.विद्या चौधरी यांचा त्यांच्या रुग्णालयात जाऊन शुभेच्छा देवून सन्मानित करण्यात आलेे.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक परभणी तालुकाध्यक्ष अब्दुल रहीम यांनी  प्रास्ताविक करत संघटनेचे धेयधोरणाची माहिती दिली या वेळी जिल्हा संघटक धाराजी भुसारे जिल्हा सदस्य के.बि.शिंदे ता उपाध्यक्ष विजय चट्टे, योगीराज वाकुडे, लक्ष्मण पवार, नसीर खान, ओमकार भुसारे उपस्थित होते.