Saturday, June 19, 2021

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर पाथर्डी तालुक्यातील खेर्डा गावात मुक्कामी ; ग्रामस्थांसोबत हितगूज

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर पाथर्डी तालुक्यातील खेर्डा गावात मुक्कामी ; ग्रामस्थांसोबत हितगूज




पाथरी / सोनपेठ (दर्शन) : -

पाथरी तालुक्यातील खेर्डा या गावी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी सायंकाळी चार वाजता भेट दिली. तेथील ग्रामस्थांबरोबर हितगूज केले. त्या गावच्या समस्या, अडीअडचणी ऐकल्या. संबंधितांना कठोर शब्दात सूचना दिल्या. पाठोपाठ त्या गावात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
      काही दिवसांपूर्वी खेर्डा या गावात हातपंपावरील पाण्यावरुन दोन समाजात वाद उद्भवला होता. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहचले होते. त्यानंतर तणाव निवळला. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी या गावास दुपारी चार वाजता भेट दिली. यावेळी  तहसीलदार श्रीकांत निळे, पंचायत समितीचे सभापती सदाशिव थोरात, गटशिक्षणाधिकारी सुहास कारेगावे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी महेश माळवदकर तसेच पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, मंडळ अधिकारी शिवाजी भरकड, उपसरपंच विष्णू सिताफळे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी समावेत होते. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दोन्ही समाजाच्या ग्रामस्थांबरोबर सुसंवाद साधला. एकोप्याने राहण्याचा, परस्परात सामंजस्य राखण्याच्या सूचना दिल्या. आजपर्यंत सर्व समाज एकमेकांच्या सुख-दुःखात, पाठीशी भक्कमपणे उभे राहीले आहेत. भविष्यातसुध्दा मिळूनमिसळून एकोप्याने राहीले पाहिजे. झालेले प्रकार चुकीचे आहे. संबंधितांना न्यायपालिका योग्य ते शासन करील. पोलिस यंत्रणा कारवाई करीत आहेत. परंतु, ग्रामस्थांनी सामाजिक एकता व शांताता राखली पाहिजे, हीच आपली संस्कृती आहे. ग्रामस्थ ती कायम ठेवतीलच, असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांनीही सकारात्मक असा प्रतिसाद, उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया नोंदविल्या. पाठोपाठ गावच्या समस्या मांडल्या. विशेषतः पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, पिककर्ज यासह अडीअडचणी मांडल्या. त्यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांना संपर्क साधून दोन दिवसात वीजेचे पोल उभारुन पुरवठा सुरळीत करावा, असा आदेश दिला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निश्‍चितच सोडविला जाईल, असा विश्‍वास दिला. पीक कर्जासंदर्भात सर्व अर्जांची दखल घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच अन्य प्रश्‍नांबाबतही तपशीलवार चर्चा केली. प्रशासन आपल्या पाठीशी उभे राहील, असा विश्‍वासही दिला. यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी गावातच मुक्कामी राहण्याचा निर्णय घेतला. व सायंकाळी उशीरापर्यंत ग्रामस्थांबरोबर हितगुज सुरु केले. त्यामुळे ग्रामस्था अक्षरशः भाराहून गेले.

No comments:

Post a Comment