जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील अडचणी सोडविण्याची मागणी
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील अधिकार्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत. तसेच या कार्यालयांतर्गत व पत्रकारांसंबंधित अडी-अडचणी तात्काळ सोडवाव्यात, अशी मागणी जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.
जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना बुधवारी (दि.23जून) पत्रकारांनी एक निवेदन सादर केले. त्याद्वारे जिल्हा माहिती कार्यालयात मागील काही दिवसापासून जिल्हयातील पत्रकारांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे, हे निदर्शनास आणून दिले. माहिती कार्यालयातून कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. कार्यालयात वारंवार तोंडी तक्रारी व सूचना देऊनही अडचणी दूर होत नाहीत. मुळात म्हणजे कार्यालयात गेल्या कित्येक दिवसापासून जबाबदार अधिकारी नसल्याने तथा प्रभारी अधिकारी नियमीत उपस्थित नसल्याने अडचणी सुटत तर नाहीत, उलट समस्या वाढत आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी वर्ग 1 यांची नेमणूक करण्यात यावी. जिल्हा कार्यालयात माहिती अधिकारी वर्ग 2 नसल्याने दररोजच्या प्रेसनोट निघत नाहीत. त्यामुळे माहिती अधिकार्यांची पदे भरण्यात यावी. जिल्हा माहिती अधिकारी वर्ग 1 उपलब्ध न झाल्यास नेमणुक केलेल्या प्रभारी अधिकार्यास आठवडयातुन किमान तीन दिवस तरी कार्यालयात हजर राहण्यास अनिवार्य करावे. दैनंदिन प्रसिध्दीपत्रके काढण्यात यावेत. अनेक महत्त्वाचे अधिकारी, मंत्रीगण यांचे दौरे, त्यांच्या प्रेस नोट काढण्यात येत नाहीत त्याबद्दल नियमितपणे माहिती देण्यात यावी. प्रेसनोट दररोज काढणे सक्तीचे करावे. जिल्हयातील पत्रकारांचे अधिस्विकृती प्रकरण, पेंशन प्रस्ताव, आरोग्य विषयक प्रस्ताव नियमित अधिकारी उपस्थित नसल्याने ही प्रकरणे प्रलंबीत राहत असल्याने वेळेत त्रुटी पुर्तता होत नसल्याने पात्र असुनही पत्रकार लाभापासून वंचित राहत आहेत, असे स्पष्ट करीत वरील अडचणी व मागण्यांबाबत जिल्हाधिकारी या नात्याने आपण लक्ष विशेष लक्ष घालुन तातडीने जिल्हा माहिती अधिकारी वर्ग 1 व वर्ग 2 चे अधिकारी उपलब्ध करुन द्यावेत, अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली.
यावेळी सुरेश नाईकवाडे, सुरज कदम, विठ्ठलराव वडकुते, प्रभू दिपके, लक्ष्मण मानोलीकर, शेख इफ्तेकार, नजीब सिद्दीकी, सय्यद अझहर, मोईन खान, प्रवीण देशपांडे, महेमुद खान, सुधाकर श्रीखंडे, राजू कर्डीले, हरिभाऊ सुतारे, राहुल धबाले, बाळू घिके, श्रीकांत देशमुख, मंचक खंदारे, दिलीप बनकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी गुरुवारी (दि.24 जून) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयावर बैठक बोलावली आहे.

No comments:
Post a Comment