आम्ही लढलो- आम्ही घडलो एक दृष्टिक्षेप - राम शिनगारे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे आंबेडकरी, डाव्या आघाडीच्या चळवळीचे केंद्र आहे. याठिकाणी अनेक आंदोलने जन्म घेतात आणि राज्य व्यापून काढतात. हा या विद्यापीठाच्या स्थायी भाव आहे. राज्यातील अनेक विद्यापीठात गैरप्रकार राजरोसपणे होतात. परंतु त्याठिकाणी चळवळी नसल्यामुळे तो मुद्दा उचलण्यात येत नाही. औरंगाबादेत तसे नाही. कोणतीही घटना घडली (मग ती भ्रष्टाचार असेल की प्रवेश प्रक्रियेतील.) त्याला उचलले जाते. त्यामुळे विद्यार्थी संघटनापासून विविध प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक संघटनांच्या आंदोलन, निवेदनांची दखल विद्यापीठ प्रशासनाला घ्यावीच लागते.
याच विद्यापीठाच्या मातीत उद्यास आलेली आणि राज्यभर पसरलेली विद्यार्थी संघटना म्हणजेच ‘एसएफआय’. या संघटनेची महाराष्ट्रात स्थापना केली ती दिवंगत डॉ. विठ्ठल मोरे सर आणि काॅ. उद्धव भवलकर यांनी. एसएफआयचे राज्य अधिवेशन कळंब येथे यशस्वीपणे घेण्यात डॉ.अरुण शेळके यांचाही मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढणारी ही संघटना अनेक अर्थांनी महत्वाची आहे. विद्यापीठासह महाविद्यालयांमध्ये खेड्यापाड्यांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे काम एसएफआय संघटनेने केले आहे. या संघटनेला मी २००९ पासून ओळखतो. विद्यापीठात शिक्षण घेण्यास आलो त्याच वर्षी पत्रकारीता विभागाचा डीआर होता. तेव्हा संघटनेच्या नेत्यांनी प्रचंड आग्रह करीत जीएसची उमेदवारी घेण्याची मागणी केली होती. मात्र ती मी नाकारली असो.
विषय हा आहे की, या चळवळीत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत हक्क मिळविले आहेत. या सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांचे अनुभव शब्दबद्ध करण्याचे महत्वाचे कार्य काॅम्रेड डॉ. Maroti Tegampure यांनी ‘आम्ही लढलो- आम्ही घडलो’ या ग्रंथाच्या माध्यमातून केले आहे. या ग्रंथात डॉ. विठ्ठल मोरे सरांपासून अगदी सध्या कार्यरत असलेल्याही कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा समावेश आहे. एखादी विद्यार्थी संघटनेची बांधणी कशा पद्धतीने होत असते. याचा उत्तम नमुना हा ग्रंथ आहे.
ग्रंथाची सुरुवातच संस्थापक असलेले डॉ. विठ्ठल मोरे सरांच्या मुलाखतीपासून होते. यानंतर काॅ. उद्धव भवलकर डॉ. डी.एल. कराड, कॉ. रामकृष्ण शेरे, डॉ. आदिनाथ इंगोले, राजानंद सुरडकर, डॉ. उमाकांत राठोड, विलास बाबर, डॉ.भाऊसाहेब झिरपे, डॉ. अतुल चौरपगार, ॲड. सुनिल राठोड, ॲड. अमोल गिराम, डॉ. राम बरकुले यांच्यासह अनेकांनी अनुभव मांडले आहेत. यातील प्रत्येकाला लढण्याचे बळ एसएफआय संघटनेेने कसे दिले? आंदोलनांनी जन्म कसा घेतला. त्यासाठी जुळवाजुळव कशी केली. या संघटनेच्या माध्यमातुन मित्रपरिवार कसा जमवला, वाढवला आणि आयुष्यात परिवर्तन कसे घडले आदी अनुभवांचा समावेश आहे.
एसएफआय संघटनेच्या उदयापासून ते अनेक आंदोलनांचा इतिहासाची मांडणीच या ग्रंथातून झालेली आहे. हे अतिशय महत्वाचे आहे. या संघर्ष लढ्यातील तीन योद्धे सध्या आपल्यात नाहीत. त्यांचेही अनुभव यात आलेले आहेत. त्यामुळे जेव्हा केव्हा महाराष्ट्रातील विद्यार्थी संघटनांचा इतिहास लिहिला जाईल. तेव्हा हा ग्रंथच एसएफआयचा इतिहास असणार आहे. हा इतिहास अनेकांना लिहिते करून तयार करण्याचे महत्वाचे कार्य काॅ. मारोती तेगमपुरे यांनी केले आहे. हे अतिशय अभिनंदीय असे पाऊल आहे.
हा ग्रंथ वाचताना प्रत्यक्षात आपणच त्याठिकाणी आहोत, असा फिल येत राहतो. एकाचा संघर्ष वाचला की, दुसऱ्याने काय मांडले असेल याची उत्सुकता लागलेली असते. प्रत्येकाचे अनुभव महत्वाचे आहेत. मी तर म्हणेल, एसएफआय संघटनेच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे अनुभव शब्दबद्ध केले आहेत. आता संघटनेचाही इतिहास लिहायला घेतला पाहिजे. त्यातुन आणखी एक दस्तऐवज तयार होईल. तो आजच्या काळाला दिशादर्शक ठरेल.
- राम शिनगारे

No comments:
Post a Comment