रेशन दुकानांवर कार्डधारकांऐवजी ई-पॉश मशीनवर मे महिन्यात दुकानदाराचाच अंगठा
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
स्वस्तधान्य दुकानातून धान्याचे वितरण करतांना ई-पॉश मशीनवर ग्राहक, कार्डधारक अंगठा लावण्यास घाबरत असल्यामुळे राज्य सरकारने आता मे 2021 या महिन्याकरिता ई-पॉश या मशीनवर कार्डधारकांऐवजी दुकानदाराचाच अंगठा घेवून धान्य वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि धान्याची पावती कार्डधारकांना देणे दुकानदारावर बंधनकारक करण्यात आले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेच्या 42 हजार 43 कार्डधारकांना 9620 क्विंटल गहू व 4927 क्विंटल तांदूळ मे 2021 करिता (प्रति शिधापत्रिका 35 किलो अन्न धान्य) तसेच प्राधान्य कुटूंब योजनेच्या 976225 लाभार्थ्यास प्रति व्यक्तीस 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ या प्रमाणे 29791 क्विंटल गहू, 17977 क्विंटल तांदूळ परभणी जिल्ह्यात मोफत देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजने अंतर्गत लक्ष निर्धारीत केलेल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी मे व जून 2021 करिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्या व्यतिरिक्त परभणी जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेच्या 11 लाख 76 हजार 919 सदस्यांना 81317 क्विंटल गहू व 50883 क्विंटल तांदूळ प्रति सदस्य प्रतिमहा 5 किलो अन्नधान्य मोफत वितरीत केले जाणार आहे, असे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी नमूद केले.
स्थलांतरीत मजूर, बेघर, बाहेरगावचे विद्यार्थी आदींना 15 एप्रिल ते 14 मे या दरम्यान शिवभोजन थाळी निशुल्क देण्यात येत आहे, असेही नमूद केले.

No comments:
Post a Comment