प्रत्येक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका - अब्दुल सत्तार
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रास एक रुग्णवाहिका निश्चितपणे दिली जाईल, आरोग्य विभागाने या संदर्भात तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, असे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
तालुक्यातील झरी येथील आरोग्य केंद्रातील 50 खाटांच्या कोविड सेंटरचा शुभारंभ राज्यमंत्री सत्तार यांच्याहस्ते मंगळवारी सायंकाळी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जून खोतकर, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, शिवसेनेचे नेते डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद आनेराव, जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना देशमुख, गजाननराव देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अतूल सरोदे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बोबडे, सरपंच दादाराव देशमुख, उपसरपंच महेश मठपती, पंचायत समिती सदस्य डॉ. प्रमोदराव देशमुख, सतीश बनसोडे, तानाजीराव भोसले, किशोर देशमुख, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, तहसीलदार संजय बिरादार यांच्यासह अन्य उपस्थित होते.
याप्रसंगी सत्तार यांनी 50 खाटांच्या या आरोग्य केंद्रात आठ ऑक्सीजनचे बेड्स उपलब्ध केल्याबद्दल आरोग्य विभागाचे अभिनंदन केले. हे रुग्णालय निश्चितच कोरोनाबाधित रुग्णांना दिलासादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरीकांना आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत. त्या दृष्टीने सरकार कटीबध्द आहे, असे ते म्हणाले. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे हे मूळ गाव असल्याने या केंद्रावर प्रशासनाद्वारे निश्चितच सर्वतोपरी सुविधा पुरविल्या जातीलच, अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी अन्य मान्यवरांची भाषणे झाली.

No comments:
Post a Comment