उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामे 30 एप्रिलपर्यंत बंद
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय तोकडी असल्याने कोरोनापासून त्यांचा बचाव न झाल्यास भविष्यातील कार्यालयीन कामकाजावर दिर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता संभवते. तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत नवीन वाहनांची नोंदणी, वाहनविषयक कामे, वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा चढविणे व उतरविणे, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, परवाना विषयक कामे, शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, अनुज्ञप्तीविषयक कामे, दुय्यमीकरण, नुतनीकरण ही कामे कार्यालयात गर्दी होवू नये म्हणून बंद ठेवण्यात आली आहेत.
केंद्र शासनाने वाहन विषयक, अनुज्ञप्ती विषयक कागदपत्रांची वैधता दि.30 जून 2021 पर्यंत वाढविलेली आहे. 30 एप्रिलपर्यंत ज्या उमेदवारांनी शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी अपॉईंटमेंट घेतल्या आहेत अशाच लोकांनी अपॉईंटमेंट रद्द करुन पुन्हा नवीन अपॉईंटमेंट सोयी प्रमाणे घ्याव्यात. तसेच त्या पुननिर्गमित करण्यात येतील. याबाबत प्रत्येक अर्जदाराला त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज येईल. जुनी अपॉईंटमेंट रद्द करणे अथवा पुन्हा नवीन घेणे ही प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दि.1 मे 2021 नंतर कार्याललय तत्कालीन शासन निर्णयाप्रमाणे कार्यरत राहील. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment