Wednesday, April 14, 2021

पोलिस दलातील 112 अधिकारी- कर्मचार्‍यांवर उपचार सुरू... काही होमकॉरंटाईन, तर अनेक जण कोविड सेंटरमध्ये दाखल.....

पोलिस दलातील 112 अधिकारी- कर्मचार्‍यांवर उपचार सुरू...
काही होमकॉरंटाईन, तर अनेक जण कोविड सेंटरमध्ये दाखल.....



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोनाविरूध्दच्या या लढाईत अहोरात्र परिश्रम करणार्‍या पोलिस दलातील अधिकारी - कर्मचार्‍यांना कोरोनाच्या विळख्याने अक्षरशः हैराण केले आहे. सद्यस्थितीत थोडे थोडके नव्हे तर 112 अधिकारी - कर्मचारी कोरोनायोध्दे उपचार घेत आहेत. त्यात 16 अधिकारी, 86 पोलिस कर्मचारीव दहा होमगार्डचा समावेश आहे.
जिल्हा पोलिस दलातील दोन कर्मचार्‍यांचा बुधवारी (दि. 14) कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे पोलिस दल अक्षरशः हादरले आहे. एकीकडे अधिकारी - कर्मचारी योध्दे एकापाठोपाठ एक घायाळ होत आहेत. त्यातच ही संख्यासुध्दा चिंता करणारी ठरली आहे. कारण वैद्यकीय अधिकारी - कर्मचार्‍यांप्रमाणे पोलिस दलातील अधिकारी - कर्मचारीसुध्दा कोरोनायोद्ध्याप्रमाणे आपापल्या कार्यक्षेत्रात अक्षरशः अहोरात्र कर्तव्यावर आहेत. दररोज वरिष्ठ पातळीवरून येणारे आदेश, बंदोबस्त, त्यातच या वार्ता ताण देणार्‍या ठरल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, असा एक दृष्टीकोन त्यातच सततचे लॉकडाऊन त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी होणारी होरपळ त्यामुळे माणूसकीचेही दर्शन घडविण्याची दुहेरी भूमिका पोलिस यंत्रणा बजावत आहे. त्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
शहरासह जिल्ह्यात बुधवारपासून म्हणजे जमावबंदी व संचारबंदीचा आदेश लागू झाल्यापासून जिल्हा पोलिस प्रशासनावरील जबाबदार्‍या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एकीकडे विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या व्यक्तींना प्रतिबंध करणे त्यापाठोपाठ विना मास्क फिरणारांविरूध्द दंडात्मक कारवाई करणे या गोष्टी अनिवार्य ठरल्या आहेत. त्यावरच ब्रेक द चेन या मोहीमेचे यशापयश अवलंबून आहे. त्यामुळेच पोलिस प्रशासनाकडे योग्य त्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या नियोजनातच पोलिस दल व्यस्त आहे. एकीकडे एकापाठोपाठ एक अधिकारी - कर्मचारी कोरोनाने घायाळ होत असताना, ते उपचारासाठी किमान 15 दिवस सुट्टीवर असताना कर्तव्यसुध्दा पार पाडण्याची महत्वपूर्ण भूमिका कसरत हे एक आव्हानच ठरत आहे.
आतापर्यंत 258 जण बाधित, सहा जणांचा मृत्यू....
सद्यस्थितीत 112 पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांवर उपचार सुरू आहेत. यातील अनेक जण होमकॉरंटाईन असून काही जण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. यात एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यासह तीन पोलिस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलिस निरीक्षक, नऊ फौजदारांचा समावेश आहे. तर 86 पोलिस कर्मचारी असून दहा होमगार्डचा समावेश आहे.
दरम्यान, मागील वर्षीपासून मंगळवारपर्यंत (दि.13) 258 अधिकारी - कर्मचारी बाधित आढळले आहेत. त्यात 41 अधिकारी, 203 कर्मचारी, 11 होमगार्ड, लिपीक दोन व एका शिपायाचा समावेश आहे. आतापर्यंत सहा कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment