Tuesday, January 5, 2021

भारतातील पहिल्या महिला वृत्तपत्र संपादिका- तानुबाई बिर्जे !! सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

भारतातील पहिल्या महिला वृत्तपत्र संपादिका- तानुबाई बिर्जे !! सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!



जोतीराव व सावित्रीमाई यांनी घडविलेल्या चळवळीतून तयार झालेल्या भारतातील पहिल्या वृत्तपत्र संपादिका म्हणजे तानुबाई बिर्जे होत.
सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते आणि महात्मा फुले यांचे शेजारी देवराव ठोसर यांची ती मुलगी होती. सावित्रीबाईंनी तिला मानसकन्या मानले होते. तानुबाईचा जन्म 1876 मध्ये पुण्यात झाला होता. त्यांचे शिक्षण सावित्रीबाईंच्या वेताळ पेठेतील शाळेमध्ये झाले होते. सावित्रीबाईंनी तानुबाईचा विवाह 26 जानेवारी 1893 रोजी वासुदेव लिंबाजी बिर्जे यांच्याशी सत्यशोधकी पद्धतीने लावून दिला होता.
वासुदेव बिर्जे हे बडोदा सरकारमध्ये 1894 ते 1905 अशी 11 वर्षे ग्रंथपाल होते. त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा देऊन दिनबंधू हे वृत्तपत्र 1897 मध्ये पुन्हा सुरु केले. कृष्णाजी भालेकर यांनी सत्यशोधक समाजाच्या बातम्या व विचारासाठी 1 जाने 1877 रोजी ते सुरु कले होते. मध्यंतरी आर्थिक अडचणीमुळे ते बंद पडले होते. 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी ते मुंबईहून सुरू केले होते. 1897 मध्ये त्याची जबाबदारी बिर्जे यांनी स्वीकारली. 1906 मध्ये त्यांचा प्लेगने मृत्यू झाला. त्यानंतर तानुबाई बिर्जे यांनी ‘दिनबंधू’ची धुरा मोठ्या हिमतीने स्वतःच्या खांद्यावर घेतली.तानुबाईंनी संपादनाचे कार्य हिरीरीने उत्कृष्ट रित्या 1912 पर्यंत सांभाळले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी दिनबंधूमध्ये सत्यशोधक चळवळीच्या बातम्यांवर भर दिला. समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध विषयांसोबतच ‘बहुजन शिक्षण पॅटर्न’ यावरही लेखन केले. 1912 मध्ये ‘भारत लोकशाही शासनप्रणाली अंमलात आणण्यास लायक आहे काय?’ या विषयावर अभ्यासू लेखनमाला प्रकाशित केली. तानुबाईंच्या लेखनावरून त्यांच्या ज्ञानाची, प्रतिभेची आणि सामाजिक जाणिवेची उत्तुंग झेप लक्षात येते. अशा या सावित्रीबाई यांच्या शिष्येचे नाव अत्यंत यशस्वी व सक्षम अशा संपादिका म्हणून पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने पत्रकार दिना निमित्त तमाम पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा...

No comments:

Post a Comment