भाषेचा वापर होत राहील तोपर्यंत भाषा जिवंत राहते-डॉ.संजय कांबळे
सोनपेठ (दर्शन ) :-
सोनपेठ येथील कै. र. व.र. महाविद्यालयाच्या मराठी विभागाकडून शासन निर्देशाप्रमाणे 14 ते 28 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा0 साजरा होत असून यापूर्वी कवी संमेलन घेण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत आज डॉ. संजय कांबळे (मराठी विभाग, राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी बेळगाव कर्नाटक) यांचे 'मराठी भाषा: काल, आज आणि उद्या' या विषयावर फेसबुक लाईव्ह व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले.
बाराव्या शतकात ताम्रपट व शिलालेखातून शब्द रुपात अवतरलेली मराठी तेराव्या शतकांमध्ये ज्ञानेश्वरी, विवेकसिंधु व लीळाचरित्र सारख्या उत्तमोत्तम ग्रंथातून काव्य व तत्वज्ञानाचे पाठ शिकवू लागली. 'माझा मराठाची बोलू कौतुके' व 'मज चक्रधरे निरुपिली मराठी,तियाची पुसा ' यासारख्या अट्टहासतून आपले सामर्थ्य प्रगट करू लागली. शिव काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारकोश तयार करून मराठी भाषेला प्रतिष्ठा व राजभाषेचा दर्जा मिळवून दिला. पेशवेकाळात याच मराठीतून शाहिरांनी लावणी व पोवाड्याच्या माध्यमातून शृंगार व वीर रसाला मोकळी वाट करून दिली.
पुढे यावनी आक्रमणाच्या काळामध्ये संत एकनाथ व नरसिंह सरस्वती यांनी मराठीतून ग्रंथरचना करून मराठीची सेवा केली. ब्रिटिशांच्या आगमनानंतर मराठी भाषा आमूलाग्र बदलली. विरामचिन्हांचा वापर व गद्य लेखनाची वेगळी पद्धत मराठीत रूढ झाली. महात्मा ज्योतिराव फुले, केशवसुत, चिपळूणकर, कोल्हटकर यांनी मराठी भाषेचे सामर्थ्य कथा, कविता, निबंध व नाटक यातून व्यक्त केले.
साठोत्तरी कालखंडामध्ये दलित, आदिवासी, स्त्रीवादी व ग्रामीण साहित्यातून आशयाच्या विविध शक्यता सामर्थ्याने अभिव्यक्त झाल्या. कामगार आहे मी तळपती तलवार आहे... म्हणणारे सुर्वे असोत वा 'एक तीळ सर्वांनी करणडून खावा... म्हणणारे ढसाळ असोत. मराठी कविता माणूस आणि माणसाचं जगणं महत्त्वाचं मानू लागली. बाबूराव बागुल, दया पवार, अण्णाभाऊ साठे शंकरराव खरात, प्र. ई. सोनकांबळे, ज.वी. पवार यांच्या लेखणीतून दलितांच्या व्यथा- वेदना सामर्थ्यानिशी व्यक्त झाल्या व मराठी भाषेला नवे आयाम प्राप्त झाले. ज्यांनी चूक केली येथे जन्म घेण्याची त्यांनीच ती सुधारली पाहिजे देश सोडून अथवा विद्रोह करून... अशी विद्रोहाची पेरणी करत कथा, आत्मकथा व कविता या तीनही अंगाने आंबेडकरी विचार आत्मसात करून प्राप्त आत्मभानाने अभिव्यक्ती साधली.
मी नाही केवळ मादी, मी माणूस माणूस आधी....असे म्हणत म्हणत येथल्या स्त्रियांनीही आपल्या माणूसपणाची अभिव्यक्ती कविता, कथा व कादंबरीतून सामर्थ्यानिशी प्रगट केली.
याच वेळी जंगल दरयातून राहणाऱ्या आदिवासींनी बिरसा मुंडा, बाबुराव शेडमाके, राणी दुर्गावती यांच्या प्रेरणा लक्षात घेऊन लिहिलेल्या लेखणीने जंगल, जमीन व पाणी यावर आमचा हक्क आहे म्हणत उलगुलान उभारले. भुजंग मेश्राम, वाहरू सोनवणे, उषाकिरण आत्राम, बाबुराव मडावी यांच्या साहित्यातून आदिवासींच्या जगण्याचे हक्क व अधिकार अबाधित राहावे यासाठी ची तळमळ दिसून येते.
शेती आणि शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनांना मुखरित करण्याचे काम मराठी ग्रामीण साहित्यातून याचवेळी झाल्याचे दिसून येते. डॉ. आनंद यादव, ना. धों. महानोर, इंद्रजीत भालेराव, विठ्ठल वाघ, भास्कर चंदनशिव, रा. रं. बोराडे यांच्या साहित्यातून कृषी व कृषकांच्या समस्या प्रचंड ताकदीने मराठी साहित्यात व्यक्त झाल्या. 'मातीसाठी जगाव माती साठीच मरावं, बाळा माती लई थोर तिला कसं विसराव... अशी जमिनीशी एकरूप राहण्याची शेतकऱ्यांची मानसिकता या कथा, कविता व कादंबरीतून सामर्थ्यानिशी व्यक्त होऊ लागली.
एकविसाव्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सगळ्याच भाषा आमूलाग्र बदलत आहेत. मराठी ही त्याला अपवाद नाही. फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, मेसेंजर च्या माध्यमातून मराठी चे नवीन रूप दिसून येऊ लागल आहे. ई-मेल व मेसेजच्या माध्यमातून इंग्रजीचे आक्रमण थोपवून न धरता येऊ शकणारी अपरिहार्यता आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे. तरीही जोपर्यंत मराठी भाषा बोलणारा शेवटचा माणूस जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषेच्या जिवंत असण्याची, वाहण्याची काळजी करण्याचे काहीही कारण नाही असेही यावेळी डॉ. कांबळे म्हणाले.
या फेसबुक लाईव्ह ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन मराठी विभागाकडून भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सखाराम कदम यांनी तर आभार विभागप्रमुख डॉ. बालासाहेब काळे यांनी मानले. या फेसबुक लाईव्ह व्याख्यानास तांत्रिक सहाय्य डॉ. विठ्ठल जायभाये यांनी केले. यावेळी प्राचार्य, डॉ. वसंत सातपुते, डॉ.मुकुंदराज पाटील, डॉ.बी. व्ही. आंधळे, डॉ. सा.द. सोनसळे, प्रा. सुरेश मोरे, डॉ. संतोष रणखांब, प्रा. अंगद फाजगे यांच्यासह प्राध्यापक व अनेक विद्यार्थी सहभागी होते.

No comments:
Post a Comment