Friday, December 12, 2025

मौजे दुधगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना 29 व्या विशेष युवक शिबिराचे आयोजन

मौजे दुधगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना 29 व्या विशेष युवक शिबिराचे आयोजन
सोनपेठ (दर्शन) :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड सलग्नित हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय कला वाणिज्य व विज्ञान सोनपेठ आयोजित प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी वर्ष 29 वे "राष्ट्रीय सेवा योजना" (NOT ME BUT YOU) शैक्षणिक वर्ष 2025 - 2026 मौजे दुधगाव येथे "शाश्वत विकासासाठी युवक : जलसंधारण व्यवस्थापन आणि ओसाड भूमी विकासावर भर" या विशेष युवक शिबिरांचे आयोजन दिनांक 18 डिसेंबर 2025 ते दिनांक 24 डिसेंबर 2025 असे 7 दिवस आयोजित केले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.वसंत सातपुते यांनी दिली.या विशेष युवक शिबिराचे उद्घाटन दिनांक 18 डिसेंबर 2025 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मा.सौ.प्रेरणाताई वरपूडकर (संचालिका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी) यांच्या शुभहस्ते तर प्रमुख पाहुणे मा.डॉ.पंढरीनाथ धोंडगे (जिल्हा समन्वयक परभणी, राष्ट्रीय सेवा योजना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड) यांची उपस्थिती राहणार आहे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.सौ.ज्योतीताई कदम (उपाध्यक्षा, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ सोनपेठ) तर प्रमुख उपस्थितीत मा.प्रा डॉ.वसंत सातपुते (प्राचार्य कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ) तसेच मा.सौ संजीवनी महादेव खरात (सरपंच मौजे दुधगाव) या राहणार आहेत, तसेच समारोप समारंभ दिनांक 24 डिसेंबर 2025 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.परमेश्वर कदम (अध्यक्ष, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ सोनपेठ) प्रमुख उपस्थिती मा.श्री.रंगनाथ सोळंके (सदस्य जिल्हा नियोजन समिती परभणी) तसेच प्रा.डॉ. मुंजाभाऊ धोंडगे (सिनेट सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर) हे असणार आहेत प्रमुख उपस्थितीत प्रा.डॉ.वसंत सातपुते (प्राचार्य कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ) तसेच मा.श्री.किरण स्वामी संपादक साप्ताहिक सोनपेठ दर्शन हे राहणार आहेत, या विशेष युवक शिबिरात दिनांक 17 डिसेंबर 2025 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता शिबिर स्थळी आगमन व स्वयंसेवक गट स्थापना, दिनांक 18 डिसेंबर 2025 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन समारंभ संकल्पपुर्ती कार्यक्रम गाव स्वच्छता, वृक्षारोपण, जलसाक्षरता, प्लास्टिक मुक्ती, मतदान जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, पथनाट्य व पशु चिकित्सा शिबिर आदि कार्यक्रम होणार आहेत, या विशेष युवक शिबिरामध्ये जल व्यवस्थापन, आजचा युवक आणि शेती, शाश्वत विकास काळाची गरज, भारतीय शेती तसेच शेती व्यवस्थापनातील बदलते तंत्रज्ञान आदि विषयावर प्रमुख मार्गदर्शकाच्या उपस्थितीत सखोल असे मार्गदर्शन होणार आहे, या विशेष युवक शिबिराचे संयोजन समिती मा.सौ.संजीवनी महादेव खरात सरपंच, मा. सौ. इंदुबाई भगवान चव्हाण उपसरपंच, मा. श्री परमेश्वर कदम ग्रामसेवक, मा.श्री परमेश्वर गव्हाडे चेअरमन, मा.श्री अनंत खरात पोलीस पाटील, मा. श्री संजय गुजर मुख्याध्यापक सर्व मोजे दुधगाव तसेच प्रा.डॉ.बी. आर.शिंदे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा.डॉ.एस.व्हि.रणखांब राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा.डॉ.मुक्ता सोमवंशी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा.अर्जुन मोरे सहाय्यक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा.डॉ.गोविंद वाकणकर क्रीडा संचालक, प्रा.डॉ.एम.डी. कच्छवे राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती सदस्य, हरिओम रेडे शिबिर प्रतिनिधी तसेच सायली पतंगे शिबिर प्रतिनिधी सर्व श्री कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ हे असणार आहेत.

Tuesday, November 25, 2025

सोनपेठ शहरात माजी खासदार इम्तीयाज जलील यांची एम.आय.एम.उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहिर सभा

सोनपेठ शहरात माजी खासदार इम्तीयाज जलील यांची एम.आय.एम.उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहिर सभा
सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ शहरात दिनांक 27/11/2025 गुरूवार रोजी औरंगाबाद येथील एम आय एम AIMIM पक्षाचे माजी खासदार इम्तीयाज जलील साहेब यांची जाहिर सभा होणार आहे, सोनपेठ नगर परिषद सावंत्रिक निवडणूक 2025 साठी एम आय एम पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी तौसीफ अली शेर कुरैशी यांच्या प्रचारार्थ माजी खासदार इम्तीयाज जलील साहेब यांची जाहिर सभा शहरातील अहिल्याबाई होळकर चौकात ठिक दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे.या सभेत एम आय एम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी प्रतिक्रिया पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस झैन साहेब व सोनपेठ,मानवत प्रभारी हाफेज अलीशेर कुरेशी यांनी दिली आहे.

Saturday, November 22, 2025

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले......? (हेरंब कुलकर्णी)

महाराष्ट्राच्या राजकारणात गुंड कसे आले......? (हेरंब कुलकर्णी)
न्यूज 18 लोकमत या चॅनेलवर आज विलास बडे यांनी घेतलेल्या बडे मुद्दे चर्चेत नगरपालिका निवडणुकीत होत असलेले गुन्हेगारीकरण यावर चर्चा झाली.. त्यात गुन्हेगार राजकारणाकडे का येऊ लागले याचे विश्लेषण करता आले... ते मांडताना मी व पु काळे यांची एक प्रसिद्ध कथा सांगितली..

 रात्रीच्या वेळी एका रातराणी बस मध्ये झोपताना हात अवघडू नये म्हणून ते एसटीच्या मधल्या दांडीवर टांगून ठेवण्याची सोय असते. एक गुंड आणि लेखक प्रवास करताना सकाळी दोघांच्या हाताची अदलाबदल होते. गुंड पुस्तके लिहू लागतो आणि लेखक खिसे कापू लागतो. वैतागून लेखक गुंडाला गाठतो आणि हात परत मागतो. तेव्हा गुंड म्हणतो की माझ्याकडे पैसा होता पण प्रतिष्ठा नव्हती आणि तुमच्याकडे प्रतिष्ठा होती पण पैसा नव्हती. तेव्हा दोघांचेही आता बरे चालले आहे...
 मला असे वाटते की गुंडांचा राजकारणातला प्रवेश हा या मानसिकतेतून झाला आहे.राजकारणी पूर्वी गुंडांशी आणि धनिकांशी अंधारात संबंध ठेवायचे आणि बदनामी मात्र गुंडांची व्हायची...गुंडांच्या हे लक्षात आले की आपण बदनामी झेलण्यापेक्षा आणि पाठीमागून मदत करण्यापेक्षा थेट आपणच राजकारणात आलो तर कुठे बिघडले ?

धनिक सुद्धा तोच विचार करतात.त्यामुळेच शहरी भागातले बिल्डर आणि ग्रामीण भागातले ठेकेदार आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला जास्त दिसतात कारण नेत्यांना पैसा देण्यापेक्षा आपलाच पैसा लावून आपणच का निवडून येऊ नये ? अशी त्यांची मानसिकता झाली आहे..
सर्वात वाईट हे आहे की नगरपालिका,महापालिका, जिल्हा परिषद या निवडणुकांना नेतृत्वाची कार्यशाळा असे म्हटले जाते.उद्याचे आमदार,खासदार यातून घडतात असे सांगितले जाते. ते खरे ही आहे विलासराव देशमुखांसारखा माणूस सरपंचांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रवास करतो. देवेंद्र फडणवीस नगरसेवक हे मुख्यमंत्री असा प्रवास करतात. अशा महाराष्ट्रात आज अशा प्रकारचे गुंड जर स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून येणार असतील तर उद्याचे आमदार, खासदार कसे असतील ? याची कल्पनाही करवत नाही....

 बिहारची बदनामी आपण का करतो ? महाराष्ट्राचा बिहार होऊ देणार नाही हा बकवास आता बंद केला पाहिजे...बिहारच्या 2020 च्या निवडणुकीत 68% उमेदवार आमदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते ते प्रमाण 15% ने या निवडणुकीत कमी झाले आणि महाराष्ट्रातील 41 टक्के आमदारांवर मात्र वेगवेगळे गुन्हे आहेत.. तेव्हा बिहारचाच महाराष्ट्र होतो काय असा प्रश्न पडतो..?

 देशपातळीवर 1993 साली राजकारणाचे गुन्हेगारीकरण यावर चर्चा करण्यासाठी व्होरा समिती नेमली होती.. या समितीतील तपशील इतके भयंकर आहेत . आजपर्यंत एकाही सरकारने या समितीचा अहवाल संसदेसमोर ठेवला नाही किंबहुना मध्यंतरी माहितीच्या अधिकारात रिपोर्ट मागितल्यावर तो उपलब्ध नाही असे उत्तर देण्यात आले... तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार निवडणूक यांच्या पलीकडे जाऊन केला पाहिजे आणि सर्वपक्षीय नेत्यांनी उद्याच्या महाराष्ट्राचा विचार करून अशा गुंडांना दूर ठेवण्याची गरज आहे 

दुर्दैवाने तुमचा दाऊद तर आमचा गवळी अशी भाषा शिवसेनेने वापरली त्यानंतर १९९० च्या निवडणुकीत कलानी आणि ठाकूर यांना काँग्रेसने तिकीट दिले त्याचे समर्थन करताना पवारांनी त्यांच्याकडे इलेक्ट्रिक मेरिट होते असे समर्थन केले आणि त्यानंतर मात्र राजकारणाचा तोल गेला...

 सामना चित्रपटात मारुती कांबळे चे काय झाले..?  हा प्रश्न सामान्य माणूस अखेरपर्यंत विचारत राहतो.. येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना मारुती कांबळे ची काय झाले हे विचारले पाहिजे आणि सरसकट गुंडांना पराभूत केले पाहिजे तरच उद्याचा महाराष्ट्र हा सुसह्य असेल......१०५ हुतात्म्यांनी असे गुंड सत्तेवर यावेत म्हणून जीव दिला का....?

हेरंब कुलकर्णी

Saturday, November 15, 2025

सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परमेश्वर कदम - युवा नेते सुमित पवार समोर घरफोड्या आहे ; आपले सर्व मतभेद विसरून एकत्र आलोत तसा विजयश्री खेचून आणू - मा.आ.व्यंकटराव कदम

सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परमेश्वर कदम - युवा नेते सुमित पवार        
समोर घरफोड्या आहे ; आपले सर्व मतभेद विसरून एकत्र आलोत तसा विजयश्री खेचून आणू - मा.आ.व्यंकटराव कदम
सोनपेठ ( दर्शन ) :- सोनपेठ शहरातील परळी रोड स्थित एल. आर. के. इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात दिनांक 9/11/2025 रविवार रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती, भाजपा प्रमुख पालकमंत्री मेघना बोर्डीकर, मा.आ.सुरेश वरपुडकर,कॉग्रेसचे मा.आ.बाबाजानी दुर्राणी, शिवसेना (उबाठा) चे खा.संजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मा.आ.व्यंकटराव कदम व शिवसेना नेते सईद खान यांच्या मार्गदर्शनात अशा पाच पक्षाची सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी कार्यकर्ता संवाद बैठकीचे अध्यक्ष काँग्रेस ज्येष्ठ नेते सनदी अधिकारी बळीराम पवार, प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस मा.आ.व्यंकटराव कदम, प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पांडुरंग तात्या कदम,योगेश कदम, अक्षय कदम, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्य दत्ताराव कदम, प्रभाकर शिरसाट, सतीश देशमुख, युवा नेते सुमित पवार, परमेश्वर कदम, राजेभाऊ अंबुरे, राजू सौदागर, खदिर अन्सारी, रामेश्वर कदम, युवक शहर अध्यश शुभंम कदम, भाजपाचे रंगनाथ सोळंके प्रा.डॉ.मंजुभाऊ धोंडगे, मल्लिकार्जुन सौंदळे, संतोष अंबुरे, डॉ.मोहनराव देशमुख, मारोती रंजवे, नितेश लष्करे, युसुब चौधरी, शिवसेना (उबाठा) पक्षाचे भगवान पायघन, संतोष गवळी, जनार्धन (नाना) झिरपे, कृष्णा पिंगळे, शिवसेना साजेद कुरेशी, सुशील सोनवणे, विश्वजित कदम आदिसह ईच्छुक उमेदवार विचार मंचावर उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष अंबुरे यांनी केले, याप्रसंगी सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची काँग्रेस युवा नेते सुमित भैय्या पवार यांनी परमेश्वर कदम यांचे नाव जाहीर करून दोघांनी हात उचावूध घोषणा केली,सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले,यावेळी मनोगत शिवाजी कदम, साजेद कुरेशी, संतोष गवळी, रंगनाथ सोळंके, प्रभाकर शिरसाट, सतीश देशमुख, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परमेश्वर कदम, प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार व्यंकटराव कदम यांनी मार्गदर्शन करताना भावनिक साथ घालत प्रथम सर्व उपस्थिताना दंडवत करत स्वागत केले, सविस्तर मार्गदर्शनाच्या शेवटी समोर घरफोड्या आहे हे विसरू नका, आपण सर्व मतभेद विसरून एकत्र आलोत तसा विजयश्री खेचून आणू असे आवाहन केले, अध्यक्ष समारोप करताना काँग्रेस नेते माजी सनदी अधिकारी बळीरामजी पवार यांनी बोलताना सोनपेठकरांना साधे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही आणि त्याचा तुम्ही आवाज काढत नाहीत हे अकलनीय आहे, आपण सर्व रोज 20 रुपये खर्च करून पाच वर्षाचे किती रुपये होतात हा प्रत्येकाने हिशोब करावा आणि समोरचा किती देतो हे पाहावे, आम्ही वातावरण निर्माण केले,आमच्या परिवाराला पदाचा हव्यास नाही, परमेश्वर कदम मला सुमित सारखाच परमेश्वर कदम यांनी शिक्षणाची सर्वोत्तम सेवा सोनपेठकरांना उपलब्ध करून दिली, असाच बदल सोनपेठ शहरात घडवू, सर्व सोयी शहरात उपलब्ध करू, निवडणुकीत सोबत राहणार, समोरचे बुद्धिभेद जातिवाद करतील बांधवांनो जगात दोनच जाती एक स्त्री व दुसरी पुरुष आम्ही सर्व काहीतरी सोनपेठ शहराचं चांगलं करण्यासाठी एकत्र आलो आहोत, प्रत्येकाने परमेश्वर कदम म्हणजे मीच नगराध्यक्ष आहे असे समजून काम करावे, समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश चिटणीस पदी नुकतीच मा.आ.व्यंकटराव कदम यांची निवड झाल्याबद्दल सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी सर्व प्रमुखांनी शाल व पुष्पहार घालून अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन मारोती रंजवे यांनी केले,समारोप अल्पोपहाराने करण्यात आला.
-------------------------------------------------------------------
सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी मध्ये यावेळी सोनखेड व आदर्शनगर तांडा, सोनखेड तांडा येथील मुस्लिम व बंजारा समाज बांधवांनी प्रवेश घेत सागितले की परमेश्वर कदम यांच्या संस्थेमुळे आमची मुलं शिकून डॉक्टर झाली, अधिकारी झाली, तेव्हा आम्हाला आमची मुल बाहेरगावी शिकवण्याची परिस्थिती नव्हती आज त्याचेच ऋण फेडण्याची वेळ आली आहे.मुलांच्या आग्रहस्तव आम्ही तन-मन-धनाने परमेश्वर कदम सोबत आहोत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Tuesday, November 4, 2025

माजी आमदार व्यंकटराव कदम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती

माजी आमदार व्यंकटराव कदम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती
सोनपेठ (दर्शन) :- 
सोनपेठ येथील माजी आमदार व्यंकटराव आनंदराव कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केल्याची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि.4) केली. 
या नियुक्तीबद्दल महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार फौजिया खान, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आमदार विजयराव गव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता डॉ.भीमराव हत्तीअंबीरे, पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष अजयराव गव्हाणे, शिक्षक सेलचे राज्यप्रमुख प्रा.किरण सोनटक्के यांनी अभिनंदन केले आहे. पक्षाची धैयधोरणे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहण्याची अपेक्षा या नियुक्तीपत्रात करण्यात आली आहे.

Wednesday, October 8, 2025

सोनपेठ नगर परिषद प्रभागाचे आरक्षण जाहीर इच्छुक उमेदवारांमध्ये कही खुशी कही गंम....

सोनपेठ नगर परिषद प्रभागाचे आरक्षण जाहीर इच्छुक उमेदवारांमध्ये कही खुशी कही गंम....
सोनपेठ (दर्शन) : -  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर सोनपेठ नगरपालिकेतील प्रभागनिहाय आरक्षण दिनांक 8 ऑक्टोबर 2025 बुधवारी अनुसूचित जाती व नागरिकाचा मागास प्रवर्ग सोडत पध्दतीने उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांच्या वतीने जाहीर करण्यात आले.
             सोनपेठ नगर परिषद छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे या आरक्षण निश्‍चिततेकरीता उपविभागीय अधिकारी श्रीमती संगीता चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत सोडत काढण्यात आली. त्यातून प्रभागनिहाय आरक्षण निश्‍चित करण्यात आले.याप्रसंगी सर्व पक्षीय नेते, संघटना व मित्र मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते भल्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     प्रभाग निहाय आरक्षण खालील प्रमाणे जाहीर करण्यात आले , प्रभाग क्रमांक 1 - अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2- अनुसुचित जाती व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 3 - सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण,  प्रभाग क्रमांक 5 - नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6 - नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 7- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8 - सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10- नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला.
एकुणच प्रत्येक प्रभागात एक महीला आणि एक पुरुष दिलेला दिसुन येत आहे.समारोप प्रसंगी मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.

Tuesday, October 7, 2025

सोनपेठ नगराध्यक्ष पद खुला झाल्याने सत्ताधारी व विरोधक दोनच गटाची चर्चा

सोनपेठ नगराध्यक्ष पद खुला झाल्याने सत्ताधारी व विरोधक दोनच गटाची चर्चा 
सोनपेठ (दर्शन) सोनपेठ नगर परिषद निवडणूक नगराध्यक्ष पद खुला झाल्याने सत्ताधारी व विरोधक या दोनच गटाची चर्चा शहरात होताना दिसत आहे, मागील निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याने तमाम जनता नाराज आहे परंतु ही नाराजी मतदानाच्या माध्यमातून दाखवून देण्याची चर्चा रंगली आहे, मागील निवडणुकीतील सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याने शहरातील सर्व पक्ष , संघटना व मित्र मंडळ एकत्र येऊन आघाडी करुन सर्वांना आपल्या आपल्या ताकतीचा वाटा नगरसेवक पदासाठी वाटप करुन सत्ताधारी मंडळींना चित करण्यासाठी सज्ज झालेले दिसुन येत आहेत , या साठी परभणी येथे बैठका झाल्या असुनही बैठकीचा सिलसिला सुरू राहणार असल्याचे समजते, दुसरीकडे मागील निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याने 20 जागेसाठी 60 उमेदवार तेही एकसे बडकर एक असल्याने कोणाला बसवावे व कोणाला रनांगनात उतरवावे तसेच अनेक महाभाग अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सागत आहेत, मागील निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याने नाराजीचा सूर या सत्ताधारी मंडळींना शेवटपर्यंत सतावणारा तसेच मुळ अडचणीचाच ठरणार आहे, दुसरीकडे आत्ताचे सर्व पक्ष, संघटना व मित्र मंडळ एकत्र येऊन कायमची सत्ताधारी मंडळींची सत्ता एकदाची उलथापालथ करण्याची संधी मिळाली आहे, या संधीचे सोने करण्यासाठी उमेदवार निवडून येणारा हा निकष लावून भले आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल पण एक दिल्याने शेवटपर्यंत निवडणुकीत तन मन धन लाऊन सर्वच्या सर्व 20 जागा तसेच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणायचाच असा आत्मविश्वास व्यक्त करताणा दिसत आहेत.

Saturday, October 4, 2025

प्रा.डॉ. सखाराम कदम यांची स्व. मारोतराव कऱ्हाळे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

प्रा.डॉ.सखाराम कदम यांची स्व. मारोतराव कऱ्हाळे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड 
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथील कै.र.व.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत प्रा.डॉ.सखाराम कदम यांची हिंगोली येथील समृद्धी प्रकाशनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्व.मारोतराव कऱ्हाळे आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 साठी निवड झाल्याचे पत्र पुरस्काराचे संयोजक प्रा.डॉ.श्रीराम कऱ्हाळे (मराठी विभागप्रमुख,शिवाजी महाविद्यालय, हिंगोली) यांनी दिले आहे. पुरस्काराचे वितरण ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.
प्रा.डॉ. कदम हे प्रस्तुत महाविद्यालयात 2011 पासून मराठी विषयाचे अध्यापन करतात. त्यांनी त्यांचे पीएच.डी.चे संशोधन 'निवडक मराठी ग्रामीण कवितेतील स्त्री चित्रण' या विषयावर यापूर्वीच पूर्ण केले आहे.
त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मधून प्रकाशित आहेत. त्यांना आतापर्यंत पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचा महात्मा जोतिराव फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच राजे संभाजी जयंती महोत्सव समिती जवळाबाजार कडून 'गुणवान युवक पुरस्कार' आदी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या शैक्षणिक,  सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेऊन राष्ट्रीय पातळीवरील या नामांकित पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम, कोषाध्यक्ष श्री रामेश्वर कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा चे समन्वयक डॉ.मुकुंदराज पाटील, मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.बालासाहेब काळे, प्रोफेसर डॉ.सा.द. सोनसळे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सर्व कर्मचारी, पत्रकार बांधव आदीनी त्यांचे अभिनंदन केले.

Tuesday, September 30, 2025

डिघोळच्या रेणुकामाता (त्रिदेवी) च्या दर्शनासाठी राज्यातून तोबा गर्दी

डिघोळच्या रेणुकामाता (त्रिदेवी) च्या दर्शनासाठी राज्यातून तोबा गर्दी
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ येथील रेणुकामाता (त्रिदेवी) च्या शारदीय नवरात्री उत्सवात गुरुवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 पासून घटस्थापना करून प्रारंभ झाला असून हा नवरात्री उत्सव पुढे दिनांक 2 ऑक्टोबर 2025 गुरुवार दसऱ्यापर्यंत सुरू राहणार आहे या उत्सवास समितीच्या गाण्याचे कार्यक्रम तसेच दररोज महाप्रसाद व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रति वर्ष प्रमाणे याही वर्षी सोनपेठ तालुक्यातील डीघोळ येथील रेणुकामाता (त्रिदेवी) मंदिरातील शारदीय नवरात्री महोत्सव प्रारंभ झाला असून यावेळी या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, दिघोळ येथे रेणुकामाता (त्रिदेवी) मंदिर सोनपेठ पासून परळी रोड कडे उजवीकडे असुन, मंदिर परिसरात सुशोभीकरणासाठी कमिटी तर्फे सदैव प्रयत्न करण्यात येत आहेत, मंदिरावर विद्युत रोषणाई सर्वत्र झगमगताना दिसत असून भाविकांच्या दर्शनासाठी लावली आहे सोनपेठ तालुक्यातुनच नाही तर परभणी जिल्हाभरातून व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त या देवीच्या दर्शनासाठी येतात, मागील काही वर्षांपासून नवरात्री उत्सवात दर्शनासाठी येणारे भाविक भक्तांसाठी अन्नछत्र सुरू आहे दररोज वेगवेगळे अन्नदाता कडून अन्नदानाची दहा दिवस अखंड सेवा सुरू राहते, आज देशमुख परिवाराच्या वतीने महाप्रसादाचा लाभ घ्यावा उपसरपंच अजयकुमार देशमुख यांनी माहिती दिली,देवीच्या समोर दोन कल्लोळ असुन पूर्वीच्या काळी देवीच्या मंदिरासमोर पाण्याची सुविधा नसल्याने अनेक भाविक तसेच शाळा विद्यालयातील सहली दर्शनासाठी येताना भाजी भाकरी घेऊन येत व दर्शनानंतर देवीच्या समोर बसून जेवण केल्यानंतर या कल्लोळातील पाणी पिऊन तृप्त होत असतात परंतु सध्या देवीच्या समोर पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता या कल्लोळातील पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले आहे, या देवी मंदिरची स्थापना इ.स. 1600 मध्ये रामदास स्वामी यांनी केली असल्याचे सांगितले जाते, या ठिकाणी मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे, अनेक वर्ष व्यवसायिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे, निजाम कालखंडापासून देवी मंदिराची देखभाल येथील देशमुख घराणे करत असून आजही विजयकुमार देशमुख, रमाकांत देशमुख, अण्णासाहेब देशमुख, उपसरपंच अजयकुमार देशमुख यांना आरती व पूजा तसेच शिलंगणाचा मान कायम आहे, या ठिकाणी अंबादास पुजारी, वैभव पुजारी व गावातील युवा तरुण नागनाथ शिंगाडे, सतीश पारेकर, कानिक अन्नपूर्णे, शाम काथवटे, माजी सरपंच गोकुळ दादा आरबाड, शरद मुळी, वैभव मोडीवाले, सुभाष मुंडीक यांच्या सह संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्यातून हा महोत्सव साजरा केला जातो.

पदवीधर मतदारसंघासाठी सर्व पदवीधरांनी मतदार नोंदणी स्वतः करावी - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण परभणी/सोनपेठ (दर्शन) : -

पदवीधर मतदारसंघासाठी सर्व पदवीधरांनी मतदार नोंदणी स्वतः करावी - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण 
परभणी/सोनपेठ (दर्शन) : - 
1 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. सन-2020 मध्ये झालेल्या निवडणूकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. जास्तीतजास्त पात्र पदवीधर मतदारांनी आपल्या तहसील कार्यालयात मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी स्वतः करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, नायब तहसिलदार सतीश रेड्डी व पत्रकार यावेळी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी म्हणाले की, पदवीधर नाव नोंदणीसाठी  फॉर्म नमुना क्रमांक-18 भरुन देणे आवश्यक आहे. हा फॉर्म सर्व तहसिल कार्यालय, मंडळ अधिकारी महसूल यांच्याकडे उपलब्ध आहे.नोंदणीसाठी पात्रता - 01 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा पूर्वी कोणत्याही शाखेचा पदवीधर.सर्व वि‌द्यापीठे तसेच सर्व मुक्त वि‌द्यापीठे अथवा कोणत्याही अभिमत वि‌द्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे.नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रेः  फार्म नंबर 18 भरुन द्यावा, फार्म नंबर 18 बरोबर अंतिम वर्ष गुणपत्रिका किंवा मुळ पदवीची छायांकित प्रत जोडावी. नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईजचे फोटो (फोटोचा पार्श्वभाग पांढ-या रंगाचा असावा).
2020 च्या निवडणूकीच्या वेळेस परभणी जिल्ह्यात पदवीधर मतदार यादीचे 76 यादी भाग असून मतदान केंद्रसंख्या 78 होती. नंतर 2 सहाय्यकारी मतदान केंद्र झाले.यावेळी वाढण्याची शक्यता आहे, या नोंदणीसाठी रहिवासी पुरावा -  आधार कार्ड, निवडणुक ओळखपत्र, रेशन कार्ड, लाईट बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, घरप‌ट्टी यापैकी एक.अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात या ठिकाणी स्वीकारले जातील. 
1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार 30 सप्टेंबर 2025, वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनर्प्रसिद्धी- बुधवार 15 ऑक्टोबर, द्वितीय पुनर्प्रसिद्धी- शनिवार 25 ऑक्टोबर, नमुना क्रमांक 18 किंवा 19 द्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक - गुरूवार 6 नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- गुरुवार 20 नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी- मंगळवार 25 नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- गुरुवार 25 डिसेंबर व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी- मंगळवार 30 डिसेंबर 2025. 
मतदार नोंदणीसाठी विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत. तर जिल्हाधिकारी  हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी असतील.  जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. 

Sunday, September 28, 2025

जागतिक हृदय दिन : हृदय आरोग्य आणि जीवनशैलीचे सामाजिक प्रतिबिंब - डॉ.राजेंद्र बगाटे, (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत)साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी सौजन्य बातम्या, लेख व जाहीरातीसाठी संपर्क मो.9823547752

जागतिक हृदय दिन : हृदय आरोग्य आणि जीवनशैलीचे सामाजिक प्रतिबिंब - डॉ.राजेंद्र बगाटे, (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत)
साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी सौजन्य बातम्या, लेख व जाहीरातीसाठी संपर्क मो.9823547752
हृदय हे शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. ते केवळ रक्तपुरवठ्याचे केंद्र नाही, तर आपल्या जीवनाचे प्रतीक आणि आपल्या शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्याचे मूळ आहे. हृदयाच्या कार्यात लक्षणीय बिघाड होणे म्हणजे फक्त वैयक्तिक आरोग्यावर परिणाम होणे नाही, तर त्याचा परिणाम कुटुंब, समाज आणि देशाच्या सामाजिक व आर्थिक जीवनावरही होतो. आजच्या आधुनिक जीवनशैलीत अनियमित आहार, व्यायामाचा अभाव, तणाव, धूम्रपान आणि मद्यपान यामुळे हृदयरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या परिस्थितीत हृदय आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे ठरते. जागतिक हृदय दिन, जो दरवर्षी 29 सप्टेंबरला साजरा केला जातो, हा दिवस हृदयरोग प्रतिबंध, जीवनशैलीतील सुधारणा आणि सामाजिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी समर्पित आहे. 2025 मध्ये हा दिवस “Don’t Miss a Beat” (एकही क्षण चुकवू नका) या थीमसह साजरा केला जात आहे, ज्याचा उद्देश हृदयाचे आरोग्य टिकवणे आणि वेळेवर उपचार घेण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
जागतिक हृदय दिनाची सुरूवात 2000 साली वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी झाली. या दिवसाच्या माध्यमातून हृदयरोगांविषयी जनजागृती निर्माण करणे, लोकांना हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक जीवनशैली अवलंबण्यास प्रोत्साहित करणे आणि वेळेवर वैद्यकीय तपासण्या करण्याचे महत्त्व सांगणे हे उद्दिष्ट आहे. प्रत्येक वर्षी या दिवसासाठी विशिष्ट थीम निश्चित केली जाते, ज्यातून त्या वर्षीच्या सामाजिक आरोग्य संदेशावर भर दिला जातो.
या वर्षीची थीम “Don’t Miss a Beat” (एकही क्षण चुकवू नका) अत्यंत प्रभावी आणि विचारप्रवर्तक आहे. हृदयरोगामुळे अनेक कुटुंबे आपल्या प्रियजनांना गमावतात, ज्याचा मानसिक, आर्थिक आणि सामाजिक स्तरावर गंभीर परिणाम होतो. या थीमद्वारे लोकांना हृदयाचे लक्षण ओळखण्याचे, नियमित तपासण्या करण्याचे, योग्य आहार व व्यायाम करण्याचे आणि मानसिक ताण कमी करण्याचे संदेश दिले जात आहेत. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने हृदयरोग प्रतिबंधित केल्यास केवळ वैयक्तिक जीवन सुधारते असे नाही, तर समाजातील कार्यक्षमतेत वाढ होते, आर्थिक स्थैर्य टिकते आणि कुटुंबीयांचे कल्याणही सुनिश्चित होते.
जागतिक स्तरावर हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण मानले जाते. दरवर्षी 20.5 दशलक्ष लोक हृदयरोगांमुळे मृत्यूमुखी पडतात, जे जागतिक मृत्यूंच्या तिसऱ्या भागापेक्षा जास्त आहेत. तथापि, योग्य जीवनशैली अवलंबल्यास आणि वेळेवर वैद्यकीय तपासण्या केल्यास सुमारे 80% हृदयरोग प्रतिबंध करता येऊ शकतात. भारतात हृदयरोगांचा प्रादुर्भाव चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये हृदयरोगांचा धोका वाढला असून विशेषतः 25 ते 50 वयोगटातील तरुणांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढले आहे. यामागे अयोग्य आहार, जंक फूडचा अधिक प्रमाणात वापर, व्यायामाचा अभाव, तणाव आणि धूम्रपान-मद्यपान यांसारखी जीवनशैलीशी संबंधित कारणे आहेत. महिलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण कमी असल्याचे जाणवत असले तरी, आधुनिक जीवनशैलीमुळे त्यांच्यातही हृदयरोगांचा धोका वाढला आहे.
हृदयाचे आरोग्य हा फक्त वैयक्तिक प्रश्न नाही, तर तो सामाजिक आरोग्याशी थेट संबंधित आहे. निरोगी व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी कार्यक्षम असते. हृदयरोगामुळे एखाद्या व्यक्तीचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक जीवन प्रभावित होते, ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो, कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता कमी होते आणि सामाजिक संबंधांवर परिणाम होतो. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून हृदयरोग प्रतिबंध म्हणजे सामाजिक स्थैर्य टिकवणे, आरोग्य सेवा वापरण्याचा भार कमी करणे आणि समाजातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा करणे होय.
हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. त्यामध्ये संतुलित आहार, ज्यामध्ये ताज्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कमी साखर आणि कमी फॅट असलेले पदार्थ यांचा समावेश असतो, तो हृदयासाठी उपयुक्त ठरतो. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करणे, चालणे, धावणे, योगा किंवा नृत्य यांसारख्या क्रियांचा समावेश करणे, यामुळे हृदयाचे कार्य सुधारते आणि रक्ताभिसरण सुसंगत राहते. तणाव व्यवस्थापनासाठी ध्यान, योगा आणि श्वासोच्छ्वासाचे तंत्र वापरणे फायदेशीर ठरते. धूम्रपान आणि मद्यपान टाळणे हृदयरोग प्रतिबंधासाठी अत्यावश्यक आहे. तसेच, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि इतर आरोग्य घटकांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. या सर्व उपायांनी व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य सुधारते, आणि समाजात आरोग्याची जागरूकता वाढते.
जागतिक हृदय दिनानिमित्त भारतभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. वॉकथॉन, हृदय आरोग्य शिबिरे, व्यायाम कार्यशाळा, योगा शिबिरे आणि आरोग्य तपासणी शिबिरे या उपक्रमांमुळे लोकांमध्ये हृदयाचे महत्त्व समजते. वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित वॉकथॉनमध्ये हजारो लोक सहभागी होतात, ज्यात कुटुंब, मित्र आणि विद्यार्थी सहभागी होऊन हृदय आरोग्याबाबत माहिती मिळवतात. वेगवेगळ्या शहरांमध्ये ‘Green Fit Marathon’ आयोजित करून हृदय आरोग्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातो. या उपक्रमांमुळे समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढते, लोकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतात आणि सामाजिक सहकार्य दृढ होते.
जागतिक हृदय दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम नाही, तर तो हृदयाच्या आरोग्यासाठी जागतिक चळवळ आहे. समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर, हा दिवस कुटुंबीय, समाज आणि व्यापक सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी एक संधी आहे. “Don’t Miss a Beat” (एकही क्षण चुकवू नका) या थीमद्वारे लोकांना हृदयाच्या आरोग्याबद्दल जागरूकता, जीवनशैलीत सकारात्मक बदल आणि नियमित आरोग्य तपासणी करण्याची प्रेरणा मिळते. हृदयाचे आरोग्य राखणे म्हणजे केवळ वैयक्तिक कल्याण नाही, तर सामाजिक स्थैर्य आणि समाजातील आर्थिक व भावनिक संतुलन टिकवणे देखील आहे. चला, आपण सर्वजण एकत्र येऊन हृदयरोग प्रतिबंधासाठी प्रयत्न करूया, जेणेकरून आपले आणि आपल्या समाजाचे जीवन निरोगी, आनंदी आणि समृद्ध राहील.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
डॉ.राजेंद्र बगाटे, (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत)
मो. क्र. ९९६०१०३५८२, ईमेल – bagate.rajendra5@gmail.com


Saturday, September 27, 2025

संत महंतांच्या मंगलमय उपस्थितीत 'बाजीराव पेट्रोलियमचे' आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन भरपावसातही स्नेही, हितचिंतकांच्या शुभेच्छा व प्रेम ओसंडून वाहिले ! परळी वैजनाथ/सोनपेठ (दर्शन) :-

संत महंतांच्या मंगलमय उपस्थितीत 'बाजीराव पेट्रोलियमचे' आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन             
भरपावसातही स्नेही, हितचिंतकांच्या शुभेच्छा व प्रेम ओसंडून वाहिले !          

परळी वैजनाथ/सोनपेठ (दर्शन) :- 
 
       परळी शहराच्या सेवा क्षेत्राचे वैभव वाढविणाऱ्या  'बाजीराव पेट्रोलियम' या नावाने परळी नंदागौळ-पुस- बर्दापूर या रस्त्यावर अत्याधुनिक पेट्रोल पंप उभारण्यात आला असुन या पेट्रोल पंपाचे आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व संत महंतांच्या मंगलमय उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आले. भर पावसातही झालेल्या या शानदार समारंभाला परळीतील मोठ्या संख्येने विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.
        ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर पासून काही अंतरावरच परळी ते नंदगौळ–पुस-बर्दापूर रोडवर, श्रद्धानंद गुरुकुल आश्रमासमोर  उभारण्यात आलेल्या बाजीराव पेट्रोलियम या भारत पेट्रोलियमच्या अत्याधुनिक पंपावर २४ तास इंधन सेवा उपलब्ध राहणार असून ग्राहकांसाठी सर्व आधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. या पेट्रोल पंपाचा शुभारंभ आज  माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.उद्घाटन प्रसंगी शांतिब्रह्म गुरुवर्य ह.भ.प.प. पू.महादेव महाराज चाकरवाडीकर, धर्मगुरू प.पू.अमृताश्रम स्वामी आणि १०८ नंदीकेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांचे आशीर्वाद व आध्यात्मिक सान्निध्य लाभले. प्रारंभी आ. धनंजय मुंडे व संत महंतांच्या हस्ते विधिवत पूजा करुन व फीत कापून पेट्रोल पंपाचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित संत महंतांचे पूजन व यथोचित सन्मान धर्माधिकारी परिवाराच्या वतीने करण्यात आला.तसेच आ.धनंजय मुंडे यांचा ह्रदय सत्कार करण्यात आला. उपस्थित संत महंतांनी या नव्या व्यवसायाला आपले आशीर्वाद प्रदान केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार 'बाजीराव पेट्रोलियम'चे प्रोप्रायटर, माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, हरिहर धर्माधिकारी,अ‍ॅड. प्रताप धर्माधिकारी यांनी केला.
     दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून परळी व परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही सकाळपासूनच  मोठा पाऊस सुरूच होता. मात्र या नव्या सेवा व्यवसायाच्या शुभारंभ सोहळ्याला भरपावसातही परळी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा देत धर्माधिकारी परिवारील प्रेम व्यक्त केले. त्याचबरोबर संपूर्ण दिवसभर या नव्या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांची 'बाजीराव पेट्रोलियम' वर रीघ लागली होती.भर पावसातही स्नेही, हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित राहून भेट देऊन, सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त केल्या. एक प्रकारे भर पावसातही परळीकरांचे धर्माधिकारी परिवारावरील प्रेम यानिमित्ताने ओसंडून वाहिल्याचे चित्र बघायला मिळाले.

Tuesday, September 23, 2025

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्जनागरिकांनी दक्ष राहावे - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण - नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी- अफवांवर विश्वास ठेवू नये, कुठलेही धाडस करु नका- सुरक्षितस्थळी राहावे, प्रशासन बचाव व सुरक्षेसाठी तत्पर- भारतीय सैन्य दल, एसडीआरएफचे पथके जिल्ह्यात दाखल- जिल्हा प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावेपरभणी/सोनपेठ (दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांच्याकडून) :-

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
नागरिकांनी दक्ष राहावे - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
 
- नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी
- अफवांवर विश्वास ठेवू नये, कुठलेही धाडस करु नका
- सुरक्षितस्थळी राहावे, प्रशासन बचाव व सुरक्षेसाठी तत्पर
- भारतीय सैन्य दल, एसडीआरएफचे पथके जिल्ह्यात दाखल
- जिल्हा प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे
परभणी/सोनपेठ (दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांच्याकडून) :-  
 
जायकवाडी, माजलगाव या धरणांमधून परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत होणारा विसर्ग याशिवाय इतर प्रकल्पांतून जिल्ह्यातील विविध नद्यांमध्ये होणारा विसर्ग तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून महसूल, पोलीस, सैन्यदल, एसडीआरएफचे पथक ही सर्व यंत्रणा सतर्क आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, विशेषत: नदीकाठच्या गावांतील लोकांनी दक्षता घ्यावी. कुठलेही धाडस करु नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन आपल्या बचाव व सुरक्षेसाठी तत्पर आहे. जिल्हा प्रशासनाच्या सर्व सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी नागरिकांना केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी म्हणाले की, सद्यस्थितीत जायकवाडी, माजलगाव या धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरु आहे, त्यामुळे पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील गोदावरी नदीची इशारा पातळी 396.47 मी. इतकी आहे तर धोका पातळी 398.7 मी. इतकी आहे. स‌द्यस्थितीत पाणी पातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांतील लोकांनी खबरदारी घ्यावी.  नागरिकांच्या बचाव व सुरक्षेसाठी भारतीय सैन्य दल आणि एसडीआरएफची (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे. भारतीय सैन्य दलाची 54 एआरटीच्या एका पथकाकडे पाथरी तालुक्यातील मंजरथ, कासापुरी आणि ढालेगाव परिसरातील गावे सोपविण्यात आली आहेत. तर दुसऱ्या पथकाकडे मानवत तालुक्यातील मौजे थारगाव आणि एसडीआरएफकडे सोनपेठ तालुक्यातील मौजे शिरशी, थडी पिंपळगाव आदी कार्यक्षेत्र सोपविण्यात आले आहे. 

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 36 गावांचा संपर्क तुटला आहे, मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे सुमारे 578 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पाथरी तालुक्यातील संपर्क तुटलेल्या 16 गावांपैकी रामपुरी  येथील 60 आणि निवळी येथील 10 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. सोनपेठ तालुक्यातील संपर्क तुटलेल्या दोन गावांपैकी नगरपालिकेच्या स्थानिक शोध बचाव पथकाच्या मदतीने थडी पिंपळगाव येथील 408 लोकांना तर लसिना येथील 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गंगाखेड, मानवत व सेलू तालुक्यातील संपर्क तुटलेल्या गावांतील नागरिक सुरक्षित असून स्थानिक यंत्रणा त्यांच्या मदतीसाठी  सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 

जून-2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता महसूल व वन विभागाचा शासन निर्णय, दि. 18 सप्टेंबर 2025 अन्वये 128 कोटी 55 लक्ष 38 हजार इतका निधी  वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली असून निधीच्या वाटपाची कार्यवाही सुरु असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, चालू सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल शासनास तातडीने सादर करण्यात येणार आहे. शेतकरी व नागरिकांनी चिंता करु नये. जिल्हा प्रशासन आपल्या मदतीसाठी सज्ज आहे. प्रशासनाच्या सुचनांचे काळजीपूर्वक पालन करावे. 
*-*-*-*-*

Saturday, September 20, 2025

"हिंदी भाषा देशाच्या सांस्कृतिक वारशाचे आणि एकतेचे प्रतीक आहे”—प्रो.डॉ.कुलकर्णी वनिता

"हिंदी भाषा देशाच्या सांस्कृतिक वारशाचे आणि एकतेचे प्रतीक आहे”—प्रो.डॉ.कुलकर्णी वनिता      
 
सोनपेठ (दर्शन) :- कै.र.व.महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.यानिमित्याने दि.14 सप्टेंबर 2025 रोजी युट्युब व्हिडिओ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.वडचकर शिवाजी यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘हिंदी दिवस’ या भितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ.वनिता कुलकर्णी या उपस्थित होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.शेख शकीला तसेच प्रा.कैलास आरबाड हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. शेख शकीला आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या “भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षातच म्हणजेच 14 सप्टेंबर 1949 दिवशी संविधान सभेने हिंदी भाषेची भारताची राजभाषा म्हणून निवड केली. या दिवसाचे औचित्य साधून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो” तसेच  दुसरे प्रमुख मार्गदर्शक प्रा. कैलास आरबाड यांनी ‘राष्ट्रभाषा हिंदी’ या विषयावर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, “भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी होय या हिंदी भाषेच्या सन्मानाकरिता तसेच हिंदी भाषेतलं सौंदर्य तसेच साहित्य जगासमोर आणण्यासाठी 14 सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो” यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. शेवटी अध्यक्षीय समारोप करताना प्रो.डॉ.कुलकर्णी वनिता म्हणाल्या “14 सप्टेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. त्यामुळे दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस ‘हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेत 17 व्या भागात परिच्छेद 343 पासून 351 पर्यंत जी कलमे आहेत त्यानुसार हिंदी ही भारतीय संघराज्याची राजभाषा असून तिची लिपी देवनागरी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. महात्मा गांधीजींनी हिंदी भाषेला जनमानसाची भाषा म्हटले आहे हिंदी ही भारत देशातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. हिंद -आर्य भाषा समुहातील हिंदुस्तानी भाषेच्या  संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे हिंदीचा साहित्यिक इतिहास खुप समृद्ध आहे.”      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आगळे स्नेहा या विद्यार्थिनीने केले तर आभार मुलगीर नागेश या विद्यार्थ्याने मांनले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Friday, September 19, 2025

श्री परमेश्वर कदम अध्यक्ष (ह.शि.प्र.मं.) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्री परमेश्वर कदम अध्यक्ष (ह.शि.प्र.मं.) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कै.र.व.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबीर, रक्तगट तपासणी, गप्पी मासे वाटप व नेत्ररोग तपासणी शिबीर आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यशोदा मल्टीकेअर हॉस्पिटल सोनपेठ मार्फत 'मोफत आरोग्य तपासणी शिबिर' घेण्यात येणार आहे. तर शासकिय रक्तपेढी, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई यांच्याकडून रक्तदान शिबिर, विमल आय केअर हॉस्पिटल सोनपेठ तर्फे 'मोफत नेत्ररोग तपासणी' इ. उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी प्राणीशास्त्र विभागाकडून 'गप्पी मासे वाटप व रक्तगट तपासणी' केली जाणार आहे.तरी यापैकी कुठल्याही उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, पालक व नागरीकांनी प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, आयक्यूएसी समन्वयक प्रा.डॉ.मुकुंदराज पाटील, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.बळीराम शिंदे, प्रा.डॉ.संतोष रणखांब व प्रा.अर्जुन मोरे यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन महाविद्यालयाच्या प्रसिद्धी विभागाकडून करण्यात आले आहे.

Saturday, September 13, 2025

अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या विभागीय अध्यक्षपदी शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांची निवड

अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या विभागीय अध्यक्षपदी शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांची निवड 
सोनपेठ (दर्शन) :- अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या जालना परभणी व बीड जिल्हा विभागीय अध्यक्षपदी श्री गुरु ष.ब्र. १०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांची तर उपाध्यक्षपदी गुरु ष.ब्र.१०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर तर सचिव पदावर श्री  गुरु ष.ब्र.१०८  विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. सोनपेठ दि १३ सप्टेंबर 2025 श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ येथे अखिल भारत वीरशैव लिंगायत शिवाचार्य संस्थेचे उपाध्यक्ष श्री गुरु ष.ब्र.१०८ श्रीकंठ शिवाचार्य महाराज नारायणसूरकर/रेवूर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य संस्थेचे अध्यक्ष गुरु ष.ब्र.१०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधाम यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.या सभेत  अखिल भारतीय वीरशैव लिंगायत शिवाचार्य संस्थेचे जालना परभणी व बीड जिल्हा विभागीय अध्यक्षपदी श्री गुरु ष.ब्र. १०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांची, उपाध्यक्षपदी  गुरु ष.ब्र.१०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर तर सचिव पदावर श्रीगुरु ष.ब्र.१०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या सभेस श्रीगुरु ष.ब्र.१०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज  मन्मथधाम ,श्री गुरु ष.ब्र.१०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर,  श्री गुरु ष.ब्र.१०८ अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर, श्री गुरु ष.ब्र.१०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर,श्री गुरु ष.ब्र.१०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर,श्री गुरु ष.ब्र. १०८ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर, श्री गुरु ष.ब्र.१०८ चनबसव शिवाचार्य महाराज बर्दापूरकर,श्री गुरु ष.ब्र.१०८ वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर ,श्री गुरु ष.ब्र.१०८ विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज आष्टीकर (लक्ष्मनाची) यांची उपस्थिती होती.
साप्ताहिक सोनपेठ दर्शन जाहिरात व बातम्या साठी संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.

Friday, August 29, 2025

जशन ए ईद ईद मिलाद उन नबी निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

जशन ए ईद ईद मिलाद उन नबी निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन 
सोनपेठ (दर्शन) :- पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलेही व सल्लम यांच्या जयंती निमित्त जशन ए ईद ईद मिलाद उन नबी निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन नौजवाने ए ईद मिलाद उन नबी कमिटी सोनपेठ द्वारा आयोजित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 ठिक सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत हो.शहिद टिपु सुलतान चौक सोनपेठ येथे  रक्तदान करा व मानवतेचा संदेश पोहचवा असे आवाहन करुन नौजवाने ए ईद मिलाद उन नबी कमिटी सोनपेठ यांनी जास्तीत जास्त तरुण बांधवांनी या भव्य रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवून आपली भूमिका जाहीर करावी अशी विनंती केली आहे.

Thursday, August 28, 2025

सोनपेठ आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन ; जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा

सोनपेठ आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन ; जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा 
सोनपेठ (दर्शन) :- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालय सोनपेठ यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक 31 ऑगस्ट 2025 रविवार रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह सोनपेठ येथे करण्यात आलेले आहे, करिता गरजवंत रुग्णांनी/नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.विठ्ठल कराड वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सोनपेठ यांनी केले आहे, शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी करून पात्र रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यातून संपूर्ण सेवा देऊन, संपूर्ण उपचार मोफत दिले जाणार आहेत तसेच शिबिरात नागरिकांचे आयुष्यमान कार्ड व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य कार्ड काढून देण्यात येणार आहे तरी सोबत रेशन कार्ड व आधार कार्ड मोबाईलसह उपस्थित राहून कार्ड काढून घ्यावेत.जेणेकरून गरजवंत रुग्णांना/नागरिकांना रुपये 5 लाखापर्यंत मोफत उपचार खाजगी दवाखान्यातही घेता येणार आहेत तरी जास्तीत जास्त रुग्णांनी/नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालय सोनपेठ वैद्यकीय अधीक्षक डॉ.विठ्ठल कराड यांनी केले आहे.

Saturday, August 23, 2025

सोनपेठ येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

सोनपेठ येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
सोनपेठ (दर्शन) :- ब्रह्माकुमारीज सोनपेठ सेवाकेंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन ब्रह्माकुमारी संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका रायोगिनी दादी प्रकाशमनी यांच्या 18 व्या पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिन (25 ऑगस्ट 2025) निमित्त करण्यात आले आहे.या शिबिरासाठी डॉ. सौ. मीरा कैलास बाकळे (B.A.M.S.), डॉ. सौ. अर्चना बालाजी पारसेवार (B.H.M.S.) आणि डॉ. सौ. प्रमिला धनंजय पवार (B.A.M.S., CGO) यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.कार्यक्रमाचे ठिकाण व्हिजन पब्लिक स्कूल, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक आठवडी बाजार सोनपेठ हे असून मंगळवार, 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता  शिबिर आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे स्वागतोच्छूक ब्रह्माकुमारी मीरा दीदी, संचालिका सेवाकेंद्र सोनपेठ असतील.या शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ब्रह्माकुमारी मीरा दीदी यांनी केले आहे. 

Saturday, August 9, 2025

पालघर नगर परिषद विरोधात "माजी सैनिकाचा" आमरण उपोषणाचा इशारा ; मुख्यमंत्री साहेब आता तरी जागे व्हा

पालघर नगर परिषद विरोधात "माजी सैनिकाचा" आमरण उपोषणाचा इशारा ; मुख्यमंत्री साहेब आता तरी जागे व्हा 
पालघर/छत्रपती संभाजीनगर/परभणी/सोनपेठ (दर्शन) :- माजी सैनिक डॉ. भाऊराव पुंडलिक तायडे (रा. समर्थ निवास, पोलीस सोसायटी, रामनगर रोड, पालघर पूर्व) यांनी पालघर नगरपरिषदच्या कथित निष्काळजीपणा आणि मनमानी कारभाराविरोधात १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पाचबत्ती हुतात्मा चौक, माहिम रोड, पालघर येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
१९ वर्ष देशसेवा करताना कारगील युद्धात सहभागी झालेले डॉ.तायडे सेवानिवृत्तीनंतर पालघर पूर्व येथे वास्तव्यास आहेत. त्यांची मालमत्ता क्र. ४०२१ (‘सी’ झोन) कर माफीस पात्र असून, २०११ पासून वारंवार पत्रव्यवहार करूनही नगरपरिषदने त्यांचे प्रकरण निकाली काढले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उलट, संबंधित मालमत्तेची नोंद दप्तरातून गहाळ केल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. शिवाय, घोलविरा (वेवूर) येथे त्यांच्या नावावर चुकीच्या दोन प्रॉपर्टी नोंदी दाखवून त्यातील एक रद्द केल्याचेही त्यांनी सांगितले.
२०११ पासून २०२५ पर्यंत कर माफीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, परंतु उत्तर मिळाले नाही. कर मागणीपत्रक दरवर्षी नियमाप्रमाणे न देता त्यावर स्वाक्षरीची पोहचही घेतली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. शासन निर्णय २०२० दाखवत कर माफी नाकारली जात असली तरी त्यांच्या अर्जाची २०११ पासून दखल घेतली गेली नाही, यामुळे त्यांना मानसिक त्रास, अन्याय व जप्तीची नोटीस मिळाल्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ.तायडे यांनी स्पष्ट केले की, १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषणापर्यंत न्याय मिळाला नाही तर संभाव्य जीवितहानीसह सर्व परिणामांसाठी शासन जबाबदार असेल. या इशाऱ्याची प्रत जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पोलीस अधिक्षक, तहसिलदार, पालकमंत्री आणि माजी सैनिक कल्याण मंत्री यांना पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास काळी राखी बांधून शेतकरी आत्महत्याचा निषेध म्हणून वेदनेचा धागा

पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास काळी राखी बांधून शेतकरी आत्महत्याचा निषेध म्हणून वेदनेचा धागा 
सोनपेठ (दर्शन) :- नरेंद्र व देवेंद्र भाऊला काळी राखी बांधून श्रद्धांजली अर्पण करू, ही राखी नाही श्रध्दांजली आहे ६ लाख ६ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या शेतकऱ्यांच्या आया बहिणीचं कुंकू पुसलं गेलं. ९ ऑगस्ट २०२५ (रक्षाबंधन) सोनपेठ येथे काळी राखी खरी शेतकरी आत्महत्येची श्रद्धांजली म्हणुन वेदनेचा धागां बांधुन घेतला, सोनपेठ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास काळी राखी बांधून सहा लाख शेतकरी आत्महत्या झाल्या असून वेदनेचा धागा म्हणून ही काळी राखी निषेध म्हणून बांधण्यात येत आहे हे सरकार आत्महत्या रोखण्यात  अयशस्वी झाले आहे,आत्महत्याग्रस्त शेतकरी पांडुरंग पंढरीनाथ होनमने यांच्या मातोश्री चे हस्ते व  अमोल शेषराव वाघमारे यांच्या मातोश्री च्या हस्ते व गणेश पुरभाजी माळवदे यांच्या पत्नीचे हस्ते राखी बांधून निषेध जाहीर केला.यावेळी तालुकाप्रमुख अशोक म्हस्के शहरप्रमुख पठाण मकसूद, नंदकिशोर शिंदे, गणेश कोल्हे, अक्षय वालेकर, आदी उपस्थित होते, 

Friday, August 8, 2025

परभणी वक्फ अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी ; 15 ऑगस्ट औरंगाबादला आमरण उपोषणाचा इशारा

परभणी वक्फ अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी ; 15 ऑगस्ट औरंगाबादला आमरण उपोषणाचा इशारा 
सोनपेठ (दर्शन):- सोनपेठ स्थानिक वक्फ कमिटी मंजूर करण्यासाठीचा दिनांक 23 जुलै 2024 रोजी दाखल प्रस्ताव याबाबत एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पैशासाठी बेकायदेशीर रित्या काम नकरता मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याबद्दल परभणी वक्त अधिकारी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद कार्यालयासमोर दिनांक 15 ऑगस्ट 2025 आमरन उपोषणाचा इशारा तसेच सेवा हमी कायदा विलंब अधिनियमाचा भंग करणाऱ्या जिल्हा वक्फ अधिकारी परभणी यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे बाबत माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन, निवेदनात सोनपेठ स्थानिक वक्फ समिती मंजूर करण्यासाठी दिनांक 23 सात 2024 रोजी रीतसर प्रस्ताव दाखल करत नियमनुसार पावती आधारे 5900 भावना करून देखील परभणी वक्फ कार्यालयातील सेवक व लिपिक हे परभणी वक्फ अधिकारी यांचे नाव सांगून 25 हजार रुपयाची मागणी केली तसेच पैसे कशासाठी साहेबांच्या चहापाण्यासाठी लागतात यावर अर्जदारांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शविली असता कार्यालयात बसलेल्या दलाल करवी तात्पुरती 5000 रुपये द्या असे सांगून त्या सेवक पदवी विकास त्यांचे काम पुढे सरकवा आणखी वरच्या साहेबाला लागल्यास पाच दहा हजार काम झाल्यावर देतील तुम्ही काम सुरू करा असे सांगून बळजबरीने अर्जदाराकडून व सहकार्याकडून 5 हजार रुपये भरती करून दिले, एक-दोन महिन्यात काम होईल असे सांगितले आणि त्यानंतर वेळोवेळी त्यांना काम झाले का असे विचारले असता आज उद्या आज उद्या करत म्हनाले उर्वरित 20 हजार रुपये देण्याबाबत सांगितले, दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी परभणी वक्फ कार्यालयात गेलो असता एक अर्ज दाखवून तुमच्या विरोधात तक्रार हवी आहे ती तक्रार मिळण्यासाठी रुपये 5000 व कामासाठी 20000 असे एकूण 25 हजार रुपये दिले शिवाय तुमचे काम करायचे नाही असे साहेबांनी सांगितले आहे असे म्हणाले, तक्रारदाराचे नाव विचारले असता नाव सांगण्यात व समर्थता दर्शविली, सदरील तक्रार कधी आली असे विचारले असता यापूर्वी तुम्ही आम्हाला आलेल्या तक्रारी बाबत तोंडी किंवा लेखी कळविले नाही असे विचारणा केली असता, तुम्हाला काम करून घ्यायचे असेल तर पैसे द्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या उगीच कशाला प्रकरण चिघळवीतात असे सांगून पैसे दिल्या शिवाय काम होणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा उपोषण करा, मोर्चा काढा, आम्हाला काही फरक पडत नाही असे म्हणून अपमानास्पद वागणूक देऊन कार्यालयातून हाकलून दिले, सोनपेठ स्थानिक वक्फ समिती चा अर्थ पावती रितसर फाडून ही,एक वर्षाच्या वर कालावधी उलटून गेला तरी पैशासाठी काम टाळणाऱ्या जिल्हा वक्फ अधिकारी व त्यांच्या कार्यालयातील सेवक व लिपिक यांच्यावर विलंब अधिनियम 2005 व सेवा हमी विधेयकाचा भंग केल्याप्रकरणी शिस्त भंगाची कारवाई करून याबाबत त्यांच्या सेवा पुस्तकेत नोंद घेण्यात यावी व आमची सोनपेठ स्थानिक कमीटी मंजूर करण्याबाबत आदेशीत करावे अशी विनंती केली आहे.तसेच सोनपेठ स्थानिक वक्फ कमिटी मंजूर करण्यासाठीचा दिनांक 23 जुलै 2024 रोजी दाखल प्रस्ताव याबाबत एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पैशासाठी बेकायदेशीर रित्या काम नकरता मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याबद्दल परभणी वक्त अधिकारी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद कार्यालयासमोर दिनांक 15 ऑगस्ट 2025 आमरन उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे, या निवेदनावर शेख इसाक शेख खालेक यांची स्वाक्षरी आहे.

Wednesday, July 23, 2025

वीरशैव आणि लिंगायत एकच : जगद्गुरू पंचाचार्य म्हणतात जाती जन्माने नव्हे तर व्यवसायाने

वीरशैव आणि लिंगायत एकच : जगद्गुरू पंचाचार्य म्हणतात जाती जन्माने नव्हे तर व्यवसायाने 
दावणगिरी (कर्नाटक)/महाराष्ट्र/छत्रपती संभाजीनगर/परभणी/सोनपेठ (दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांचेकडून) : - श्रीजगद्गुरू पंचाचार्य सनातन हिंदू वीरशैव धर्माचे संस्थापक आहेत. या धर्माचे तत्त्वज्ञान आणि नीती नियम सांगण्यासाठी यांचे देशामध्ये निरंतर परिभ्रमण असते. काही विशिष्ट वेळी निर्णय घेण्यासाठी पाचही जगद्गुरू एकत्र येण्याची परंपरा आहे. १९१८ साली जगद्गुरू पंचाचार्यांचे संमेलन काशी क्षेत्रात संपन्न झाले होते. त्यावेळी अनेक विषयांवर निर्णय झाले होते. यातील मुख्य निर्णय म्हणजे एक पीठ आणि मठावर पूर्वी दोन शिवाचार्य असायचे. एक शिवाचार्य मठ/ पीठात राहून मठाची व्यवस्था पाहायचे. दुसरे शिवाचार्य धर्मप्रचारासाठी सर्वत्र भ्रमण करायचे. दोन शिवाचार्य असल्यामुळे मठाचा कारभार पाहताना काही अडचणी यायच्या. यासाठी पाच जगद्गुरूंनी एकत्र येऊन निर्णय घेतला. याच्यापुढे दोन अधिकारी नेमण्याऐवजी एकच अधिकारी नेमायचे आणि त्यांना दोन्ही अधिकार द्यायचे. तेव्हापासून एका गादीवर एकच अधिकारी पीठ किंवा मठ सांभाळतात. पाच जगद्गुरू एकत्र येऊन निर्णय घेण्याची ही परंपरा पुढेही सुरूच राहिली. १९०९ पासून २००९ पर्यंत पंचाचार्य एकत्र येणे, सभा संमेलने घेणे, पंचाचार्य युगमानोत्सव घेणे असे कार्यक्रम सुरू होते. २००९ मध्ये जगद्गुरू पंचाचार्य संमेलन, जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सव समारंभ पुण्यात झाला होता. पिंपरी चिंचवडचे महेश स्वामी यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. थोर उद्योजक बाबा कल्याणी हे स्वतः उपस्थित होते. महाराष्ट्र वीरशैव सभेचाही सहभाग होता. जगद्गुरू पंचाचार्यांचा अडृडपालखी महोत्सव आणि दोन दिवसीय संमेलन संपन्न झाले होते. नंतर सोळा वर्षे अशा प्रकारचे कार्यक्रम झाले नव्हते. सोळा वर्षानंतर झालेल्या या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या एकोप्यासाठी हे संमेलन संपन्न झाले. भविष्यात पंचाचार्य परंपरेतील शिवाचार्य आणि विरक्त परंपरेतील मठाधिपती या सर्वांना एकत्र घेऊन महासंमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी एकदा वीरशैव आणि लिंगायत वेगळे आहेत असा वाद सुरू होता. बदामी जवळील शिवयोग मंदिर परिसरात संमेलन पार पडले होते. हनगल कुमार स्वामी यांनी स्थापन केलेल्या शिवयोग मंदिरात गुरुकुल आहे. तिथे दोन्ही परंपरेचे २००० हून अधिक मठाधिपती आणि दोन लाखाहून अधिक भक्तांनी एकत्र येऊन आपण एक असल्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा भेद संपला होता.
       भारतामध्ये आता जनगणना होणार आहे. या संदर्भात निर्णय घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. वीरशैवांची संख्या कळावी. वीरशैवांच्या प्रत्येक घटकाला आरक्षण मिळत नाही. समाजामध्ये ही मोठी समस्या आहे. धर्म आणि जात काय लिहावे हा संभ्रम समाजामध्ये आहे. या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचे शृंग संमेलन कर्नाटकातील दावणगिरी येथील जगद्गुरू रेणूक मंदिराच्या कल्याण मंडपात आयोजित केले होते. या संमेलनासाठी पाचही जगद्गुरू, सर्व प्रांतीय सर्व शिवाचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       या संमेलनाचे उद्घाटन दि. २१ रोजी सकाळी ११ वाजता अ. भा. वीरशैव महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष ९५ वर्षीय डॉ. शामनुरू शिवशंकरप्पा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे उपस्थित होते. याबरोबरच विविध पक्षांचे वीरशैव धर्म अनुयायी असलेले मंत्री, आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संमेलनात सर्व जगद्गुरूंनी निर्णय घेतला की जनगणनेमध्ये जात या रकान्यात प्रचलित जात म्हणजे ज्या पोटजातीला आरक्षण मिळते ती लिहायची. धर्म हिंदू लिहायचा. त्याबरोबरच वीरशैव या पंथाचा उल्लेख जनगणनेत होण्यासाठी वीरशैव धर्मीय खासदार, मठाधिपती, विविध पोटजातींच्या भक्तगणांनी एकत्र येऊन सन्माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संबंधित खात्याचे मंत्री, अधिकारी यांना भेटून धर्माच्या रकान्यानंतर पंथ रकाना असावा असा आग्रह करावा. पंथ या रकान्यामध्ये वीरशैव लिंगायत असे लिहावे.
       पोटजातीच्या नावाखाली आपण विभक्त व्हायचे नाही. पोटजाती सांभाळून आपण सर्व एक राहायचे. वीरशैव आणि लिंगायत वेगळे आहेत असे म्हणायचे नाही. वीरशैव हा शास्त्रीय शब्द आहे. लिंगायत हा परंपरेतून आलेला शब्द आहे. पंचाचार्य आणि महात्मा बसवेश्वरादी शरणांचे विचार वेगळे नाहीत. वीरशैव लिंगायत एकच आहे असे लोकांचे प्रबोधन करण्यात आले.
       वीरशैवातील पोटजाती जन्माच्या आधारे नसून व्यवसायांच्या आधारे मिळालेले आडनाव आहेत. म्हणून जातीच्या आधारे कुणीही विभक्त होऊ नये. आपल्या पोटजाती सांभाळून आपण सर्व वीरशैव लिंगायत एकच आहोत अशी भावना निर्माण करण्यासाठी पीठाचार्य, शिवाचार्य आणि राजकारण्यांनी प्रबोधन केले. यावेळी एकूण १२ ठराव घेण्यात आले. सर्व पीठाचार्य आणि शिवाचार्यांनी वीरशैव आणि लिंगायत एकच आहेत अशी घोषणा एकमुखाने केली.
       कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोमई, जगदीश शेट्टर, वीरशैव लिंगायत महामंडळाचे अध्यक्ष तथा हुनगुंदचे खासदार विजयानंद काशप्पनवर, केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा, उपस्थित होते. या सर्वांचे वरील विषयांवर एकमत झाले. संमेलन यशस्वी होण्यासाठी अनेक मान्यवरांनी तनमनधनाने सेवा केली. कर्नाटक सरकारचे मंत्री मल्लिकार्जुनप्पा यांचे विशेष योगदान होते.

या शृंग संमेलनात घेतलेले १२ ठराव पुढील प्रमाणे आहेत.

१) येणाऱ्या जातीनिहाय जनगणनेमध्ये सर्व पोटजातींचा उल्लेख पंथ या रकान्यामध्ये वीरशैव लिंगायत असा करावा. वीरशैव आणि लिंगायत एकच आहेत. ही एकी सदैव टीकवण्याचा संकल्प करण्यात आला.

२) सनातन हिंदू वीरशैव लिंगायत धर्माच्या सर्व अनुयायींच्या पोटजाती व्यवसायावर आधारित आहेत. या पोटजातींच्या आधारावर धर्मामध्ये कोणत्याही प्रकारे विभाजन करू नये. पोटजात कोणतीही असो आपण सारे वीरशैव लिंगायत आहोत. ही एकता कायम ठेवायची आहे. 

३) जनगणना फॉर्ममध्ये धर्माबरोबरच पंथ किंवा मत असा रकाना असावा. अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या माध्यमातून केंद्र सरकारला याविषयी आग्रह करावा. 

४) या मुद्द्यावर मा. पंतप्रधान महोदयांचे लक्ष वेधण्यासाठी समाजाचे प्रमुख नेते, मठाधिपती, सर्व धर्मीय वीरशैव लिंगायत खासदारांचे एक प्रतिनिधी मंडळ दिल्लीला पाठवावे. 

५) वीरशैव धर्मातील सर्व पोटजातींना ओबीसी या संवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी पोटजातीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारचे लक्ष वेधावे.

६) वीरशैव लिंगायत समाजाच्या ज्या पोटजातींना आरक्षण मिळत आहे ते आरक्षण कायम राहावे.

७) अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या जिल्हा, तालुका आणि गावातील कार्यालयामध्ये श्री जगद्गुरू रेणूकादी पंचाचार्य प्रतिमा लावणे आवश्यक आहे. वीरशैव लिंगायत यांचे मूळ सिद्धान्त तसेच शरण आणि संतांची विचारधारा एकत्रितपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला.

८) गुरूंची प्राचीन परंपरा श्रद्धेने चालू ठेवावी. युवकांमध्ये याविषयी जागरूकता आणि आस्था निर्माण करावी.

९) वीरशैव लिंगायत परंपरेतील महिला, दिव्यांग, वंचितांच्या हिताच्या रक्षणासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. 

१०) वीरशैव पीठाचार्य आणि शिवाचार्य यांचे एकमेकांशी सहकार्याचे धोरण असले पाहिजे. संबंधित पीठ आणि शाखा मठ यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या हिताच्या रक्षणासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. इतर पीठांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये.

११) वर्षातून एकदा पीठाचार्य आणि शिवाचार्यांचे महासंमेलन आयोजित करावे. वीरशैव लिंगायत परंपरेच्या आदर्श मूल्यांचे रक्षण करावे.

१२) उत्तर भारतातील दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर राज्यात वीरशैव समाज प्राचीन काळापासून वास्तव्यास आहे. त्यांच्यासाठी धार्मिक, सांस्कृतिक योजना तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.

Friday, July 18, 2025

बच्चू कडू यांची "शेतकरी मात्रा" "सातबारा कोरा करा" यात्रा प्रचंड प्रतिसाद

बच्चू कडू यांची "शेतकरी मात्रा" "सातबारा कोरा करा" यात्रा प्रचंड प्रतिसाद 
अमरावती/परभणी/सोनपेठ (दर्शन) :- 
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी गुरूकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन व त्यापाठोपाठ पापळ ते चिलगव्हाण ही 138 किलोमीटरची ‘सातबारा कोरा’ यात्रा काढली. जीवाचे हाल करून घेणारी ही पदयात्रा वजा ‘शेतकरी मात्रा’ आजारी सरकारवर कितपत आणि केव्हा उपायकारक होईल, ते आताच सांगता येणार नाही. परंतु जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलनांचे सिंहावलोकन होईल, तेव्हा या सातबारा कोरा यात्रेचा उल्लेख अनिवार्यतेने होईल, अशी ही ऐतिहासिक पदयात्रा आहे.
 
भारताच्या इतिहासात महात्मा गांधी यांची दांडीयात्रा प्रसिद्ध आहे. ब्रिटीश सरकारने जीवनावश्यक मिठावर कर लावल्याने महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रमातून 12 मार्च 1930 ला दांडीयात्रा काढली होती. 385 किलोमीटरची दांडीयात्रा 24 दिवस चालली. ही यात्रा समुद्रकिनारी 6 एप्रिल 1930 ला पोहोचली. गांधीजींनी चिमूटभर मिठ उचलून ‘कायदेभंग’ केला होता. अगदी अलिकडे अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत 136 दिवसांची 3,570 किलोमीटरची कन्याकुमारी ते काश्मिर, अशी संपूर्ण ग्रामीण भारताला ढवळून काढणारी ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. या यात्रेदरम्यान खा. राहुल गांधी यांनी असंख्य नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. तत्पूर्वी, 2011 मध्ये शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव मिळावा, यासाठी गुरूकुंज मोझरी येथून सेवाग्रामपर्यंत पायी कापूस दिंडी काढली होती. शेतकर्‍यांचे पंचप्राण दिवंगत खा. शरद जोशी यांनीसुद्धा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी कित्येक आंदोलने केलीत, आता बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग अन् लगेच पापळ ते चिलगव्हाण ही सातबारा कोरा यात्रा काढलेली आहे.
 
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या बाजूला गुरूकुंज मोझरी येथे 8 जूनपासून तब्बल सात दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती गठीत केली जाईल, असे लेखी आश्वासन सरकारच्या वतीने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. परंतु ‘सरकारी काम सहा महिने थांब’, ही सरकारची कार्यपद्धती असल्यानेच बच्चू कडू यांनी सरकारला 2 ऑक्टोबरची ‘डेडलाईन’ दिलेली आहे.
  
सरकारला आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी बच्चू कडू यांनी ‘सातबारा कोरा’ पदयात्रा 7 जुलैला प्रारंभ केली. 55 वर्षीय बच्चू कडू हे जन्मजात आणि जातीवंत आंदोलनकारी आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा पायाच जनआंदोलन आहे. बच्चू कडू यांची आंदोलने केवळ राज्यातच प्रसिद्ध नव्हे तर परराज्यात त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. गोरगरीब, दिव्यांग, शेतकरी, कष्टकरी लोकांचे हक्क व त्यांच्या प्रश्नाबद्दल मनात संताप येणे हा त्यांचा स्वभाव असून व्यवस्थेविरुद्ध मनात चिड आणून त्यासाठी लढणे, झगडणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. लढण्या झगडण्यासाठीसुद्धा जिगर लागते. तो कलेजा बच्चू कडू यांच्याकडे आहे.

सातबारा कोरा पदयात्रेची सुरूवात भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून करण्यात आली. तेव्हा अवघा महाराष्ट्र आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तीत तल्लीन होता. पांडुरंगाच्या नामस्मरणाने ओतप्रोत भरलेला होता. मार्गात ही पदयात्रा महाराष्ट्राच्या कृषीक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कर्मभूमीतून गेली.  बच्चू कडू यांनी वसंतराव नाईक यांना शेतकर्‍यांचा खरा ‘विठ्ठल’ संबोधून त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि अखेरच्या टप्प्यात पायी चालून चालून रक्ताळलेले तळपाय, पायाच्या नखातून रक्त बाहेर येण्याच्या असह्य वेदना सहन करीत बच्चू कडू यांची ही पदयात्रा 14 जुलैला नियोजितस्थळी चिलगव्हाण-आंबोडा (जि. यवतमाळ) येथे पोहोचली. या संपूर्ण यात्रेदरम्यान बच्चू कडू यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न, मन गहिवरून आणणार्‍या त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. 

महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून 18 जुलैपर्यंत नियोजित आहे. त्या मधोमध 7 ते 14 जुलै या कालावधीत ही सातबारा कोरा पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेच्या समारोपासाठी चिलगव्हाण-आंबोडा हे गाव निवडण्यालासुद्धा एक प्रमुख कारण आहे. चिलगव्हाण-आंबोडा येथील शेतकरी साहेबराव करपे, मालतीताई करपे या दाम्पत्याने त्यांच्या चार मुलांसह पवनार जवळच्या दत्तपूर या आश्रमात 19 मार्च 1986 ला नापिकी व कर्जबाजारीपणामुळे सामुहिक आत्महत्या केली होती. ती महाराष्ट्र सरकारने मान्य केलेली पहिली शेतकरी आत्महत्या होय. तेव्हापासून आजतागायत लाखो शेतकर्‍यांनी कर्ज व नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या आहेत. पण सरकारला त्याची कळ नाही. वसंतराव नाईक यांनी कृषीक्रांती घडवलेल्या महाराष्ट्राच्या माथ्यावर शेतकरी आत्महत्येचा लागलेला कलंक पुसता पुसला जात नाही. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना नाहीत. अर्धनग्न ‘स्मोकर मिनिस्टर’ सिगारेटचे झुरके घेत आहेत, दौर्‍यावरून बॅगमध्ये लाखो रुपयांचे बंडल घेऊन घरी पोहोचत आहे. सरकार यातच मस्त आहे. दुसरीकडे शेतकरी अन्यायाविरुद्ध पेटून तर उठतच नाही, व्यक्त व्हायलासुद्धा धजावत नाही. शिवाजी जन्माला यावा, पण तो शेजार्‍याच्या घरात, अशी स्थिती आहे. सरकारविरुद्ध कुणी आणि कसा आवाज उठवावा, हा प्रश्न विभागलेल्या शेतकर्‍यांच्या विखुरलेल्या मनाला पडलेला आहे, ही हतबलता दर्शविणारी बाब यात्रेदरम्यान बच्चू कडू आणि शेतकरी संवादातून प्रकर्षाने पुढे आलेली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 80 पेक्षा अधिक आमदार पराभूत झालेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारने आणलेल्या ‘फुकट’च्या योजनेला भाळून लाडक्या बहिणींनी कैक बहिण-भावांना फुकटात गारद केले. त्यात पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, हितेंद्र ठाकूर, यशोमती ठाकूर, बच्चू कडू आदिंसह कित्येक दिग्गजांना लॉटरी लागली. आता त्यापैकी बहुतेकजण घरी बसून पुढील निवडणुकीची प्रतिक्षा करीत आहेत. बच्चू कडू यांनासुद्धा घरी येणार्‍यांचे ऐकून व निवेदन स्विकारून बघतो म्हणून सांगता आले असते. पण हा भीडू लोकांसाठी, लोकांसारखा स्वस्थ बसत नाही. लोकांना विसर पडतो, पण लोक लक्षातही ठेवतात, हेही तेवढेच खरे आहे. लोकशाहीत लोकभावना, जनमताचा कौल याला खूप महत्त्व आहे. सातबारा कोरा करा, ही एक आर्त जनभावना आहे. लोकांच्या सामाजिक व आर्थिकतेशी संबंधित आहे. आमदार, खासदार, मंत्र्यांसारख्या सोयीसुविधा नव्हे तर दररोजच्या मरणातून सुटका करा, एवढेच शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्या आक्रोशाची मात्रा बच्चू कडू या यात्रेच्या निमित्ताने सरकारला देत आहेत.  सरकारने ऐकले नाही तर ‘नवा कायदेभंग’ अटळ दिसत आहे.

-गोपाल हरणे
94228 55496
अमरावती.

Saturday, July 12, 2025

जेव्हा भक्ती, श्रद्धा आणि सेवा एकत्र येते तेंव्हा अन्नछत्र निर्माण होतं ! श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट 12 व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

जेव्हा भक्ती, श्रद्धा आणि सेवा एकत्र येते तेंव्हा अन्नछत्र निर्माण होतं ! श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट 12 व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 
अन्नछत्राच्या सावलीत – परळीच्या सेवाभावाचं उगमस्थान परळी वैजनाथ या पवित्र नगरीबद्दल आपण अनेकदा ऐकत असतो. महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योर्तिलिंग असलेलं श्री वैद्यनाथ मंदिर, दररोज हजारो भाविकांची उपस्थिती, पावित्र्याचं, श्रद्धेचं आणि भक्तीचं केंद्र अशी परळी या शहराची ही ओळख फार जुनी आहे. पण गेल्या काही वर्षांत परळीची आणखी एक ओळख निर्माण झाली आहे ती म्हणजे "श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या" सेवाभावी कार्यामुळे. या ट्रस्टने केवळ उपाशी पोटांना अन्न दिले नाही, तर माणुसकीला अर्थ दिला आहे. कोणत्याही प्रसिद्धीच्या हव्यासाविना, निव्वळ एक विचार घेऊन सुरू झालेलं हे कार्य आज हजारो लोकांच्या जीवनात आधारवडासारखं उभं आहे. परळी येथील एक हरहुन्नरी समाजसेवक याने अन्नछत्राची संकल्पना मांडली परंतू केदारनाथ दुर्घटनेत त्यांचे स्वप्न त्यांच्या सोबत तिथेच राहिले त्यांच्या धाकट्या बंधुनी मित्र मंडळीसह अन्नदान कार्याची सुरुवात केली त्यास मिळालेल्या प्रतिसादाने सन 2013 मध्ये श्री अन्नपूर्णा ट्रस्टची स्थापना झाली. समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं, आपलं आयुष्य जनतेच्या सेवेच्या वाटेला द्यायचं असा निश्चय तरुणांनी केला. त्यांनी "अन्नछत्र" ही संकल्पना उराशी बाळगून ट्रस्टची नोंदणी केली व कै.ओमभाऊ लाहोटी यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाला पूर्तता देण्यासाठी त्यांनी आपलं उर्वरित जीवन या ट्रस्टला समर्पित केलं.याच क्षणी या अन्नछत्राच्या कार्याला खरी सुरुवात झाली.

2013 साली आलेल्या श्रावण महिन्यात त्यांनी प्रत्येक रविवारी मोफत अन्नदान सुरू केलं.ते निरंतर पुढे सुरुच राहिले.ही सेवा एका दिवशी किंवा एका महिन्यात संपणारी नव्हती.त्या अन्नदानात जो समर्पणाचा, समाधानाचा भाव अनुभवला, त्यानेच पुढचा मार्ग स्पष्ट केला. त्यांनी ठरवलं की वर्षभर प्रत्येक रविवारी मोफत अन्नदान चालू ठेवायचं.आणि मग दुसऱ्या वर्षी त्यांनी अन्नछत्राचं स्वरूप अधिक व्यापक केलं वर्षभर प्रत्येक शनिवार आणि रविवारी मोफत भोजन सेवा सुरू झाली.हे केवळ एक उपक्रम नव्हता,तर श्रद्धेचा, स्मरणाचा आणि समाजभानाचा प्रत्यय होता.अन्नछत्र हे भाऊ च्या आठवणींचं रूप होतं ज्यात दर रविवारी, दर शनिवारी केवळ भुकेच्या पोटात अन्न नव्हे,तर समाजाच्या अंतरात्म्यात माणुसकीचा अर्थ घालण्यात येत होता.

या अन्नछत्राची सुरुवात परळीतील श्री शनी मंदिर येथे झाली. तेव्हा त्यांच्याकडे ना मोठा निधी होता ना मोठा हॉल, ना आधुनिक किचन होते  होता तो सेवाभाव, कार्यनिष्ठा आणि लोकांचा पाठिंबा.काही वर्षांनी श्री शनी मंदिर चे बांधकाम सुरू झाल्यामुळे अन्नछत्र दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागलं आणि मग ते "श्री वैद्यनाथ अर्बन को ऑप बँक परळी" यांच्या जागेत स्थलांतरित झालं.गेली 8 वर्षे हे अन्नछत्र तिथे सकाळी आणि संध्याकाळी चालू आहे.दररोज सुमारे 1200 ते 1500 भाविक इथे मोफत भोजनाचा लाभ घेतात.देश विदेशातून प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनास येणारे शिवभक्त जेंव्हा इथला प्रसाद घेऊन जातात ते अन्नछत्रासह परळीचे गुणगान करतात.एका वेळेस दीडशे लोक बसू शकतात अशी या अन्नछत्राची व्यवस्था आहे.पण ही आकड्यांची गोष्ट नाही – ही गोष्ट आहे, रोज उगवणाऱ्या माणुसकीच्या सूर्यासारख्या कार्याची.

वैद्यनाथ बँके ने दिलेल्या जागेवर बांधकाम सुरू होणार असल्यामुळे आज पुन्हा एकदा अन्नछत्राचं स्थलांतर आता श्री वैद्यनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला श्री दत्त मंदिर, श्री राम मंदिर ( श्री बालाजी मंदिर ) येथे झाले आहे. मात्र हे स्थलांतर म्हणजे काही मागे जाणं नाही तर एका मोठ्या प्रवासाचा पुढचा टप्पा आहे.जिथं पोटभर जेवण मिळतं,तिथं प्रेमाची सावली आपसूकच तयार होते आणि ही सावली परळीकरांनी वाढवली आहे, जपली आहे.

श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टचं मोठेपण म्हणजे त्यांनी ‘माझं आणि तुझं’ असा भेद ठेवलेलाच नाही. इथं प्रत्येकजण ‘हे माझ्या परळीचं अन्नछत्र आहे’ असं म्हणतो. इथे कोणतेही पदं नाहीत, अधिकार नाहीत फक्त जबाबदाऱ्या आहेत. प्रत्येक काम करणारा माणूस मालक आहे आणि सेवकही. ही भावना इथल्या कार्यात खोलवर रुजलेली आहे. म्हणूनच हे अन्नछत्र केवळ अन्नदान करणारं ठिकाण नाही, तर परळीच्या समाजाची एक जबाबदारी बनून गेलं आहे.

या ट्रस्टने अन्नदानासोबतच अनेक समाजोपयोगी योजना सुरू केल्या आहेत. गरीब व निराधार महिलांसाठी ‘निराधार महिला सहाय्य योजना’ राबवली जाते. यात महिलांना दर महिन्याला जीवनावश्यक वस्तू, किराणा साहित्य, साडी-चोळी अशा वस्तू दिल्या जातात. आज या योजनेचा लाभ परळीतीलच नव्हे, तर परिसरातील महिला आणि निराधार लोकांपर्यंत पोहोचतो आहे.

‘विद्यार्थी सहाय्य योजना’तून गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, गणवेश, शालेय साहित्य, पेन, कंपास, शूज हे सगळं मोफत दिलं जातं. विशेषतः जे अनाथ आहेत, ज्यांना पालकही नाहीत, अशा मुलांसाठी ‘निराधार पालक-पाल्य योजना’ अंतर्गत ट्रस्ट संपूर्ण जबाबदारी घेतो अन्न, शिक्षण आणि कपडालत्ते यांची संपूर्ण व्यवस्था केली जाते . या व्यतिरिक्त ट्रस्टने 'ग्रंथदान ही योजना' राबवली आहे. शाळांना दर्जेदार वाचनीय पुस्तके दिली जातात. वाचन संस्कृती जपण्यासाठी आणि मुलांचं वैचारिक पोषण करण्यासाठी या योजनेचा उपयोग होतो. विद्यार्थ्यांच्या मनात विचारांचं बीज पेरणं ही खरंतर खूप मोठी सेवा आहे.

‘शुद्ध पेयजल’ हा विषय उन्हाळ्याच्या दिवसांत जिव्हाळ्याचा असतो. ट्रस्टने परळी परिसरात RO फिल्टर चे पाणी जार बसवून अनेक ठिकाणी मोफत शुद्ध पिण्याचे पाणी दिलं आहे. याचा लाभ फक्त भाविकांनाच नव्हे, तर जनावरं, पक्षी, रस्त्यावरची मंडळी सगळ्यांनाच होतो आहे तसेच अन्न हे पुर्णबृम्ह म्हणून अन्न वाचवा शपथ शालेय विद्यार्थी असो वा श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट च्या अन्नछत्रात येणारा प्रत्येक व्यक्ती घेतो.

ट्रस्टच्या या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांनी ट्रस्टचा गौरव केला आहे. पण या ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना पुरस्कारांची नाही, फक्त समाधानाची अपेक्षा आहे. कोणी उपाशी झोपलं नाही, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शिकण्यासाठी वह्या मिळाल्या, एखादी विधवा आई किराणाचा डबा घेऊन गेली हाच त्यांचा खरा पुरस्कार आहे.

परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगा पैकी पंचम ज्योतिर्लिंग असून या तीर्थक्षेत्राला शोभेल असेच या श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य आहे कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय, निव्वळ लोकसहभागातून १२ वर्षे चालावं, ही गोष्ट आज आश्चर्य वाटावी अशी आहे. पण खरंतर ही ताकद आहे लोकांची, त्यांच्या विश्वासाची, आणि अशा संस्थांच्या निष्ठेची.

आज हे अन्नछत्र हजारो जणांचं पोट भरतं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे अन्नछत्र माणसांची मनं जिंकतं आहे. जेव्हा एखादा भुकेला भाविक या अन्नछत्रात बसतो आणि समाधानाने जेवतो, तेंव्हा तो फक्त अन्न घेत नाही तर या समाजात अजूनही आपल्यासाठी कोणी आहे, हे अनुभवतो.

येणाऱ्या काळात परळीतल्या प्रत्येक नागरिकाने, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने  अन्नछत्र  "हे माझ्या परळीकरांचं आहे" या भावनेनं आपलं मानून पुढे आलं, तर या अन्नछत्राचं रूप आणखी भव्य होईल, हे नक्की. ही एक अशी संकल्पना आहे जी केवळ काही मंडळींच्या खांद्यावर न राहता, संपूर्ण परळीकरांनी मनोभावे उचलली, तर ही सेवा एका वेगळ्याच उंचीवर जाऊ शकेल. आज जरी दररोज सुमारे एक हजार ते बाराशे लोक इथं पोटभर अन्न घेत असले तरी ही संख्या केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही. ही संख्या हे दाखवत आहे की समाजात आजही माणुसकी जिवंत आहे, आणि ती इथे दररोज वाढते आहे. या अन्नछत्राचं भविष्यातील रूप आणखी मोठं व्हावं, यासाठी फक्त गरज आहे ती म्हणजे  प्रत्येक परळीकराने मनात ही सेवा ‘आपली’ समजणं. ही सेवा कुण्या एका व्यक्तीची, संस्थेची किंवा समूहाची नसून ती संपूर्ण परळीच्या संस्कृतीची ओळख बनली पाहिजे. अन्नछत्राचं पुढचं पाऊल म्हणजे केवळ जेवण देणं नव्हे, तर परळीतल्या गरजूंना, भाविकांना आणि समाजाला माणुसकीच्या सावलीत घेऊन जाणं ही जबाबदारी आपलीच आहे!
दिनांक १३ जुलै २०२५ ला ट्रस्ट चा १२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे.श्री अन्नपुर्णा चॅरिटेबल ट्रस्ट च्या सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

Friday, July 11, 2025

सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा एंव कलश यात्रा महाराष्ट्र - 2025 मराठवाडा ते विदर्भ

सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा एंव कलश यात्रा महाराष्ट्र - 2025 मराठवाडा ते विदर्भ 
मुख्य संयोजक आंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य श्री विवेकदासजी शास्त्री महाराज काशी वाराणसी (श्रीराम वृंदावन) यांना साप्ताहिक सोनपेठ दर्शन अंक भेट देताना संपादक किरण रमेश स्वामी दिसत आहेत...

सोनपेठ (दर्शन) :- सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा एंव कलश यात्रा महाराष्ट्र-2025 मुख्य संयोजक आंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य श्री विवेकदासजी शास्त्री महाराज काशी वाराणसी (श्रीराम वृंदावन) यांच्या मार्गदर्शनात विशेष आकर्षण भगवा ध्वज धारी, मातृशक्ती कलश धारी, संतांचे मार्गदर्शन, मंदिर मुक्ती संकल्प घेऊन अनेक उद्देश घेऊन ही पदयात्रा दिनांक 11 जुलै 2025 औंढा नागनाथ ते परळी वैद्यनाथ मुक्काम, दिनांक 12 जुलै 2025 परळी वैद्यनाथ ते सोनपेठ, पाथरी मुक्काम, दिनांक 13 जुलै 2025 सेलू, मंठा मुक्काम, दिनांक 14 जुलै 2025 तळणी, लोणार मुक्काम, दिनांक 15 जुलै 2025 सुलतानपूर-सिद्धपूर, मेहकर, हिवरा आश्रम मुक्काम, दिनांक 16 जुलै 2025 लव्हाळा फाटा, चिखली मुक्काम, दिनांक 18 जुलै 2025 वाघ झाड, मोताळा समारोप दिनांक 22 जुलै 2025 जलाभिषेक एंव महाप्रसाद श्री रायरेश्वर महादेव मंदिर चिंचपूर मोताळा जिल्हा बुलढाणा, आयोजक श्री पुरुषोत्तम राजमल मापारी व सौ.वर्षा पुरुषोत्तम मापारी या यात्रेचा मुख्य उद्देश भारताला संविधानिक पद्धतीने हिंदू राष्ट्र घोषित करावे, भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा येथे मुघलकालीन अतिक्रमण मुक्त करून भव्य मंदिर निर्माण करावे, काशी विश्वनाथ ज्ञानवापी परिसर संपूर्ण पद्धतीने हिंदू धर्मियांना सुपूर्त करावा, गोमाता "राष्ट्रमाता" घोषित करावी व गोहत्या संपूर्ण बंदी करावी, सनातन हिंदू धर्म राष्ट्रीय बोर्डाची स्थापना करावी, आदी मागण्या घेऊन ही यात्रा मराठवाडा ते विदर्भ औंढा नागनाथ ते श्री रायरेश्वर महादेव मंदिर चिंचपूर मोताळा जिल्हा बुलढाणा येथे समारोप होणार आहे तरी तमाम हिंदू बांधवांनी या यात्रेत तन-मन-धनाने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन मुख्य संयोजक अंतराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य श्री विवेकदासजी शास्त्री महाराज काशी वाराणसी (श्रीधाम वृंदावन) यांनी केले आहे.