Wednesday, July 23, 2025

वीरशैव आणि लिंगायत एकच : जगद्गुरू पंचाचार्य म्हणतात जाती जन्माने नव्हे तर व्यवसायाने

वीरशैव आणि लिंगायत एकच : जगद्गुरू पंचाचार्य म्हणतात जाती जन्माने नव्हे तर व्यवसायाने 
दावणगिरी (कर्नाटक)/महाराष्ट्र/छत्रपती संभाजीनगर/परभणी/सोनपेठ (दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांचेकडून) : - श्रीजगद्गुरू पंचाचार्य सनातन हिंदू वीरशैव धर्माचे संस्थापक आहेत. या धर्माचे तत्त्वज्ञान आणि नीती नियम सांगण्यासाठी यांचे देशामध्ये निरंतर परिभ्रमण असते. काही विशिष्ट वेळी निर्णय घेण्यासाठी पाचही जगद्गुरू एकत्र येण्याची परंपरा आहे. १९१८ साली जगद्गुरू पंचाचार्यांचे संमेलन काशी क्षेत्रात संपन्न झाले होते. त्यावेळी अनेक विषयांवर निर्णय झाले होते. यातील मुख्य निर्णय म्हणजे एक पीठ आणि मठावर पूर्वी दोन शिवाचार्य असायचे. एक शिवाचार्य मठ/ पीठात राहून मठाची व्यवस्था पाहायचे. दुसरे शिवाचार्य धर्मप्रचारासाठी सर्वत्र भ्रमण करायचे. दोन शिवाचार्य असल्यामुळे मठाचा कारभार पाहताना काही अडचणी यायच्या. यासाठी पाच जगद्गुरूंनी एकत्र येऊन निर्णय घेतला. याच्यापुढे दोन अधिकारी नेमण्याऐवजी एकच अधिकारी नेमायचे आणि त्यांना दोन्ही अधिकार द्यायचे. तेव्हापासून एका गादीवर एकच अधिकारी पीठ किंवा मठ सांभाळतात. पाच जगद्गुरू एकत्र येऊन निर्णय घेण्याची ही परंपरा पुढेही सुरूच राहिली. १९०९ पासून २००९ पर्यंत पंचाचार्य एकत्र येणे, सभा संमेलने घेणे, पंचाचार्य युगमानोत्सव घेणे असे कार्यक्रम सुरू होते. २००९ मध्ये जगद्गुरू पंचाचार्य संमेलन, जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सव समारंभ पुण्यात झाला होता. पिंपरी चिंचवडचे महेश स्वामी यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. थोर उद्योजक बाबा कल्याणी हे स्वतः उपस्थित होते. महाराष्ट्र वीरशैव सभेचाही सहभाग होता. जगद्गुरू पंचाचार्यांचा अडृडपालखी महोत्सव आणि दोन दिवसीय संमेलन संपन्न झाले होते. नंतर सोळा वर्षे अशा प्रकारचे कार्यक्रम झाले नव्हते. सोळा वर्षानंतर झालेल्या या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या एकोप्यासाठी हे संमेलन संपन्न झाले. भविष्यात पंचाचार्य परंपरेतील शिवाचार्य आणि विरक्त परंपरेतील मठाधिपती या सर्वांना एकत्र घेऊन महासंमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी एकदा वीरशैव आणि लिंगायत वेगळे आहेत असा वाद सुरू होता. बदामी जवळील शिवयोग मंदिर परिसरात संमेलन पार पडले होते. हनगल कुमार स्वामी यांनी स्थापन केलेल्या शिवयोग मंदिरात गुरुकुल आहे. तिथे दोन्ही परंपरेचे २००० हून अधिक मठाधिपती आणि दोन लाखाहून अधिक भक्तांनी एकत्र येऊन आपण एक असल्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा भेद संपला होता.
       भारतामध्ये आता जनगणना होणार आहे. या संदर्भात निर्णय घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. वीरशैवांची संख्या कळावी. वीरशैवांच्या प्रत्येक घटकाला आरक्षण मिळत नाही. समाजामध्ये ही मोठी समस्या आहे. धर्म आणि जात काय लिहावे हा संभ्रम समाजामध्ये आहे. या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचे शृंग संमेलन कर्नाटकातील दावणगिरी येथील जगद्गुरू रेणूक मंदिराच्या कल्याण मंडपात आयोजित केले होते. या संमेलनासाठी पाचही जगद्गुरू, सर्व प्रांतीय सर्व शिवाचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       या संमेलनाचे उद्घाटन दि. २१ रोजी सकाळी ११ वाजता अ. भा. वीरशैव महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष ९५ वर्षीय डॉ. शामनुरू शिवशंकरप्पा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे उपस्थित होते. याबरोबरच विविध पक्षांचे वीरशैव धर्म अनुयायी असलेले मंत्री, आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संमेलनात सर्व जगद्गुरूंनी निर्णय घेतला की जनगणनेमध्ये जात या रकान्यात प्रचलित जात म्हणजे ज्या पोटजातीला आरक्षण मिळते ती लिहायची. धर्म हिंदू लिहायचा. त्याबरोबरच वीरशैव या पंथाचा उल्लेख जनगणनेत होण्यासाठी वीरशैव धर्मीय खासदार, मठाधिपती, विविध पोटजातींच्या भक्तगणांनी एकत्र येऊन सन्माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संबंधित खात्याचे मंत्री, अधिकारी यांना भेटून धर्माच्या रकान्यानंतर पंथ रकाना असावा असा आग्रह करावा. पंथ या रकान्यामध्ये वीरशैव लिंगायत असे लिहावे.
       पोटजातीच्या नावाखाली आपण विभक्त व्हायचे नाही. पोटजाती सांभाळून आपण सर्व एक राहायचे. वीरशैव आणि लिंगायत वेगळे आहेत असे म्हणायचे नाही. वीरशैव हा शास्त्रीय शब्द आहे. लिंगायत हा परंपरेतून आलेला शब्द आहे. पंचाचार्य आणि महात्मा बसवेश्वरादी शरणांचे विचार वेगळे नाहीत. वीरशैव लिंगायत एकच आहे असे लोकांचे प्रबोधन करण्यात आले.
       वीरशैवातील पोटजाती जन्माच्या आधारे नसून व्यवसायांच्या आधारे मिळालेले आडनाव आहेत. म्हणून जातीच्या आधारे कुणीही विभक्त होऊ नये. आपल्या पोटजाती सांभाळून आपण सर्व वीरशैव लिंगायत एकच आहोत अशी भावना निर्माण करण्यासाठी पीठाचार्य, शिवाचार्य आणि राजकारण्यांनी प्रबोधन केले. यावेळी एकूण १२ ठराव घेण्यात आले. सर्व पीठाचार्य आणि शिवाचार्यांनी वीरशैव आणि लिंगायत एकच आहेत अशी घोषणा एकमुखाने केली.
       कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोमई, जगदीश शेट्टर, वीरशैव लिंगायत महामंडळाचे अध्यक्ष तथा हुनगुंदचे खासदार विजयानंद काशप्पनवर, केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा, उपस्थित होते. या सर्वांचे वरील विषयांवर एकमत झाले. संमेलन यशस्वी होण्यासाठी अनेक मान्यवरांनी तनमनधनाने सेवा केली. कर्नाटक सरकारचे मंत्री मल्लिकार्जुनप्पा यांचे विशेष योगदान होते.

या शृंग संमेलनात घेतलेले १२ ठराव पुढील प्रमाणे आहेत.

१) येणाऱ्या जातीनिहाय जनगणनेमध्ये सर्व पोटजातींचा उल्लेख पंथ या रकान्यामध्ये वीरशैव लिंगायत असा करावा. वीरशैव आणि लिंगायत एकच आहेत. ही एकी सदैव टीकवण्याचा संकल्प करण्यात आला.

२) सनातन हिंदू वीरशैव लिंगायत धर्माच्या सर्व अनुयायींच्या पोटजाती व्यवसायावर आधारित आहेत. या पोटजातींच्या आधारावर धर्मामध्ये कोणत्याही प्रकारे विभाजन करू नये. पोटजात कोणतीही असो आपण सारे वीरशैव लिंगायत आहोत. ही एकता कायम ठेवायची आहे. 

३) जनगणना फॉर्ममध्ये धर्माबरोबरच पंथ किंवा मत असा रकाना असावा. अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या माध्यमातून केंद्र सरकारला याविषयी आग्रह करावा. 

४) या मुद्द्यावर मा. पंतप्रधान महोदयांचे लक्ष वेधण्यासाठी समाजाचे प्रमुख नेते, मठाधिपती, सर्व धर्मीय वीरशैव लिंगायत खासदारांचे एक प्रतिनिधी मंडळ दिल्लीला पाठवावे. 

५) वीरशैव धर्मातील सर्व पोटजातींना ओबीसी या संवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी पोटजातीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारचे लक्ष वेधावे.

६) वीरशैव लिंगायत समाजाच्या ज्या पोटजातींना आरक्षण मिळत आहे ते आरक्षण कायम राहावे.

७) अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या जिल्हा, तालुका आणि गावातील कार्यालयामध्ये श्री जगद्गुरू रेणूकादी पंचाचार्य प्रतिमा लावणे आवश्यक आहे. वीरशैव लिंगायत यांचे मूळ सिद्धान्त तसेच शरण आणि संतांची विचारधारा एकत्रितपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला.

८) गुरूंची प्राचीन परंपरा श्रद्धेने चालू ठेवावी. युवकांमध्ये याविषयी जागरूकता आणि आस्था निर्माण करावी.

९) वीरशैव लिंगायत परंपरेतील महिला, दिव्यांग, वंचितांच्या हिताच्या रक्षणासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. 

१०) वीरशैव पीठाचार्य आणि शिवाचार्य यांचे एकमेकांशी सहकार्याचे धोरण असले पाहिजे. संबंधित पीठ आणि शाखा मठ यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या हिताच्या रक्षणासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. इतर पीठांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये.

११) वर्षातून एकदा पीठाचार्य आणि शिवाचार्यांचे महासंमेलन आयोजित करावे. वीरशैव लिंगायत परंपरेच्या आदर्श मूल्यांचे रक्षण करावे.

१२) उत्तर भारतातील दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर राज्यात वीरशैव समाज प्राचीन काळापासून वास्तव्यास आहे. त्यांच्यासाठी धार्मिक, सांस्कृतिक योजना तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.

No comments:

Post a Comment