Tuesday, September 23, 2025

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्जनागरिकांनी दक्ष राहावे - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण - नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी- अफवांवर विश्वास ठेवू नये, कुठलेही धाडस करु नका- सुरक्षितस्थळी राहावे, प्रशासन बचाव व सुरक्षेसाठी तत्पर- भारतीय सैन्य दल, एसडीआरएफचे पथके जिल्ह्यात दाखल- जिल्हा प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावेपरभणी/सोनपेठ (दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांच्याकडून) :-

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
नागरिकांनी दक्ष राहावे - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
 
- नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी
- अफवांवर विश्वास ठेवू नये, कुठलेही धाडस करु नका
- सुरक्षितस्थळी राहावे, प्रशासन बचाव व सुरक्षेसाठी तत्पर
- भारतीय सैन्य दल, एसडीआरएफचे पथके जिल्ह्यात दाखल
- जिल्हा प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे
परभणी/सोनपेठ (दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांच्याकडून) :-  
 
जायकवाडी, माजलगाव या धरणांमधून परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत होणारा विसर्ग याशिवाय इतर प्रकल्पांतून जिल्ह्यातील विविध नद्यांमध्ये होणारा विसर्ग तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून महसूल, पोलीस, सैन्यदल, एसडीआरएफचे पथक ही सर्व यंत्रणा सतर्क आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, विशेषत: नदीकाठच्या गावांतील लोकांनी दक्षता घ्यावी. कुठलेही धाडस करु नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन आपल्या बचाव व सुरक्षेसाठी तत्पर आहे. जिल्हा प्रशासनाच्या सर्व सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी नागरिकांना केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी म्हणाले की, सद्यस्थितीत जायकवाडी, माजलगाव या धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरु आहे, त्यामुळे पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील गोदावरी नदीची इशारा पातळी 396.47 मी. इतकी आहे तर धोका पातळी 398.7 मी. इतकी आहे. स‌द्यस्थितीत पाणी पातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांतील लोकांनी खबरदारी घ्यावी.  नागरिकांच्या बचाव व सुरक्षेसाठी भारतीय सैन्य दल आणि एसडीआरएफची (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे. भारतीय सैन्य दलाची 54 एआरटीच्या एका पथकाकडे पाथरी तालुक्यातील मंजरथ, कासापुरी आणि ढालेगाव परिसरातील गावे सोपविण्यात आली आहेत. तर दुसऱ्या पथकाकडे मानवत तालुक्यातील मौजे थारगाव आणि एसडीआरएफकडे सोनपेठ तालुक्यातील मौजे शिरशी, थडी पिंपळगाव आदी कार्यक्षेत्र सोपविण्यात आले आहे. 

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 36 गावांचा संपर्क तुटला आहे, मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे सुमारे 578 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पाथरी तालुक्यातील संपर्क तुटलेल्या 16 गावांपैकी रामपुरी  येथील 60 आणि निवळी येथील 10 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. सोनपेठ तालुक्यातील संपर्क तुटलेल्या दोन गावांपैकी नगरपालिकेच्या स्थानिक शोध बचाव पथकाच्या मदतीने थडी पिंपळगाव येथील 408 लोकांना तर लसिना येथील 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गंगाखेड, मानवत व सेलू तालुक्यातील संपर्क तुटलेल्या गावांतील नागरिक सुरक्षित असून स्थानिक यंत्रणा त्यांच्या मदतीसाठी  सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 

जून-2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता महसूल व वन विभागाचा शासन निर्णय, दि. 18 सप्टेंबर 2025 अन्वये 128 कोटी 55 लक्ष 38 हजार इतका निधी  वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली असून निधीच्या वाटपाची कार्यवाही सुरु असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, चालू सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल शासनास तातडीने सादर करण्यात येणार आहे. शेतकरी व नागरिकांनी चिंता करु नये. जिल्हा प्रशासन आपल्या मदतीसाठी सज्ज आहे. प्रशासनाच्या सुचनांचे काळजीपूर्वक पालन करावे. 
*-*-*-*-*

No comments:

Post a Comment