जेव्हा भक्ती, श्रद्धा आणि सेवा एकत्र येते तेंव्हा अन्नछत्र निर्माण होतं ! श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट 12 व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
अन्नछत्राच्या सावलीत – परळीच्या सेवाभावाचं उगमस्थान परळी वैजनाथ या पवित्र नगरीबद्दल आपण अनेकदा ऐकत असतो. महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योर्तिलिंग असलेलं श्री वैद्यनाथ मंदिर, दररोज हजारो भाविकांची उपस्थिती, पावित्र्याचं, श्रद्धेचं आणि भक्तीचं केंद्र अशी परळी या शहराची ही ओळख फार जुनी आहे. पण गेल्या काही वर्षांत परळीची आणखी एक ओळख निर्माण झाली आहे ती म्हणजे "श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या" सेवाभावी कार्यामुळे. या ट्रस्टने केवळ उपाशी पोटांना अन्न दिले नाही, तर माणुसकीला अर्थ दिला आहे. कोणत्याही प्रसिद्धीच्या हव्यासाविना, निव्वळ एक विचार घेऊन सुरू झालेलं हे कार्य आज हजारो लोकांच्या जीवनात आधारवडासारखं उभं आहे. परळी येथील एक हरहुन्नरी समाजसेवक याने अन्नछत्राची संकल्पना मांडली परंतू केदारनाथ दुर्घटनेत त्यांचे स्वप्न त्यांच्या सोबत तिथेच राहिले त्यांच्या धाकट्या बंधुनी मित्र मंडळीसह अन्नदान कार्याची सुरुवात केली त्यास मिळालेल्या प्रतिसादाने सन 2013 मध्ये श्री अन्नपूर्णा ट्रस्टची स्थापना झाली. समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं, आपलं आयुष्य जनतेच्या सेवेच्या वाटेला द्यायचं असा निश्चय तरुणांनी केला. त्यांनी "अन्नछत्र" ही संकल्पना उराशी बाळगून ट्रस्टची नोंदणी केली व कै.ओमभाऊ लाहोटी यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाला पूर्तता देण्यासाठी त्यांनी आपलं उर्वरित जीवन या ट्रस्टला समर्पित केलं.याच क्षणी या अन्नछत्राच्या कार्याला खरी सुरुवात झाली.
2013 साली आलेल्या श्रावण महिन्यात त्यांनी प्रत्येक रविवारी मोफत अन्नदान सुरू केलं.ते निरंतर पुढे सुरुच राहिले.ही सेवा एका दिवशी किंवा एका महिन्यात संपणारी नव्हती.त्या अन्नदानात जो समर्पणाचा, समाधानाचा भाव अनुभवला, त्यानेच पुढचा मार्ग स्पष्ट केला. त्यांनी ठरवलं की वर्षभर प्रत्येक रविवारी मोफत अन्नदान चालू ठेवायचं.आणि मग दुसऱ्या वर्षी त्यांनी अन्नछत्राचं स्वरूप अधिक व्यापक केलं वर्षभर प्रत्येक शनिवार आणि रविवारी मोफत भोजन सेवा सुरू झाली.हे केवळ एक उपक्रम नव्हता,तर श्रद्धेचा, स्मरणाचा आणि समाजभानाचा प्रत्यय होता.अन्नछत्र हे भाऊ च्या आठवणींचं रूप होतं ज्यात दर रविवारी, दर शनिवारी केवळ भुकेच्या पोटात अन्न नव्हे,तर समाजाच्या अंतरात्म्यात माणुसकीचा अर्थ घालण्यात येत होता.
या अन्नछत्राची सुरुवात परळीतील श्री शनी मंदिर येथे झाली. तेव्हा त्यांच्याकडे ना मोठा निधी होता ना मोठा हॉल, ना आधुनिक किचन होते होता तो सेवाभाव, कार्यनिष्ठा आणि लोकांचा पाठिंबा.काही वर्षांनी श्री शनी मंदिर चे बांधकाम सुरू झाल्यामुळे अन्नछत्र दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागलं आणि मग ते "श्री वैद्यनाथ अर्बन को ऑप बँक परळी" यांच्या जागेत स्थलांतरित झालं.गेली 8 वर्षे हे अन्नछत्र तिथे सकाळी आणि संध्याकाळी चालू आहे.दररोज सुमारे 1200 ते 1500 भाविक इथे मोफत भोजनाचा लाभ घेतात.देश विदेशातून प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनास येणारे शिवभक्त जेंव्हा इथला प्रसाद घेऊन जातात ते अन्नछत्रासह परळीचे गुणगान करतात.एका वेळेस दीडशे लोक बसू शकतात अशी या अन्नछत्राची व्यवस्था आहे.पण ही आकड्यांची गोष्ट नाही – ही गोष्ट आहे, रोज उगवणाऱ्या माणुसकीच्या सूर्यासारख्या कार्याची.
वैद्यनाथ बँके ने दिलेल्या जागेवर बांधकाम सुरू होणार असल्यामुळे आज पुन्हा एकदा अन्नछत्राचं स्थलांतर आता श्री वैद्यनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला श्री दत्त मंदिर, श्री राम मंदिर ( श्री बालाजी मंदिर ) येथे झाले आहे. मात्र हे स्थलांतर म्हणजे काही मागे जाणं नाही तर एका मोठ्या प्रवासाचा पुढचा टप्पा आहे.जिथं पोटभर जेवण मिळतं,तिथं प्रेमाची सावली आपसूकच तयार होते आणि ही सावली परळीकरांनी वाढवली आहे, जपली आहे.
श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टचं मोठेपण म्हणजे त्यांनी ‘माझं आणि तुझं’ असा भेद ठेवलेलाच नाही. इथं प्रत्येकजण ‘हे माझ्या परळीचं अन्नछत्र आहे’ असं म्हणतो. इथे कोणतेही पदं नाहीत, अधिकार नाहीत फक्त जबाबदाऱ्या आहेत. प्रत्येक काम करणारा माणूस मालक आहे आणि सेवकही. ही भावना इथल्या कार्यात खोलवर रुजलेली आहे. म्हणूनच हे अन्नछत्र केवळ अन्नदान करणारं ठिकाण नाही, तर परळीच्या समाजाची एक जबाबदारी बनून गेलं आहे.
या ट्रस्टने अन्नदानासोबतच अनेक समाजोपयोगी योजना सुरू केल्या आहेत. गरीब व निराधार महिलांसाठी ‘निराधार महिला सहाय्य योजना’ राबवली जाते. यात महिलांना दर महिन्याला जीवनावश्यक वस्तू, किराणा साहित्य, साडी-चोळी अशा वस्तू दिल्या जातात. आज या योजनेचा लाभ परळीतीलच नव्हे, तर परिसरातील महिला आणि निराधार लोकांपर्यंत पोहोचतो आहे.
‘विद्यार्थी सहाय्य योजना’तून गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, गणवेश, शालेय साहित्य, पेन, कंपास, शूज हे सगळं मोफत दिलं जातं. विशेषतः जे अनाथ आहेत, ज्यांना पालकही नाहीत, अशा मुलांसाठी ‘निराधार पालक-पाल्य योजना’ अंतर्गत ट्रस्ट संपूर्ण जबाबदारी घेतो अन्न, शिक्षण आणि कपडालत्ते यांची संपूर्ण व्यवस्था केली जाते . या व्यतिरिक्त ट्रस्टने 'ग्रंथदान ही योजना' राबवली आहे. शाळांना दर्जेदार वाचनीय पुस्तके दिली जातात. वाचन संस्कृती जपण्यासाठी आणि मुलांचं वैचारिक पोषण करण्यासाठी या योजनेचा उपयोग होतो. विद्यार्थ्यांच्या मनात विचारांचं बीज पेरणं ही खरंतर खूप मोठी सेवा आहे.
‘शुद्ध पेयजल’ हा विषय उन्हाळ्याच्या दिवसांत जिव्हाळ्याचा असतो. ट्रस्टने परळी परिसरात RO फिल्टर चे पाणी जार बसवून अनेक ठिकाणी मोफत शुद्ध पिण्याचे पाणी दिलं आहे. याचा लाभ फक्त भाविकांनाच नव्हे, तर जनावरं, पक्षी, रस्त्यावरची मंडळी सगळ्यांनाच होतो आहे तसेच अन्न हे पुर्णबृम्ह म्हणून अन्न वाचवा शपथ शालेय विद्यार्थी असो वा श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट च्या अन्नछत्रात येणारा प्रत्येक व्यक्ती घेतो.
ट्रस्टच्या या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांनी ट्रस्टचा गौरव केला आहे. पण या ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना पुरस्कारांची नाही, फक्त समाधानाची अपेक्षा आहे. कोणी उपाशी झोपलं नाही, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शिकण्यासाठी वह्या मिळाल्या, एखादी विधवा आई किराणाचा डबा घेऊन गेली हाच त्यांचा खरा पुरस्कार आहे.
परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगा पैकी पंचम ज्योतिर्लिंग असून या तीर्थक्षेत्राला शोभेल असेच या श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य आहे कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय, निव्वळ लोकसहभागातून १२ वर्षे चालावं, ही गोष्ट आज आश्चर्य वाटावी अशी आहे. पण खरंतर ही ताकद आहे लोकांची, त्यांच्या विश्वासाची, आणि अशा संस्थांच्या निष्ठेची.
आज हे अन्नछत्र हजारो जणांचं पोट भरतं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे अन्नछत्र माणसांची मनं जिंकतं आहे. जेव्हा एखादा भुकेला भाविक या अन्नछत्रात बसतो आणि समाधानाने जेवतो, तेंव्हा तो फक्त अन्न घेत नाही तर या समाजात अजूनही आपल्यासाठी कोणी आहे, हे अनुभवतो.
येणाऱ्या काळात परळीतल्या प्रत्येक नागरिकाने, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अन्नछत्र "हे माझ्या परळीकरांचं आहे" या भावनेनं आपलं मानून पुढे आलं, तर या अन्नछत्राचं रूप आणखी भव्य होईल, हे नक्की. ही एक अशी संकल्पना आहे जी केवळ काही मंडळींच्या खांद्यावर न राहता, संपूर्ण परळीकरांनी मनोभावे उचलली, तर ही सेवा एका वेगळ्याच उंचीवर जाऊ शकेल. आज जरी दररोज सुमारे एक हजार ते बाराशे लोक इथं पोटभर अन्न घेत असले तरी ही संख्या केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही. ही संख्या हे दाखवत आहे की समाजात आजही माणुसकी जिवंत आहे, आणि ती इथे दररोज वाढते आहे. या अन्नछत्राचं भविष्यातील रूप आणखी मोठं व्हावं, यासाठी फक्त गरज आहे ती म्हणजे प्रत्येक परळीकराने मनात ही सेवा ‘आपली’ समजणं. ही सेवा कुण्या एका व्यक्तीची, संस्थेची किंवा समूहाची नसून ती संपूर्ण परळीच्या संस्कृतीची ओळख बनली पाहिजे. अन्नछत्राचं पुढचं पाऊल म्हणजे केवळ जेवण देणं नव्हे, तर परळीतल्या गरजूंना, भाविकांना आणि समाजाला माणुसकीच्या सावलीत घेऊन जाणं ही जबाबदारी आपलीच आहे!
दिनांक १३ जुलै २०२५ ला ट्रस्ट चा १२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे.श्री अन्नपुर्णा चॅरिटेबल ट्रस्ट च्या सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
No comments:
Post a Comment