गंगाखेड/सोनपेठ (दर्शन) : - देश, संविधान उध्दवस्त करण्यासाठी एक टीम कामाला लागली आहे. आपल्याला प्रजासत्ताक देश वाचवण्याचे काम करायचे आहे. लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांना वाळवी लागली असुन आणीबाणीचा काळ आणि देशातील आजची परिस्थिती सारखीच असल्यामुळे पत्रकार असलेल्या चौथ्या स्तंभाला आता पुढे यावे लागेल असे प्रतिपादन राजकीय विश्लेषक, जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी गंगाखेड येथे आयोजित व्हॉईस ऑफ मीडिया दर्पण दिन सोहळ्या प्रसंगी बोलताना केले.
व्हॉईस ऑफ मीडिया गंगाखेड शाखेच्या वतीने रविवार १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे दर्पण दिनानिमित्त दर्पण दिन सोहळ्याचे आयोजन करून पत्रकारांना विमा कवच वाटप, पत्रकारांच्या सौभाग्यवतींना खास मराठवाडी आहेर देऊन सन्मान करत ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया प्रदेश कार्याध्यक्ष विजय चोरडिया, उदघाटक म्हणून व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (टायगर) तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, राजेश सूर्यवंशी, रिपाई (आ) प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ भालेराव, सपोनि सिद्धार्थ इंगळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, माजी जि.प. सदस्य श्रीकांत भोसले, गोविंद यादव, अभय कुंडगीर, सुरेश जंपनगीरे, दगडू सोमाणी, डॉ संजय सुपेकर , चंद्रकांत खारकर, प्राचार्य डॉ. दिनानाथ फुलवाडकर, बाबुराव गळाकाटू, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख , गोविंद यादव आदींची उपस्थिती होती . कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात बोलताना ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे म्हणाले की पत्रकारांनी पत्रकारितेची ताकद ओळखावी, एकमेकांसोबत आल्यावर मोठी ताकद निर्माण होते. पत्रकारांनो गरजा मर्यादित करा, स्वाभिमानी रहा, त्यामुळे तुम्हाला कोणीही विकत घेऊ शकणार नाही असा मौलीक सल्ला ही यावेळी अशोक वानखेडे यांनी दिला. व्यवस्था व भिनाऱ्यांना निडर असणाऱ्या पत्रकारांचा आदर असतो असेही यावेळी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना सांगितले. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सर्वांसाठी लढत आहेत. त्यांनी बोलावलेल्या प्रत्येक ठिकाणी मी आवर्जून येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हॉईस ऑफ मीडिया गंगाखेड शाखेचे तालुकाध्यक्ष अन्वर शेख लिंबेकर यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे,व्हॉइस ऑफ मीडिया प्रदेश कार्याध्यक्ष विजय चोरडिया, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान व्हॉईस ऑफ मीडिया गंगाखेड शाखेतील ४५ पत्रकार सदस्यांना प्रत्येकी १५ लाख रुपयांचे विमा कवच देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. शहरातील ज्येष्ठ पत्रकारांचाही यावेळी सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये व्हॉइस ऑफ मीडिया नांदेड जिल्हाध्यक्ष गणेश जोशी यांनी संघटने मार्फत नांदेड येथे संघटनेतील पत्रकारांना घरकुल व विमा कवच देण्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहीती दिली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांला उत्तरे दिली. माझे माध्यम कोणते आहे हे विचारू नको, मी कोण आहे ते विचार असे ठामपणे सांगायला शिका म्हणत पत्रकारांनी जोड व्यवसाय करावा, ताण तणाव कमी ठेवावा, गरजा कमी कराव्यात, पत्रकारांत आत्मसन्मान असला पाहिजे, मन लावून न घाबरता काम करा असा सल्ला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना दिला. कार्यक्रमाच्या निरोपिय भाषणात बोलताना संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी प्रत्येकाला मदत करा, मदतीची भावना ठेवा, संघटना आपल्या आजूबाजूला कार्यरत आहे, इतरांशी द्वेष भावना ठेवू नका, चाट जीपीटी व एन व्ही सारखे ॲपचा पत्रकारांनी वापर सुरू करावा, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज असल्याने काळानुरूप चालायला सुरुवात करा असा सल्ला दिला. नांदेड येथे १५ व १६ फेब्रुवारी रोजी पत्रकारांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्या कार्यशाळेत पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी ९ तालुक्यातील व्हॉईस ऑफ मीडिया शाखेच्या तालुकाध्यक्ष व सदस्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा दर्डा यांनी तर आभार तालुकाध्यक्ष अन्वर शेख लिंबेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया गंगाखेड शाखेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.