रमाई विचारमंचाकडून मंडळ अधिकारी ज्योती प्रधान यांचा हृदय सत्कार
जिंतूर तालुक्यातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महत्वपूर्ण महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यात रमाई विचारमंच नेहमीच अग्रेसर असतो. जिंतूर तहसील कार्यालयाअंतर्गत पुंगळा व अतिरिक्त पाचलेगाव या दोन सज्जाचा कार्यभार सांभाळणाऱ्या सक्षम महिला तलाठी श्रीमती ज्योती प्रधान यांची महसूल विभागीय परीक्षेद्वारे नुकतीच मंडळ अधिकारी पदावर निवड झाल्याबद्दल रमाई विचारमंचच्या अध्यक्षा आशाताई खिल्लारे यांच्यासह सदस्यांनी त्यांचा हृदय सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ.श्रद्धा खिल्लारे, सुमन प्रधान, आशाबाई वाकळे, शेवंताबाई प्रधान, दैवशाला जाधव, विमल प्रधान, दिपाली वाकळे, मेघा मोरे, ताईबाई डबडे, राजश्री देबाजे, सुकेशिनी प्रधान, कु. आदिती प्रधान यांची उपस्थिती होती.
जमीनविषयक नोंदी ठेवून पीक परिस्थितीप्रमाणे महसुलाची वसुली करणे, नागरिकांना जमिनीचे उतारे देणे ही जमीन विषयक महत्त्वाची कामे तलाठी करत असतो. महसूल प्रशासनाचा गावातील मुख्य घटक म्हणून गावात विविध कामे व निर्णयाची अंमलबजावणी करताना तलाठी प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. महिला तलाठी ज्योती प्रधान यांनी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून गोरगरीब, विधवा, दिव्यांग आणि निराधारांना शासनाच्या विविध योजनेतुन अर्थसहाय्य मिळण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून संबंधितास लाभ मिळवून दिला. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत उपलब्ध करून देण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. फेरफार नोंदी, सातबारा यासह शेतजमीन विषयक इतर कामेही त्यांनी प्राधान्याने पार पडली आहेत. त्यामुळे त्यांच्या कामावर सज्जातील शेतकरी खुश व समाधानी होते. याचा प्रत्यय त्यांची मंडळ अधिकारी पदी निवड झाल्यानंतर सत्कार व शुभेच्छा देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यालयात हजेरी लावली होती यावरून दिसून आले.

No comments:
Post a Comment