उद्योग आणि आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यशाळा संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ जि. परभणी येथील समाजशास्त्र विभाग आणि दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, नगर परिषद, गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जानेवारी 2022 रोजी उद्योग आणि आर्थिक साक्षरता जनजागृती एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत 'उद्योगा द्वारे महिला विकास आणि गरज आर्थिक साक्षरतेची' या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रो.डॉ. अंजली जोशी, समाजशास्त्र विभाग प्रमुख, दयानंद कला महाविद्यालय, लातूर व डॉ. प्रतिभा बिरादार, समाजशास्त्र विभाग प्रमुख, माऊली महाविद्यालय, वडाळा, सोलापुर यांना आमंत्रित करण्यात आले होते.
झूम मीटिंग च्या ऑनलाइन माध्यमातून मान्यवरांनी बचत गटातील महिलांशी संवाद साधला. डॉ.अंजली जोशी यांनी बचत गट महिला सक्षमीकरणाचे एक माध्यम बनत असून बचत गटाद्वारे सर्वसामान्य महिला आपली नवीन ओळख समाजात निर्माण करत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सांगितले. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बचत गटातील महिलांनी संयुक्त पणे निर्णय घेऊन ते कार्यान्वित करण्याची आज नितांत गरज आहे. केवळ आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी बचत गट न स्थापन करता गटातील रकमेच्या सह्याने तसेच शासनाच्या विविध योजनांची मदत घेऊन ग्रामीण महिलांनी लघु उद्योग, कुटिर उद्योग, पशूपालन करून आपल्या बचत गटाची नवीन ओळख निर्माण करण्याची संधी शासनाने त्यांना उपलब्ध करून दिली आहे. आणि संधीचे सोने सर्व महिलांनी करण्याची वेळ आज आली आहे. याची जाणीव बचत गटातील महिलांनी बाळगावी. असे आवाहन डॉ.अंजली जोशी यांनी महिलांशी संवाद साधताना केले.
डॉ. प्रतिभा बिरादार यांनी आर्थिक साक्षरतेवर मार्गदर्शन करताना महिलांशी संवाद साधला, त्या म्हणाल्या पैसा काय आहे, पैशाच्या साह्याने आपण काय करू शकतो, पैसा कुठे आणि कशासाठी, कशा पद्धतीने खर्च करायला हवा या सार्या गोष्टींची माहिती असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. भविष्याच्या दृष्टीने आपण पैशाचे नियोजन करतो ते सुद्धा आर्थिक साक्षरताच आहे. जर या गोष्टीची आपल्याला माहिती नसेल तर आपल्या जीवनात विविध प्रकारच्या आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक गुंतवणूक करताना महिलांनी जागरुकता बाळगणे गरजेचे आहे. तसेच ज्याप्रमाणे आपण कुटुंबाच आर्थिक नियोजन करतो त्याचप्रमाणे आपण बचत गटातील सर्व महिलांनी सामुहिकरित्या नवनविन उद्योग चालू करून त्याचे आर्थिक नियोजनही केले पाहिजे. मानवी जीवनात दोन मोठे पैलू आहेत ते म्हणजे पैसा आणि शिक्षण या दोन्हीचा विचार केला तर समाजातील प्रत्येक गरीब-श्रीमंत, तरुण-वृध, शिक्षित-अशिक्षित, स्त्री- पुरुष यांच्या साठी आर्थिक साक्षरता ही खूप महत्त्वाची आहे. कुटुंबातील आर्थिक निर्णय प्रक्रियेत सुद्धा महिलांनी सहभागी असणे गरजेचे आहे. आर्थिक साक्षरता महिलांना कुटुंबात आणि कुटुंबाबाहेर वावरतांना निश्चितच उपयुक्त ठरते. महिलांनी ऑनलाईन आर्थिक व्यवहार कसे होतात याची इत्यंभूत माहिती जाणून घेणे आज काळाची गरज असल्याचे डॉ. बिरादार म्हणाले.
उद्योग आणि आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यासाठी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. परमेश्वर कदम, उपाध्यक्षा मा. ज्योतीताई कदम, मा. विजयकुमारजी तापडिया नगराध्यक्ष, गंगाखेड यांनी मार्गदर्शन केले, तर प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, मा. श्री देविदास जाधव, मुख्याधिकारी, नगरपरिषद, गंगाखेड यांनी कार्यशाळेचे आयोजक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. या कार्यशाळेच्या समन्वयक डॉ सुनिता टेंगसे, सौ. अंजना बिडगर प्रकल्प अधिकारी, नगर परिषद, गंगाखेड, सौ.जयमाला हजारे, समुदाय संघटक, नगर परिषद, गंगाखेड यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले आणि या ऑनलाइन कार्यशाळेसाठी तांत्रिक सहाय्यक प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील हे होते. या कार्यशाळेत बचत गटातील महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ.सुनिता टेंगसे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.अंजना बिडगर यांनी मानले.

No comments:
Post a Comment