Tuesday, September 30, 2025

डिघोळच्या रेणुकामाता (त्रिदेवी) च्या दर्शनासाठी राज्यातून तोबा गर्दी

डिघोळच्या रेणुकामाता (त्रिदेवी) च्या दर्शनासाठी राज्यातून तोबा गर्दी
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ येथील रेणुकामाता (त्रिदेवी) च्या शारदीय नवरात्री उत्सवात गुरुवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 पासून घटस्थापना करून प्रारंभ झाला असून हा नवरात्री उत्सव पुढे दिनांक 2 ऑक्टोबर 2025 गुरुवार दसऱ्यापर्यंत सुरू राहणार आहे या उत्सवास समितीच्या गाण्याचे कार्यक्रम तसेच दररोज महाप्रसाद व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रति वर्ष प्रमाणे याही वर्षी सोनपेठ तालुक्यातील डीघोळ येथील रेणुकामाता (त्रिदेवी) मंदिरातील शारदीय नवरात्री महोत्सव प्रारंभ झाला असून यावेळी या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, दिघोळ येथे रेणुकामाता (त्रिदेवी) मंदिर सोनपेठ पासून परळी रोड कडे उजवीकडे असुन, मंदिर परिसरात सुशोभीकरणासाठी कमिटी तर्फे सदैव प्रयत्न करण्यात येत आहेत, मंदिरावर विद्युत रोषणाई सर्वत्र झगमगताना दिसत असून भाविकांच्या दर्शनासाठी लावली आहे सोनपेठ तालुक्यातुनच नाही तर परभणी जिल्हाभरातून व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त या देवीच्या दर्शनासाठी येतात, मागील काही वर्षांपासून नवरात्री उत्सवात दर्शनासाठी येणारे भाविक भक्तांसाठी अन्नछत्र सुरू आहे दररोज वेगवेगळे अन्नदाता कडून अन्नदानाची दहा दिवस अखंड सेवा सुरू राहते, आज देशमुख परिवाराच्या वतीने महाप्रसादाचा लाभ घ्यावा उपसरपंच अजयकुमार देशमुख यांनी माहिती दिली,देवीच्या समोर दोन कल्लोळ असुन पूर्वीच्या काळी देवीच्या मंदिरासमोर पाण्याची सुविधा नसल्याने अनेक भाविक तसेच शाळा विद्यालयातील सहली दर्शनासाठी येताना भाजी भाकरी घेऊन येत व दर्शनानंतर देवीच्या समोर बसून जेवण केल्यानंतर या कल्लोळातील पाणी पिऊन तृप्त होत असतात परंतु सध्या देवीच्या समोर पाण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता या कल्लोळातील पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले आहे, या देवी मंदिरची स्थापना इ.स. 1600 मध्ये रामदास स्वामी यांनी केली असल्याचे सांगितले जाते, या ठिकाणी मोठ्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे, अनेक वर्ष व्यवसायिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे, निजाम कालखंडापासून देवी मंदिराची देखभाल येथील देशमुख घराणे करत असून आजही विजयकुमार देशमुख, रमाकांत देशमुख, अण्णासाहेब देशमुख, उपसरपंच अजयकुमार देशमुख यांना आरती व पूजा तसेच शिलंगणाचा मान कायम आहे, या ठिकाणी अंबादास पुजारी, वैभव पुजारी व गावातील युवा तरुण नागनाथ शिंगाडे, सतीश पारेकर, कानिक अन्नपूर्णे, शाम काथवटे, माजी सरपंच गोकुळ दादा आरबाड, शरद मुळी, वैभव मोडीवाले, सुभाष मुंडीक यांच्या सह संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्यातून हा महोत्सव साजरा केला जातो.

पदवीधर मतदारसंघासाठी सर्व पदवीधरांनी मतदार नोंदणी स्वतः करावी - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण परभणी/सोनपेठ (दर्शन) : -

पदवीधर मतदारसंघासाठी सर्व पदवीधरांनी मतदार नोंदणी स्वतः करावी - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण 
परभणी/सोनपेठ (दर्शन) : - 
1 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. सन-2020 मध्ये झालेल्या निवडणूकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. जास्तीतजास्त पात्र पदवीधर मतदारांनी आपल्या तहसील कार्यालयात मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी स्वतः करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, नायब तहसिलदार सतीश रेड्डी व पत्रकार यावेळी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी म्हणाले की, पदवीधर नाव नोंदणीसाठी  फॉर्म नमुना क्रमांक-18 भरुन देणे आवश्यक आहे. हा फॉर्म सर्व तहसिल कार्यालय, मंडळ अधिकारी महसूल यांच्याकडे उपलब्ध आहे.नोंदणीसाठी पात्रता - 01 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा पूर्वी कोणत्याही शाखेचा पदवीधर.सर्व वि‌द्यापीठे तसेच सर्व मुक्त वि‌द्यापीठे अथवा कोणत्याही अभिमत वि‌द्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे.नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रेः  फार्म नंबर 18 भरुन द्यावा, फार्म नंबर 18 बरोबर अंतिम वर्ष गुणपत्रिका किंवा मुळ पदवीची छायांकित प्रत जोडावी. नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईजचे फोटो (फोटोचा पार्श्वभाग पांढ-या रंगाचा असावा).
2020 च्या निवडणूकीच्या वेळेस परभणी जिल्ह्यात पदवीधर मतदार यादीचे 76 यादी भाग असून मतदान केंद्रसंख्या 78 होती. नंतर 2 सहाय्यकारी मतदान केंद्र झाले.यावेळी वाढण्याची शक्यता आहे, या नोंदणीसाठी रहिवासी पुरावा -  आधार कार्ड, निवडणुक ओळखपत्र, रेशन कार्ड, लाईट बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, घरप‌ट्टी यापैकी एक.अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात या ठिकाणी स्वीकारले जातील. 
1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार 30 सप्टेंबर 2025, वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनर्प्रसिद्धी- बुधवार 15 ऑक्टोबर, द्वितीय पुनर्प्रसिद्धी- शनिवार 25 ऑक्टोबर, नमुना क्रमांक 18 किंवा 19 द्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक - गुरूवार 6 नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- गुरुवार 20 नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी- मंगळवार 25 नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- गुरुवार 25 डिसेंबर व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी- मंगळवार 30 डिसेंबर 2025. 
मतदार नोंदणीसाठी विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत. तर जिल्हाधिकारी  हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी असतील.  जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. 

Sunday, September 28, 2025

जागतिक हृदय दिन : हृदय आरोग्य आणि जीवनशैलीचे सामाजिक प्रतिबिंब - डॉ.राजेंद्र बगाटे, (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत)साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी सौजन्य बातम्या, लेख व जाहीरातीसाठी संपर्क मो.9823547752

जागतिक हृदय दिन : हृदय आरोग्य आणि जीवनशैलीचे सामाजिक प्रतिबिंब - डॉ.राजेंद्र बगाटे, (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत)
साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी सौजन्य बातम्या, लेख व जाहीरातीसाठी संपर्क मो.9823547752
हृदय हे शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. ते केवळ रक्तपुरवठ्याचे केंद्र नाही, तर आपल्या जीवनाचे प्रतीक आणि आपल्या शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्याचे मूळ आहे. हृदयाच्या कार्यात लक्षणीय बिघाड होणे म्हणजे फक्त वैयक्तिक आरोग्यावर परिणाम होणे नाही, तर त्याचा परिणाम कुटुंब, समाज आणि देशाच्या सामाजिक व आर्थिक जीवनावरही होतो. आजच्या आधुनिक जीवनशैलीत अनियमित आहार, व्यायामाचा अभाव, तणाव, धूम्रपान आणि मद्यपान यामुळे हृदयरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या परिस्थितीत हृदय आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे ठरते. जागतिक हृदय दिन, जो दरवर्षी 29 सप्टेंबरला साजरा केला जातो, हा दिवस हृदयरोग प्रतिबंध, जीवनशैलीतील सुधारणा आणि सामाजिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी समर्पित आहे. 2025 मध्ये हा दिवस “Don’t Miss a Beat” (एकही क्षण चुकवू नका) या थीमसह साजरा केला जात आहे, ज्याचा उद्देश हृदयाचे आरोग्य टिकवणे आणि वेळेवर उपचार घेण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
जागतिक हृदय दिनाची सुरूवात 2000 साली वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या संयुक्त प्रयत्नांनी झाली. या दिवसाच्या माध्यमातून हृदयरोगांविषयी जनजागृती निर्माण करणे, लोकांना हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक जीवनशैली अवलंबण्यास प्रोत्साहित करणे आणि वेळेवर वैद्यकीय तपासण्या करण्याचे महत्त्व सांगणे हे उद्दिष्ट आहे. प्रत्येक वर्षी या दिवसासाठी विशिष्ट थीम निश्चित केली जाते, ज्यातून त्या वर्षीच्या सामाजिक आरोग्य संदेशावर भर दिला जातो.
या वर्षीची थीम “Don’t Miss a Beat” (एकही क्षण चुकवू नका) अत्यंत प्रभावी आणि विचारप्रवर्तक आहे. हृदयरोगामुळे अनेक कुटुंबे आपल्या प्रियजनांना गमावतात, ज्याचा मानसिक, आर्थिक आणि सामाजिक स्तरावर गंभीर परिणाम होतो. या थीमद्वारे लोकांना हृदयाचे लक्षण ओळखण्याचे, नियमित तपासण्या करण्याचे, योग्य आहार व व्यायाम करण्याचे आणि मानसिक ताण कमी करण्याचे संदेश दिले जात आहेत. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने हृदयरोग प्रतिबंधित केल्यास केवळ वैयक्तिक जीवन सुधारते असे नाही, तर समाजातील कार्यक्षमतेत वाढ होते, आर्थिक स्थैर्य टिकते आणि कुटुंबीयांचे कल्याणही सुनिश्चित होते.
जागतिक स्तरावर हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण मानले जाते. दरवर्षी 20.5 दशलक्ष लोक हृदयरोगांमुळे मृत्यूमुखी पडतात, जे जागतिक मृत्यूंच्या तिसऱ्या भागापेक्षा जास्त आहेत. तथापि, योग्य जीवनशैली अवलंबल्यास आणि वेळेवर वैद्यकीय तपासण्या केल्यास सुमारे 80% हृदयरोग प्रतिबंध करता येऊ शकतात. भारतात हृदयरोगांचा प्रादुर्भाव चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये हृदयरोगांचा धोका वाढला असून विशेषतः 25 ते 50 वयोगटातील तरुणांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढले आहे. यामागे अयोग्य आहार, जंक फूडचा अधिक प्रमाणात वापर, व्यायामाचा अभाव, तणाव आणि धूम्रपान-मद्यपान यांसारखी जीवनशैलीशी संबंधित कारणे आहेत. महिलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण कमी असल्याचे जाणवत असले तरी, आधुनिक जीवनशैलीमुळे त्यांच्यातही हृदयरोगांचा धोका वाढला आहे.
हृदयाचे आरोग्य हा फक्त वैयक्तिक प्रश्न नाही, तर तो सामाजिक आरोग्याशी थेट संबंधित आहे. निरोगी व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी कार्यक्षम असते. हृदयरोगामुळे एखाद्या व्यक्तीचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक जीवन प्रभावित होते, ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो, कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता कमी होते आणि सामाजिक संबंधांवर परिणाम होतो. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून हृदयरोग प्रतिबंध म्हणजे सामाजिक स्थैर्य टिकवणे, आरोग्य सेवा वापरण्याचा भार कमी करणे आणि समाजातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा करणे होय.
हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. त्यामध्ये संतुलित आहार, ज्यामध्ये ताज्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कमी साखर आणि कमी फॅट असलेले पदार्थ यांचा समावेश असतो, तो हृदयासाठी उपयुक्त ठरतो. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करणे, चालणे, धावणे, योगा किंवा नृत्य यांसारख्या क्रियांचा समावेश करणे, यामुळे हृदयाचे कार्य सुधारते आणि रक्ताभिसरण सुसंगत राहते. तणाव व्यवस्थापनासाठी ध्यान, योगा आणि श्वासोच्छ्वासाचे तंत्र वापरणे फायदेशीर ठरते. धूम्रपान आणि मद्यपान टाळणे हृदयरोग प्रतिबंधासाठी अत्यावश्यक आहे. तसेच, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि इतर आरोग्य घटकांची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. या सर्व उपायांनी व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य सुधारते, आणि समाजात आरोग्याची जागरूकता वाढते.
जागतिक हृदय दिनानिमित्त भारतभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. वॉकथॉन, हृदय आरोग्य शिबिरे, व्यायाम कार्यशाळा, योगा शिबिरे आणि आरोग्य तपासणी शिबिरे या उपक्रमांमुळे लोकांमध्ये हृदयाचे महत्त्व समजते. वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित वॉकथॉनमध्ये हजारो लोक सहभागी होतात, ज्यात कुटुंब, मित्र आणि विद्यार्थी सहभागी होऊन हृदय आरोग्याबाबत माहिती मिळवतात. वेगवेगळ्या शहरांमध्ये ‘Green Fit Marathon’ आयोजित करून हृदय आरोग्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातो. या उपक्रमांमुळे समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढते, लोकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतात आणि सामाजिक सहकार्य दृढ होते.
जागतिक हृदय दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम नाही, तर तो हृदयाच्या आरोग्यासाठी जागतिक चळवळ आहे. समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर, हा दिवस कुटुंबीय, समाज आणि व्यापक सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी एक संधी आहे. “Don’t Miss a Beat” (एकही क्षण चुकवू नका) या थीमद्वारे लोकांना हृदयाच्या आरोग्याबद्दल जागरूकता, जीवनशैलीत सकारात्मक बदल आणि नियमित आरोग्य तपासणी करण्याची प्रेरणा मिळते. हृदयाचे आरोग्य राखणे म्हणजे केवळ वैयक्तिक कल्याण नाही, तर सामाजिक स्थैर्य आणि समाजातील आर्थिक व भावनिक संतुलन टिकवणे देखील आहे. चला, आपण सर्वजण एकत्र येऊन हृदयरोग प्रतिबंधासाठी प्रयत्न करूया, जेणेकरून आपले आणि आपल्या समाजाचे जीवन निरोगी, आनंदी आणि समृद्ध राहील.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
डॉ.राजेंद्र बगाटे, (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत)
मो. क्र. ९९६०१०३५८२, ईमेल – bagate.rajendra5@gmail.com


Saturday, September 27, 2025

संत महंतांच्या मंगलमय उपस्थितीत 'बाजीराव पेट्रोलियमचे' आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन भरपावसातही स्नेही, हितचिंतकांच्या शुभेच्छा व प्रेम ओसंडून वाहिले ! परळी वैजनाथ/सोनपेठ (दर्शन) :-

संत महंतांच्या मंगलमय उपस्थितीत 'बाजीराव पेट्रोलियमचे' आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन             
भरपावसातही स्नेही, हितचिंतकांच्या शुभेच्छा व प्रेम ओसंडून वाहिले !          

परळी वैजनाथ/सोनपेठ (दर्शन) :- 
 
       परळी शहराच्या सेवा क्षेत्राचे वैभव वाढविणाऱ्या  'बाजीराव पेट्रोलियम' या नावाने परळी नंदागौळ-पुस- बर्दापूर या रस्त्यावर अत्याधुनिक पेट्रोल पंप उभारण्यात आला असुन या पेट्रोल पंपाचे आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व संत महंतांच्या मंगलमय उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आले. भर पावसातही झालेल्या या शानदार समारंभाला परळीतील मोठ्या संख्येने विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.
        ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर पासून काही अंतरावरच परळी ते नंदगौळ–पुस-बर्दापूर रोडवर, श्रद्धानंद गुरुकुल आश्रमासमोर  उभारण्यात आलेल्या बाजीराव पेट्रोलियम या भारत पेट्रोलियमच्या अत्याधुनिक पंपावर २४ तास इंधन सेवा उपलब्ध राहणार असून ग्राहकांसाठी सर्व आधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. या पेट्रोल पंपाचा शुभारंभ आज  माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.उद्घाटन प्रसंगी शांतिब्रह्म गुरुवर्य ह.भ.प.प. पू.महादेव महाराज चाकरवाडीकर, धर्मगुरू प.पू.अमृताश्रम स्वामी आणि १०८ नंदीकेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांचे आशीर्वाद व आध्यात्मिक सान्निध्य लाभले. प्रारंभी आ. धनंजय मुंडे व संत महंतांच्या हस्ते विधिवत पूजा करुन व फीत कापून पेट्रोल पंपाचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित संत महंतांचे पूजन व यथोचित सन्मान धर्माधिकारी परिवाराच्या वतीने करण्यात आला.तसेच आ.धनंजय मुंडे यांचा ह्रदय सत्कार करण्यात आला. उपस्थित संत महंतांनी या नव्या व्यवसायाला आपले आशीर्वाद प्रदान केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार 'बाजीराव पेट्रोलियम'चे प्रोप्रायटर, माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, हरिहर धर्माधिकारी,अ‍ॅड. प्रताप धर्माधिकारी यांनी केला.
     दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून परळी व परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही सकाळपासूनच  मोठा पाऊस सुरूच होता. मात्र या नव्या सेवा व्यवसायाच्या शुभारंभ सोहळ्याला भरपावसातही परळी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा देत धर्माधिकारी परिवारील प्रेम व्यक्त केले. त्याचबरोबर संपूर्ण दिवसभर या नव्या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांची 'बाजीराव पेट्रोलियम' वर रीघ लागली होती.भर पावसातही स्नेही, हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित राहून भेट देऊन, सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त केल्या. एक प्रकारे भर पावसातही परळीकरांचे धर्माधिकारी परिवारावरील प्रेम यानिमित्ताने ओसंडून वाहिल्याचे चित्र बघायला मिळाले.

Tuesday, September 23, 2025

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्जनागरिकांनी दक्ष राहावे - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण - नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी- अफवांवर विश्वास ठेवू नये, कुठलेही धाडस करु नका- सुरक्षितस्थळी राहावे, प्रशासन बचाव व सुरक्षेसाठी तत्पर- भारतीय सैन्य दल, एसडीआरएफचे पथके जिल्ह्यात दाखल- जिल्हा प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावेपरभणी/सोनपेठ (दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांच्याकडून) :-

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
नागरिकांनी दक्ष राहावे - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
 
- नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी
- अफवांवर विश्वास ठेवू नये, कुठलेही धाडस करु नका
- सुरक्षितस्थळी राहावे, प्रशासन बचाव व सुरक्षेसाठी तत्पर
- भारतीय सैन्य दल, एसडीआरएफचे पथके जिल्ह्यात दाखल
- जिल्हा प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे
परभणी/सोनपेठ (दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांच्याकडून) :-  
 
जायकवाडी, माजलगाव या धरणांमधून परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत होणारा विसर्ग याशिवाय इतर प्रकल्पांतून जिल्ह्यातील विविध नद्यांमध्ये होणारा विसर्ग तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून महसूल, पोलीस, सैन्यदल, एसडीआरएफचे पथक ही सर्व यंत्रणा सतर्क आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, विशेषत: नदीकाठच्या गावांतील लोकांनी दक्षता घ्यावी. कुठलेही धाडस करु नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन आपल्या बचाव व सुरक्षेसाठी तत्पर आहे. जिल्हा प्रशासनाच्या सर्व सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी नागरिकांना केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी म्हणाले की, सद्यस्थितीत जायकवाडी, माजलगाव या धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरु आहे, त्यामुळे पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील गोदावरी नदीची इशारा पातळी 396.47 मी. इतकी आहे तर धोका पातळी 398.7 मी. इतकी आहे. स‌द्यस्थितीत पाणी पातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांतील लोकांनी खबरदारी घ्यावी.  नागरिकांच्या बचाव व सुरक्षेसाठी भारतीय सैन्य दल आणि एसडीआरएफची (राज्य आपत्ती प्रतिसाद दल) तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे. भारतीय सैन्य दलाची 54 एआरटीच्या एका पथकाकडे पाथरी तालुक्यातील मंजरथ, कासापुरी आणि ढालेगाव परिसरातील गावे सोपविण्यात आली आहेत. तर दुसऱ्या पथकाकडे मानवत तालुक्यातील मौजे थारगाव आणि एसडीआरएफकडे सोनपेठ तालुक्यातील मौजे शिरशी, थडी पिंपळगाव आदी कार्यक्षेत्र सोपविण्यात आले आहे. 

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 36 गावांचा संपर्क तुटला आहे, मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे सुमारे 578 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पाथरी तालुक्यातील संपर्क तुटलेल्या 16 गावांपैकी रामपुरी  येथील 60 आणि निवळी येथील 10 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. सोनपेठ तालुक्यातील संपर्क तुटलेल्या दोन गावांपैकी नगरपालिकेच्या स्थानिक शोध बचाव पथकाच्या मदतीने थडी पिंपळगाव येथील 408 लोकांना तर लसिना येथील 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गंगाखेड, मानवत व सेलू तालुक्यातील संपर्क तुटलेल्या गावांतील नागरिक सुरक्षित असून स्थानिक यंत्रणा त्यांच्या मदतीसाठी  सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 

जून-2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता महसूल व वन विभागाचा शासन निर्णय, दि. 18 सप्टेंबर 2025 अन्वये 128 कोटी 55 लक्ष 38 हजार इतका निधी  वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली असून निधीच्या वाटपाची कार्यवाही सुरु असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, चालू सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल शासनास तातडीने सादर करण्यात येणार आहे. शेतकरी व नागरिकांनी चिंता करु नये. जिल्हा प्रशासन आपल्या मदतीसाठी सज्ज आहे. प्रशासनाच्या सुचनांचे काळजीपूर्वक पालन करावे. 
*-*-*-*-*

Saturday, September 20, 2025

"हिंदी भाषा देशाच्या सांस्कृतिक वारशाचे आणि एकतेचे प्रतीक आहे”—प्रो.डॉ.कुलकर्णी वनिता

"हिंदी भाषा देशाच्या सांस्कृतिक वारशाचे आणि एकतेचे प्रतीक आहे”—प्रो.डॉ.कुलकर्णी वनिता      
 
सोनपेठ (दर्शन) :- कै.र.व.महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.यानिमित्याने दि.14 सप्टेंबर 2025 रोजी युट्युब व्हिडिओ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.वडचकर शिवाजी यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘हिंदी दिवस’ या भितीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ.वनिता कुलकर्णी या उपस्थित होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.शेख शकीला तसेच प्रा.कैलास आरबाड हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. शेख शकीला आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या “भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षातच म्हणजेच 14 सप्टेंबर 1949 दिवशी संविधान सभेने हिंदी भाषेची भारताची राजभाषा म्हणून निवड केली. या दिवसाचे औचित्य साधून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो” तसेच  दुसरे प्रमुख मार्गदर्शक प्रा. कैलास आरबाड यांनी ‘राष्ट्रभाषा हिंदी’ या विषयावर आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, “भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी होय या हिंदी भाषेच्या सन्मानाकरिता तसेच हिंदी भाषेतलं सौंदर्य तसेच साहित्य जगासमोर आणण्यासाठी 14 सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो” यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. शेवटी अध्यक्षीय समारोप करताना प्रो.डॉ.कुलकर्णी वनिता म्हणाल्या “14 सप्टेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. त्यामुळे दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस ‘हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेत 17 व्या भागात परिच्छेद 343 पासून 351 पर्यंत जी कलमे आहेत त्यानुसार हिंदी ही भारतीय संघराज्याची राजभाषा असून तिची लिपी देवनागरी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. महात्मा गांधीजींनी हिंदी भाषेला जनमानसाची भाषा म्हटले आहे हिंदी ही भारत देशातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. हिंद -आर्य भाषा समुहातील हिंदुस्तानी भाषेच्या  संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे हिंदीचा साहित्यिक इतिहास खुप समृद्ध आहे.”      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आगळे स्नेहा या विद्यार्थिनीने केले तर आभार मुलगीर नागेश या विद्यार्थ्याने मांनले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Friday, September 19, 2025

श्री परमेश्वर कदम अध्यक्ष (ह.शि.प्र.मं.) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्री परमेश्वर कदम अध्यक्ष (ह.शि.प्र.मं.) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कै.र.व.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबीर, रक्तगट तपासणी, गप्पी मासे वाटप व नेत्ररोग तपासणी शिबीर आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यशोदा मल्टीकेअर हॉस्पिटल सोनपेठ मार्फत 'मोफत आरोग्य तपासणी शिबिर' घेण्यात येणार आहे. तर शासकिय रक्तपेढी, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई यांच्याकडून रक्तदान शिबिर, विमल आय केअर हॉस्पिटल सोनपेठ तर्फे 'मोफत नेत्ररोग तपासणी' इ. उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी प्राणीशास्त्र विभागाकडून 'गप्पी मासे वाटप व रक्तगट तपासणी' केली जाणार आहे.तरी यापैकी कुठल्याही उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, पालक व नागरीकांनी प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, आयक्यूएसी समन्वयक प्रा.डॉ.मुकुंदराज पाटील, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.बळीराम शिंदे, प्रा.डॉ.संतोष रणखांब व प्रा.अर्जुन मोरे यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन महाविद्यालयाच्या प्रसिद्धी विभागाकडून करण्यात आले आहे.

Saturday, September 13, 2025

अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या विभागीय अध्यक्षपदी शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांची निवड

अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या विभागीय अध्यक्षपदी शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांची निवड 
सोनपेठ (दर्शन) :- अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेच्या जालना परभणी व बीड जिल्हा विभागीय अध्यक्षपदी श्री गुरु ष.ब्र. १०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांची तर उपाध्यक्षपदी गुरु ष.ब्र.१०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर तर सचिव पदावर श्री  गुरु ष.ब्र.१०८  विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. सोनपेठ दि १३ सप्टेंबर 2025 श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ येथे अखिल भारत वीरशैव लिंगायत शिवाचार्य संस्थेचे उपाध्यक्ष श्री गुरु ष.ब्र.१०८ श्रीकंठ शिवाचार्य महाराज नारायणसूरकर/रेवूर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य संस्थेचे अध्यक्ष गुरु ष.ब्र.१०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधाम यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.या सभेत  अखिल भारतीय वीरशैव लिंगायत शिवाचार्य संस्थेचे जालना परभणी व बीड जिल्हा विभागीय अध्यक्षपदी श्री गुरु ष.ब्र. १०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांची, उपाध्यक्षपदी  गुरु ष.ब्र.१०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर तर सचिव पदावर श्रीगुरु ष.ब्र.१०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या सभेस श्रीगुरु ष.ब्र.१०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज  मन्मथधाम ,श्री गुरु ष.ब्र.१०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर,  श्री गुरु ष.ब्र.१०८ अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर, श्री गुरु ष.ब्र.१०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर,श्री गुरु ष.ब्र.१०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर,श्री गुरु ष.ब्र. १०८ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर, श्री गुरु ष.ब्र.१०८ चनबसव शिवाचार्य महाराज बर्दापूरकर,श्री गुरु ष.ब्र.१०८ वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर ,श्री गुरु ष.ब्र.१०८ विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज आष्टीकर (लक्ष्मनाची) यांची उपस्थिती होती.
साप्ताहिक सोनपेठ दर्शन जाहिरात व बातम्या साठी संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.