Monday, February 3, 2025

|| अखंड तेवणारा स्नेहदीप : संत मन्मथ स्वामी ||

 महाराष्ट्रातील वीरशैव -लिंगायत संप्रदायातील पारमार्थिकदृष्ट्या सर्वोच्च आदरस्थानी  असलेले आणि परमार्थाला वाङ्मयाची जोड देऊन मराठी 
भक्तीसाहित्याला सखोल बनविणारे  वीरशैव मराठी वाङ्मयकार  म्हणून संत मन्मथ स्वामींचा आदराने उल्लेख करावा लागतो. 🌷मराठी वीरशैवांच्या दृष्टीने त्यांचे स्थान माऊली चे आहे. 🌷
            अर्थात ही माऊली राजघराण्यातील. कडक शिस्तीची, काटेकोर वर्तनाबद्दल जागरूक असणारी आणि फटकळ लेखणीची परंतु समाजाला वळण लावण्यासाठी डोळ्यात तेल घालून राखण करणारी आहे . 
     मन्मथ माऊलीच्या उक्ति- कृतीमागे 
  " जे दुष्ट दुर्जन अमंगळ | त्यांची हृदये होओत निर्मळ "
  ही अंतरीची तळमळ आहे.
 मन:परिवर्तन झालेल्या लोकांना
   "जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे "
  याचा प्रत्यय यावा आणि समाजातल्या लहानातल्या लहान घटकापर्यंत ...
"सर्व सुखांचा हो सुकाळ | दुःख दारिद्र्य छळ | "
   अशी अवस्था यावी.संपत्ती, सुख तर सर्वांनाच मिळावे परंतु महत्त्वाचे म्हणजे 🪷समाजातील घटकांमध्ये एकात्मता निर्माण व्हावी .मतभेद असतीलही .परंतु  "नष्ट होवो सकळ | मनोमालिन्य ही ||" - 
अर्थात मनभेद नष्ट होऊन एकात्म, एकरस आणि समरस समाज निर्माण व्हावा.' असे मन्मथ माऊलींना ठामपणे वाटते.कारण
   🚩 समरससमाज , एकात्म समाज हीच राष्ट्रीय सुखाची  शाश्वत संपत्ती आहे  . 🚩
   हेच  *प्रसादान*  मन्मथ स्वामी जगदाधारा असलेल्या 
जगन्निर्मात्या महेश्वराकडे -भगवान शिवांकडे मागतात. .
  जोडीलाच 🌷स्वधर्माचा जागर आणि समन्वयशीलतेचा ध्यास हे मन्मथ माऊलींच्या व्यक्तित्वाचे, कार्याचे मर्मस्थळ आहे. 🌷
   परंतु त्यांच्या लेखनाचा -ग्रंथवाङ्मय आणि अभंगवाणी - यांचा केवळ सांप्रदायिक  व  विवक्षित दृष्टीने विचार झाल्यामुळे संत मन्मथ स्वामींचे कार्य नेमकेपणाने पुढील पिढीपर्यंत पोहोचले आहे, असे म्हणणे अवघड आहे.
   श्रीपरमरहस्य हा मन्मथ माऊलींचा ग्रंथ म्हणजे त्यांची वाङ्मयीन मूर्ती. वीरशैव -लिंगायतांची श्रीमद्भगवद्गीताच. भगवद्गीते इतकेच महाराष्ट्रीय विचार प्रवाहाला वेगळे वळण देणारा आणि  वीरशैव तत्त्वज्ञानाला सुबोधपणे समाजापुढे मांडणारा हा ग्रंथ ; वीरशैव - लिंगायत सांप्रदायिक आचार- विचारांचे दिग्दर्शन करणारा देखील आहे आणि त्याच वेळी स्वधर्माचा व्यापक परिप्रेक्ष्य स्पष्ट करणारा देखील आहे.
"अधर्माची शीग निमें सहजे |तोंचि धर्म ओ देवी ||(
श्रीपरमरहस्य १.५१)
ही त्यांची धर्माची व्याख्या विशिष्ट संप्रदायापुरती निगडित आहे असे कोण म्हणेल ?
" स्वधर्माचे करावे मंडन | परधर्माचे होय खंडन |
अशी दृढ शास्त्रांतून | वाक्ये शोधून पाहावी|| (श्रीपरमरहस्य,८.
१२६) हे त्यांचे सांगणे कोणत्या स्वधर्मप्रेमी व्यक्तीला आवडणार नाही ?
व्यक्तीने नुसते सज्जन असून चालणार नाही त्याच्या सज्जनशीलतेला क्रियाशीलतेची  जोड असावी लागते , म्हणूनच 
" तरी क्रियेविण जे पुण्य | ते सुकृताशी  होय उणें ||
 म्हणौनि न टाकिजें सज्जने |  क्रियाचाराशी ||"(श्रीपरमरहस्य३.५१) हे अध्यात्म आणि समाजकार्य यांची सांगड घालणाऱ्या कुठल्याही सुबुद्ध व्यक्तीला पटणारच ना ?
  विश्वनिर्मिती मागील *परमरहस्य*, वीरशैव तत्त्वज्ञान आणि वीरशैवाचार हा केंद्रबिंदू असलेला 
श्रीपरमरहस्य ज्ञानदेवांच्या शैलीने रंगलेला दिसतो.
  *अनुभवानंद* हा त्यांचा ग्रंथ गुरु - शिष्य संवादाच्या माध्यमातून भारतीय मनाचे दर्शन घडवितो. ब्रह्म म्हणजे काय हा पारंपरिक प्रश्न न विचारता अनुभवानंदातील शिष्य आपल्या गुरूंना 
"मी जीव की शिव आहे | की उभयातीत माझी मी नेणे सोये | म्हणौनि माझा मज दावा निश्चय | जे मी कोण ऐसे ||(अनुभवानंद ५) असा प्रश्न विचारत *मी* चा शोध घेताना दिसतो. देह पडताना  ब्रह्म भावना असल्यास जीवाला ब्रह्मस्वरूप प्राप्त होते, हे गीतेचे सूत्र असले तरी हे कर्म कसे असावे याचे दिग्दर्शन मात्र मन्मथ माऊली करतात. त्यांच्या मते, "हे  कर्म  लोकसंग्रहाकारणे असले पाहिजेत यातून लोकसंस्थेचा उत्कर्ष झाला पाहिजे ' . अर्थातच हा उत्कर्ष परोपकारात ,  सत्कर्मात आणि जनकल्याणात सामावलेला आहे. म्हणूनच, गुरुदक्षिणा देण्यासाठी उत्सुक असलेल्या शिष्याकडे ते ,
"सर्व जीवातें दया करिशी | 
दुःख हरोनी सुखातें देशी|
 संतसेवे जीवा कुरवंडी करीशी | 
तेचि उतराई 
शिष्यराया || "(अनु.२२२) अशी अपूर्व  गुरुदक्षिणा मागताना दिसतात.
  अशी निरपेक्ष गुरुदक्षिणा मागणारे गुरु कोणत्याही काळात आणि कोणत्याही समाजाच्या शीर्षस्थानीच असतील; हो ना?
  *स्वयंप्रकाश* हा मन्मथ  माऊलींचा अत्यंत महत्त्वाचा परंतु अलक्षित असा ग्रंथ आहे. माऊलींचे समकालीन संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीचे एका अर्थाने पुनरुज्जीवन केले. तर दुसरीकडे संत एकनाथांचे समकालीन मन्मथ माऊलींनी मराठीच्या 
आद्यग्रंथाला - विवेकसिंधूला- सुबोध रूप देऊन सर्वसामान्यांच्या आटोक्यात या ग्रंथातील विचार आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. विवेकसिंधू वरील मराठीतील पहिला टीकाग्रंथ म्हणून एकूण मराठी वाङ्मयात स्वयंप्रकाश हा ग्रंथ महत्त्वाचा ठरतो.
" एक  आत्मा सर्वांभूती वसे |त्याचे रूप कैसे असे "या साधक शिष्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना 
स्थूलदेहनिरसन ,
त्वंपद ,तत्पदादींचे तात्विक स्पष्टीकरण करीत असताना आणि देहाबद्दल उदासीन राहून कर्म कसे करावे हे सांगताना मन्मथ माऊली,
"आपण निराश कर्माची चाड नाही | परि लोकसंग्रहालागी 
कीजे काही |
 लोकसंग्रहमेवपि ऐसे गोविंदही |
गीतेमाजी बोलिला असे "||( 
स्वयंप्रकाशी ६.९३) असा श्रीमद् भगवद्गीतेचा दाखला देत व्यापक अशा भारतीय तत्त्वज्ञानाशी असलेले आपले अंतरंग नाते स्पष्ट करतात.
  *ज्ञानबोध* मन्मथ माऊलींच्या ग्रंथाचा मूळ उद्देश जीवाचा अर्थात *अंगा*चा लिंगाकडे म्हणजेच शिवतत्त्वाकडे होणारा प्रवास स्पष्ट करणे आहे. मात्र तो स्पष्ट करताना वीरशैवतत्व परंपरेतील *षटस्थल*या पारिभाषिक संज्ञांचा वापर करताना दिसत नाही.कारण विशिष्ट पारिभाषिक संज्ञा पेक्षा देखील 'भक्त'स्थलाकडून 'ऐक्य' स्थलाकडे जीवाची वाटचाल होत असताना त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते आणि म्हणूनच ऐक्य स्थलाकडे जाणारा शिवयोगी 
" जीवातळी जीव  अंथरी | दुःखीतिया सुखी करी | सुखिया देखोनी सुखावे अंतरी ||"(ज्ञानबोध ३३) अशा उच्चतम अवस्थेला पोहोचतो. 
  थोडक्यात , मध्ययुगीन मराठी समीक्षकांनी दुर्लक्षित केलेले आणि वीरशैव मराठी अभ्यासकांनी , सांप्रदायिकांनी संप्रदायाच्या कक्षेत , भजन- पूजनाच्या उपचारांमध्ये सीमित केलेले संत शिरोमणी 
श्रीमन्मथ माऊली हे मध्ययुगातील असा स्नेहदीप आहेत की ज्यांनी कर्मकांडांच्या विळख्यात, जन्मगत 
वर्णश्रेष्ठत्वाच्या किंवा जातीभेदाच्या अमानुष कालखंडात आणि भारतीय संस्कृतीचा उच्छेद करण्यासाठी सिद्ध झालेल्या इस्लामच्या  आक्रमणाच्या 
रेट्यामध्ये  सांप्रदायिक आचार विचारांचे अधोरेखन करीत असतानाच व्यापक आणि शाश्वत अशा
मानवता धर्माचा जागर केला. सर्व तऱ्हेच्या विषमतेवर मात करीत आपल्या स्नेहपूर्ण *प्रसादा*ने सभोवतालचा अंधःकार दूर करण्याचा प्रयत्न केला आणि  सर्व जातींच्या शिष्यांनाआईच्या मायेने  आपलेसे केले. हे प्रेम, हा स्नेह वृद्धिंगत होणाऱ्या माघ मासातील
वसंत पंचमीच्या रंगाला अधिक प्रकाशमान करणारा आहे. 
  स्नेहदीपाच्या या प्रेमप्रकाशात वाटचाल करण्याचे प्रेरणा तुम्हाला मला होवो ; हीच  परमगुरु मन्मथ माऊलींकडे विनम्र प्रार्थना🙏🙏
   मन्मथ माऊलींचे मी एकेकाळी रेखाटलेले रेखाचित्र
  © डॉ श्यामा घोणसे, संत नामदेव अध्यासन प्रमुख व प्राध्यापक,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
Shyama Ghonse

No comments:

Post a Comment