Monday, February 10, 2025

जिल्हा परिषद आदर्श शिक्षिका ज्योत्स्ना पारलिंग मानुरकर (स्वामी) सेवानिवृत्ती समारंभ संपन्न

(सौ.ज्योत्स्ना पारलिंग मानुरकर (स्वामी) साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी ग्रंथ भेट देताना) 
सोनपेठ (दर्शन) :- परळी तालुक्यातील उपक्रमशील आणि जिल्हा परिषद आदर्श शिक्षिका ज्योत्स्ना पारलिंग मानुरकर (स्वामी) या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दादाहरी वडगाव येथून 38 वर्षांच्या अतुलनीय शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित भव्य सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
ज्योत्सना स्वामी यांनी शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. इंग्रजी अध्यापनातील त्यांचा दांडगा अनुभव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मोलाचा ठरला. शिक्षण हेच पूज्य मानून त्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. धर्मापुरी, सायगाव, कन्या शाळा परळी, वागबेट, टोकवाडी तसेच दादाहरी वडगाव या शाळांमध्ये त्यांनी आपल्या अध्यापन कौशल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले.
सेवा, संस्कार आणि शैक्षणिक वारसा
कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरूवर्य दत्ताप्पा इटके गुरुजी यांनी स्वामी मॅडम यांच्या कार्याचा गौरव करताना “त्यांच्या कुटुंबाचा तीन पिढ्यांपासूनचा शैक्षणिक वारसा आजही अविरत सुरू आहे”असे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेली विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.
स्वामी मॅडमच्या मार्गदर्शनामुळेच मी न्यायाधीश – मनिषा साखरे
या प्रसंगी नांदेडच्या न्यायाधीश आणि स्वामी मॅडम यांच्या माजी विद्यार्थिनी मनिषा साखरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना “स्वामी मॅडम यांच्या शिकवणीमुळेच आज मी न्यायाधीश झाले” असे सांगितले. कार्यक्रमास टी.आर. देशमुख सर, रंगनाथ खके, माजी गटशिक्षणाधिकारी आणि जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अन्सारी मॅडम, केंद्रप्रमुख पल्लेवाड यादव सर आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, नातेवाईक तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे स्वागत इंजी.रामलिंग मानूरकर आणि सौ.प्रांजल मानूरकर यांनी केले. स्वामी मॅडम यांचे शैक्षणिक योगदान सदैव प्रेरणादायी ठरेल.

No comments:

Post a Comment