कै.राजाभाऊ कदम साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन......
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा सोनपेठ सारख्या ग्रामीण भागात पोचवून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करून देणारे दूरदृष्टी नेतृत्व दिवंगत राजाभाऊ कदम साहेबांचा आज स्मृतिदिन आहे. साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना शतशः नमन.
उद्योगाच्या क्षेत्रामध्ये नवनवीन संकल्पना राबवून उभारण्यात येणाऱ्या उद्योगांना आज मोठ्या प्रमाणावर आपण स्टार्टअप (उद्यमारंभ) म्हणून संबोधतो. एका लहानशा गरजेतून तुम्ही एखाद्या नवीन उद्योगाची केलेली सुरुवात म्हणजे उद्यमारंभ होय. गरज हि शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. नव्वदीच्या दशकात अशाच एका सामाजिक गरजेतून आणी सेवाभावी वृतीतून उच्चशिक्षणाची सुरुवात सोनपेठ सारख्या अडवळणाच्या ठिकाणी करावी या संकल्पनेतून कै. राजाभाऊ कदम साहेबांनी उद्दात्त हेतूने हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाची सुरुवात १९९३ मध्ये करून कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय या नावाने नवीन स्टार्टअप सुरू केले. सोनपेठ सारख्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत मागे असलेल्या छोट्या शहरात उच्च शिक्षणाची गंगा पोचवून अनेक पिढ्या घडवण्याचा उद्देश त्यामागे होता. हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाने ‘ज्ञानात धर्म ततः सुखम’ हे ब्रीद घेऊन सोनपेठ तालुक्यातील युवकांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याचे हाती घेतलेले कार्य आजतागायत सुरू आहे. संस्थेच्या कै रमेश वरपुडकर महाविद्यालयाने नुकतीच पंचवीस वर्षे पूर्ण केलेली असून महाविद्यालयाची आजपर्यंतची वाटचाल उतरोत्तर प्रगतीकडे घेऊन जाणारी ठरलेली आहे. सुरुवातीच्या काळात भाड्याचा इमारतीमध्ये सुरू झालेले महाविद्यालय आज स्वतःच्या जागेत डौलाने उभे असून सोनपेठ तालुक्याच्या शैक्षणिक विकासात मैलाचा दगड ठरत आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. परमेश्वर कदम साहेबांनी मागील अकरा वर्षांपासून संस्थेअंतर्गत विविध शैक्षणीक घटक संस्था सुरू केलेल्या आहेत. सोनपेठ पंचक्रोशीतील युवकांना आणि विशेष करून मुलींना उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याचे स्वप्न संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय राजाभाऊ कदम यांचे होते. १९९० च्या दशकामध्ये मुलींना शिक्षणासाठी परगावी ठेवण्याची मानसिकता रुजलेली नव्हती आणि अशा परिस्थितीत आपल्याच भागात महाविद्यालय असावे अशा खंबीर भूमिकेतून संस्थेची स्थापना झाली. संस्थेच्या या सेवाभावी कार्याला तत्कालीन सचिव श्री रमेशराव खरवडे, ऊपाध्यक्ष श्री लक्ष्मीकांत परळकर, कोषाध्यक्ष श्री व्यंकटरावजी कदम साहेब, संचालक श्री बालासाहेब नखाते, श्री अंकुशराव वाकणकर, डॉ .संतोष नायबळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सोनपेठ शहरातील परळी रोडवरील राजाभाऊ कदम नगर परिसरात आज संस्थेच्या सर्व घटकसंस्था कार्यरत आहेत.यामध्ये प्रामुख्याने कै.रमेश वरपूडकर वरिष्ठ महाविद्यालय, कै.रमेश वरपूडकर कनिष्ठ महाविद्यालय, कै. राजाभाऊ कदम विद्यालय (मराठी माध्यम) ई.चा समावेश होतो. प्राथमिक शिक्षणातील इंग्रजी माध्यमाकडे असलेला पालकांचा ओढा लक्षात घेऊन एल. आर. के. नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु केली. याशिवाय शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना परत प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरू करण्यात आलेले आहे तसेच पदव्युत्तर शिक्षणाची गैरसोय लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासुन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाने महाविद्यालयास एम.ए. / एम.कॉम.चे वर्ग चालवण्यास परवानगी दिली असून आता सोनपेठ पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना के.जी.पासून पी.जी.पर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली पूर्ण करण्याची संधी संस्थेचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम साहेबांनी महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात उपलब्ध करून दिलेली आहे. संस्थेचे मिशन ‘Reaching to the Unreached’ असून सोनपेठ तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व घटक बांधील आहेत, त्याचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये महाविद्यालयाने आपली गुणवत्ता NAAC द्वारे प्रमाणित करून घेऊन ‘ब’ दर्जा प्राप्त केलेला आहे तसेच स्वा.रा.ती.म. विद्यापिठाने महाविद्यालयास शैक्षणिक अंकेक्षणात ‘अ’ दर्जा दिलेला आहे. क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी आंतरविद्यापीठ पातळीपर्यंत मजल मारली आहे. महाविदयालयाच्या ‘प्रज्ञा’ वार्षिक अंकास विद्यापिठाने सलग ४ वेळा उत्क्रुष्ट अंक म्हणून पुरस्कारीत केलेले आहे. महाविद्यालयातील बहुतांश शिक्षक पत्रकारिता, कला, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून स्वा.रा.ती.म. विद्यापिठाच्या विविध प्राधिकरणावर नियुक्त आहेत. १९९४ मध्ये ५० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या प्रवासात आज जवळपास २००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविदयालयाचे अनेक माजी विद्यार्थी अंकेक्षक, शिक्षण, कला, भारतीय सैन्य, शिक्षण क्षेत्र आणी व्यवसायात आपले करिअर करत आहेत. महाविद्यालयाचे बहुतांश विद्यार्थी इंजिनिअरिंग तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरत आहेत. महाविद्यालयाचे विद्यार्थी नेट/सेट सारख्या परीक्षेमध्ये यश मिळवत असून २०२१ च्या परीक्षेत ४ विद्यार्थी सेट पास झालेले आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पारंपरिक विषयांचे शिक्षण देत असताना आज बदलत्या काळानुसार कालसुसंगत शिक्षण देण्यासाठी संस्था प्रयत्नरत आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपले महाविद्यालय कसे बहुविद्याशाखीय राहील यासाठी संस्थेची वाटचाल सुरू आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना व्यवसाईक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध असून येत्या काळात अशा प्रकारचे शिक्षण घेऊन विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहतील असा आशावाद आम्ही बाळगून आहोत. स्वर्गीय राजाभाऊ कदम साहेबांनी लावलेल्या या शैक्षणिक संस्थेच्या छोट्या रोपट्याचे रूपांतर आज वटवृक्षात झालेले असुन पंचक्रोशीतील विद्यार्थी आणि पालकांना याचा लाभ होत आहे. साहेबांच्या स्मृतीस पुनश्च विनम्र अभिवादन.🙏🙏🙏
श्री.डाॕ.प्राचार्य वसंत सातपुते
कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ.

No comments:
Post a Comment