Monday, March 28, 2022

परभणी वैद्यकीय महाविद्यालयासाठी पदे आणि निधी मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाद्वारे परिपत्रक जारी

परभणी वैद्यकीय महाविद्यालयासाठी पदे आणि निधी मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाद्वारे परिपत्रक जारी



सोनपेठ (दर्शन) : -

परभणीतील 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नीत 430 रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापनेकरीता वैद्यकीय शिक्षण विभागाने सोमवार दि. 28 मार्च रोजी शासन निर्णयासंदर्भात तपशीलवार  परिपत्रक जारी केले असून त्यातून या महाविद्यालयासाठी चार वर्षातील अंदाजीत खर्च, पद निर्मिती तसेच अन्य अत्यावश्यक गोष्टींना मंजूरी बहाल केली आहे.
      वैद्यकीय शिक्षण खात्याचे अव्वर सचिव डॉ. श्री. पु. कोतवाल यांनी सोमवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीतून मान्यता दिलेल्या प्रमाणे शासन निर्णय जारी केले आहेत. त्यात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नीत 430 रुग्ण खाटांचे रुग्णालय केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर सुरु करण्यास मान्यता बहाल केली आहे. तसेच प्रस्तावित महाविद्यालयाकरीता आवश्यक तेवढी पद निर्मिती व पदे भरावयास मान्यता बहाल केली असून यासाठी उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट शिथिल केली आहे. नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालयाकरीता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे परभणी येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा सामान्य रुग्णालय, अस्थिव्यंग रुग्णालय व स्त्री रुग्णालय निकषानुसार आवश्यक जागेसह (स्थावर जंगम मालमत्तेसह) तात्पूरत्या स्वरुपात वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागास निशुल्क वापरास उपलब्ध करण्यास मान्यता बहाल केली आहे.
       परभणी येथील या महाविद्यालयाकरीता मौजे ब्रह्मपूरी ता. जि. परभणी येथील उद्योग विभागाने त्यांच्या नावे असलेली गट क्र. 2, 20, 47 व 53 येथील एकूण 52.6 हेक्टर आर. ही आवश्यक जमीन महसूल विभागास निःशुल्क हस्तांतरीत करुन देण्यास मान्यता बहाल केली आहे. सदर जमीन महसूल विभागामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागास निःशुल्क हस्तातरीत करण्यास मान्यता बहाल केली असून सदर जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय स्थलांतरीत करण्याससुध्दा मान्यता बहाल केली आहे.
       या व्यतिरिक्त अतिरिक्त बांधकाम, त्यासाठीच्या आवश्यक खर्चासही मान्यता बहाल करण्यात आली आहे. प्रस्तावित महाविद्यालयाकरीता एकूण 682 कोटी 76 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चास मान्यता बहाल केली असून वेळोवेळी पूरक मागणीद्वारे निधी उपलब्ध करण्यासही मान्यता बहाल केली आहे.
      प्रशासकीय इमारत, अचिकित्सालयीन व चिकित्सालयीन विभाग, रुग्णालयातील इमारत, अधिकारी कर्मचारी आवास आणि विद्यार्थी वसतीगृह, आवश्यकतेनुसार अतिरिक्त बांधकाम यासाठी अंदाजे 60 हजार 242 चौ.मी. करीता 309 कोटी 63 लाख रुपये खर्च होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच वर्ग-1, 2 विद्या वेतनाची पदे वर्ग-3 नियमित पदे, काल्पनिक पदे, बाह्यस्त्रोताने, वर्ग-4 कंत्राटी पदांकरीता 97 कोटी 60 लाख रुपये 4 वर्षासाठीच्या खर्चास मान्यता बहाल केली आहे.
         रुग्णालयातील आवश्यक पदे व त्यावरील 4 वर्षांच्या अंदाजीत 109 कोटी 19 लाख रुपयांच्या खर्चासह मान्यता बहाल केली असून यंत्र सामूग्री, आवर्तीत खर्च वगैरेंकरीताही एकूण 682 कोटी 76 लाख रुपये लागतील, असा अंदाजही व्यक्त केला आहे.
        दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड.विजय गव्हाणे यांनी तसेच खासदार प्रा.फौजीया खान यांच्या सह परभणीकर संघर्ष समिती यांनी सतत पाठपुरावा केला होता त्यांनी समाधान व्यक्त केले.

दिल्ली मॅराथॉन स्पर्धेत परभणीच्या मराठवाडा एक्सप्रेस ज्योती गवते प्रथम

दिल्ली मॅराथॉन स्पर्धेत परभणीच्या मराठवाडा एक्सप्रेस ज्योती गवते प्रथम



परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

नवी दिल्ली येथील मॅराथॉन स्पर्धेत महिला गटात परभणीच्या मराठवाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणार्‍या ज्योती गवते हीने बाजी मारुन प्रथम क्रमांक पटकाविला.
       नवी दिल्लीतील एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्स या कंपनीद्वारे न्यू दिल्ली मॅराथॉन - 2022 या स्पर्धांचे रविवारी आयोजन केले होते. महिला गटात ज्योती गवते हीने 42.195 किलो मीटर अंतर 3 तास 1 मिनीट 20 सेकंदात पार केले. त्याद्वारे तीने विजेतेपद पटकाविले. गवते हीला या कंपनीद्वारे 1 लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. दरम्यान, ज्योती गवते हीने गेल्या काही महिन्यातच मुंबई मॅराथॉन, पुणे मॅराथॉन स्पर्धांपाठोपाठ नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे.
मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट ; आयएससो नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी - छगन भुजबळ



मुळशी / पुणे / परभणी / सोनपेठ (दर्शन):-

पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील दौऱ्यावर असतांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील परवानाधारक धनजंय दाभाडे यांच्या स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली.यावेळी शासनाने आयएससो नामांकन प्राप्त करण्यासाठी ठरवून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन केले जाते की नाही याबाबत छगन भुजबळ यांनी पाहणी केली. 
यावेळी आयएसओ नामांकन आवश्यक असलेल्या अटी व नियमांनुसार रेशन दुकानातील वजनमापे काटा, धान्यवाटप प्रमाणपत्र फलक, दरपत्रक फलक, जिल्हा दक्षता कमिटी बोर्ड, तालुका दक्षता कमिटी बोर्ड, परवाना फलक, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार कीट, व्हिजीट बुक, तक्रार पुस्तिका, ऑनलाईन विक्री रजिस्टर या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्वस्त धान्य दुकानदाराकडून आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी व नियमांची पूर्तता करण्यात आल्याने सदर रेशन दुकानास आयएसओ प्रमाणपत्र देण्यात यावे अशा सूचना करत छगन भुजबळ यांनी रेशन दुकानदार प्रामाणिकपणे सेवा करत असल्याबद्दल कौतुक करत आपले काम सुरु ठेवावे अशा सूचना दुकानदारास केल्या.

Friday, March 25, 2022

दलित वस्ती निधी चा वापर वस्ती सोडून करू नये रिपाईचे भूषण मोरे यांचे अभ्यंकर यांना निवदन

दलित वस्ती निधी चा वापर वस्ती सोडून करू नये रिपाईचे भूषण मोरे यांचे अभ्यंकर यांना निवदन

 परभणी सोनपेठ (दर्शन) :- 
महानगरपालिका अंतर्गत दलित वस्तीसाठी राज्य शासनाकडून मिळणारा निधी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध यांची संख्या ज्या ठिकाणी 50 टक्के पेक्षा कमी असून देखील त्या ठिकाणी हा निधी वापरला जातो यामुळे या निधीचा गैरवापर होत असून हा थांबविण्यात यावा या आशयाचे निवेदन राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण मोरे यांच्यातर्फे  देण्यात आले. सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनातर्फे परभणी महापालिकेला मिळालेला दलित वस्ती चा निधी महापालिकेतील आयुक्त व शहर अभियंता हे ज्या ठिकाणी अनुसूचित जाती व नवबौद्ध यांचे 50 टक्के पेक्षा कमी लोकसंख्या असून देखील त्या ठिकाणी दलित वस्ती चे कामे करण्यात येत असल्याने जे प्रभाग राखीव आहेत त्या ठिकाणी आजही रस्ते नाल्यांचे व्यवस्था नसल्याने येथील दलित लोकांवर अन्याय होत असल्याने येथील लोकांना आजही नाल्या रस्ते दिवे यांच्या सुविधा मिळत नाहीत यामुळे या लोकांवर अन्याय होत असल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण मोरे त्यांनी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांच्याकडे केली आहे याप्रकरणी अभ्यंकर यांनी भूषण मोरे यांना जिल्हाधिकारी समक्ष सदरील प्रकरण मी हाताळून जिल्हाधिकारी यांना निर्देश देईल असे सांगितले.

Saturday, March 19, 2022

माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देवडीतील विद्यार्थ्यांना सोमवारी शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार

माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देवडीतील विद्यार्थ्यांना सोमवारी शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार



बीड / सोनपेठ (दर्शन) : -

थोर समाजसेवक, देवडी गावचे माजी सरपंच माणिकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देवडी गावातील तीनही शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना "स्व. माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या" वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सोमवार दिनांक २१ मार्च रोजी हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार एस.एम देशमुख यांनी दिली..
माणिकराव देशमुख यांनी देवडी गावात विविध सामाजिक उपक्रम राबवून गावातील गरीब जनता, विद्यार्थी यांना मदत केली.जिल्हा परिषद शाळेत इ-लर्निंगची सोय केली, शाळेतील ग्रंथालयास पुस्तके भेट दिली.गरीब मुलांना जवळपास ५० सायकलींचे वाटप केले.नेत्र तपासणी शिबिर घेऊन अनेकांना दृष्टीदान दिले.भाऊंचा हा वारसा पुढे चालविण्याचा संकल्प देशमुख कुटुंबियांनी केला असून माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने गावात विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून देवडी येथील तीनही शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.. वडवणीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेषराव जगताप यांच्या हस्ते आणि गट शिक्षणाधिकारी श्री. उजगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक २१ मार्च रोजी हा सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होत आहे.
या कार्यक्रमास देवडी ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन एस.एम देशमुख, न्या. दिलीप देशमुख, विश्वंभर देशमुख, मुख्याध्यापक आंभुरे सर यांनी केले आहे.

Thursday, March 17, 2022

धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी जिल्हाचा पालकमंत्र्याचा पदभार सुपूर्त

धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी जिल्हाचा पालकमंत्र्याचा पदभार सुपूर्त 

परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

आगामी निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी धनंजय मुंडे यांची नियुक्ती व्हावी,असा सूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत काही नेते मंडळींनी व्यक्त केला होता,अपेक्षेप्रमाणे गुरुवारी रात्री धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी पालकमंञ्याचा पदभार सुपूर्त करण्यात आला.
      राज्याचे अल्पसंख्यांक राज्यमंत्री नवाब मलिक यांची परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यापासून महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना व काँग्रेस हे दोन्ही पक्ष नाराज आहेत.विशेषतः राष्ट्रवादी अंतर्गतसुध्दा धूसफूस सुरुच आहे.मुंबईतील मलिक यांनी परभणी जिल्ह्याचे पालकत्व स्विकारल्यापासून कधीच पुरेसा वेळ दिला नाही.ध्वजारोहनाचे शासकीय कार्यक्रम अपवाद आपत्तीच्या काळातसुध्दा ते कधी वेळेवर फिरकले नाहीत.जिल्ह्यांतर्गंत आघाडी अंतर्गत नेते मंडळीं बरोबर सुध्दा त्यांचे फारसे सख्य राहीले नाही किंवा ते असो,नेतेमंडळींनी सुध्दा जूळवून घ्यावयाचे प्रयत्नसुध्दा केले नाहीत.या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी अंतर्गत आमदार बाबाजानी दुर्राणी यांनीच मलिक यांच्या विरोधात खुलेआमपणे नाराजीचा सूर व्यक्त केला होता.त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती.मलिक यांनी त्या स्थितीत सुध्दा हेकेखोरपणा कायम राखला,राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी दुर्राणी विरुध्द मलिक या वादात दोघांनाही सबुरीचा सल्ला दिला.त्यामुळे त्या दोघातील ते मतभेद त्याचवेळी निवळले खरे,गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर मलिक यांच्या विरोधात राष्ट्रवादी अंतर्गत स्थानिक नेतेमंडळींनी उघडपणे श्रेष्ठींकडे सूर आवळण्यास सुरुवात केली.ज्येष्ठ नेते शरद पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी अंतर्गत नेते मंडळींनी मलिक यांच्या ऐवजी धनंजय मुंडे यांच्याकडेच पालकत्व दिले जावे,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
       गेल्या काही दिवसांपासून ईडीने केलेल्या कारवाईनंतर मलिक हे न्यायालयीन कोठडीत आहेत. चांगलेच अडचणीत सापडले आहेत.मलिक यांचा राजीनामा घ्यावा,यासाठी विरोधी पक्षाने रान उठवले आहे.त्यामुळे मलिक कमालीचे संकटात सापडले असून या स्थितीत त्यांच्यावर मंत्रीपद गमाविण्याची टांगती तलवार आहेच.या पार्श्‍वभूमीवर मलिक यांचा राजीनामा आघाडी सरकारद्वारे घेण्याऐवजी धनंजय मुंडे यांना परभणी जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा पदभार सुपूर्त केला.मलिक यांच्या कडील खातीही अन्यत्र वळवण्यात येणार आहेत असा अंदाज आहे.

Wednesday, March 16, 2022

एक भुकेला कुत्रा स्वतः च्या सावलीने पोळी ही मुकला ; अती हाव मातीतच जाव

एक भुकेला कुत्रा स्वतः च्या सावलीने पोळी ही मुकला ; अती हाव मातीतच जाव

सोनपेठ (दर्शन) :-

एकदा एका कुत्र्याला खूप भूक लागली होती. तो कुत्रा रस्त्याने काहीतरी खायला सापडेल या आशेने तो फिरत होता. तेव्हाच त्याला रस्त्यात एक पोळी सापडली.
त्याच्या मनामध्ये खूप आनंद झाला.आता तो ती पोळी खाऊ इच्छित होता. म्हणून त्याने काय केले,बघा सगळ्यांची नजर चुकवून आपल्या तोंडात पोळी दाबून धूम पळत सुटला.
आणि तेही नदीवर निघून गेला. पण काय घडले त्या नदीवर एक पूल होता. कुत्रा पूल पार करताना त्याने पाण्यात डोकावले.पुलावरून त्याला त्याची सावली दिसली. त्याला असे वाटले, हा कुत्रा कुठून आला. माझी पोळी तरी घेणार नाही.आणि त्या सावलीला तो पाहून दुसरा कुत्रा समजून त्याच्या तोंडातील पोळी हिसकावण्याचा विचार करू लागला.म्हणजे दोन पोळ्या होतील.
पाण्यातील कुत्र्याच्या तोंडातील पोळीचा तुकडा घेण्यासाठी त्याने आपले तोंड उघडले. यासाठी तोंड उघडताच तोंडातली पोळी पाण्यात पडली.अशाप्रकारे तो लोभी कुत्रा उपाशीच राहिला,अती हाव मातीतच जाव.

Saturday, March 12, 2022

जिजामाता पब्लिक स्कूल ज्यु.कॉलेज मध्ये दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

जिजामाता पब्लिक स्कूल ज्यु.कॉलेज मध्ये दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

सोनपेठ (दर्शन):-
जिजामाता पब्लिक स्कूल ज्यु.कॉलेज मध्ये दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.सोनपेठ येथील नामांकित जिजामाता पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आज दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला, याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य गणेश जयपाल,प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मा. प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, वर्गशिक्षिका सौ. अश्विनी चव्हाण, शेख सर , दिलीप कोलते, गांगर्डे सर, वृशाली  मुदगलकर, आळसे सर, तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे यांच्या हस्ते करण्यात आले.अश्वीनी  मॅडम यांनी प्रस्ताविक केले. नववी वर्गातील विद्यार्थिनी अंजली कदम, कल्याणी पोपळघट आणि शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्राप्ती दांबे व श्रद्धा सूर्यवंशी या विद्यार्थिनी जिजाऊ वंदनेचे घेतली.दहावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना कोरोना यासारख्या वाईट परिस्थिती मध्ये सुद्धा नाईट क्लास च्या माध्यमातून चार महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व शिक्षकांनी अतिशय परिश्रमाने परीक्षेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे , प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे यांनी सोनपेठ आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि गुणवत्तेसाठी शाळा सदैव कटिबद्ध असल्याचे मत प्रकट केले.अध्यक्षीय समारोप करताना शाळेचे प्राचार्य गणेश जयतपाल यांनी सर्व विद्यार्थ्यांना दहावी परीक्षा आणि जीवनातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर आभार प्रदर्शन नववी वर्गातील विद्यार्थी श्रीकांत कदम यांने मानले.

Friday, March 11, 2022

शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम 



परभणी / सोनपेठ (दर्शन): -
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.12 मार्च 2022 रोजी नांदेड येथून शासकीय विश्रामगृह परभणी येथे सकाळी 11.30 ते 2.45 वाजेपर्यंत आगमन व राखीव. दुपारी 2.45 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय परभणीकडे प्रयाण. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने अक्षदा मंगल कार्यालयाकडे प्रयाण, सायंकाळी 4.10 ते 6 वाजेपर्यंत व्हियतनाम येथील पंचधातूच्या 355 तथागत गौतम बुध्द मुर्ती वितरण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ : अक्षदा मंगल कार्यालय, परभणी), सायंकाळी 6 ते 6.30 वाजेपर्यंत परभणी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : बी.रघुनाथ सभागृह परभणी), सायंकाळी 6.30 ते 7.15 वाजेपर्यंत परभणी विधानसभा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व परभणी विधानसभा मतदार संघातील महिला बचत गटांना मोफत शिलाई मशिन वाटप कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : कल्याण मंडपम परभणी), सायंकाळी 7.15 वाजता कल्याण मंडपम येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथून मोटारीने रेल्वेस्थानकाकडे प्रयाण, रात्री 8.20 वाजता परभणी येथून देवगिरी एक्सप्रेस रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करतील.

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम 



परभणी / सोनपेठ (दर्शन): -
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.12 मार्च 2022 रोजी नांदेड येथून शासकीय विश्रामगृह परभणी येथे सकाळी 11.30 ते 2.45 वाजेपर्यंत आगमन व राखीव. दुपारी 2.45 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय परभणीकडे प्रयाण. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने अक्षदा मंगल कार्यालयाकडे प्रयाण, सायंकाळी 4.10 ते 6 वाजेपर्यंत व्हियतनाम येथील पंचधातूच्या 355 तथागत गौतम बुध्द मुर्ती वितरण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ : अक्षदा मंगल कार्यालय, परभणी), सायंकाळी 6 ते 6.30 वाजेपर्यंत परभणी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ : बी.रघुनाथ सभागृह परभणी), सायंकाळी 6.30 ते 7.15 वाजेपर्यंत परभणी विधानसभा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व परभणी विधानसभा मतदार संघातील महिला बचत गटांना मोफत शिलाई मशिन वाटप कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : कल्याण मंडपम परभणी), सायंकाळी 7.15 वाजता कल्याण मंडपम येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. रात्री 8 वाजता शासकीय विश्रामगृह परभणी येथून मोटारीने रेल्वेस्थानकाकडे प्रयाण, रात्री 8.20 वाजता परभणी येथून देवगिरी एक्सप्रेस रेल्वेने मुंबईकडे प्रयाण करतील.

Thursday, March 10, 2022

जिल्ह्यातील सात नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहिर ;आक्षेप, हरकती, सूचना असल्यास मुदतीत सादर करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील सात नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहिर ;आक्षेप, हरकती, सूचना असल्यास मुदतीत सादर करण्याचे आवाहन



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात माहे डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 मध्ये मुदत संपलेल्या गंगाखेड, जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ व पुर्णा 
 या नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम-2022 जाहिर करण्यात आला आहे. या नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील तर त्यांनी कारणासह, संबंधित नगरपरिषदांच्या मुख्याधिकारी यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात मंगळवार दि. 17 मार्च 2022 रोजीपर्यंत लेखी सादर करावे. मुदतीनंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.
  या कार्यक्रमानुसार या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आालेली संबंधित नगरपरिषदेची प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे  (महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 10 नुसार) रहिवाशांच्या माहितीसाठी संबंधित नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Wednesday, March 9, 2022

लाहोरकर दाम्पत्य PLI/RPLI यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबदल सन्मानित


लाहोरकर दाम्पत्य PLI/RPLI यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबदल सन्मानित
सोनपेठ (दर्शन):-

परभणी येथे मुख्य पोस्ट विभाग येथे दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमचे प्रमुख पाहुण्या शिक्षण अधिकारी आशा गरुड  यांच्या हस्ते श्री सोमेश्वर प्रल्हाद लाहोरकर व सौ.पुजा सोमेश्वर लाहोरकर दाम्पत्य यांना PLI/RPLI यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबदल सन्मानित करण्यात आले व पुढील कार्यस शुभेच्छा दिल्या.तसेच यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष विभाग सहाय्यक अधिक्षक खदीर सर , डाक विभागाचे सहाय्यक अधिक्षक कुलकर्णी सर , ईरशाद सर , लोहट मॅडम ,चव्हाण सर आदिनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Monday, March 7, 2022

महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार' राष्ट्रपतींच्या हस्ते आज होणार सन्मानित

महाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार'
राष्ट्रपतींच्या हस्ते आज होणार सन्मानित


नवी दिल्ली / मुंबई / परभणी /सोनपेठ (दर्शन):-

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणा-या एकूण 28 महिलांना ‘नारीशक्ती पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील तीन महिलांचा समावेश आहे. हे पुरस्कार वर्ष 2020 व 2021 साठीचे आहेत.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘नारीशक्ती पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये डाऊन सिंड्रोमप्रभावित सायली आगवणे, कथक नृत्यागणा, विनिता बोराडे या पहिल्या महिला सर्पमित्र यांना वर्ष 2020साठी तर वर्ष 2021साठी सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांना जाहीर झाला आहे. आज मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्यादिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काचे वितरण करण्यात येणार आहे.
कोव‍िड महासाथीमुळे वर्ष 2020 च्या पुरस्कारांचे वितरण होऊ शकले नाही. 8 मार्च, मंगळवारी रोजी वर्ष 2020 आणि 2021 च्या पुरस्कारांचे वितरण होणार आहेत. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री तसेच अन्य मंत्री वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.
या कार्यक्रमामध्ये एकूण 28 पुरस्कार (वर्ष 2020 आणि 2021 साठी प्रत्येकी 14) एक पुरस्कार संयुक्तपणे दोन महिलांना देण्यात येणार आहे. समाजातल्या असुरक्षित आणि उपेक्षित महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सेवा कार्य करणा-या महिलांच्या बहुमोल कार्याची घेतलेली दखल म्हणून 29 महिलांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची पोचपावती म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अनेक महिला समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात, या महिला समाजाला दिशादर्शक असे काम करतात. त्यांचा कार्याचा गौरव व्हावा म्हणुन त्यांना नारी शक्ती पुरस्काराने गौरविण्यात येते.
2020 च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांमध्ये उद्योजकता, कृषी, नवकल्पना उपक्रम, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, एसटीईएमएमआणि वन्यजीव संवर्धन अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. तसेच 2021च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्या महिलांमध्ये भाषाशास्त्र, उद्योजकता, कृषी, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, मर्चंट नेव्ही, एसटीईएमएम, शिक्षण आणि साहित्य, दिव्यांग अधिकारासाठी कार्य करणा-या महिला यांचा समावेश आहे.