मराठा सेवा संघ संचालित || जिजाऊ रथ यात्रा – मराठा जोडो अभियान || दिनांक १८ मार्च २०२५ ते १ मे २०२५
(भोसले गढी वेरूळ येथुन सुरवात तर लाल महाल पुणे येथे समारोप)
जिजाऊ रथयात्रा का व कशासाठी ?
मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथयात्रा - मराठा जोडो अभियान दिनांक 18 मार्च (शहाजीराजे जयंती) ते 1 मे (महाराष्ट्र दिन) या 45 दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रातून मार्गक्रमण करणार आहे.18 मार्चला सकाळी स्वराज्य संकल्पक शहाजीराजी भोसले यांचे जन्मस्थळ वेरूळ गढी येथून ही रथयात्रा निघणार असून 1 मे ला महाराष्ट्र दिनी लाल महाल पुणे येथे या रथयात्रेचा समारोप होणार आहे.मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री ॲड.पुरुषोत्तम खेडेकर या रथयात्रेला हिरवी झेंडी दाखवून रथयात्रेची सुरुवात करणार आहे.संभाजी ब्रिगेडचे महासचिव युवा नेतृत्व शिवश्री सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वात ही रथयात्रा निघणार असून मराठा सेवा संघ व 33 पक्षांचे प्रमुख पदाधिकारी त्यांच्या सोबतीला राहणार आहेत.काही पदाधिकारी पूर्णवेळ,काही अर्धवेळ तर काही आपापल्या सोयीनुसार त्या त्या भागात रथयात्रेत सहभागी होणार आहेत.मराठा सेवा संघाच्या नेतृत्वात जवळपास वीस वर्षानंतर जिजाऊ रथयात्रा निघत असल्यामुळे मराठा सेवा संघासोबतच समस्त पुरोगामी चळवळीमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.भारताच्या राष्ट्रगीता मधील पंजाब सिंध गुजरात *मराठा* या संकल्पनेनुसार महाराष्ट्रात राहणारा तो मराठा हे ब्रीदवाक्य घेऊन, जातीची बंधने तोडून आणि धर्माच्या भिंती गाडून समस्त बहुजन समाजाला एकरूप,एकजीव आणि एकसंघ करण्याच्या व्यापक हेतूने ही जिजाऊ रथयात्रा निघत आहे.
सध्या महाराष्ट्र आणि देशातील वातावरण जातीच्या आणि धर्माच्या नावाने विषारी आणि विखारी करण्याचे जोरदार कारस्थान सुरू आहे.माणसे एकमेकांपासून तोडली जात असून संत-महापुरुषांच्या पवित्र महाराष्ट्र भूमीला बदनाम करण्याचे षडयंत्र काही मंडळी करीत आहे.अशा या भीषण परिस्थितीत महाराष्ट्राची पूर्वीची ओळख निर्माण करण्यासाठी या 45 दिवसांमध्ये रथयात्रेच्या माध्यमातून परिवर्तनरुपी प्रबोधनाचा झंझावात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गुंजणार आहे.सध्यस्थितीत सामान्य माणसाचे जगण्यामरण्याचे प्रश्न अतिशय बिकट बनलेले आहे.परंतु त्याकडे दुर्लक्ष करून बिनकामाचे आगलाऊ मुद्दे दररोज जाणूनबुजून उकरून काढले जात आहे व लोकांचे लक्ष मुख्य प्रश्नांवरून दुसरीकडे डायव्हर्ट केले जात आहे.शेतीचे प्रश्न,बेरोजगारांची समस्या,महिलांवरील अत्याचार,विद्यार्थ्यांचे प्रश्न,प्रचंड वाढलेली गुंडगिरी व राजकीय पाठबळाने दिवसाढवळ्या होणाऱ्या भयानक हत्या या सर्व गोष्टी बाजूला ठेवून जाती-धर्माच्या अस्मिता टोकदार आणि नोकदार करण्याचे काम सध्या सुरू आहे.आमच्या संत महापुरुषांचा दररोज ठरवून अपमान केला जात आहे.रयतेचे राजे छत्रपती शिवरायांबद्दल अतिशय खालच्या भाषेत गरळ ओकली जात आहे.त्यामुळे समस्त शिवप्रेमी संतप्त आहे.
अशावेळी ही रथयात्रा महाराष्ट्रातील जनतेचे मूलभूत व मुख्य प्रश्न घेऊन महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून जनजागृती करत लोकांना त्यांच्या हक्क आणि अधिकाराची जाणीव करून देत मार्गक्रमण करणार आहे.शिवश्री सौरभ खेडेकर हे युवा नेतृत्व या रथयात्रेतून जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहे.त्यातून जनतेचे प्रश्न, समस्या,अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सरकारवर दबाव आणल्या जाणार आहे.त्यांच्या सोबतीला ज्येष्ठ आणि तरुण अशा नव्या-जुन्या कार्यकर्त्यांची फळी या रथयात्रेत सोबत असणार आहे. सोबतच जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सुद्धा प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येने या रथयात्रेत सहभागी होणार आहे. अनेक नामवंत वक्ते,विचारवंत आणि अभ्यासक या रथयात्रेत लोकांसमोर आपले मत मांडणार आहे.तसेच विविध पुरोगामी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते सुद्धा ठिकठिकाणी या रथयात्रेत आपला सहभाग नोंदविणार आहे.अनेक सामजिक संघटनांनी जाहीरपणे या रथयात्रेला आपला पाठिंबा दिला आहे.महाराष्ट्राच्या सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रात ही रथयात्रा निश्चितच एक मैलाचा दगड ठरणार आहे.समस्त पुरोगामी चळवळींसाठी येणाऱ्या काळात या रथयात्रेच्या माध्यमातून एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे.बहुजनवादी चळवळीत काम करणाऱ्या व महापुरुषांच्या वेळोवेळी होणाऱ्या अपमानाने व्यथित झालेल्या समस्त महाराष्ट्रप्रेमी जनतेने या ऐतिहासिक रथयात्रेत आपला सहभाग नोंदवावा ही नम्र अपेक्षा.
जय जिजाऊ-जय शिवराय-जय ज्योती-जय भीमराय
प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी
मराठा तितुका मेळवावा,
गुण – दोषांसह स्विकारावा..
मराठा सेवा संघ संचालित....
`|| जिजाऊ रथ यात्रा – मराठा जोडो अभियान ||
दिनांक १८ मार्च २०२५ ते १ मे २०२५
(भोसले गढी वेरूळ ते लाल महाल पुणे )
__________________________
No comments:
Post a Comment