Tuesday, February 25, 2025

भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रदिप पेशकार यांनी अतीख पटेल यांच्या घरी सदीच्छा भेट दिली

परभणी/सोनपेठ (दर्शन) :-
भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा केंद्रीय सुक्ष्म-लघु-मध्यम बोर्ड (उद्योग मंत्रालय)चे संचालक मा.प्रदिप पेशकार हे परभणी येथे आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाल्या नंतर त्यांनी आज भाजपा चे मा.जिल्हा सरचिटणीस अतीख पटेल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. प्रदिप पेशकार व अतीख पटेल यांचे  कौटुंबिक संबंध  आहेत, प्रदिप पेशकार यांचा सत्कार करून अतीख पटेल यांनी वक्फ बिल विधेयक तसेच मौ.आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, अल्पसंख्यांक आयोग संदर्भात अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा करून प्रदिप पेशकार यांना सखोल माहिती दिली, या वेळी मनपा सदस्य श्री. महेमुद खान श्री. एमडी ज़फरउल्लाह खान (FK), अब्दुल बारी, शहेबाज पटेल, मुजाहीद अन्सारी, सिराज चौधरी, गुलजार पठाण, नौशाद खान, शेख जावेद आदी उपस्थित होते.

Sunday, February 16, 2025

समाज माध्यमांमुळे व्यक्तीचे मानसिक आरोग्य धोक्यात - प्रा.रॅनिया लॅम्पाॅउ ग्रीक मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन & द डायरेक्टर ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी ग्रीक


सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालय सोनपेठ, संभाजीराव केंद्रे महाविद्यालय जळकोट जि.लातुर व महात्मा फुले महाविद्यालय किनगाव जिल्हा लातूर यांच्या सामंजस्य करारा अंतर्गत संयुक्त विद्यमाने समाजशास्त्र विभाग आयोजित समाज माध्यमांचा समाजावर होणारा परिणाम या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. मोबाईल हे आजच्या व्यक्तीला लागलेले एक व्यसन आहे. एक वेळेस शूज शिवाय  व्यक्ती बाहेर पडतील पण मोबाईल शिवाय व्यक्ती बाहेर पडणार नाहीत.मोबाईल हा व्यक्तीच्या स्टेटस चा एक भाग बनलेला आहे. कोणत्याही गोष्टीची आजची तरुण पिढी प्रायव्हसी ठेवत नाहीत.प्रत्येक गोष्ट स्टेटसला ठेवून समाजाच्या समोर आणली जाते आणि यामुळे सायबर गुन्हे वाढलेले आहेत.हे सांगत असताना त्यांनी सोशल मीडियामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि त्या चांगल्या गोष्टीवर सर्वांनी फोकस करणे आवश्यक आहे. मोबाईल मध्ये पूर्ण जग सामावलेले आहे. मोबाईल म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे. यावर भर न देता व्यक्ती एकलकोंडा होत चाललेला आहे. आपल्यासमोर अनेक व्यक्ती असताना तो इतर डिजिटल माध्यमांनी जोडलेल्या व्यक्तींशी जास्त बोलत असतो. यामुळे लाईक, शेर, कमेंट याकडेच त्याचे जास्त लक्ष आहे. आणि हे एक व्यसन बनलेले आहे. याचा व्यक्तीच्या मेंदूवर आणि मनावर परिणाम होतो. यामुळे झोप येत नाही, एकाच वेळी व्यक्ती अनेक कामे करतो त्यामुळे एका कामावर लक्ष केंद्रित होत नाही. त्यासाठी सोशल मीडियाचं फ्युचर काय असेल यावर सुद्धा त्यांनी चर्चा केली व विविध सोशल मीडियाच्या कंपनीने व सरकारनी यावर काम करून काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले. या चर्चासत्रासाठी लाभलेल्या विशेष मार्गदर्शिका प्राध्यापिका अर्पिता चटर्जी, बी.एड. कॉलेज कल्याणी, वेस्ट बेंगाॅल, यांनी सोशल मीडियाचे चांगले परिणाम आणि वाईट परिणाम समाजावर कशा पद्धतीने होत आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. समाज माध्यम हे चांगली माहिती देतात आणि चुकीची पण माहिती देतात याचा राजकारणावर मोठा परिणाम होत असतो. असे मत व्यक्त केले.  सोशल मीडियाचा वापर किती प्रमाणामध्ये करावा हे ठरवणे गरजेचे आहे. याचा वापर जर आपण मर्यादित केला तर याच्यासारखा चांगला मार्गदर्शक दुसरा नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. या चर्चासत्राच्या अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने संभाजीराव केंद्रे महाविद्यालय जळकोट जिल्हा लातूर, अध्यक्षीय समारोप करत असताना म्हणाले की, सोशल मीडियाने खूप मोठी क्रांती केली आहे. समाजामध्ये खूप चांगले बदल होत आहेत. परंतु त्याच बरोबर नकारात्मक बदल सुद्धा होत आहेत. प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर करत असताना जागृती, नीतिमत्ता व सदसद विवेक बुद्धीचे भान ठेवून वापर करावा.याप्रसंगी प्राचार्य  डॉ. वसंत सातपुते कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ  जिल्हा परभणी .प्राचार्य  डॉ.वसंत सातपुते यांनी आपले मत मांडताना असे म्हटले की समाज माध्यमांनी समाजातील व्यक्ती एकत्र आणल्या, संभाषण आणि व्यक्त होण्यासाठी संधी दिल्या असल्या तरी कुठेतरी आपल्या आयुष्यात अडथळे तयार केले आहेत. वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी, डोळ्यांचे आजार, लोप पावणारी माणुसकी या गोष्टी एका बाजूला पण आपल्या मेंदूला आणि मनाला या समाज माध्यमांमुळे जी कीड लागते आहे‌.आज ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही उक्ती खरी करताकरता ही समाज माध्यमे आपल्याला आपल्या बाजूच्या माणसाला विसरण्यास भाग पाडत आहेत. 
वास्तववादी जीवन जगण्याची एक प्रकारे गरज भारतीयांना असताना, समाज माध्यमांमुळे एक प्रकारे आभासी जीवन अनेक भारतीय आपलेसे करू लागले आहेत असे मत मांडले.तसेच प्राचार्य डॉ. बबन बोडके महात्मा फुले महाविद्यालय किनगाव जिल्हा लातूर यांनीही सोशल मीडियाच्या सकारात्मक व नकारात्मक परिणामावर चर्चा केली. व परिषदेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या प्रास्ताविक पर मनोगतांमध्ये प्रा. डॉ. अल्का सोमवंशी सोशल मीडियामुळे समाजाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान व्यक्तीला घरी बसून होत आहे. यातूनच जगामध्ये खूप मोठी क्रांती झालेली आहे. आज सोशल मीडियाचे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. फेसबुक, युट्युब, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट , टीकटाॅक , टेलिग्राम इत्यादीच्या माध्यमातून जग जोडलेले आहे. आजची तरुण पिढी सोशल मीडियावर व्यस्त आहे. आपला टाईम, टॅलेंट वेस्ट करत आहेत. हे भारतासह पूर्ण जगाला परवडणारे नाही असे मत मांडले डॉ. सुनिता टेंगसे  यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय दिला.  सदरील चर्चासत्रामध्ये जगामधील विविध देशातून 600 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. झुम  व  युट्युब लाईव्ह या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सदरील चर्चा सत्र पार पडले. यामध्ये श्रीलंका, नेपाळ, चीन, जपान, कोरिया ,युक्रेन ,ग्रीस,रशीया इत्यादी देशाबरोबरच भारतातील वेस्ट बेंगॉल, आसाम ,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू इत्यादी राज्यातील व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता. सदरील चर्चासत्रात विविध सहभागिनी पेपर वाचन केले. यामध्ये मंजुला आर -बेंगलोर विद्यापीठ, श्रेया सील- कलकत्ता वेस्ट बेंगाॅल, डॉ. अनुजा जैन- जबलपूर मध्य प्रदेश, डॉ. विनोद कुमार -मंडी हिमाचल प्रदेश, अनुराधा पाटील- अंबाजोगाई, महाराष्ट्र महानंदा राऊत खेडकर- नांदेड, डॉ.कालिदास भांगे -छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र यांनी प्रतिनिधिक स्वरूपात विविध विषयावर पेपर वाचन केले.  या चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा देशपांडे,  व  डॉ.एन. पी. कुडकेकर यांनी केले  तर आभार डॉ.अल्का सोमवंशी यांनी मानले. या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ. अल्का सोमवंशी डॉ. सुनिता टेंगसे, डॉ. बळीराम पवार,डॉ. शरद सुरनर,  प्रा. नप्ते  एस. यु, डॉ. मनीषा देशपांडे, डॉ. एन. पी. कुडकेकर, डॉ देवराये यांनी परिश्रम घेतले

Monday, February 10, 2025

जिल्हा परिषद आदर्श शिक्षिका ज्योत्स्ना पारलिंग मानुरकर (स्वामी) सेवानिवृत्ती समारंभ संपन्न

(सौ.ज्योत्स्ना पारलिंग मानुरकर (स्वामी) साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी ग्रंथ भेट देताना) 
सोनपेठ (दर्शन) :- परळी तालुक्यातील उपक्रमशील आणि जिल्हा परिषद आदर्श शिक्षिका ज्योत्स्ना पारलिंग मानुरकर (स्वामी) या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दादाहरी वडगाव येथून 38 वर्षांच्या अतुलनीय शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित भव्य सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
ज्योत्सना स्वामी यांनी शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. इंग्रजी अध्यापनातील त्यांचा दांडगा अनुभव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मोलाचा ठरला. शिक्षण हेच पूज्य मानून त्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. धर्मापुरी, सायगाव, कन्या शाळा परळी, वागबेट, टोकवाडी तसेच दादाहरी वडगाव या शाळांमध्ये त्यांनी आपल्या अध्यापन कौशल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले.
सेवा, संस्कार आणि शैक्षणिक वारसा
कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरूवर्य दत्ताप्पा इटके गुरुजी यांनी स्वामी मॅडम यांच्या कार्याचा गौरव करताना “त्यांच्या कुटुंबाचा तीन पिढ्यांपासूनचा शैक्षणिक वारसा आजही अविरत सुरू आहे”असे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेली विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.
स्वामी मॅडमच्या मार्गदर्शनामुळेच मी न्यायाधीश – मनिषा साखरे
या प्रसंगी नांदेडच्या न्यायाधीश आणि स्वामी मॅडम यांच्या माजी विद्यार्थिनी मनिषा साखरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना “स्वामी मॅडम यांच्या शिकवणीमुळेच आज मी न्यायाधीश झाले” असे सांगितले. कार्यक्रमास टी.आर. देशमुख सर, रंगनाथ खके, माजी गटशिक्षणाधिकारी आणि जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अन्सारी मॅडम, केंद्रप्रमुख पल्लेवाड यादव सर आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, नातेवाईक तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे स्वागत इंजी.रामलिंग मानूरकर आणि सौ.प्रांजल मानूरकर यांनी केले. स्वामी मॅडम यांचे शैक्षणिक योगदान सदैव प्रेरणादायी ठरेल.

Friday, February 7, 2025

कै.रमेश वरपुडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनपेठ माजी विद्यार्थी पालक स्नेह भेटीचे आयोजन

सोनपेठ (दर्शन) :-  हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ सोनपेठ संचलित कै.र.व.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनपेठ येथे शैक्षणिक वर्ष 2024 - 25 यावर्षी आपल्या महाविद्यालयात नॅक पुनर्मूल्यांकनास सामोरे जात आहे या निमित्याने नॅकचे परीक्षक आपल्या महाविद्यालया दिनांक 17 व दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी प्रत्यक्ष येऊन पाहणी करणार आहेत, दिनांक 17 फेब्रुवारी 2025 सोमवार रोजी माजी विद्यार्थी आणि पालक यांची बैठक आयोजित केली आहे, या भेटीत आपल्याला या महाविद्यालयातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी व त्या अनुषंगाने आपण केलेली वाटचाल याची मांडणी करून महाविद्यालयाचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सूचना कराल ही अपेक्षा तरी सर्व माजी विद्यार्थी व पालक आपण नविसरता दिनांक 17 फेब्रुवारी 2025 सोमवार रोजी ठीक दुपारी 12:30 वाजता उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ द्यावा अशी विनंती प्राचार्य डॉ.वसंत सातपुते व सर्व प्राध्यापक मंडळी आणि माजी विद्यार्थी समन्वय समिती तसेच कै.र.व.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय माजी विद्यार्थी प्रतिष्ठान सोनपेठ आदींनी केली आहे.

सोनपेठ ह.शि.प्र.मंडळास मानाचा तुरा ; डाॅ.शिवाजी वडचकर यांची "करिअर कट्टा" उपक्रम परभणी जिल्हा समन्वयक म्हणुन निवड

सोनपेठ (दर्शन) :- 
सोनपेठ शहरातील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळास मानाचा तुरा कै.र.व.महाविद्यालय सोनपेठ जि.परभणी येथे हिन्दी विभागात कार्यरत असलेले व स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हिन्दी अभ्यास मंडळ सदस्य प्रा.डाॅ.शिवाजी वडचकर यांची  महाराष्ट्र राज्य उच्च व तंञ शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंञज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने "करिअर कट्टा" या उपक्रमांतर्गत परभणी जिल्हा समन्वयक पदी 2025-30 पाच वर्षा करीता निवड करण्यात आली आहे.परभणी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना रोजगारांच्या , व्यवसायाच्या आणि नोकरीच्या संधी पासून वंचित राहू नयेत, यासाठी चाललेला हा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी हा उपक्रम शासन राबवत आहे.यासाठी परभणी जिल्हा समन्वयक म्हणुन प्रा.डाॅ. शिवाजी वडचकर यांचे संस्था अध्यक्ष मा.श्री.परमेश्वर कदम, प्राचार्य वसंत सातपुते, अंर्तगत गुणवता चेअरमन डाॅ.मुकुंदराज पाटिल, डाॅ.मारोती कच्छवे, डाॅ.वनिता कुलकर्णी यांनी अभिनदंन केले.या निवडीबद्यल सर्व स्तरामधुन त्याचे अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त होताना दिसत आहे.

Monday, February 3, 2025

|| अखंड तेवणारा स्नेहदीप : संत मन्मथ स्वामी ||

 महाराष्ट्रातील वीरशैव -लिंगायत संप्रदायातील पारमार्थिकदृष्ट्या सर्वोच्च आदरस्थानी  असलेले आणि परमार्थाला वाङ्मयाची जोड देऊन मराठी 
भक्तीसाहित्याला सखोल बनविणारे  वीरशैव मराठी वाङ्मयकार  म्हणून संत मन्मथ स्वामींचा आदराने उल्लेख करावा लागतो. 🌷मराठी वीरशैवांच्या दृष्टीने त्यांचे स्थान माऊली चे आहे. 🌷
            अर्थात ही माऊली राजघराण्यातील. कडक शिस्तीची, काटेकोर वर्तनाबद्दल जागरूक असणारी आणि फटकळ लेखणीची परंतु समाजाला वळण लावण्यासाठी डोळ्यात तेल घालून राखण करणारी आहे . 
     मन्मथ माऊलीच्या उक्ति- कृतीमागे 
  " जे दुष्ट दुर्जन अमंगळ | त्यांची हृदये होओत निर्मळ "
  ही अंतरीची तळमळ आहे.
 मन:परिवर्तन झालेल्या लोकांना
   "जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे "
  याचा प्रत्यय यावा आणि समाजातल्या लहानातल्या लहान घटकापर्यंत ...
"सर्व सुखांचा हो सुकाळ | दुःख दारिद्र्य छळ | "
   अशी अवस्था यावी.संपत्ती, सुख तर सर्वांनाच मिळावे परंतु महत्त्वाचे म्हणजे 🪷समाजातील घटकांमध्ये एकात्मता निर्माण व्हावी .मतभेद असतीलही .परंतु  "नष्ट होवो सकळ | मनोमालिन्य ही ||" - 
अर्थात मनभेद नष्ट होऊन एकात्म, एकरस आणि समरस समाज निर्माण व्हावा.' असे मन्मथ माऊलींना ठामपणे वाटते.कारण
   🚩 समरससमाज , एकात्म समाज हीच राष्ट्रीय सुखाची  शाश्वत संपत्ती आहे  . 🚩
   हेच  *प्रसादान*  मन्मथ स्वामी जगदाधारा असलेल्या 
जगन्निर्मात्या महेश्वराकडे -भगवान शिवांकडे मागतात. .
  जोडीलाच 🌷स्वधर्माचा जागर आणि समन्वयशीलतेचा ध्यास हे मन्मथ माऊलींच्या व्यक्तित्वाचे, कार्याचे मर्मस्थळ आहे. 🌷
   परंतु त्यांच्या लेखनाचा -ग्रंथवाङ्मय आणि अभंगवाणी - यांचा केवळ सांप्रदायिक  व  विवक्षित दृष्टीने विचार झाल्यामुळे संत मन्मथ स्वामींचे कार्य नेमकेपणाने पुढील पिढीपर्यंत पोहोचले आहे, असे म्हणणे अवघड आहे.
   श्रीपरमरहस्य हा मन्मथ माऊलींचा ग्रंथ म्हणजे त्यांची वाङ्मयीन मूर्ती. वीरशैव -लिंगायतांची श्रीमद्भगवद्गीताच. भगवद्गीते इतकेच महाराष्ट्रीय विचार प्रवाहाला वेगळे वळण देणारा आणि  वीरशैव तत्त्वज्ञानाला सुबोधपणे समाजापुढे मांडणारा हा ग्रंथ ; वीरशैव - लिंगायत सांप्रदायिक आचार- विचारांचे दिग्दर्शन करणारा देखील आहे आणि त्याच वेळी स्वधर्माचा व्यापक परिप्रेक्ष्य स्पष्ट करणारा देखील आहे.
"अधर्माची शीग निमें सहजे |तोंचि धर्म ओ देवी ||(
श्रीपरमरहस्य १.५१)
ही त्यांची धर्माची व्याख्या विशिष्ट संप्रदायापुरती निगडित आहे असे कोण म्हणेल ?
" स्वधर्माचे करावे मंडन | परधर्माचे होय खंडन |
अशी दृढ शास्त्रांतून | वाक्ये शोधून पाहावी|| (श्रीपरमरहस्य,८.
१२६) हे त्यांचे सांगणे कोणत्या स्वधर्मप्रेमी व्यक्तीला आवडणार नाही ?
व्यक्तीने नुसते सज्जन असून चालणार नाही त्याच्या सज्जनशीलतेला क्रियाशीलतेची  जोड असावी लागते , म्हणूनच 
" तरी क्रियेविण जे पुण्य | ते सुकृताशी  होय उणें ||
 म्हणौनि न टाकिजें सज्जने |  क्रियाचाराशी ||"(श्रीपरमरहस्य३.५१) हे अध्यात्म आणि समाजकार्य यांची सांगड घालणाऱ्या कुठल्याही सुबुद्ध व्यक्तीला पटणारच ना ?
  विश्वनिर्मिती मागील *परमरहस्य*, वीरशैव तत्त्वज्ञान आणि वीरशैवाचार हा केंद्रबिंदू असलेला 
श्रीपरमरहस्य ज्ञानदेवांच्या शैलीने रंगलेला दिसतो.
  *अनुभवानंद* हा त्यांचा ग्रंथ गुरु - शिष्य संवादाच्या माध्यमातून भारतीय मनाचे दर्शन घडवितो. ब्रह्म म्हणजे काय हा पारंपरिक प्रश्न न विचारता अनुभवानंदातील शिष्य आपल्या गुरूंना 
"मी जीव की शिव आहे | की उभयातीत माझी मी नेणे सोये | म्हणौनि माझा मज दावा निश्चय | जे मी कोण ऐसे ||(अनुभवानंद ५) असा प्रश्न विचारत *मी* चा शोध घेताना दिसतो. देह पडताना  ब्रह्म भावना असल्यास जीवाला ब्रह्मस्वरूप प्राप्त होते, हे गीतेचे सूत्र असले तरी हे कर्म कसे असावे याचे दिग्दर्शन मात्र मन्मथ माऊली करतात. त्यांच्या मते, "हे  कर्म  लोकसंग्रहाकारणे असले पाहिजेत यातून लोकसंस्थेचा उत्कर्ष झाला पाहिजे ' . अर्थातच हा उत्कर्ष परोपकारात ,  सत्कर्मात आणि जनकल्याणात सामावलेला आहे. म्हणूनच, गुरुदक्षिणा देण्यासाठी उत्सुक असलेल्या शिष्याकडे ते ,
"सर्व जीवातें दया करिशी | 
दुःख हरोनी सुखातें देशी|
 संतसेवे जीवा कुरवंडी करीशी | 
तेचि उतराई 
शिष्यराया || "(अनु.२२२) अशी अपूर्व  गुरुदक्षिणा मागताना दिसतात.
  अशी निरपेक्ष गुरुदक्षिणा मागणारे गुरु कोणत्याही काळात आणि कोणत्याही समाजाच्या शीर्षस्थानीच असतील; हो ना?
  *स्वयंप्रकाश* हा मन्मथ  माऊलींचा अत्यंत महत्त्वाचा परंतु अलक्षित असा ग्रंथ आहे. माऊलींचे समकालीन संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीचे एका अर्थाने पुनरुज्जीवन केले. तर दुसरीकडे संत एकनाथांचे समकालीन मन्मथ माऊलींनी मराठीच्या 
आद्यग्रंथाला - विवेकसिंधूला- सुबोध रूप देऊन सर्वसामान्यांच्या आटोक्यात या ग्रंथातील विचार आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. विवेकसिंधू वरील मराठीतील पहिला टीकाग्रंथ म्हणून एकूण मराठी वाङ्मयात स्वयंप्रकाश हा ग्रंथ महत्त्वाचा ठरतो.
" एक  आत्मा सर्वांभूती वसे |त्याचे रूप कैसे असे "या साधक शिष्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना 
स्थूलदेहनिरसन ,
त्वंपद ,तत्पदादींचे तात्विक स्पष्टीकरण करीत असताना आणि देहाबद्दल उदासीन राहून कर्म कसे करावे हे सांगताना मन्मथ माऊली,
"आपण निराश कर्माची चाड नाही | परि लोकसंग्रहालागी 
कीजे काही |
 लोकसंग्रहमेवपि ऐसे गोविंदही |
गीतेमाजी बोलिला असे "||( 
स्वयंप्रकाशी ६.९३) असा श्रीमद् भगवद्गीतेचा दाखला देत व्यापक अशा भारतीय तत्त्वज्ञानाशी असलेले आपले अंतरंग नाते स्पष्ट करतात.
  *ज्ञानबोध* मन्मथ माऊलींच्या ग्रंथाचा मूळ उद्देश जीवाचा अर्थात *अंगा*चा लिंगाकडे म्हणजेच शिवतत्त्वाकडे होणारा प्रवास स्पष्ट करणे आहे. मात्र तो स्पष्ट करताना वीरशैवतत्व परंपरेतील *षटस्थल*या पारिभाषिक संज्ञांचा वापर करताना दिसत नाही.कारण विशिष्ट पारिभाषिक संज्ञा पेक्षा देखील 'भक्त'स्थलाकडून 'ऐक्य' स्थलाकडे जीवाची वाटचाल होत असताना त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते आणि म्हणूनच ऐक्य स्थलाकडे जाणारा शिवयोगी 
" जीवातळी जीव  अंथरी | दुःखीतिया सुखी करी | सुखिया देखोनी सुखावे अंतरी ||"(ज्ञानबोध ३३) अशा उच्चतम अवस्थेला पोहोचतो. 
  थोडक्यात , मध्ययुगीन मराठी समीक्षकांनी दुर्लक्षित केलेले आणि वीरशैव मराठी अभ्यासकांनी , सांप्रदायिकांनी संप्रदायाच्या कक्षेत , भजन- पूजनाच्या उपचारांमध्ये सीमित केलेले संत शिरोमणी 
श्रीमन्मथ माऊली हे मध्ययुगातील असा स्नेहदीप आहेत की ज्यांनी कर्मकांडांच्या विळख्यात, जन्मगत 
वर्णश्रेष्ठत्वाच्या किंवा जातीभेदाच्या अमानुष कालखंडात आणि भारतीय संस्कृतीचा उच्छेद करण्यासाठी सिद्ध झालेल्या इस्लामच्या  आक्रमणाच्या 
रेट्यामध्ये  सांप्रदायिक आचार विचारांचे अधोरेखन करीत असतानाच व्यापक आणि शाश्वत अशा
मानवता धर्माचा जागर केला. सर्व तऱ्हेच्या विषमतेवर मात करीत आपल्या स्नेहपूर्ण *प्रसादा*ने सभोवतालचा अंधःकार दूर करण्याचा प्रयत्न केला आणि  सर्व जातींच्या शिष्यांनाआईच्या मायेने  आपलेसे केले. हे प्रेम, हा स्नेह वृद्धिंगत होणाऱ्या माघ मासातील
वसंत पंचमीच्या रंगाला अधिक प्रकाशमान करणारा आहे. 
  स्नेहदीपाच्या या प्रेमप्रकाशात वाटचाल करण्याचे प्रेरणा तुम्हाला मला होवो ; हीच  परमगुरु मन्मथ माऊलींकडे विनम्र प्रार्थना🙏🙏
   मन्मथ माऊलींचे मी एकेकाळी रेखाटलेले रेखाचित्र
  © डॉ श्यामा घोणसे, संत नामदेव अध्यासन प्रमुख व प्राध्यापक,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
Shyama Ghonse