Monday, September 30, 2024

व्यसन मुक्त गाव ; तंटामुक्त गांव समिती तंटे सोडवण्याबरोबरच, अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी पोलीसांना मदत करतीलपोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांची संकल्पनापरभणी/सोनपेठ (दर्शन) :-

व्यसन मुक्त गाव ; तंटामुक्त गांव समिती तंटे सोडवण्याबरोबरच, अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी पोलीसांना मदत करतील
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांची संकल्पना
परभणी/सोनपेठ (दर्शन) :- 

नांदेड परिक्षेत्रात पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतून ‘व्यसनमुक्त गाव मोहीम’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून गावातील तरुणांना व्यसनांच्या विळख्यातून वाचविण्याचा उद्देश आहे. या योजनेत चार जिल्हे –नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोलीतील ग्रामपंचायतींमध्ये २ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा घेऊन तंटामुक्त गांव समिती गठीत केली जाणार आहे.
या समित्या गावांतील तंटे सोडवण्याबरोबरच, अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी पोलीसांना मदत करतील. या मोहिमेच्या अंतर्गत, गावात २५ ते ५० होतकरू तरुणांचा समावेश असलेल्या ग्रामरक्षक दल तयार केले जाणार आहे, ज्यामुळे व्यसनमुक्ती आणि अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. महिलांसाठीही ‘दुर्गा व्यसनमुक्त गांव समिती’ स्थापन करण्यात येईल, ज्याद्वारे गावातील महिलांचा सहभाग वाढेल.
पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके गठीत करून अवैध व्यवसायांवर धाड सत्रांचे आयोजन सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी निर्भीडपणे अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Sunday, September 29, 2024

आज जागतिक हार्ट दिन आहे, त्या निमित्ताने - डॉक्टर अजय सुमन मारुती भोसेकर सोनपेठ (दर्शन) :-

आज जागतिक हार्ट दिन आहे, त्या निमित्ताने - डॉक्टर अजय सुमन मारुती भोसेकर
सोनपेठ (दर्शन) :- 
खरंतर हार्ट च काम रक्त पंप करण्याचा आहे.
आपण जो श्वास घेतो त्यातील ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळवून लंग्ज, शुद्ध रक्त 
हृदयाकडे पाठवतात.
हृदय ते शुद्ध रक्त संपूर्ण शरीराच्या कानाकोपऱ्यात पसरवते.
आपण उभे असतानाही मेंदूमध्ये आणि खाली पायापर्यंत रक्त पोहोचवण्याचं काम हृदय करतं.
या हृदयाला पण रक्तवाहिन्या असतात.
या रक्तवाहिन्या हृदयाला रक्तपुरवठा करण्याचे काम करतात.
त्यांना कोरोनरी आर्टेरीज असं म्हणतात.
आज-काल हृदयरोगामुळे खूप कमी वयात सुद्धा आजारी असलेले लोक आपल्याजवळचे नातेवाईक परिचित दिसून येत आहेत.
अँजिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी,
बायपास सर्जरी ही नावे आता सर्वसामान्य लोकांना पण माहिती झाली आहेत. 
यांना नक्की काय होतंय,तर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनाेरी आर्टेरीज मध्ये ब्लॉक/गुठळी झालेले असतात.
ब्लॉक झाल्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे ऑक्सिजनेटेड रक्त त्या भागाला मिळत नाही.
परिणामी तो भाग मृतवत होत जातो.

*लक्षणे काय असतात ?*
रुग्णांना याची तीव्र लक्षणे दिसून येतात जसं की छातीमध्ये तीव्र दुखणं, घाम येणे, उलटी होणं, संडास कळं येणं, डाव्या हाताला दुखणं, डाव्या पाठीत दुखणं, चक्कर येणे, मुंग्या येणे.काही रुग्णांना चालताना दम लागणे,जिने चढताना दम लागणे असा होऊ शकतो.
याशिवाय काही रुग्णांना जर मधुमेह डायबिटीस रक्तदाब असेल तर अशी कोणतीही लक्षणं न येता तो रुग्ण चक्कर येऊन पडतो.



*निदान*
अशावेळी ईसीजी तपासणी निदान करण्यासाठी उपयोगी पडते.
इसीजी म्हणजे हृदयाचा इलेक्ट्रो कार्डिओग्राम.
याशिवाय अँजिओग्राफी म्हणजे रक्तवाहिनी मध्ये डाय मिसळवून
तो डायाहिनी मध्ये कुठपर्यंत शेवटपर्यंत पोहोचला जातोय याची तपासणी.
याशिवाय काही कार्डियाक एंजाइम्स ज्या हृदयविकारांमध्ये वाढलेले असतात जसं की ट्रोपोनीन आय सीकेएमबी.

*तर मग हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना गुठळी किंवा ब्लॉक का होतात ?*

याची बरीच कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे आपण जे अन्न खातो आपलं अन्नामध्येच जर भेसळयुक्त तेल असेल जास्त चरबीयुक्त खान असेल तर याचा परिणाम रक्तवाहिनीमध्ये  आतील भागांमध्ये चरबीचा थर साचून 
रक्तपुरवठा हळूहळू कमी कमी व्हायला लागतो.
आता हृदयविकाराची कारणे काय आहेत मघाशी सांगितल्याप्रमाणे आपण जे अन्न खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो
  तेल- जास्तीत जास्त तळलेले पदार्थ असतील आणि ते तेल पाम तेल किंवा ट्रिपल रिफायईनड तेल असेल तर 
याचा परिणाम हृदयातील रक्तवाहिन्यामध्ये चरबीचा थर साचण्यामध्ये होतो.
साठवलेले अन्न, फ्रिज मधील अन्न, शिळे अन्न, बेकरी पदार्थ, 
पॅक फुड, प्रिझर्वड फुड, हे हृदयासाठी घातक आहे.
याशिवाय मैदा युक्त जास्त साखर युक्त,जंक फूड, फास्ट फूड, चायनीज हे सुद्धा घातक आहे.
याशिवाय पार्सल मागवताना गरम अन्न पॅक करताना वापरले जाणारे प्लॅस्टिक किंवा अल्युमिनियम फॉईल हे जेवढे जास्त वेळ अन्न व पॅकचा संबंध राहील त्या प्रमाणात अल्युमिनियम किंवा प्लास्टिक अन्नात मिसळून घातक बनते.
चहासाठी वापरले जाणारे प्लास्टिक कप हे 
हे सुद्धा घातकच आहे.
सध्याच्या सर्व शेतातील पिकांवर कीटकनाशके यांचा फवारा मारलेला असतो.
याचा सुद्धा परिणाम आपल्या शरीरावर होतो.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपणअन्न खाताना कोणत्या भावनेने खातो.
आपण अन्न खाताना जर द्वेष, राग, चिंता, भिती, ताण भावनेने खात असू तर त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतात व याचा परिणाम शरीरावर होतो.
जर आपण खाताना चांगल्या भावनेने प्रेम आदर मैत्री बंधुभाव आनंद सुख समाधान
या चांगल्या भावनांसोबत ज्यांनी अन्न बनवले त्यांच्या प्रती आभार, धन्यवाद, अशा चांगल्या भावना ठेवून जेवणं केले तर ते अन्न चांगल्या प्रकारे पचते व आपल्या शरीरामध्ये चांगले हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे आपल्या शरीरातील सर्व अवयव चांगले काम करतात.
आपण प्रत्येक घास हळूहळू जास्त चावून खाल्ला तर, त्या प्रमाणात आपल्या लाळे मध्ये एन्झाईम्स तयार होऊन आपले अन्न चांगल्या प्रकारे पचवले जाते.
आपण अन्न खाताना जशी भूक लागली तेव्हा व थोडे कमी खाल्ले तर याचा परिणाम आपले वजन नियंत्रित राहण्यास व स्थूलपणा कमी होण्यास होतो.
शेवटी आपण काय खातो, कसे खातो याचा बरा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.
याशिवाय आपल शरीर 
हे अद्भुत आहे.
कारण या शरीरामध्ये करोडो पेशी रोज नवीन तयार होत असतात.
जुन्या पेशी मरत असतात, आपल्या शरीरामध्ये असंख्य विभाग, आपण झोपलो तरी अविरतपणे आपल्यासाठी काम करत असतात.
हे आपले शरीर निसर्गाची अमूल्य देणगी आहे.
 या शरीराला कधी आपण थँक्यू म्हणतोय का ? 
या अविरत कामाबद्दल आपण आपल्या शरीराचे आभार मानलेत का ?

म्हणून आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे.
रोज सकाळी उठल्या उठल्या आपण आपल्या शरीराला थँक्यू म्हटलं पाहिजे. 
आपल्या शरीरातील सर्व अवयवांचे आभार मानले पाहिजेत.
दररोज आपल्या शरीरासाठी 40 मिनिटे ते एक तास राखून ठेवला पाहिजे.
यामध्ये आपल्याला आपण जे शक्य असेल ते व्यायाम केले पाहिजेत.
चालणे, पळणे, पोहणे, झुंबा डान्स, गार्डनिंग, स्ट्रेचिंग 
असे जे आपल्याला आवडतात सुटेबल आहेत ते कुठलेही व्यायाम आपण करू शकता.

*ताण तणावाचा विपरित परिणाम ह्रदयावर होऊ शकतो का ??*

 सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपले मन आहे.
मन म्हणजे काय ?
आपले विचार, आपल्या भावना, आपल्या समजूती यासंबंधी मेंदूचे जे कार्य आहे तेच मन आहे.
सर्व विचार मनामध्ये तयार होतात.
सर्व समजूती मनामध्ये तयार होतात.
आपल्या सर्व महापुरुषांनी, संतांनी मनाच्या साधनेवर जोर द्यायला सांगितलेला आहे.
विपश्यना मेडिटेशन यामध्ये सुद्धा मनात काय चाललंय ते समजून सकारात्मक प्रेरणादायक विचार करण्यावर भर दिला आहे.
आपलं मन हे जमिनी सारखं आहे.
जमिनीमध्ये जे पेराल त्याप्रमाणे उगवते.
जर आपण आंब्याचे झाड लावले तर, आपल्याला आंबा खायला मिळेल.
आपण कारल्याचे रोप लावले तर आपल्याला कारलं खायला मिळेल.
त्याच पद्धतीप्रमाणे मनामध्ये रोज चांगले सकारात्मक प्रेरणादायक विचार रुजवले तर आपल्याला सकारात्मक चांगले परिणाम मिळतील.
त्या ऐवजी जर आपण राग, द्वेष, चिंता, भीती, तणाव, निराशा, घृणा, मत्सर, इर्षा
यासारखे नकारात्मक विचार मनामध्ये रुजवले तर आपल्याला सर्व जग नकारात्मकच दिसेल.
यामुळे पूर्वाश्रमीच्या ह्रदय विकार असलेल्या व ताण तणाव व नकारात्मक व निगेटिव्ह भावना साठवून ठेवलेल्या लोकांना या निगेटिव्ह इमोशन्स मुळे कोरोनरी आर्टेरीज स्पाझममुळे म्हणजे रक्तवाहिनी आकुंचित होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो.

*उपाय काय आहे*
आहार 
व्यायाम
आणि
मनाचे व्यायाम

लक्षात ठेवा आपले जीवन खूप मौल्यवान आहे.
तसेच हे जीवन निरंतर परिवर्तनशील आहे.
या जीवनामध्ये कधी काय होईल काहीच सांगता येत नाही.
म्हणून प्रत्येक दिवशी आपल्या आयुष्यामध्ये काय काय चांगले झाले आहे, त्याबद्दल आपण निसर्गाचे आभार माना.
आपल्या शरीराचे आभार माना. आपले माता-पिता गुरुजन आपल्या शरीराचे आभार माना. आपले माता, पिता, गुरुजन, मित्र, सहकारी, परिचित, नातेवाईक ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सर्वांचे आभार माना.
ज्यांनी आपल्याला वाईट वागणूक दिली व त्यामुळे आपल्याला एक जीवनाचा नवीन धडा मिळाला त्या अनुभवाबद्दल त्यांचेही आभार माना.
आपल्या मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार निगेटिव्ह इमोशन्स ठेवू नका.
मनाची स्वच्छता करा.
नेहमी चांगले विचार, चांगल्या भावना, चांगले कार्य व चांगले वागणे ठेवा.
जुन्या दुःखद आठवणी त्रास देतात किंवा याचा आपण स्वतःहून आपल्याला त्रास करून घेतोय. 
भूतकाळाबद्दल पश्चाताप व भविष्यकाळाची चिंता वर्तमानकाळ नासवतात.
काही गोष्टी आपल्या हातात नसतात, लोकांचे वागणे, वातावरण हे आपल्या हातात नाही.
आपल्या हातात काय आहे याचा विचार करा.
आपल्या भावना, आपले विचार, आपल्या प्रतिक्रिया, आपला रिस्पॉन्स आपल्याच हातात आहे.
परिस्थितीचा स्वीकार केल्याने बरीच चिंता कमी होते.
त्यामुळे प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद द्यायला शिका.
विचार बदला, कामात स्वतःला गुंतवा, व स्वतःचा त्रास कमी करा.
आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टीबद्दल अपराध भाव असतो.
आपण स्वतःला लायक समजत नाही किंवा कमी समजतो.
किंवा आपल्याला अशी भावना असते की मित्र मला प्रेम करत नाहीत,
 नातेवाईक मला समजून घेत नाहीत.
म्हणजे आपल्यामध्ये नाकारलेपणाची भावना असते.
या सर्व नकारात्मक भावना जसे की 
मला सर्व त्रास देतात,
 मला कोणी विचारत नाही,
 मी कोणाला आवडत नाही,
 मी कम नशिबी आहे,
 मला काहीच चांगलं करता येत नाही,
माझी तेवढी लायकी नाही,
आई/वडील माझा लाड करत नाही,
बायको/नवरा मला वेळ देत नाही, 
बहिणी/भाऊ मला नावे ठेवतात,
मला कोणी प्रेम करत नाही, मला नेहमी सर्वजण दोष देतात,
सर्वजण माझ्यावर टीका करतात,
मला नेहमी राग येतो,
मला परिस्थिती हाताळता येत नाही,
 माझ्यासाठी कुणाला वेळ नाही,
माझ्या इच्छेची कुणाला पर्वा नाही
यासारख्या असंख्य नकारात्मक भावना आपण आपल्या मनामध्ये ठेवतो.
याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.
यामुळे सर्व निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतात.
म्हणून या सर्व नकारात्मक भावना काढून टाका.
स्वतःला माफ करा,
स्वतःचा स्वीकार करा, स्वतःमध्ये बदल करा,
इतरांना पण माफ करा,
तक्रारी बंद करा आणि स्वतःमध्ये बदल घडवा.
आपल्या विचारांमध्ये बदल घडवा.
एखादा विचार चुकीची समजूत तुमच्या कामाची नसेल तर टाकून द्या.
न्यूनगंड फेकून द्या.
कौतुकाची अपेक्षा करू नका.
स्वतःसाठी वेळ द्या
रोज पाच मिनिटे डोळे झाकून विचार करा की मी ताण, राग, भिती, चिंता, अपराध भाव, नाकारलेपणाची भावना, लायक नसण्याची भावना, विचार सोडून देत आहे.
मी जसा आहे तसा माझा स्वीकार करत आहे.
मी माझा आदर करतो,
मी माझ्यावर प्रेम करतो,
मी लायक आहे,
मी बदलतोय,
मी स्वतःला स्वीकारतोय
आणि सर्वजण माझ्यावर प्रेम करतात.
माझे मन प्रेम आनंद समाधान या भावनेने भरून गेले आहे.
मी शांत आहे.
मी जीवनातील या क्षणामध्ये जगतोय आणि आनंद घेतोय.
माझा माझ्यावर विश्वास आहे.
मी भूतकाळाबद्दल पश्चाताप करणार नाही.
मी भविष्यकाळाची चिंता करणार नाही.
मी माझा आजचा दिवस आनंदात जगणार आहे.
अशी वरील वाक्ये जर आपण रोज म्हणून चांगला विचार केला तर आपल्या जीवनामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल होईल.
कारण आपण जसे विचार करतो तसे आपण बनतो.
जसे आपण कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते.
आणि प्रयत्न केल्याशिवाय कोणत्याही परिवर्तन होत नाही.
रोज वाचनाची सवय लावा, चांगली पुस्तके वाचा,
तुम्हाला जे आवडते ते संगीत ऐका,
तुम्हाला जे चांगले वाटतात तुमचा आदर करतात अशा नातेवाईक, मित्रांबरोबर वेळ घालवा.
रोज सकाळी लवकर उठा.
आपल्या दिवसाचे योग्य नियोजन करा.
मोबाईलवर व इंस्टावर वेळ घालवल्यामुळे फक्त वेळेचा अपव्यय होतो.
या ऐवजी आपण आपल्या शरीरावर व मनावर काम केले तर आपण निश्चितच निरोगी आयुष्य जगू शकतो.
एवढा वेळ मोठा मेसेज आपण वाचलात धन्यवाद!
आभारी आहे.

Saturday, September 21, 2024

शिक्षण महर्षी : कर्मवीर भाऊराव पाटील - अनिल भुसारी

शिक्षण महर्षी : कर्मवीर भाऊराव पाटील - अनिल भुसारी
सोनपेठ (दर्शन) :- महाराष्ट्राच्या मातीने अनेक विरपुत्रांना घडवले आहे. या विरपुत्रांची  यादी बनवायची महटल्यावर पेनाची शाई सुद्धा कमी पडेल. या पुत्रांनी देशाला आणि जगाला आश्चर्यचकित केले. अशा वीरांपैकीच एक नाव म्हणजे पायगोड़ा पाटील व गंगूबाई यांच्या पोटी 22 सप्टेंबर 1887 ला कुंभोज ता. हातकंणगले जि. कोल्हापुर  येथे जन्मलेले कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्राच्या शैक्षणिक व सामाजिक सुधाराणांचा इतिहास कर्मविर भाऊराव पाटील उर्फ अण्णा या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 
कर्मविर भाऊराव पाटलांचे नाव माहित नाही असा महाराष्ट्राच्या मातीत एकही नाव सापडणार नाही. या अवलियाने "शिक्षण हा जीवनाचा पाया आहे' हे ओळखून खेडया-पाडयातील, डोंगराळ, दुर्गम भागातील बहुजनांची मुले शिकली पाहिजेत म्हणून स्वत: गावोगावी फिरून  त्यांना शिक्षणाचे महत्व सांगितले. गरिब -श्रीमंत, जात-धर्म असा भेद न करता, स्वत:च्या घराला वास्तिगृह बनवून मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली. पुढे दातृत्ववान व्यक्तिकडून देनग्या गोळा करुन (उदा. धोन्डाजी भोसले, मलोजीराजे निम्बालकर, सयाजीराव गायकवाड, छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज, श्रीमंत यशवंतराव होळकर, गवालीहरचे श्रीमंत जिजाजीराव शिंदे, संत गाडगेबाबा) बायकोच्या (वाहिनीसाहेब लक्ष्मीबाई) अंगवारचे दागिने मोडून वास्तिगृह, शाळा व महाविद्यालय उभारून शिक्षणाची बीजे तळागाळात रुजविले 'कमवा आणि शिका' हा मंत्र घेऊन 4 ऑक्टोंबर 1919 ला 'रयत शिक्षण संस्थेची' स्थापना केली.  ज्याना शिक्षण काय? हे माहित नव्हते.  अशा बहुजनांच्या मुलांना उत्तम नागरिक होता यावं याकरिता प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण देणाऱ्या शाळा महाविद्यालय काढले. शाळेत प्रशिक्षिक शिक्षक असाव म्हणून "महात्मा फुले अध्यापक विद्यालयाची" स्थापना केली, पुरुषांच्या प्रशिक्षणाप्रमानेच स्त्रियांकरिता "जिजामाता अध्यापिका विद्यालय" स्थापन केले. आज या रयत शिक्षण संस्थेचीं 439 माध्यमिक विद्यालय आहेत. पुढे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च महाविद्यालयिन शिक्षण घेण्यकरिता  पुणे, कोल्हापुर, मुम्बई, बेलगाव, सांगली, बड़ोदा या ठिकाणी विद्यार्थ्याना जावे लागत असे,  त्याकरिता मुलांना व पालकांना खूप परिश्रम घ्यावे लागयाचे. यावर उपाय म्हणजे स्वतःच महाविद्यालय स्थापन करणे आणि अण्णानी 1947 मध्ये सातारा येथे "छत्रपती शिवाजी महाराज" हे महाविद्यालय स्थापन केले. इथेच न थांबता 1954 मध्ये सैदापुर ता. कराड सारख्या गावात महाविद्यालयची स्थापना करुन उच्च शिक्षणात क्रांतीच केली. आज या रयत शिक्षण संस्थेची 40 महाविद्यालय आहेत. अन्नानी शिक्षणाचे पेरलेले हे बीज आजही अंकुरत आहे. अन्नानी शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या या कार्यामुळे अनेक लोक प्रभावित झालेत, त्यांचा आदर्श घेऊन  शाळा-महाविद्यालये ग्रामीण भागात सुरु करुन शिक्षणाचा प्रवाह सामान्य जनापर्यन्तपोहचविण्याचे कार्य केले. त्यातील एक नाव म्हणजे भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी "शिवाजी शिक्षण संस्थेच्या' माध्यमातून बहुजनांना शिक्षणाची दारे उघड़ी करुन दिली. 
कर्मवरांच्या आयुष्यातील एक प्रसंग म्हणजे. छत्रपती शिवाजी महाराज हे कर्मवीर अण्णांचे
 प्रेरणास्थान. त्यांच्या स्मरणार्थ १९४७ साली सातारा येथे त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावे महाविद्यालय सुरू केले. महाविद्यालयामध्ये ध्येयवादी व कर्तृत्ववान रयतसेवक निर्माण व्हावे हे भाऊरावांचे ध्येय होते. एका धनिकाने भाऊरावांना शिवाजी महाराजांचे नाव बदलून महाविद्यालयास आपले नाव देण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपये देऊ केले. तेव्हा भाऊराव म्हणाले, 'एक वेळ मी माझ्या जन्मदात्या बापाचे नाव बदलेन, पण कॉलेजला दिलेले महाराजांचे नाव कदापि बदलणार नाही'. महाराजांवर भाऊरावांची केवढी ही श्रद्धा.

अन्नानी हा शिक्षणाचा बहुजनकरिता डोलारा उभारला तो एवढ्या सहजासहजी उभरल्या गेला नाही. त्यासाठी अण्णाना प्रचंड संघर्ष करावा लागला. प्रस्थापितांचा विरोध स्विकारवा लागला,ल. अनेक संकटांना सामोरे जाऊंन त्या संकटांना पायदळी तुडवून बहुजनाकरिता हे शिक्षण केंद्र उभारले.
भाऊराव हे मानवतेचे पुजारी, सामाजिक मुक्तिचे पुरस्कर्ते, शिक्षणाचार्य होते. लोकशिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हा त्यांचा ध्यास होता. 'रयतेचे सेवक' ही पदवी ते स्वत: सहीखाली नेहमी लिहीत. पण जनतेने त्यांना 'कर्मवीर' ही पदवी बहाल केली आणि खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान केला. असा हा महान समाजसेवक आपल्या कार्याचा अमुल्य असा ठेवा आपल्या पदरात टाकून, ग्रामीण शिक्षणाची नवी दिशा दाखवून ९ मे १९५९ रोजी अंतर्धान पावला. रयतेच्या या सेवकास त्यांच्या जन्मदिनानिमित्त विनम्र 
अभिवादन ! 
===== अनिल भुसारी ===== 
तुमसर, जि. भंडारा
विभागीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ

Wednesday, September 18, 2024

मा.परमेश्वर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे आयोजन

मा.परमेश्वर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे आयोजन 
सोनपेठ (दर्शन) : - सोनपेठ येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित कै.र.वरपुडकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या व स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाईच्या वतीने दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.परमेश्वर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  आले आहे .
      रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे.आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचतो.अपघातातील जखमीस जीवदान मिळते.तसेच रक्तदानामुळे आपल्या शरीरात कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.याउलट रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुलभ होते.
      याशिवाय पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे.म्हणून हे दोन्ही समाजउपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याचा आमचा माणूस आहे.
   सोनपेठ तालुक्यातील तरूण तरूणी यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करून या समाज उपयोगी उपक्रमात सहभाग नोंदवावा. असे आवाहन प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बापूराव आंधळे, प्रा.डॉ. अंगद फाजगे, डॉ . मुक्ता सोमवंशी यांनी केले आहे.
      या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या पुढील संपर्क क्रमांकांवर ९४२३७७९०००, ९४२३४७२७५५, ९४२३४४४०९७ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Tuesday, September 10, 2024

विमा चळवळीतील शिलेदारांचा कान्हेगावकऱ्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार

विमा चळवळीतील शिलेदारांचा कान्हेगावकऱ्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार
सोनपेठ (दर्शन) :- 

दि. 09/09/24 रोजी मौजे कान्हेगाव येथे सन 2021 मध्ये रिलायन्स  कंपनीच्या घशातून शेतकऱ्याच्या खिशात विमा आणल्याबद्दल विमा चळवळीतील सर्व शिलेदारांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.सर्व सत्कारमूर्तींना गावातून वाजत गाजत कार्यक्रम स्थळी आणण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.
 याप्रसंगी डॉक्टर सुभाष कदम, मा. हेमचंद्रजी शिंदे, मा. विश्वांबर  भाऊ गोरवे, माननीय कृष्णाजी सोळंके मा. माधव घुन्नर सर यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी  सत्कार करण्यात आला...
   परभणी जिल्ह्यातील सोनपेठ गंगाखेड पालम तालुक्यातील शेतकऱ्या सन 2021 मध्ये विमा चळवळीने 210 कोटी विमा मिळून दिला. यासाठी विमा चळवळीने दिल्लीपर्यंत  लढा उभारला याची माहिती डॉ. सुभाष कदम यांनी गावकऱ्यांना माहिती दिली. सोयाबीनचे हमीभाव,तसेच दुष्काळातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानावर सरकारचा शाब्दिक खेळ याबाबत हेमचंद्र शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच सोनपेठ तालुक्यात मधील शेतकऱ्यांची विम्या बाबत असो किंवा कृषी खाते किंवा महसूल खाते याबाबत कोणतीही अडचण आली तर शेतकरी संघटना सोनपेठ ती पूर्णपणे सोडवेल असे मत श्री विश्वाभर गोरवे यांनी व्यक्त केले. तसेच विमा चळवळीमुळे परभणी जिल्ह्याला 2020, 2023  मध्ये काय फायदा झाला. आणि 2023 मध्ये पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला याबद्दल श्री गोविंद लांडगे सर यांनी मत मांडले.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शेषराव मोकाशे हे होते, सूत्रसंचालन श्री अवधूत गिरी सर यांनी केले तसेच आभार श्री दत्तराव कोरडे यांनी मानले. याप्रसंगी पंचक्रोशीतील  चळवळीत काम करणारे अरुण भाऊ मुंडे शिर्शी, गजानन कापसे बालासाहेब जाधव अविनाश जाधव पोहंडूळ, उमाकांत बागवाले शेळगाव, निवास यादव खडका, सुरज जाधव मोहळा,श्री महेश जोगदंड नरवाडी आदीची उपस्थित होती.