स्त्रियांचा आदर करणारे नीतिमान छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!!
सोनपेठ (दर्शन) :-
शिवरायांनी छत्रपती संभाजी राजांना शस्त्राच्या,शिक्षणासोबत कुशल प्रशिक्षक नेमून भाषा, व्याकरण, धर्मशास्त्रे, इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य, काव्य, विनोद, राजनीति, विविध कला व क्रीडा इत्यादी अनेक गोष्टींचे शिस्तबद्ध प्रशिक्षण दिले. चौदाव्या वर्षी त्यांचा कल ओळखून स्वतंत्र लेखनिक दिला. त्यामुळे संभाजी राजे धर्मशास्त्र, तत्त्वज्ञ, चांगला राज्यकर्ता, न्यायप्रिय प्रशासक, लेखक, कवी, युद्धकुशल सेनानी म्हणून विकसित झाले. त्यामुळेच केशव पंडित आणि त्यांना "सकल शास्त्र विचारशील" अशा शब्दात गौरवले. काशीचा पंडित गागाभट्टाने आपला "संस्कृत ग्रंथ" युवराज संभाजीराजांना अर्पण केला होता.
शिवरायांनी छत्रपती संभाजी राजांना जाणीवपूर्वक प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याची संधी दिली. आठ वर्षाच्या संभाजी ला मोगलाकडे ओलिस म्हणून ठेवले. शत्रूच्या छावणीत न घाबरता वावरण्याची त्यांना सवय लागली शत्रूची बलस्थाने व कमजोर स्थाने त्यांना माहीत झाली. आग्र्याला शिवराय कैदेत असताना ते रोज मोगल दरबारात जात होते. त्यामुळे त्यांना मोगल दरबारातले वातावरण औरंगजेबाची कार्यपद्धती माहित झाली. औरंगजेबाचे अनेक सरदार व त्यांचे शहजादे यांच्याशी त्यांनी स्नेह जुळला. या सर्व गोष्टीचा त्यांना संघर्ष काळात उपयोग झाला.
औरंगजेबाला त्यामुळे स्वतःच्या मुलाबद्दल व अनेक सरदारा बद्दल संशयाने पछाडले. त्यातूनच त्याने माझे कोण कोणते सरदार तुला सामील आहेत. हा प्रश्न संभाजीराजांना विचारला. आग्र्याहून निसटल्यावर शिवरायांनी संभाजी राजांना कवी कलश कडे ठेवले. कलशा सोबत वेशांतर करून स्वराज्यात परत येताना त्यांना खडतर प्रवास व प्रतिकूल वातावरनासह अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. ब्राह्मणाच्या मुला प्रमाणे वागावे लागले. वेषांतर, मिळेल ते खाणे व मिळेल तेथे झोपणे याची सवय करून घ्यावी लागली. ते निडर व कणखर बनले. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याचे धैर्य त्यांच्यात आले. कोणत्याही संकटांना न डगमगता त्यांच्याशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य निर्माण झाले. या सर्वांचा उपयोग त्यांच्या 'संघर्षमय' जीवनात अत्यंत परिणामकारकरीत्या झालेला दिसतो.
आठव्या वर्षी मोगलांचे पंचहजारी मनसबदार, दहाव्या वर्षी सप्तहजारी मनसबदार, तेराव्या वर्षी अनेक मोहिमांना सोबत नेणे आणि चौदाव्या वर्षी दहा हजारांच्या तुकडीचा प्रमुख करून स्वतंत्र प्रशासकीय अधिकार देणे. यामुळे संभाजीच्या कर्तृत्वाला संधी मिळाली आणि त्यांच्या क्षमता विकसित झाल्या. प्रशासकीय काम युद्धकला यामध्ये ते निपून झाले वयाच्या पंधराव्या वर्षी शिवरायांनी त्यांना विलायती वकिलाशी चर्चा व करार करण्याचे अधिकार दिले इंग्रज, डच, फ्रेंच, मोगल, पोर्तुगीज वकिलांशी चर्चा केल्यामुळे त्यांचा मुत्सद्दीपणा व संभाषण कौशल्य विकसित झाले. परिणामी आपल्या कारकिर्दीत त्यांना सर्व विलायती ्यापार्यावर जबर ठेवता आली.
आजचे आई-वडील मुलांना योग्य वेळी योग्य वयात संधी देत नाहीत. त्यामुळे मुलांचे कर्तुत्व बहरू शकत नाही. ते आणीबाणीच्या प्रसंगात स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांना सावलीत न वाढवता शिवराय, छत्रपती संभाजी राजे यांचे अनुकरण करून त्यांना फुलण्याची संधी देणे व कणखर बनवण्यासाठी प्रयत्न करणे. आवश्यक आहे संधी दिली तर ते आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येक कठीण प्रसंगात ते सहजपणे तोंड देतात. यशस्वी होतात पालकांनी मुलांचे फाजील लाड करू नयेत. मुलांना नकार पचवायला शिकवणे अत्यावश्यक आहे.
छत्रपती संभाजी राजांना बालपणापासून मैदानी खेळांची आवड होती. शरीर सुदृढ व बलदंड होते राजे जे नियमित व्यायाम व शारीरिक कसरती करत असे. त्यांना व्यायामाची, मल्लखांबाची, मैदानी खेळांची आवड होती. रायगडावर आजही ही एक लोहस्तंभ आहे. त्याला संभाजींचा मलखंब म्हणतात. मलखांब, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे व विविध मर्दानी खेळामुळेच संभाजीराजे कसून तयार झाले. त्यामुळेच सततच्या मोहिमा लढाया व घोड़ दौड सुरू असूनही त्यांचे आरोग्य उत्तम होते. ते आजारी पडल्याची एकही नोंद सापडत नाही. यात शारीरिक ताकदीमुळे औरंगजेबाने सतत एक महिना अमानुष छळ करून देखील त्यांचे मनोबल कायम होते. अत्यंत निडरपणे त्यांनी औरंगजेबाचा सामना केला.
आजची मुले मैदानी खेळाऐवजी कॉम्प्युटर मोबाईल गेम मध्येच सतत रममान होतात. शारीरिक आरोग्याकडे व शरीराच्या जडणघडनीकडे दुर्लक्ष होऊन ते दुर्लभ बणतात. मर्दानी खेळ न खेळल्यामुळे त्यांच्यात पराभव पचवण्याची व यशाने हुरळून न जाण्याचा समतोल दृष्टिकोन व खिलाडूवृत्ती निर्माण होत नाही. त्यामुळे छोट्या छोट्या अपयशाने ते खचून जातात. त्यामुळे निरोगी व सुदृढ राहण्यासाठी व्यायाम व मैदानी खेळ यांचे महत्त्व जाणणे अत्यावश्यक आहे.
युरोप-अमेरिकेतील पालक म्हणतात. भारतीय पालक व मुले अत्यंत नशीबवान आहेत. त्यांना जीवनातील प्रत्येक आदर्शासाठी छत्रपती संभाजी सारखे त्यांच्याच रक्ताचे पूर्वज उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतात व महाराष्ट्रात संभाजींच्या वारसांची कमतरता नसावी व पुढे ते म्हणतात. की आमच्याकडे जर संभाजी झाला असता तर आम्हाला आमच्या मुलांना काल्पनिक कथा स्पायडरमॅन, हरक्यूलिस शिकवावा लागला नसता. आम्ही संभाजीच्या कथा बालकांना सांगितल्या असत्या.
संभाजीराजांनी वाचलेल्या ऐकलेल्या सुचलेल्या सर्व विचारांच्या वेळोवेळी नोंदी ठेवल्या त्यामुळेच ते बुद्धभूषण, नायिकाभेद, नखशिख व सातसतक या ग्रंथांची निर्मिती करु शकले. आपणही या प्रेरणेतून मनात येणारे विचार, सुचलेल्या कल्पना, वाचलेल्या व ऐकलेल्या महत्त्वाच्या गोष्टी वेळीच लिहून ठेवल्या पाहिजेत. त्यातूनच लेखक, कवी, विचारवंत निश्चित तयार होतील.
वैदिक ब्राह्मणी धर्माने शूद्र ठरवून सर्व हक्क अधिकारापासून वंचित ठेवलेल्या 'स्त्रीला' संभाजीराजांनी सन्मान दिला. त्यांनी येसूबाईना स्वतंत्र शिक्का देऊन "अभिव्यक्त राजाचे राजाज्ञा" काढण्याचे अधिकार दिले. आज या अधिकार पदाला 'राष्ट्रपतीपद' म्हणता येईल. येसूबाईनी संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत चोखपणे मुलकी कारभार सांभाळून स्त्रियांना संधी दिल्या. त्या या संधीचे सोने करतात. हे दाखवून दिले. त्यांच्या या कर्तृत्वामुळे संभाजी राजांना निर्धास्तपणे आपल्या मोहिमा यशस्वी करता आल्या. त्यानंतर ताराराणीने संधी मिळताच. औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला चारी मुंड्या चीत करून इतिहास घडवला. यातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या घरात, कुटुंबात, समाजात, कामाच्या ठिकाणी राज्यात व देशात जर स्त्रियांना समान संधी दिली तर त्या निश्चितपणे या देशाला प्रगतीच्या रस्त्यावर नेतील. संभाजीराजांच्या अटकेनंतर स्वतःच्या मुला ऐवजी छत्रपती राजारामाला छत्रपती बनवून येसुबाईनी कौटुंबिक कलहाच्या युगात एक आदर्श वस्तुपाठ दिला.
छत्रपती संभाजीराजा बद्दल नाना प्रकारच्या अफवा पसरवून त्यांची बदनामी व चरित्रहनन करण्यात आले. या सर्व गोष्टी चुकीच्या व खोट्या असल्याचे ऐतिहासिक पुराव्यावरून स्पष्ट होते. बहुजन समाजातील अनेक कर्तुत्ववान व्यक्तींना याप्रकारे बदनाम करून आयुष्यातुन उठवण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. आधुनिक काळातही ब्राह्मणी भांडवली व्यवस्थेच्या विरोधकांची बदनामी व चरित्रहनन सुरू आहे. आपण योग्य शहानिशा करूनच अशा गोष्टीवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
संभाजीराजांनी भारतीय समाजात शोषणाचे मूळ असलेले जातीव्यवस्था व स्त्रीदास्य नाकारले. त्यांनी आपल्या राज्यात नेमणुका देताना जात-पात न पाहता फक्त कर्तृत्वाच्या आधारे नेमणुका केल्या. अस्पृश्य व आदिवासींना महत्वाचे पदे दिली. आपल्या या तत्त्वासाठी त्यांनी "यातनामय" मरण देखील पत्करले त्यामुळे काँ शरद पाटील संभाजी राजांना अब्राह्मणी समतेचा हुतात्मा असे संबोधितात. यामधून आदर्श घेऊन आपण विषमतावादी व्यवस्था नाकारणे गरजेचे आहे.
या सर्वा सोबतचे संभाजीराजांचे राजनैतिक व सामाजिक कौशल्य आपल्या कर्तव्यप्रती व सामान्य जनतेप्रती त्यांची बांधीलकी, त्यांची अभ्यासू वृत्ती, त्यांची बेडरवृत्ती, आत्मविश्वास व मुत्सद्दीपणा या सर्व गोष्टी अनुकरणीय आहेत. या सर्वांमधून प्रेरणा घेऊन एक समतावादी, कर्तुत्ववान, बुद्धीप्रामाण्यवादी, विज्ञानवादी, संवेदनशील समाजाची निर्मिती करणे हीच शंभूराजांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा ठरतील.

No comments:
Post a Comment