Sunday, March 26, 2023

जागतिक रंगभूमी:नवसर्जनाची अंत:प्रेरणा" जागतिक रंगभूमी दिनानिमित्त हार्दिक शुभकामना

"जागतिक रंगभूमी:नवसर्जनाची अंत:प्रेरणा"
जागतिक रंगभूमी दिनानिमित्त हार्दिक शुभकामना 


सोनपेठ (दर्शन) :-

दर वर्षी दि. २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमीदिन साजरा केला जातो. सर्वप्रथम १९६१ मध्ये 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस जाहीर केला. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. भारतीय रंगभूमीने आजपर्यंत वेगवेगळी स्थित्यंतरे अनुभवली आहेत.
रंगभूमी (नाटक) हे वर्तमानातील क्षण जगताना आनंद आदान-प्रदान करण्याचे एक सामर्थ्यशाली माध्यम आहे. माणूस म्हणून जगताना भोवतालचा अनुभव व्यक्त करण्यासाठी अव्याहत चालणारी जादूमय प्रक्रिया आहे. अनेकांवर चटकन गारुड करणारे, परंतु खडतर साधनेशिवाय खऱ्या अर्थाने साध्याच्या जवळही पोहोचता न येणार ध्येय्य आहे. काळाच्या कसोटीवर लेखन उतरवणे हे नाटककाराच्या सर्जनशीलतेचे लक्षण असते,

आज समांतर प्रवाहाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.लोकप्रिय रंगभूमीचा वेग, पसारा, अर्थकारण, प्रसिद्धी हे सगळे दीपवणारे आहे. ती सतत झगमगत राहण्यासाठी दर वर्षी किमान दोन-तीन लोकप्रिय नाटके येणे पुरेसे असते. पण, या झगमगाटाचा निकष लावून मुंबई-पुण्याबाहेरच्या समांतर रंगभूमीकडे पाहू नये. नागरी जीवनापलीकडच्या बुचकाळ्यातील ग्रामीण-नवशहरी जगण्याचा सार घेऊन येणाऱ्या नाटकांना लोकप्रियतेच्या-चालण्याच्या निकषावर तोलून पाहिले जाते नि मग ती नाटके बाजूला पडतात. याला अपवाद फार कमी वेळा घडतात. पण, जेव्हा जेव्हा असे अपवाद मुख्य प्रवाह हिमतीने स्वीकारतो, तेव्हा तेव्हा ही कथित मुख्य प्रवाहातील रंगभूमी झळाळून गेली आहे! पण, प्रादेशिक समांतर प्रवाहाकडे तरीही फार लक्ष दिले जात नाही. सुविधा नाहीत. गावोगावी थिएटर उभारले जाण्याच्या घोषणा वल्गनाच ठरताहेत. जेव्हा हे होईल तेव्हा प्रादेशिक रंगभूमीची श्रेष्ठ-अश्रेष्ठता ठरविण्याचे कथित मुख्य प्रवाहाकडील 'अधिकार' गळून पडतील आणि तेही इकडे नाटक बघायला गर्दी करू लागतील!

मराठी रंगभूमीला जागतिक दर्जा मिळवून द्यायचा असेल तर राजकीय पाठबळ गरजेचे आहे. मराठी रंगभूमीला आता जागतिक दर्जा प्राप्त करून घ्यायचाय. त्यासाठी सर्व रंगकर्मीं प्रयत्न करीत आहेत. आज  कलाकार व्यावसायिक, प्रायोगिक आणि थिएटर ऑलिम्पिकच्या निमित्ताने जागतिक स्तरावर पोहोचले आहेत. यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सर्व सहकारी रंगकर्मींचा मोलाचा वाटा आहे, याचा अभिमान वाटतो. 
मराठी रंगभूमी श्रीमंत व समृद्ध होण्यासाठी सर्वस्त्रांतून प्रयत्न व्हावे.मराठी रंगभूमी ही जगातली प्रायोगिक रंगभूमी आहे. इतर कोणत्याही भाषेतल्या रंगभूमीमध्ये इतके प्रयोग होत नाहीत. मराठी नाटकाचा प्रेक्षक अतिशय सुज्ञ आहे.  नाटकाला जेव्हा हा सुज्ञ प्रेक्षक येतो तेव्हा कोठे टाळ्या द्यायच्या व कोठे विराम घ्यायचा हे त्यांना अगदी बिनचूक कळते. मराठी रंगभूमी श्रीमंत आहेच, परंतु कलाकारांना आणखी काम करण्याची गरज आहे. इतर भाषांतील थिएटर्स शोरूमसारखे आहेत. परंतु, मराठी भाषेचे थिएटर्स म्हणजे अभिनयाची शाळा आहे.
नवीन कलावंतांना चित्रपट किंवा सीरियल्सचे जे आकर्षण वाटते अशांनी रंगभूमीपासून सुरुवात करावी, तरच यश मिळेल, असे मार्गदर्शनपर शिबिर किंवा व्याख्यान रंगभूमीदिनाला आयोजित व्हावे, असे मला वाटते.
मराठी रंगभूमीकडून मला काय अपेक्षा आहेत यापेक्षा माझ्याकडून तिला काय अपेक्षा आहेत, हा विचार मला नेहमी महत्त्वाचा वाटतो. आपल्या रंगभूमीवर वेगवेगळ्या धाटणीचे विषय हाताळले गेले. यातूनच वेगळेपण जपण्याचा प्रयत्न होत आहे.
'काहीतरी वेगळे करू या' हे स्वप्न उराशी बाळगून गेली अनेक शतके ही रंगभूमी सक्षमपणे अविरत उभी आहे. काहीतरी वेगळे लिहिण्याची लेखकाची अस्वथता. एखादा वेगळा प्रयोग करावा म्हणून दिग्दर्शक अस्वस्थ असतो. एखादी वेगळी व्यक्तिरेखा मिळावी म्हणून नट अस्वस्थ असतो. एखादा वेगळा नाट्यानुभव पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेले असतात. हे 'वेगळेपण' जपण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्नशील असतो आणि म्हणूनच सिनेमा, दूरचित्रवाणी या चलचित्रांच्या आक्रमणातून रंगभूमी आपल्या अस्तित्वासाठी खिंड लढवत आहे. ही वेगळेपणाची नित्यसेवा अशीच घडत राहावी, हीच रंगभूमीदिनाला मनापासून प्रार्थना.
रंगभूमीवर अविरत काम करता करता नाटक माझा श्वास झाले आहे. प्रत्येक वेळी मला नव्याने घडविण्याचा प्रयत्न व वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न रंगभूमीने केलाय. नाटक हे स्वत:च्या अंतरंगातला सुखांत आहे. या प्रवासाच्या माध्यमातून त्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याची प्रचंड ओढ एकलेखक, दिग्दर्शक, नट व समीक्षक म्हणून मला अस्वस्थ करते. अजून बरेच शिकायचेय, आत्मसात करायचेय व मिळवायचेय. ज्याच्या स्पर्शाने माझ्या जीवनाला नवा अर्थ मिळाला, त्या ग्रीन-विंगेपासून रंगमंचावरच्या प्रत्येक सजीव अस्तित्वाला माझे शतश: अभिवादन!
मराठी रंगभूमीवर सध्या अनेक प्रयोग होताहेत. परंतु, ते फक्त नाटक या संकल्पनेपुरते मर्यादित आहेत. कादंबरीच्या भागांचे अभिवाचन, ज्येष्ठ कवींच्या कवितांवर आधारित नाट्यप्रयोग-नाट्यरुपांतर. छोटे-मोठे स्कीट्स, इतर भाषेतल्या साहित्यकृतींवर आधारित नाट्यप्रयोग, लेखन आणि अभिनयाचा कस लागेल अशा कसदार कलाकृती रंगभूमीवर येणे बंद झालेय. व्हाइट रॅबिट रेड रॅबिटसारखी असामान्य संकल्पना, संगीतनाटक स्पर्धा, काही निवडक रंगकर्मीं करीत असलेले प्रायोगिक नाटक या गोष्टी आजघडीला काही प्रमाणात दिलासादायक आहेत. परंतु, प्रायोगिकतेची पोकळी मोठी आहे.

मराठी रंगभूमी ही जगातील अजरामर अशी एकमेव रंगभूमी आहे. माणूस म्हणून जगलो, रंगमंच कलाकार म्हणूनच मरायचं आहे.ही भावना अनेकांच्या मनात असते.
रंगभूमी आमचे दैवत आहे. रंगभूमीने आम्हाला खूप काही दिले आहे. आम्ही ऋणी आहोत. रंगभूमीमूळे आम्ही आयुष्य जगत आहोत. आमचे रंगभूमीप्रेम शब्दातीत आहे.
रंगभूमी आणि काम करणारे रंगकर्मी यांच्यासाठी येणारा काळ फार मोठा महत्त्वाच्या संधी उपलब्ध करणारा आहे. त्याची प्रचीती आज आपल्याला दिसतेय. व्यावसायिक निर्माते नवीन नाटककारापासून नट, तंत्रज्ञांना संधी देताहेत. निर्मात्यांना यशही मिळतेय आणि हे सर्व तरुण झपाटलेले रंगकर्मी आठ-दहा वर्षांत महाराष्ट्रातील नाटक आणि रंगभूमी सकारात्मकदृष्ट्या बदलवतील, नाटकाचे एक भक्कम मार्केट तयार करतील. हे रंगकर्मी थांबणारे नाहीत. त्यांच्या या ऊर्जेचे श्रेय महाराष्ट्रभर होणाऱ्या एकांकिका स्पर्धा असून, त्यातून तावून सुलाखून निघालेले हे सर्व रंगकर्मी आहेत. ही सत्य परिस्थिती आपण अनुभवतो आहोत.
मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन विषय आणि तेही तरुण रंगकर्मींकडून येत आहेत. अनेक नाटकांचे प्रयोग ज्येष्ठ रंगकर्मींना भावत असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.नाटक जपणारा  व नाटक जगणारा माणूस म्हणून वेगळी ओळख निर्माण करणे हेच रंगकर्मींचे ध्येय असावे.नवीन पिढीसाठी हा सांस्कृतिक, सामाजिक वारसा आहे. मराठी रंगभूमी समृद्ध होती, आहे आणि अधिकाधिक ऊर्जित अवस्थेकडे वाटचाल करीत राहील, अशी आशा आहे.
✒️ प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे,
  🎭
  मो.९८२२८३६६७५

Saturday, March 25, 2023

आदि जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सवा निमित्ताने त्रिवार वंदन! वीरशैव धर्म स्थापक पंचाचार्य

आदि जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सवा निमित्ताने त्रिवार वंदन! वीरशैव धर्म स्थापक पंचाचार्य 


सोनपेठ (दर्शन) :-

स्कंद पुराणाच्या प्रमाणवचनाने धर्माला ग्लानी आल्यान्ंतर भगवान शिव आपले विशेष अंश असलेला  शिवगणाच्या रूपात अवतरित होवून प्रत्येक युगात धर्माची स्थापना केलेली आहे . या सनातन वीरशैव धर्माचे संस्थापक पाच आचार्य आहेत.

शिवाच्या सद्योजात वामदेव अघोर तत्पुरूष व र्इशान्य मुखाच्या रूपाने विराजमान कुल्यपाक येथील श्री सोमेश्वरलिंग, वट क्षेत्रातील श्री सिध्देश्वर लिंग, द्राक्षाराम क्षेत्रातील श्री रामनाथलिंग, सुधाकुण्ड क्षेत्रातील श्री मल्लीकार्जून लिंग व काशी क्षेत्रातील श्री विश्वनाथ लिंग या पाचही लिंगातून अनुक्रमे १) श्री जगदगुरू रेवणाराध्य २) श्री जगदगुरू मरूळाराध्य ३) श्री जगदगुरू एकोरामाराध्य ४) श्री जगदगुरू पंडीताराध्य ५) श्री जगदगुरू विश्वाराध्य असे पाच आचार्य प्रत्येक युगात वेगवेगळ्या  नावाने अवतरित होवून वीरशैव धर्माची स्थापना व धर्मप्रसार केलेले आहेत. 

श्री श्री श्री १00८ जगदगुरू रेवणाराध्य :- 
शिवाच्या आदेशानुसार श्री जगद्गुरू रेवणाराध्य वीरशैव धर्माच्या स्थापनेसाठी आन्ध्र प्रदेशातील सुप्रसिध्द क्षेत्र कोल्लीपाक सोमेश्वर लिंगातून अवतार घेवून आले.  कॄतायुगात एकाक्षर शिवाचार्य, त्रेतायुगात एकवत्र शिवाचार्य‚ व्दापारयुगात रेणुक शिवाचार्य आणि कलीयुगात रेवणाराध्य शिवाचार्य या नावाने प्रसिध्द आहेत. व्दापारयुगात त्यांनी अवतार घेतल्यानंतर श्री जगदगुरूनी मलयपर्वतावर श्री अगस्त्य महर्षीना वीरशैव सिध्दांताचा उपदेश केला. तोच ग्रंथ शिवयोगी शिवाचार्य यांनी संग्रहित केलेला तो उपदेश म्हणजेच " सिध्दात शिखामणी " या नावाने ग्रंथ प्रसिध्द आहे. धर्म प्रचारासाठी त्यांनी कर्नाटकातील बाळेहोनूर येथे पीठाची स्थापना केली. हे पीठ रंभापूरी पीठ या नावाने प्रसिध्द आहे. हया पीठाची शाखा रेणुक शाखा आहे. या पीठाचे सिंहासन वीर सिंहासन आहे. हे वीरगोत्राचे आद्यगुरू होत. हया पीठाचे झेंडयाचा रंग हिरवा आहे. दंड अस्वत्य (पिवळा) दंड आहे.  कमंडलु , वेद ऋगवेद आहे. हया आचार्याचे सूत्र पडविड सूत्र आहे. हया शाखेचे तत्व पॄथ्वी आहे. आज या पीठावर प.पु.श्री श्री श्री १00८ जगद्गुरू वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी अधिकारावर आहेत. 
Website: www.rambhapuripeetha.info

श्री श्री श्री १00८ जगदगुरू मरूळाराध्य :- 
शिवाच्या आज्ञेवरून मरूळाराध्य वीरशैव धर्माच्या स्थापनेसाठी क्षिप्रा नदीच्या काठी विराजमान असलेल्या वट क्षेत्रातील सिध्देश्वर लिंगातून प्रत्येक युगात अवतार घेत आले. कॄतायुगात द्वअक्षर शिवाचार्य येतायुगात द्विवत्र शिवाचार्य‚ व्दापारयुगात दारूक शिवाचार्य व कलियुगात मरूळाराध्य शिवाचार्य या नावाने प्रसिध्द आहेत. त्यांनी धर्म प्रसारासाठी मध्यप्रदेशात उज्जयिनी पीठाची स्थापना केली. ते आता कर्नाटकातील विजयनगर जिल्हयातील उजनी नगरात आहे. हे नंदी गोत्राचे आद्यगुरू आहेत. हयाची शाखा दारूक शाखा आहे. याचे सिंहासन सध्दर्म सिंहासन या नावाने प्रसिध्द् आहे. हया पीठाचे वृष्टी सूत्र आहे. वेद यजुर्वेद आहे. आप तत्व आहे. आता या पीठावर प.पु.श्री श्री श्री १00८ जगदगुरू सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी विराजमान आहेत. 
Website: www.ujjainisaddharmapeetha.com

श्री श्री श्री १00८ जगदगुरू एकोरामाराध्य :- 
श्री जगदगुरू एकोरामाराध्य यांनी शिवाच्या आदेशानुसार वीरशैव धर्म स्थापनेसाठी द्राक्षाराम क्षेत्रातील श्री रामनाथ लिंगातून अवतार घेतला. कॄतायुगात त्रयक्षर शिवाचार्य तर  त्रेतायुगात त्रिवत्र शिवाचार्य‚ व्दापारयुगात घंटाकर्ण शिवाचार्य व कलीयुगात एकोरामाराध्य शिवाचार्य या नावाने अवतार घेतला. धर्म प्रसारासाठी यांनी हिमालायात धर्म पीठाची स्थापना केली. ते केदारपीठ या नावाने प्रसिध्द आहे. यालाच वैराग्यसिंहासन नावाने ओळखले जाते. हे पीठ पुरातन फार आहे. टेहरी नरेश या पीठाचे शिष्य होते. नरेशाच्या तिलकोत्सवाच्या समारंभात ' रावल ' ही उपाधी बहाल करत होते म्हणून या पीठाच्या जगदगुरूना ' रावल ' या उपाधीनेही संबोधतात. हया पीठाचा झेंडयाचा रंग निळा आहे. सिंहासन वैराग्यसिंहासन होय. हया पीठाचे वेद सामवेद आहे. हे भुंगि गोत्राचे आद्यगुरू होत. हयाचा दंड वेणुचा आहे. आज या पीठावर प.पू.श्री श्री श्री १00८ रावल भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी अधिकारावर आहेत.

श्री श्री श्री १00८ जगदगुरू पंडिताराध्य :- 
शिवाच्या आज्ञेनुसार प.पु.जगदगुरू पंडिताराध्य वीरशैव धर्म स्थापना करण्यासाठी श्री शैल क्षेत्रात असलेल्या श्री मल्लीकार्जून ज्योतिर्लिंगातून अवतरले. कॄतायुगात त्यांनी चतुरक्षर शिवाचार्य‚ त्रेतायुगात चतुर्वक्र शिवाचार्य‚ व्दापारयुगात धेनुकर्ण शिवाचार्य व कलियुगात पण्डीताराध्य शिवाचार्य या नावाने ओळखले जातात. हया पीठाची धेनुकर्ण शाखा आहे. हया पीठाच्या झेंडयाचा रंग पांढरा आहे. यांचे वॄषभ गोत्र होय. हे चतुरक्षर शिवाचार्य प्रवर आहेत. हया पीठाचा अथर्ववेद  आहे. हया पीठाचे सूर्यसिंहासन आहे. आज या पीठावर प.पू. श्री श्री श्री १00८ जगदगुरू डॉ.चन्नसिद्धराम पंडिताराध्य महास्वामीजी अधिकारावर आहेत. 
Website: www.srishailapeetham.org

श्री श्री श्री १ 00८ जगदगुरू विश्वाराध्य :- 
वीरशैव धर्माच्या स्थापनेसाठी शिवाच्या आज्ञेनुसार श्री जगदगुरू विश्वाराध्य काशीक्षेत्रातील विश्वनाथ ज्योर्तिलिंगातून अवतार घेतले.कॄतायुगात पंचाक्षर शिवाचार्य, त्रेतायुगात पंचवक्र शिवाचार्य या नावाने प्रासिध्द आहेत. वीरशैव धर्माच्या प्रचारासाठी यानी काशीपीठाची स्थापना केली. काशीमध्ये अत्य्ंत पवित्र व ' आन्ंद कानन ' या नावाने प्रासिध्द असलेल्या या क्षेत्रात हे पीठ आहे. आता हे जंगमवाडी मठ या नावाने प्रसिध्द आहे. आता या जंगमवाडी मठात आपल्या वीरशैव धर्माचे एक स्वतंत्र अभ्यासकेंद्र चालवले जाते. पीठाचे विश्वकर्ण शाखा आहे. हया पीठाचा झेंडयाचा रंग पिवळा आहे. स्कंद गोत्राचे आध्यगुरू मानले जातात. हयाचा दंड बिल्ब दंड आहे. हे ज्ञानसिंहासन पीठ आहे. सध्या या पीठावर ज्ञानसिंहासन नावाप्रामाणे ज्ञानी असलेले प.पु.श्री श्री श्री १00८ जगदगुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी विराजमान आहेत. यांचे उत्तराधिकारी श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य आहेत. 
Website: www.shrisiddhanthashikhamani.com

अशा प्रकारे वीरशैव धर्माचे संस्थापक हे पाच मूल पंचाचार्य होत. यांनाच आपण वीरशैव धर्माचे पाच जगदगुरू म्हणुन संबोधतो.

1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी होत असलेल्या दिनांक 14 मार्च 2023 पासून च्या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होत असल्याचे निवेदन तहसीलदार,गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांना देऊन निवेदनात महाराष्ट्र राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतर नियुक्त राज्य सरकारी / निमसरकारी इत्यादी सर्व कर्मचाऱ्यांना / अधिकाऱ्यांना नवी पेन्शन योजना एनपीएस रद्द करून जुनी पेन्शन योजना (महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 व नियम 1984) पुन्हा पूर्ववत लागू करावी या प्रमुख मागणीसाठी दिनांक 14 मार्च 2023 पासून पुकारण्यात आलेल्या राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या
 राज्यव्यापी बेमुदत संपात आम्ही सहभागी होत आहोत करिता माहिती सादर यांच्या प्रति तहसीलदार गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी आदींना देण्यात आले आहेत.




अनेक कर्मचारी संघटनेचा राज्यव्यापी बेमुदत संपास पाठिंबा ; नागरिकांची कामे खोळंबली
 
सोनपेठ तालुक्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वयक समिती महाराष्ट्र जुनी पेन्शन योजना लागु करावी या प्रमुख मागणीसह अनेक वर्षापासुन प्रलंबित मागण्यांबाबत शासनस्तरावर निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांचा दिनांक १४ मार्च २०२३ पासून "राज्यव्यापी बेमुदत संप" परभणी जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समिती व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघासह अनेक संघटनांचाही पाठिंबा दिला असुन तहसील कार्यालय परिसरात श्वेत टोपी घालून त्यावर "एकच मिशन जुनी पेन्शन" लिहीलेली काळ्या रंगाच्या रिबीन घालून शेकडो कर्मचारी शासनाचा निषेध व्यक्त करत आहेत, अनेक कार्यालयातील अर्धे कर्मचारी संपात सहभागी असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत.शासनाने त्वरित दखल घेऊन हा बेमुदत संप मिटवावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने होत आहे.

Friday, March 10, 2023

श्रीहरीकोटा अंतराळ केंद्राच्या सहलीसाठी सोनपेठ तालुक्यातील विवेक धबडे,गोपाळ पवार व रुद्राणी राजमाने पात्र

श्रीहरीकोटा अंतराळ केंद्राच्या सहलीसाठी सोनपेठ तालुक्यातील विवेक धबडे,गोपाळ पवार व रुद्राणी राजमाने पात्र 
चि.विवेक अजय धबडे.जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ.चि.गोपाळ दामोदर पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवठाना. 
कु.रुद्राणी शिवलिंग राजमाने जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ .
सोनपेठ (दर्शन) : - 

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत औरंगाबाद विभागातील जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून तीन विद्यार्थी श्रीहरीकोटा अंतराळ केंद्र,उपग्रह प्रक्षेपण केंद्र,थुंबा येथील स्पेस म्युझियम व विश्वेश्वरय्या इंडस्ट्रीयल ॲड टेक्नीकल म्युझियम येथे भेट देऊन येथील कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत.त्यासाठी केंद्रस्तरावर परीक्षेत प्रत्येक केंद्रातून 10 विद्यार्थी पुन्हा त्यांची तालुकास्तरीय परीक्षेतून 10 विद्यार्थी तसेच नुकतीच शेवटची जिल्हास्तरीय परीक्षेतून सोनपेठ तालुक्यातील तीन विद्यार्थी पात्र प्रथम विवेक अजय धबडे जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ, द्वितीय गोपाळ दामोदर पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवठाना तर तृतीय रुद्राणी शिवलिंग राजमाने जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ यासाठी प्रयत्न करणारे जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा सोनपेठ मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड, प्रमुख मार्गदर्शक श्रीमती म्हात्रे मॅडम व श्रीमती माळी मॅडम तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवठाना मुख्याध्यापक हनुमंत केदार, प्रमुख मार्गदर्शक श्रीमान गुरव सर व विवेक धबडे,गोपाळ पवार व रुद्राणी राजमाने या विद्यार्थ्यांचे  शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रा.विठ्ठल भुसारे,तहसीलदार सारंग चव्हाण,गट विकास अधिकारी मदनराव कदम,उप जिल्हाधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण,वैद्यकीय अधीक्षक डॉ.सिध्देश्वर हालगे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष पवार, पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड,मुख्याधिकारी विठ्ठल केदारे,गट साधन केंद्र सर्व कर्मचारी वर्ग,सर्व केंद्र प्रमुख, सर्व मुख्याध्यापक,सर्व शिक्षक शिक्षिका शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी, उपाध्यक्षा सौ.वंदना नवनाथ शिंदे,सदस्य मुस्ताक चाॅदसाब खुरेशी,राजाभाऊ सिद्धेश्वर बर्वे, डॉ. सतीश अरबाड,महादेव दत्ता चव्हाण,बाबासाहेब मरीबा कसबे,प्रकाश दगडूबा शिंदे तसेच सदस्या सौ.मंगल समाधान गायकवाड,सौ.सरस्वती वैजनाथ चौंडे,सौ.अनिता धोंडीराम सुरवसे,सौ.अनुसया सुभाष होनमणे आणि विद्यार्थी प्रतिनिधी कु.हर्षा परमेश्वर पैंजणे आदिसह सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील श्रीहरिकोटा सहलीसाठी शुभकामना व्यक्त होताना दिसत आहेत.

लेक वाचवा लेक शिकवा' 'जाग... एक फेरविचार' लघुपट प्रदर्शित प्राथमिक शिक्षक प्रमोद जाधव यांची प्रमुख भूमिका

'लेक वाचवा लेक शिकवा' 'जाग... एक फेरविचार' लघुपट प्रदर्शित
प्राथमिक शिक्षक प्रमोद जाधव यांची प्रमुख भूमिका

                 सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ तालुक्यातील मौजे वाघलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील प्राथमिक शिक्षक प्रमोद जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला हा 'लेक वाचवा लेक शिकवा' सामाजिक संदेश देणारा 'जाग... एक फेरविचार' लघुपट,दि.०८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त 'लेक वाचवा लेक शिकवा' हा सामाजिक संदेश देणारा लघुपट यु- ट्युबवर प्रदर्शित झाला. स्वयंम माय क्रिएशन निर्मित कथा,पटकथा,संवाद,दिग्दर्शन यशवंत मस्के यांनी केले असून,यात प्रमुख भुमिका जि.प.प्रा.शा.वाघलगाव येथील प्राथमिक शिक्षक प्रमोद जाधव याबरोबर माधुरी चव्हाण,बालकलाकार हिंदवी जाधव सह सुप्रिया दापके,विनोद जाधव,प्रणिता जगताप,मीरा भोसले,स्वराज जाधव,स्वराज जगदाळे यांच्या भुमिका आहेत . (https://youtu.be/EgGmvTQvgdM) या लिंक वर सर्वाना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. या 'लेक वाचवा लेक शिकवा' सामाजिक संदेश देणारा 'जाग... एक फेरविचार' लघुपटाचे व कलाकारांचे शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रा.विठ्ठल भुसारे,उप शिक्षणाधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण,सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका आदिसह मित्र परिवार,सा.सोनपेठ दर्शन परिवार तसेच सर्वस्तरातून कौतुक  केले जात आहे.

Thursday, March 9, 2023

न्याय व्यवस्थेतील दीपस्तंभ :ॲड.दिलीप (मामा) उजगरे

न्याय व्यवस्थेतील दीपस्तंभ :ॲड.दिलीप (मामा) उजगरे


सोनपेठ (दर्शन) :-

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील स्वाभिमानी समाज घडवून त्यांच्या न्याय-हक्कांसाठी लढण्यासाठीच  जीवन समर्पित करणारे विधिज्ञ म्हणजेच आदरणीय ॲड. दिलीप ( मामा)उजगरे. दि.१० मार्च हा त्यांचा वाढदिवस.विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो.परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितले होते की तन-मन-धन समाजाच्या हितासाठी खर्च करा...! डॉ.बाबासाहेबांचा तोच संदेश आमलात आणून ॲड.दिलीप उजगरे मामा  सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.दीन-दलित-दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वत:ला झोकून देवून काम करणारे वकील म्हणून त्यांची ख्याती आहे. ॲड.दिलीप उजगरे यांच्यासारख्या स्वाभिमानी भीम अनुयायांच्या भक्कम साथीमुळेच गोरगरीब लोकांना न्याय मिळत आहे.न्याय व्यवस्था,सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, कृषी, ऐतिहासिक, सांस्कृतिक प्रश्नांची जाण असणारा,
उच्चविद्याविभूषित वकील काय करू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे ॲड.दिलीप (मामा)उजगरे आहेत. 
बुद्ध-शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर-माता रमाई या महामानवांच्या जयंती सोबतच समाजोपयोगी विधायक उपक्रम राबविण्याचा ॲड.उजगरे यांचा मानस आहे. प्रामाणिकपणे काम करणे आणि जिद्द हे आपल्या उत्साहाचे रहस्य असल्याचे सांगतात. काळानुसार बदलले पाहिजे. असे त्यांचे ठाम मत आहे. सोशल मीडियावर ते सक्रिय असतात. सोशल तर मीडियावर त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचा जनसंपर्क खूप दांडगा आहे. सामाजिक व कायदा या दोन्ही क्षेत्रात ॲड.उजगरे मामा यांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते.
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून त्यांनी वकिली व्यवसायात पदार्पण केले.आजपर्यंत त्यांनी असंख्य केस लढल्या. त्यासाठी  त्यांनी प्रचंड संघर्ष करून अफाट मेहनत घेतली. प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी त्यांची धडपड सुरू असते. त्यांच्या अनेक केसेस गाजल्या आहेत. 
विधी क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी आपल्या वकिलीला एक नवा आयाम दिला आहे.सर्वसामान्य माणसाचे हक्काचे वकील अशी त्यांची जनमानसातील प्रतिमा आहे.
 शालेय तसेच महाविद्यालयीन जीवना पासून त्यांना दलित पँथर चळवळीचे आकर्षण होते. त्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन अनेक आंदोलने केली. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील त्यांचे योगदान महत्वपूर्ण  आहे. या कट्टर भीमसैनिकाने  जेलभरो आंदोलनातही सहभाग घेतला होता.राजकीय ऑफर नाकारून या स्वाभिमानी भीमसैनिकाने आपला लढा उभारला आहे. वाचन,लेखन, वक्तृत्व अभिनय, संगीत व गायनाची आवड असल्याने हे सर्व छंद चांगल्या प्रकारे ते जोपासत आहेत.  ह्या मधून त्यांना समाधान मिळते.आम्हा सर्व कलावंतांना नवी ऊर्जा देण्याचं काम ते करत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "मी सांस्कृतिक युद्धावर आहे".हे युद्ध आपणांस कलावंत म्हणून लढायचे आहे आणि तुमच्या सोबतीला मी आहे असा खंबीर पाठिंबा ते आम्हाला देतात. जगातल्या विविध प्रश्नांची उकल ते करतात. आमची विविध सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक प्रश्नांवर चर्चा सुरू असते. मोठा भाऊ या नात्याने ॲड.दिलीप उजगरे मामा आम्हाला अनमोल मार्गदर्शन करतात. ते आमचे दीपस्तंभ आहेत.
 जे अशक्य आहे ते शक्य करण्याचा नेहमीच ते प्रयन्त करतात ” म्हणूनच ते एक सामाजिक योद्धे या नावे ओळखले जातात. ॲड.दिलीप उजगरे  यांच्या सारख्या दिलदार , प्रयन्तवादी, वैचारिक , सामाजिक , व्यक्तीमत्वाचा सहवास आणि मार्गदर्शन आम्हाला मिळते. हे आमचे अहोभाग्यच.माणसाच्या मनात जिद्द असेल, काही सकारात्मक ध्येय असेल, तर तो कधीच थकत नाही, कधीच थांबत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ॲड. दिलीप उजगरे मामा.
 वकील म्हणून जनसेवा करण्याचे कारण, सांगताना ॲड.उजगरे मामा  म्हणतात.."गोरगरिबांच्या वस्तीत आजही गरिबांची मुलं अजाणतेपणे गुन्हेगारीत गोवली जातात. त्यांना माणुसकीच्या नात्याने कायदेशीर सल्ला देणारे कुणीही हक्काचे असे नसते. वस्तीपातळीवरच्या आयाबाया दिवसरात्र राबतात. पण, त्यातल्या कित्येक जणींना घरगुती हिंसेचे बळी व्हावे लागते. या मायभगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी आपण हक्काचा वकील व्हावे,त्यांना मान सन्मान मिळवून द्यावा यासाठीच मी या क्षेत्रात कार्यरत आहे". ॲड.उजगरे मामा यांच्या सारखा कर्तृत्ववान वकील समाजाला लाभला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
 प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणासंदर्भातले, मानवी हक्कासंदर्भातले विचार ते जनमानसात रूजवत असतात. ‘शिका, स्वावलंबी व्हा, आपण सगळे भारतीय आहोत, बाबासाहेबांनी संविधानामध्ये जे हक्क आणि अधिकार आपल्याला दिले आहेत, ते जाणून घ्याच. पण, आपल्यासाठी संविधानामध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत, त्याबाबतही विचार करा,’ अशी मांडणी आपल्या वक्तव्यातून ते सातत्याने करत असतात. वस्तीतील गरजू मुलांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी, त्यांना काही अडीअडचण असेल, तर ती दूर करण्यासाठी ॲड. दिलीप उजगरे सदैव तत्पर असतात.
 विधिज्ञ दिलीप उजगरे म्हणतात की,न्यायाचा समानार्थी शब्दच मुळात 'जयभीम' आहे,हे इथल्या प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे व त्यासाठी कुठलाही पूर्वग्रह मेंदूत न ठेवता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचा प्रत्येक भारतीयाने यथार्थ गौरव केला पाहिजे.सत्याची ताकद, प्रामाणिकपणा, संवेदनशिलता,  तत्वांशी असणारी बांधिलकी काय असते व त्याचा प्रभाव किती असतो हे अनुभवायचे असेल तर विधिज्ञ दिलीप उजगरे यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यांचे वाचन अफाट आहे तेवढाच लोकसंग्रह आहे.ज्येष्ठ पत्रकार-संपादक साहित्यिक रानबा गायकवाड यांच्या समवेत आम्ही कायम विधिज्ञ दिलीप उजगरे यांच्या संपर्क-सानिध्यात असतो आणि समृद्ध होतो.!
 विधिज्ञ ॲड.दिलीप उजगरे म्हणतात,आपली बाजू सत्य असेल व आपण शेवट पर्यंत खंबीर आणि आपल्या मतावर ठाम राहिल्यास आपला विरोधक कितीही शक्तीशाली असला तरी तुम्हांला न्याय मिळवून देण्याची धमक या देशाच्या संविधानात आहे,म्हणजेच “सिर्फ कानून ही मेरा हाथियार है!" असा त्यांना दृढ आत्मविश्वास आहे.
 व्यवस्थेने बहिष्कृत केलेल्या, गावकुसाबाहेर फेकलेल्या इथला मुलनिवासी 'माणूस' समूहासाठी आणि इथल्या 'इंडियातल्या' लोकांसाठी भारतीय संविधानांनुसार कायदा सारखाच आहे हे,हाच संदेश विधिज्ञ ॲड. दिलीप उजगरे मामा आम्हाला देतात.
 व्यवस्थेला भिडणाऱ्या गरीबांच्या मसिहाने अर्थातच सर्वप्रिय सन्मित्र मार्गदर्शक ॲड.दिलीप (मामा) उजगरे यांनी वकील म्हणून अणि सर्वांचा मित्र बनून अमीट असा ठसा उमटवला आहे. तो कायम राहो, त्यांना उत्तम आरोग्य आणि त्यांची मानवतावादी संवेदना लौकिकार्थाने सर्वदूर होवो, हीच सदिच्छा!आदरणीय मामांना जन्मोत्सवाच्या स्वाभिमानी-सम्यक मंगलकामना!
-------------------------------------------------------------
प्रा. डॉ. सिद्धार्थ आबाजी तायडे
(सिने-नाटय लेखक-अभिनेता-दिग्दर्शक-समीक्षक तथा सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचे संशोधक-अभ्यासक)मो.9822836675.
-------------------------------------------------------------

ओबीसींच्या जनजागृती व एकजुटीसाठी प्रबोधन मंडल यात्रेचे सोनपेठ येथे जंगी स्वागत

ओबीसींच्या जनजागृती व एकजुटीसाठी प्रबोधन मंडल यात्रेचे सोनपेठ येथे जंगी स्वागत 

सोनपेठ (प्रतिनिधी) :- 

ओबीसींच्या जनजागृती व एकजुटीसाठी प्रबोधन मंडल यात्रा ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती, परभणी.आयोजित ही यात्रा परभणी जिल्ह्यातील ओबीसी चळवळीच्या इतिहासातील अविस्मरणीय यात्रा ठरणार आहे.या यात्रेचे दि.२८ फेब्रुवारी २०२३ मंगळवार रोजी सोनपेठ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी ठिक ६ वाजता सर्व जातींच्या ओबीसी समाज बांधवांनी यात्रेतील भगवान वाघमारे,स्वराजसिंह परीहार,नाना राऊत,किर्तीकुमार बुरांडे सह अनेक समाज बांधवांचे जंगी स्वागत करण्यात आले व सोनपेठ तालुका संयोजक सुभाषआप्पा नित्रुडकर यांनी आभार व्यक्त केले.ओबीसी आरक्षणाच्या हक्कासाठी काही दिवसापूर्वी परभणी येथे काढण्यात आलेल्या भव्य ओबीसी मोर्चाला जिल्ह्यातील तमाम ओबीसी समाजाने अतिशय भरभरून प्रतिसाद दिला होता.अर्थात तुम्ही सर्वांनी देखील तो मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले होते.आणि त्या सगळ्या अक्रोशाचे फलीत म्हणुन आपले राजकीय आरक्षण आपल्याला पुन्हा परत मिळाले आहे परंतू त्यासाठी नेमण्यात आलेल्या बाटीया आयोगाने नोंदविलेल्या निष्कर्षात आणि गांव पातळीवर माहिती संकलित करणाऱ्या यंत्रनेच्या हातुन जाणीवपूर्वक काही चुका करण्यात आल्या आहेत त्यामुळे ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी दाखवण्यात आली आहे.परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ओबीसींच्या जागांना फटका बसला आहे.पूर्वीच्या जनगणनेत जामची लोकसंख्या ५२% असतांना २०२२ च्या आकडेवारीत ती ३७% कशी दाखवण्यात आली. वास्तविक पाहता पूर्वीच्या लोकसंख्येपेक्षा आत्ताच्या लोकसंख्येत वाढ होने अपेक्षित असताना ती घटली कशी ? हा जवाब आम्हाला शासनाला विचारायचा आहे.त्याच बरोबर ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा ही गेल्या कित्येक दिवसाची आपली मागणी आहे परंतू शासन जाणीवपूर्वक त्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.शासन कोणतेही असो त्यांनी कायम ओबीसींची दिशाभूल करण्याचे आणि त्यांना खेळवत ठेवण्याचेच काम केले आहे.या साऱ्या गोष्टीकडे आता आपल्याला डोळे उघडे ठेऊन पहावे लागणार आहे.जो पर्यंत आपण आपल्या मागण्यांसंदर्भात उग्र होणार नाहीत तोपर्यंत शासन व्यवस्था आपली हेळसांड थांबवणार नाही त्यासाठी आधी आपल्यातील विखुरलेल्या शक्तीला एकत्र करून परस्परात एकजुटीची भावना निर्माण करुन खालील जिव्हाळ्यांच्या मागण्यांसंदर्भात आपल्या ओबीसी बांधवात जनजागृती करावी या उदात्त हेतूने ही प्रबोधन मंडल यात्रा काढण्यात आली आहे.सदर मंडल यात्रा परमणी जिल्हातील सर्व तालुके आणि त्या मार्गावरील मोठ्या गावावरून जाणार आहे. ही यात्रा परभणी जिल्ह्यातील ओबीसी चळवळीच्या इतिहासातील अविस्मरणीय यात्रा ठरणार आहे.या यात्रेचे स्वागत सोनपेठ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रांगोळी तुन सुस्वागतम, यात्रेतील सहभागी सर्व समाज बांधव यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत तर रथास सोनपेठ संयोजक सुभाषआप्पा नित्रुडकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले.मागण्या (१) ओबीसीचे संपूर्ण आरक्षण कायम ठेवा.२) ओबीसींची जातनिहाय जनगणना करा.३) मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागु करा.४) बाटीया आयोगासाठी संकलित केलेल्या माहितीची सत्यता तपासा.घोषणा देऊन परीसर दणाणून सोडला यामध्ये सर्व जातींच्या ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या सर्वांचे आभार सोनपेठ तालुका संयोजक सुभाषआप्पा नित्रुडकर यांनी व्यक्त केले.याप्रसंगी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.