Monday, September 12, 2022

आदर्श गणेश मंडळात मोरया प्रथम,अष्टविनायक द्वितीय तर सोमेश्वर तृतीय

आदर्श गणेश मंडळात मोरया प्रथम,अष्टविनायक द्वितीय तर सोमेश्वर तृतीय 


सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथे यावर्षीपासून पहिल्यांदाच उत्कृष्ट गणेश मंडळांना बक्षीस जाहीर करण्यात आले यामध्ये पहिल्याच वर्षी मोरया गणेश मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला असून द्वितीय क्रमांकावर अष्टविनायक गणेश मंडळ तर तृतीय क्रमांक सोमेश्वर गणेश मंडळ यांनी मिळवला आहे.
        पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत तहसीलदार सारंग चव्हाण यांनी उत्कृष्ट गणेश मंडळांना यावर्षी पहिल्यांदाच बक्षिसे जाहीर केली होती. यानुसार सोनपेठ शहरात 26 गणेश मंडळांनी सोनपेठ पोलीस स्टेशन कडे अधिकृत नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या 26 गणेश मंडळाची तहसीलच्या पथकामार्फत तपासणी करण्यात आली होती. यामधून सोनपेठ शहरातील शारदा नगर येथील मोरया गणेश मंडळांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले तसेच मिरवणूक ही यशस्वीरित्या पूर्ण केल्याने मोरया गणेश मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला असून द्वितीय क्रमांक सारडा गल्ली येथील अष्टविनायक गणेश मंडळाने तर तृतीय क्रमांक दहीखेड येथील सोमेश्वर गणेश मंडळाने मिळवला आहे. लवकरच या तीनही गणेश मंडळांना पारितोषिकाचे वितरण करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सारंग चव्हाण, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment