Wednesday, September 28, 2022

गुढघे दुःखी पासून मुक्ती साठी रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोनपेठ आयोजित शिबीरात सहभाग नोंदवा

गुढघे दुःखी पासून मुक्ती साठी रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोनपेठ आयोजित शिबीरात सहभाग नोंदवा
सोनपेठ (दर्शन) :-

रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोनपेठ सिटी यांच्या व डॉ. राममनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्था राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ( भव्य रोग निदान शिबिर ) गुढघे दुखी व कमर दुखी उपचार बिना आपरेशन जर्मन टेक्नालजी व १००% गॅरंटी आपल्या शहरात प्रथमच दिनांक : 3, 4, 5, 6, 7 व 8 ऑक्टोबर सोमवार पासुन वेळ : दररोज सकाळी 9.00 ते दु. 01, सायं. 3 ते 8 आता गुढघे (साधेरोपण) बदलण्याची आवशक्ता नाही उपचार थेरेपी * न्युरोथेरेपी * व्हाईब्रेट थेरेपी * फायर व्हॅक्युम (कप्पींग) नोंदणी फ्रिस रु.200/- 6 दिवसाकरीता शिबीराचा पत्ता :- छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतीक सभागृह,सोनपेठ (जुने पोलीस स्टेशन जवळ) तज्ञ डॉक्टर डॉ. आर. के. मिठीया (MPT) 9898526009.डॉ. विक्रम मशाल (Neurotherpist) 7688800686.अधिक माहितीसाठी संपर्क प्रदिप गायकवाड 8888454595. लिंबाजी कागदे 9730783097.संतोष रनखांब 7972047033.


Monday, September 26, 2022

जिल्ह्यातील सर्व शाळांनी तंबाखू मुक्त व कोटपा कायदा 2003 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी आंचल गोयल

जिल्ह्यातील सर्व शाळांनी तंबाखू मुक्त व कोटपा कायदा 2003 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी आंचल गोयल


परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 

तंबाखू मुक्त शाळांचे 9 निकष या प्रमाणे सर्व शाळांनी आपापल्या शाळा तंबाखू मुक्त कराव्यात तसेच पोलीस विभाग, अन्न व औषध प्रशासन व  राष्ट्रीय तंबाखू नियत्रंण कार्यक्रम यांनी कोटपा कायदा 2003  ची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समन्वय समितीची त्रेमासिक बैठक जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास जगताप, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. जयश्री यादव, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नारायण सरकटे, महानगरपालीकेचे वैद्यकीय अधिकारी  डॉ. कल्पना सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल म्हणाल्या की, जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोटपा कायद्याचे उल्लंघन होत असेल, तिथे कडक कार्यवाही करावी. प्रत्येक तालुक्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची तालुकास्तरीय समन्वय समिती स्थापन करुन प्रत्येक तालुक्यात कोटपा कायद्याची अंमलबजवणी करण्यासाठी पथक स्थापन करावे . तसेच कोटपा कायदा 2003 चे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करावी. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व पोलीस अधिकारी यांची कार्यशाळा आयोजीत करावे अशा सूचनाही  जिल्हाधिकरी आंचल गोयल यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी महानगरपालीका यांच्याकडील घंटा गाडीवर तंबाखू विरोधी जन जागृतीच्या ऑडिओ क्लिप द्वारे जनजागृती करण्याच्या सूचनाही दिल्या.
यावेळी मागील एप्रिल ते ऑगस्ट 2022 या कालावधीत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,जिल्हा सामान्य रुग्णालयाचे मानस तज्ज्ञ केशव गव्हाणे यांनी झालेल्या कामाची माहिती सादर केली. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबादचे अभिजीत संघई यांची तंबाखू मुक्त शाळा याबाबतच्या 9 निकष बदल माहिती सांगितली.
यावेळी अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. जी. के. सिरसूलवार, गट विकास अधिकारी एस.आर.कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.एम.सोनवणे, पोलीस उपनिरिक्षक वेंकट कुसाने, शिक्षणाधिकारी (प्रा.) विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी (मा.) आशा गरूड, जिल्हा कामगार अधिकारी  व्ही. एन. मानगावकर,  जिल्हा कार्यक्रम समन्वयक एन. सी. डी. पांडुरंग अवचार यांचीही उपस्थिती होती.

Friday, September 16, 2022

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथे प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे आयोजन

                                                           
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथे प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे आयोजन


परभणी / सोनपेठ (दर्शन) : -

 राज्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवक युवतींसाठी खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे "कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत" मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त "प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे दि. 17 व 18 सप्टेंबर 2022 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे आयोजन करण्यात आलेले आहे. 
या महारोजगार मेळाव्याव्दारे बजाज ऑटो, नवभारत फर्टीलायझर, अजंता फार्मा, एनआरबी बेअरिंग्स, अजित सीडस, फोर्ब्स, धूत ट्रान्समिशन, इंडयुरंस टेक्नोलॉजी, व्हॅराक इंजिनिअरींग, देवगिरी फोर्जींग्स, रुचा इंजिनिअर्स, श्री सेवा कॉम्प्युटर्स, परम स्किल्स, नील मेटल, मराठवाडा ऑटो कॉम्पो, पिट्टी इंजिनिअरींग अशा विविध नामांकित कंपन्यांमधील विविध पदांच्या 5 हजार पेक्षा अधिक जागा भरण्यात येणार आहेत. महारोजगार मेळाव्यास सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी पुढीलप्रमाणे सहभाग नोंदवावा. 
सर्वप्रथम www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोकरी साधक (Job Seeker) म्हणून नोंदणी करणे. वेबसाईटवरील नोकरी साधक (Job Seeker) या पर्यायावर क्लिक करणे. युजर आयडी व पासवर्ड चा वापर करुन login या पर्यायावर क्लिक करणे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायावर क्लिक करणे. औरंगाबाद जिल्हा निवडून Filter या बटणावर क्लिक करावे. आपल्याला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमीत्त आयोजित रोजगार मेळावा दिसू लागेल. त्यातील Action या पर्यायावरील View Details या बटणवर क्लिक केल्यावर मेळाव्यास उपलब्ध रिक्त पदे दिसतील list of Vacancy या बटणावर क्लि करुन शैक्षणिक पात्रतेनुसार Apply करावे. आपल्याला एक संदेश दिसेल. सदर संदेश काळजी पूर्वक वाचा व Ok बटनावर क्लिक करावे, आपला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदविला आहे अशा प्रकारचा संदेश दिसू लागेल. ऑनलाईन Apply केलेल्या प्रतीसहीत मुलाखतीसाठी स्वखर्चाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद येथे उपस्थित राहावे. जिल्हयातील जास्तीत जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी सदर प्रधानमंत्री महारोजगार मेळाव्यास सहभाग नोंदवावा असे आवाहन प्र. सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, परभणी यांनी केले आहे. 

राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांचा परभणी जिल्हा दौरा

राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांचा परभणी जिल्हा दौरा

परभणी / सोनपेठ (दर्शन) : - 
महाराष्ट्र राज्याच्या सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे हे दि. 16 व 17 सप्टेंबर, 2022 रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असणार आहे. शुक्रवार, दि. 16 सप्टेंबर, 2022 रोजी रात्री 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, परभणी येथे आगमन व मुक्काम. 
                                   तसेच शनिवार, दि. 17 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 8.40 वाजता शासकीय विश्रामगृह, परभणी येथून राजगोपालचारी उद्यान येथे प्रयाण करतील. सकाळी 08.45 वाजता राजगोपालचारी उद्यान येथे आगमन. सकाळी 09.00 वाजता मराठवाडा मुक्ती संग्रामदिन ध्वजारोहणाकरिता उपस्थित राहतील. सकाळी 09.10 ते 09.20 स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान त्यांची वीर शौर्य पत्नी, वारस व उपस्थितीत नागरीकांची भेट घेतील. सकाळी 10.00 वाजता सोईनूसार औरंगाबादकडे प्रयाण करतील.
 

Thursday, September 15, 2022

सोनपेठ शहरातील भुरट्या चोर्या व घरफोडी करणारे दोघे ताब्यात परभणी पोलीसांची कारवाई

सोनपेठ शहरातील भुरट्या चोर्या व घरफोडी करणारे दोघे ताब्यात परभणी पोलीसांची कारवाई



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील भुरट्या चोर्या व घरफोडी करणारे दोघे ताब्यात परभणी पोलीसांच्या पथकाने केली विषेश कारवाई.सोनपेठ शहरात १२ सप्टेंबर रोजी झालेल्या सराफा दुकानातील ८ लाख २५ हजार २७३ रुपये किंमतीचे सोने लंपास झालेल्या गुन्ह्याची उकल झाली आहे. ही कारवाई परभणी पोलीसांच्या पथकाने केली.
कैलास सखाराम पवार (रा.लिंबा ता.पाथरी), अदिनाथ आसाराम कदम ( रा. बाभुळगाव ता. पाथरी) असे ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची नावे आहेत. मागील काही दिवसात सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हदित चोरी, घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तैनात करण्यात आले. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलीसांनी तपास करत यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यासाठी वापरलेले साहित्य आणि चोरीतील काही मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. एकूण ३ प्रकरणाची उकल करण्यात पोलीसांना यश आले आहे. या आरोपींनी परभणी बरोबरच बीड जिल्ह्यात देखील गुन्हे केले आहेत. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप निलपत्रेवार यांनी विशेष परिश्रम घेतले तर सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा, स्थागुशाचे पोनि वसंत चव्हाण, पोउपनि मारोती चव्हाण, साईनाथ पुड, नागनाथ तुकडे, पोलीस कर्मचारी बाळासाहेब तुपसुंदरे, सय्यद मोबीन, दिलावर खान, हरीचंद्र खुपसे,सिध्देश्वर चाटे, मधुकर ढवळे, परसोडे, जाधव, किशोर चव्हाण, पौळ, दुबे, गायकवाड, सातपुते, घुगे, कांबळे, शेटे, शिरसाठ, इमरान, हनुमंत पौळ, सायबर सेलचे बालाजी रेडी, गणेश कौटकर, राजेश आगाशे यांच्या पथकाने केली.

Monday, September 12, 2022

आदर्श गणेश मंडळात मोरया प्रथम,अष्टविनायक द्वितीय तर सोमेश्वर तृतीय

आदर्श गणेश मंडळात मोरया प्रथम,अष्टविनायक द्वितीय तर सोमेश्वर तृतीय 


सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथे यावर्षीपासून पहिल्यांदाच उत्कृष्ट गणेश मंडळांना बक्षीस जाहीर करण्यात आले यामध्ये पहिल्याच वर्षी मोरया गणेश मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला असून द्वितीय क्रमांकावर अष्टविनायक गणेश मंडळ तर तृतीय क्रमांक सोमेश्वर गणेश मंडळ यांनी मिळवला आहे.
        पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत तहसीलदार सारंग चव्हाण यांनी उत्कृष्ट गणेश मंडळांना यावर्षी पहिल्यांदाच बक्षिसे जाहीर केली होती. यानुसार सोनपेठ शहरात 26 गणेश मंडळांनी सोनपेठ पोलीस स्टेशन कडे अधिकृत नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या 26 गणेश मंडळाची तहसीलच्या पथकामार्फत तपासणी करण्यात आली होती. यामधून सोनपेठ शहरातील शारदा नगर येथील मोरया गणेश मंडळांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले तसेच मिरवणूक ही यशस्वीरित्या पूर्ण केल्याने मोरया गणेश मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला असून द्वितीय क्रमांक सारडा गल्ली येथील अष्टविनायक गणेश मंडळाने तर तृतीय क्रमांक दहीखेड येथील सोमेश्वर गणेश मंडळाने मिळवला आहे. लवकरच या तीनही गणेश मंडळांना पारितोषिकाचे वितरण करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सारंग चव्हाण, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी सांगितले.

Sunday, September 11, 2022

सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस म्हणजे अंधेर नगरी अनबुझ रजा - प्रभाकर शिरसाट

सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस म्हणजे अंधेर नगरी अनबुझ रजा - प्रभाकर शिरसाट 




सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ चा भ्रष्टाचारी राक्षस हा सोनपेठ ला लुटण्यासाठी आसुसलेला व निवडून येण्यासाठी शासनाच्या योजनांची कशी वासलात लावतो व सत्तेचा  गैरवापर किती व कसा करतो ते या प्रमाणे......
सोनपेठ शहराची लोकसंख्या ही जवळपास सोळा हजार च्या आत आहे व सोनपेठ शहरामध्ये एकूण घरे इमारती यांची मालमत्ता ही तीन हजार ते साडे तीन हजार आहे,
भ्रष्टाचारी राक्षसाने सोनपेठ शहरासाठी पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत तीन हजार घरकुले मंजूर करून घेतली आहेत,म्हणजे या तीन हजार घरकुलां मध्ये पति पत्नी व दोन मुले राहणार असे गृहीत जरी धरले तर या घरकुल मध्ये राहणाऱ्या नागरिकांची  लोकसंख्या ही जवळपास बारा हजार होते म्हणजे सोनपेठ शहरातील एकूण 16 हजार लोक संख्या पैकी 12 हजार नागरीक हे घरकूल योजने तील घरामध्ये राहतील व उर्वरित 4 हजार नागरीक हे सोनपेठ शहरातील जी घरे व बहुमजली इमारती आहेत या मध्ये प्रत्येकी एका ईमारती मध्ये व  प्रत्येकी एका घरामध्ये एक नागरीक या प्रमाणे राहतात असे आपण समजू या
म्हणजे सोनपेठ शहरांमध्ये प्रत्यक्षात तीन ते साडेतीन हजार घरे व ईमारती असताना बारा हजार नागरीक हे बेघर दाखवून भ्रष्टाचारी राक्षसाने तीन हजार घरकुले मंजूर करून आणली आहेत हे केवळ येणाऱ्या निवडणूकीत निवडून येण्यासाठी केलेले आहे,या तीन हजार घरकुला पैकी सहाशे घरकुले ही बोगस लाभार्थी यांचे नावावर आहेत हे विशेष होय,सोनपेठ शहरामध्ये स्ट्रीट लाईट ही दिवस रात्र चालू आहे यामुळे नगर परिषदेला दर वर्षी 30लाखा पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे ही दिवसाची स्ट्रीट लाईट बंद करण्यासाठी संपुर्ण सोनपेठ शहरातीलप्रत्येक विद्युत खांब्या वर एक तार गेल्या बावीस वर्षापासून भ्रष्टाचारी राक्षसाला ओढता आली नाही किती हा विकास म्हणावा लागेल,सोनपेठ शहरामध्ये दहिखेड सोमेश्वर मंदिर जवळ जी दोन सभागृहे बांधली आहेत ती जनतेसाठी खुली केली आहेत परंतू ती अजूनही नगर परिषदेकडे हस्तांतरण केली नाहीत,सोणखेड येथील शादी खाना व भोई समाजासाठी बांधलेले सभा गृह हे जनतेसाठी खुले केलेले आहे परंतू ही दोन्ही सभागृहे अजुनही नगर परिषदेकडे हस्तांतरण केली नाहीत म्हणजे ही सर्व सभागृहे ही कंत्राटदार यांचे हातावर आहेत या सर्व सभागृहाची बांधकामे ही नाममात्र कंत्राट दार यांचे नावावर होती परंतु प्रत्यक्षात ही सर्व कामे भ्रष्टाचारी राक्षसाचे कंत्राटी टीमने केली आहेत व या कामांची चौकशी झाली तर आपण अडचणीत येवू शकतो म्हणून ही सर्व सभागृहे नगरपरिषद कडे हस्तांतरित केली नाहीत, सोनखेड शादी खाना येथील रूपये किमतीचा जनरेटर मंजुर झालेला असताना तो आजही गायब आहे अनेकसभागृहाना रंग रांगोटी केली नाही अनेक सभागृहा मध्ये विद्युत पुरवठ्यासाठी निधि मंजूर असताना अद्याप ही विद्युत करण झाले नाही याचा निधी कोणी गायब केला हे वेगळे सांगण्याची गरज नाही या सर्व प्रकरणी  भ्रष्टाचारी राक्षसाने स्वतःचा बचाव करण्यासाठी मोठी चालाखी केली आहे,भ्रष्टाचारी राक्षसाने सन 2001ते सन 2022पर्यंतची विकास कामांची कागद पत्रे म्हणजे प्रत्येक विकास कामांची प्रशासकीय मान्यता तांत्रीक मान्यता कार्यारंभ आदेश उप योजिता प्रमाण पत्रे अनेक कामांची देयके नष्ट केली आहेत,भ्रष्टाचारी राक्षस म्हणजे अंधेर नगरी अनबुझ राजा या कथेतील खरा राजा असावा असे त्याने गेल्या बावीस वर्षा मध्ये वर्तन केले आहे
धन्यवाद
आपला
प्रभाकर शिरसाट.
सामाजिक कार्यकर्ते तथा 
जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सदस्य परभणी.

Wednesday, September 7, 2022

निट परिक्षेत करण बालासाहेब काळे व अविनाश तुकाराम तळेकर यांचें घवघवीत यश

निट परिक्षेत करण बालासाहेब काळे व अविनाश तुकाराम तळेकर यांचें घवघवीत यश

चि.करण बालासाहेब काळे

चि.अविनाश तुकाराम तळेकर 

सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ शहरातील कै.र.व. कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी  तसेच जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेचे विद्यार्थी कै.र.व.वरिष्ठ महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रा.बालासाहेब काळे व लिपिक तुकाराम तळेकर यांचें चिरंजीव अनुक्रमे चि.करण बालासाहेब काळे यांनी निट परिक्षेत 720 पैकी 610 मार्क मिळवणं तर चि.अविनाश तुकाराम तळेकर यांनी‌ निट परिक्षेत 720पैकी 590 मार्क मिळवत घवघवीत यश संपादन केल्या बद्दल संस्था अध्यक्ष परमेश्वर कदम, उपाध्यक्षा सौ.ज्योतीताई कदम, संचालक रामेश्वर कदम, प्राचार्य डॉ वसंत सातपुते, प्राचार्या डॉ.शेख शकीला,सर्व संचालक मंडळ,सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मित्र परिवार, नातेवाईक पालक, शिक्षक , सोनपेठ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच सर्व पत्रकार बांधव , केशव भोसले, मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड, सा.सोनपेठ दर्शन संपादक तथा अध्यक्ष जि.प.कें.कन्या शाळा किरण स्वामी व परिवार यांच्या वतीने तसेच सर्वस्तरातून करण काळे व अविनाश तळेकर यांचें अभिनंदन तसेच पुढिल वाटचालीस शुभेच्छा व्यक्त होताना दिसत आहेत.

केंद्रीय कन्या प्राथमिक शाळा ताडकळस येथे रसायनशास्त्रज्ञ फेडरिक ऑगस्ट केकुले यांची जयंती साजरी

केंद्रीय कन्या प्राथमिक शाळा ताडकळस येथे रसायनशास्त्रज्ञ फेडरिक ऑगस्ट केकुले यांची जयंती साजरी

 पुर्णा / सोनपेठ (दर्शन) :-
पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील जिल्हा परिषद गुणवत्ता कक्ष अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या विविध कार्यक्रमातील थोर शास्त्रज्ञ फेड्रिक केकुले यांची जयंती केंद्रीय कन्या प्राथमिक शाळेत साजरी करण्यात आली. दिनांक 7 सप्टेंबर 2022 बुधवार रोजी केंद्रीय कन्या प्राथमिक शाळा ताडकळस येथे रसायनशास्त्रज्ञ फेडरिक ऑगस्ट केकुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी इयत्ता पाचवी मधील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे श्री आनंद कांबळे सरांच्या व मार्गदर्शिका शिक्षिका सौ अर्चना पुणेकर मॅडम यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. याप्रसंगी शास्त्रज्ञ फेड्रीक केकुले व बेंजीन या संयोगांबद्दल सौ .सारिका गिरी मॅडम यांनी माहिती सांगितली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका सौ अपर्णा पंडित व सौ राशद शेख मॅडम , श्री संजय सोनकांबळे श्री झहीर पठाण यांनी प्रयत्न केले.मुख्याध्यापक श्री राजकुमार भाग्यवंत यांनी शुभेच्छा दिल्या. 

Tuesday, September 6, 2022

फुलकळस केंद्रांतर्गत सर जॉन डाल्टन यांची जयंती उत्साहात साजरी

फुलकळस केंद्रांतर्गत सर जॉन डाल्टन यांची जयंती उत्साहात साजरी

पुर्णा / सोनपेठ (दर्शन) :-

पूर्णा तालुक्यातील फुलकळस केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खडाळा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लिमला, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कमलापूर,आणि प्राथमिक शाळा ईटलापूर माळी येथे सर रसायनशास्त्राचे थोर शास्त्रज्ञ
 सर जॉन डाल्टन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
 याबाबतची सविस्तर वृत्त असे की, मा. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
 मा.शिवानंद टाकसाळे यांच्या प्रेरणेतून, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली चला करूया शास्त्रज्ञांची जयंती साजरी या उपक्रमांतर्गत आज थोर शास्त्रज्ञ सर जॉन डाल्टन यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यात लिमला शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता डिग्रसकर, पदवीधर शिक्षक गंगाधर काकडे ,तुकाराम काशीकर,  सुनीता भेटे, व अर्चना पौळ. खडाळा शाळेतील मुख्याध्यापक नागनाथ नागरगोजे, शास्त्रज्ञ जयंती प्रमुख प्रल्हाद राठोड ,ज्ञानेश्वर साखरे, वर्षा पाटील राहुल काऊतकर, पांडुरंग मोरे, कैलास सुरवसे. ईठलापुर माळी येथे गोविंद कामुलवार,ओम धूळशेट्टे कमलापूर येथे विज्ञान शिक्षक महेश जाधव, मुख्याध्यापक बापूराव पलये , संतोष रत्नपारखे, नितीन चौकेवार, दत्ता अबुज, सचिन राठोड, शेख कलीम आदींची उपस्थिती होती.

Monday, September 5, 2022

केंद्रीय कन्या प्राथमिक शाळा ताडकळस येथे शिक्षक दिन तथा मेजर धनसिंह थापा स्मृती दिन साजरा

केंद्रीय कन्या प्राथमिक शाळा ताडकळस येथे शिक्षक दिन तथा मेजर धनसिंह थापा स्मृती दिन साजरा


पुर्णा / सोनपेठ (दर्शन):-

    पुर्णा तालुक्यातील केंद्रीय कन्या प्राथमिक शाळा ताडकळस येथे शिक्षक दिन व मेजर धन सिंग थापा यांचा स्मृतिदिन व शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भाग्यवंत सर व प्रमुख पाहुणे म्हणून श्री अंगद भालेराव सर उपस्थित होते, याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका गिरी मॅडम यांनी केले,तथा परमवीर चक्र व मेजर धनसिंह थापा यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. याप्रसंगी सौ.पंडित मॅडम,व श्री भाग्यवंत सर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले,याप्रसंगी श्री संजय सोनकांबळे सर यांच्या तर्फे मुलींना केळीचे वाटप करण्यात आले.

Sunday, September 4, 2022

सोनपेठ तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षक श्रीमती रंजना डोंगरे के.प्रा.शा.सोनपेठ व राम आत्राम जि.प.प्रशाला शेळगाव

सोनपेठ तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षक श्रीमती रंजना डोंगरे के.प्रा.शा.सोनपेठ व राम आत्राम जि.प.प्रशाला शेळगाव

सोनपेठ (दर्शन) :-

परभणी जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षक म्हणून दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय  कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना जिल्हास्तरावर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दिला जातो. २०२२ - २३ यावर्षी  देखील जिल्ह्यातील ११ जिल्हा परिषद शिक्षकांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिली आहे.
       मुख्य कार्यकारी आधिकारी यांच्या मार्गदर्शनात आणि पारदर्शक झालेल्या निवड प्रक्रियेत जिल्हा परिषद शाळेतील ९ प्राथमिक शिक्षक आणि २ माध्यमिक शिक्षक अशा एकूण ११ उत्कृष्ट शिक्षकांच्या निवडी करण्यात आल्या असून सोनपेठ तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षक श्रीमती रंजना डोंगरे के.प्रा.शा.सोनपेठ व राम आत्राम जि.प.प्रशाला शेळगाव असे आहेत सदर शिक्षकांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  
         परभणी जिल्ह्यातील या शिक्षकांना मिळणार उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार १.दत्तात्रय दिगंबरबुवा परबत (प्रा.शा. भेंडेवाडी. ता.गंगाखेड), २.शेख इकबाल इस्माईल (प्रा.शा.चारठाणा - उर्दू ता.जिंतूर), ३.मायादेवी अंकुश गायकवाड (प्रा.शा.उक्कलगाव ता.मानवत), ४.सुभाष मोतीराम चव्हाण (प्रा.शा.वाडी खु. ता. पालम), ५ सुधाकर अशोकराव गायकवाड (प्रा.शा.पिंपरी देशमुख ता. परभणी), ६.सोमनाथ पंडितराव डोंगरे (प्रा.शा.माळीवाडा. ता. पाथरी), ७.आबनराव भावराव पारवे (प्रा.शा.फुकटगाव ता. पूर्णा), ८.पद्माकर बाबुराव गौंडगे (प्रा.शा.देऊळगाव गात ता सेलू). ९.श्रीमती रंजना बलभिम डोंगरे (के.प्रा.शा.सोनपेठ ता.सोनपेठ), माध्यमिक शिक्षक १०. प्रतिमा विठ्ठलराव वाव्हुळे (जि. प. जांब ता. परभणी) ११.राम परसराम आत्राम (जि.प. प्रशाला शेळगाव ता. सोनपेठ) अशा ११ शिक्षकांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.
      उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी तालुका स्तरावरून प्रस्ताव मागविले जातात यामधून प्राप्त प्रस्तावांपैकी  प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड केली जाते. सन २०२२-२३ या वर्षीच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक शिक्षक १.जिंतूर - ७, २.सेलू - ३, ३.मानवत - २. ४. पाथरी - १. ५.सोनपेठ - ३. ६.गंगाखेड - ३. ७.पालम - १. ८.पूर्णा - ४. ९.परभणी - ६ तर माध्यमिक शिक्षका मधून परभणी व सोनपेठ तालुक्यातून प्रत्येकी एक या प्रमाणे प्रस्ताव प्राप्त झाले होते.
      अशी केली निवड समितीने उत्कृष्ट शिक्षकांची निवड पठाण शौकत उपशिक्षणाधिकारी परभणी यांच्या अध्यक्षतेखाली छाणणी समितीचे गठण करुन प्राप्त सर्व प्रस्तावांची छाननी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी मा. शिक्षणाधिकारी प्रा.या चार सदस्यीय समिती मार्फत प्रत्येकी १० गुणांच्या मर्यादेत  गुणांकन करुन एकुण ४० गुणांपैकी सर्वाधिक गुणप्राप्त उत्कृष्ट शिक्षकांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. 
      सीईओ यांच्या विशेष निगराणीत केवळ गुणवत्तेच्या आधारे वस्तूनिष्ठ व पारदर्शक पद्धतीने करण्यात आलेल्या उत्कृष्ट शिक्षक निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निश्चित  केलेल्या नविन मानांकनामुळे ही उत्कृष्ट शिक्षकांची निवड पारदर्शक झाल्याचे बोलले जात आहे. दि. ९ सप्टेंबर २०२२ रोजी निवड समिती आणि शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार संबंधित ११ उत्कृष्ट शिक्षकांचा जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी दिली आहे.
         सोनपेठ तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षक श्रीमती रंजना डोंगरे व राम आत्राम यांच्या निवडीचे तहसीलदार सारंग चव्हाण, गट विकास अधिकारी मधुकर कदम, गट शिक्षणाधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी शौकत पठाण, तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षिका मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी, उपाध्यक्षा सर्व सदस्य व सदस्या शालेय व्यवस्थापन समिती केंद्रीय कन्या शाळा तसेच सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.