वैदिक पाठशाळेतून आचारसंपन्न आणि धर्मनिष्ठ जंगम पुरोहित उद्याच्या समाजाला मिळतील - पं.शिवाप्पा खके
पाथरी येथील श्री कांच बसवेश्वर मठामध्ये स्थापन करण्यात आलेल्या वैदिक पाठशाळेतून आचारसंपन्न आणि धर्मनिष्ठ जंगम पुरोहित उद्याच्या वीरशैव समाजाला मिळतील असा विश्वास संत साहित्याचे अभ्यासक, संस्कृत विशारद पं. शिवाप्पा खके यांची व्यक्त केला.सोमवार दि. ७ फेब्रुवारी रोजी वीरशैव समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या पाथरी येथील श्री कांचबसवेश्वर मठामध्ये विद्यमान मठाधिपती श्रीगुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या श्रीगुरू कंच बसवेश्वर वैदिक पाठशाळेचा शुभारंभ पं. शिवाप्पा खके यांचे हस्ते करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर मठाचे विद्यमान आचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीगुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज, पं. शिवाप्पा खके,पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन उंबरकर, श्री प्रभु प्रसाद माध्यम समुहाचे संपादक परमेश्वर लांडगे, वे.मू. गंगाधर शास्त्री, राजू पामे यांची उपस्थिती होती.
दीप प्रज्वलानाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. प्रारंभी लिं. शिवकुमारस्वामी यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करून, स्वरसाम्राज्ञी स्व. लतादिदी मंगेशकर यांना दोन मिनीटे स्तब्ध राहून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वे.मू. गंगाधर शास्त्री यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी वीरशैव समाजाचा महत्वपूर्ण घटक असलेल्या जंगम समाजासाठी वैदिक पाठशाळेची नितांत आवश्यकता असल्याचे सांगीतले.
पुढे बोलतांना पं. शिवाप्पा खके यांनी अशा प्रकारची वैदिक पाठशाळा चालवताना येणार्या अडचणी प्रामुख्याने मांडत त्यावर मात कशी करायची या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात पाथरी मठाचे मठाधिपती श्रीगुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज यांनी मठामध्ये वैदिक पाठशाळा सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ठ केली. कोणत्याही स्थितीत ही पाठशाळा बंद पडणार नाही असे आश्वसन देतांना, श्रीगुरू काशीनाथ शिवाचार्य म्हणाले, या पाठशाळेतून केवळ वेदाध्यायनच नव्हे तर सांप्रदायिक शिक्षण, ज्योतिषशास्त्र, संगीतशास्त्र आदी विषय देखील अतिशय गंभीरतेन हाताळले जाणार असून भविष्यात पाथरीच्या या वैदिक पाठशाळेतून बाहेर पडलेला विद्यार्थी हा आचारसंपन्न, धर्मनिष्ठ आणि एक आदर्श नागरिक म्हणून लौकिकास पात्र होईल असा विश्वासही व्यक्त केला.या समारोहाच्या औचित्याने श्री प्रभु प्रसाद मासिकाच्या वतीने संपादक परमेश्वर लांडगे यांनी श्रीगुरू पाथरीकर महाराजांना लिहिलेल्या संपादकीय पत्राचे वाचन या वेळी करण्यात आले. वीरभद्र हुले सर यांनी सदरील पत्राचे वाचन करून वैदिक पाठशाळेबाबतची श्री प्रभु प्रसाद माध्यम समुहाची भूमिका स्पष्ट केली.सुमारे २ तास चालू असलेल्या या उद्घाटन सोहळ्यास पाथरी सह मानवत, गुंज, लिंबा आदी परिसरातून दोनशे पेक्षा अधिक समाज बांधवांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शांतलिंगअप्पा काळे सर यांनी केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.