Wednesday, July 23, 2025

वीरशैव आणि लिंगायत एकच : जगद्गुरू पंचाचार्य म्हणतात जाती जन्माने नव्हे तर व्यवसायाने

वीरशैव आणि लिंगायत एकच : जगद्गुरू पंचाचार्य म्हणतात जाती जन्माने नव्हे तर व्यवसायाने 
दावणगिरी (कर्नाटक)/महाराष्ट्र/छत्रपती संभाजीनगर/परभणी/सोनपेठ (दर्शन संपादक किरण रमेश स्वामी यांचेकडून) : - श्रीजगद्गुरू पंचाचार्य सनातन हिंदू वीरशैव धर्माचे संस्थापक आहेत. या धर्माचे तत्त्वज्ञान आणि नीती नियम सांगण्यासाठी यांचे देशामध्ये निरंतर परिभ्रमण असते. काही विशिष्ट वेळी निर्णय घेण्यासाठी पाचही जगद्गुरू एकत्र येण्याची परंपरा आहे. १९१८ साली जगद्गुरू पंचाचार्यांचे संमेलन काशी क्षेत्रात संपन्न झाले होते. त्यावेळी अनेक विषयांवर निर्णय झाले होते. यातील मुख्य निर्णय म्हणजे एक पीठ आणि मठावर पूर्वी दोन शिवाचार्य असायचे. एक शिवाचार्य मठ/ पीठात राहून मठाची व्यवस्था पाहायचे. दुसरे शिवाचार्य धर्मप्रचारासाठी सर्वत्र भ्रमण करायचे. दोन शिवाचार्य असल्यामुळे मठाचा कारभार पाहताना काही अडचणी यायच्या. यासाठी पाच जगद्गुरूंनी एकत्र येऊन निर्णय घेतला. याच्यापुढे दोन अधिकारी नेमण्याऐवजी एकच अधिकारी नेमायचे आणि त्यांना दोन्ही अधिकार द्यायचे. तेव्हापासून एका गादीवर एकच अधिकारी पीठ किंवा मठ सांभाळतात. पाच जगद्गुरू एकत्र येऊन निर्णय घेण्याची ही परंपरा पुढेही सुरूच राहिली. १९०९ पासून २००९ पर्यंत पंचाचार्य एकत्र येणे, सभा संमेलने घेणे, पंचाचार्य युगमानोत्सव घेणे असे कार्यक्रम सुरू होते. २००९ मध्ये जगद्गुरू पंचाचार्य संमेलन, जगद्गुरू पंचाचार्य युगमानोत्सव समारंभ पुण्यात झाला होता. पिंपरी चिंचवडचे महेश स्वामी यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. थोर उद्योजक बाबा कल्याणी हे स्वतः उपस्थित होते. महाराष्ट्र वीरशैव सभेचाही सहभाग होता. जगद्गुरू पंचाचार्यांचा अडृडपालखी महोत्सव आणि दोन दिवसीय संमेलन संपन्न झाले होते. नंतर सोळा वर्षे अशा प्रकारचे कार्यक्रम झाले नव्हते. सोळा वर्षानंतर झालेल्या या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या एकोप्यासाठी हे संमेलन संपन्न झाले. भविष्यात पंचाचार्य परंपरेतील शिवाचार्य आणि विरक्त परंपरेतील मठाधिपती या सर्वांना एकत्र घेऊन महासंमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी एकदा वीरशैव आणि लिंगायत वेगळे आहेत असा वाद सुरू होता. बदामी जवळील शिवयोग मंदिर परिसरात संमेलन पार पडले होते. हनगल कुमार स्वामी यांनी स्थापन केलेल्या शिवयोग मंदिरात गुरुकुल आहे. तिथे दोन्ही परंपरेचे २००० हून अधिक मठाधिपती आणि दोन लाखाहून अधिक भक्तांनी एकत्र येऊन आपण एक असल्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा भेद संपला होता.
       भारतामध्ये आता जनगणना होणार आहे. या संदर्भात निर्णय घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. वीरशैवांची संख्या कळावी. वीरशैवांच्या प्रत्येक घटकाला आरक्षण मिळत नाही. समाजामध्ये ही मोठी समस्या आहे. धर्म आणि जात काय लिहावे हा संभ्रम समाजामध्ये आहे. या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचे शृंग संमेलन कर्नाटकातील दावणगिरी येथील जगद्गुरू रेणूक मंदिराच्या कल्याण मंडपात आयोजित केले होते. या संमेलनासाठी पाचही जगद्गुरू, सर्व प्रांतीय सर्व शिवाचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       या संमेलनाचे उद्घाटन दि. २१ रोजी सकाळी ११ वाजता अ. भा. वीरशैव महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष ९५ वर्षीय डॉ. शामनुरू शिवशंकरप्पा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे उपस्थित होते. याबरोबरच विविध पक्षांचे वीरशैव धर्म अनुयायी असलेले मंत्री, आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संमेलनात सर्व जगद्गुरूंनी निर्णय घेतला की जनगणनेमध्ये जात या रकान्यात प्रचलित जात म्हणजे ज्या पोटजातीला आरक्षण मिळते ती लिहायची. धर्म हिंदू लिहायचा. त्याबरोबरच वीरशैव या पंथाचा उल्लेख जनगणनेत होण्यासाठी वीरशैव धर्मीय खासदार, मठाधिपती, विविध पोटजातींच्या भक्तगणांनी एकत्र येऊन सन्माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संबंधित खात्याचे मंत्री, अधिकारी यांना भेटून धर्माच्या रकान्यानंतर पंथ रकाना असावा असा आग्रह करावा. पंथ या रकान्यामध्ये वीरशैव लिंगायत असे लिहावे.
       पोटजातीच्या नावाखाली आपण विभक्त व्हायचे नाही. पोटजाती सांभाळून आपण सर्व एक राहायचे. वीरशैव आणि लिंगायत वेगळे आहेत असे म्हणायचे नाही. वीरशैव हा शास्त्रीय शब्द आहे. लिंगायत हा परंपरेतून आलेला शब्द आहे. पंचाचार्य आणि महात्मा बसवेश्वरादी शरणांचे विचार वेगळे नाहीत. वीरशैव लिंगायत एकच आहे असे लोकांचे प्रबोधन करण्यात आले.
       वीरशैवातील पोटजाती जन्माच्या आधारे नसून व्यवसायांच्या आधारे मिळालेले आडनाव आहेत. म्हणून जातीच्या आधारे कुणीही विभक्त होऊ नये. आपल्या पोटजाती सांभाळून आपण सर्व वीरशैव लिंगायत एकच आहोत अशी भावना निर्माण करण्यासाठी पीठाचार्य, शिवाचार्य आणि राजकारण्यांनी प्रबोधन केले. यावेळी एकूण १२ ठराव घेण्यात आले. सर्व पीठाचार्य आणि शिवाचार्यांनी वीरशैव आणि लिंगायत एकच आहेत अशी घोषणा एकमुखाने केली.
       कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोमई, जगदीश शेट्टर, वीरशैव लिंगायत महामंडळाचे अध्यक्ष तथा हुनगुंदचे खासदार विजयानंद काशप्पनवर, केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा, उपस्थित होते. या सर्वांचे वरील विषयांवर एकमत झाले. संमेलन यशस्वी होण्यासाठी अनेक मान्यवरांनी तनमनधनाने सेवा केली. कर्नाटक सरकारचे मंत्री मल्लिकार्जुनप्पा यांचे विशेष योगदान होते.

या शृंग संमेलनात घेतलेले १२ ठराव पुढील प्रमाणे आहेत.

१) येणाऱ्या जातीनिहाय जनगणनेमध्ये सर्व पोटजातींचा उल्लेख पंथ या रकान्यामध्ये वीरशैव लिंगायत असा करावा. वीरशैव आणि लिंगायत एकच आहेत. ही एकी सदैव टीकवण्याचा संकल्प करण्यात आला.

२) सनातन हिंदू वीरशैव लिंगायत धर्माच्या सर्व अनुयायींच्या पोटजाती व्यवसायावर आधारित आहेत. या पोटजातींच्या आधारावर धर्मामध्ये कोणत्याही प्रकारे विभाजन करू नये. पोटजात कोणतीही असो आपण सारे वीरशैव लिंगायत आहोत. ही एकता कायम ठेवायची आहे. 

३) जनगणना फॉर्ममध्ये धर्माबरोबरच पंथ किंवा मत असा रकाना असावा. अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या माध्यमातून केंद्र सरकारला याविषयी आग्रह करावा. 

४) या मुद्द्यावर मा. पंतप्रधान महोदयांचे लक्ष वेधण्यासाठी समाजाचे प्रमुख नेते, मठाधिपती, सर्व धर्मीय वीरशैव लिंगायत खासदारांचे एक प्रतिनिधी मंडळ दिल्लीला पाठवावे. 

५) वीरशैव धर्मातील सर्व पोटजातींना ओबीसी या संवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी पोटजातीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारचे लक्ष वेधावे.

६) वीरशैव लिंगायत समाजाच्या ज्या पोटजातींना आरक्षण मिळत आहे ते आरक्षण कायम राहावे.

७) अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या जिल्हा, तालुका आणि गावातील कार्यालयामध्ये श्री जगद्गुरू रेणूकादी पंचाचार्य प्रतिमा लावणे आवश्यक आहे. वीरशैव लिंगायत यांचे मूळ सिद्धान्त तसेच शरण आणि संतांची विचारधारा एकत्रितपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला.

८) गुरूंची प्राचीन परंपरा श्रद्धेने चालू ठेवावी. युवकांमध्ये याविषयी जागरूकता आणि आस्था निर्माण करावी.

९) वीरशैव लिंगायत परंपरेतील महिला, दिव्यांग, वंचितांच्या हिताच्या रक्षणासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. 

१०) वीरशैव पीठाचार्य आणि शिवाचार्य यांचे एकमेकांशी सहकार्याचे धोरण असले पाहिजे. संबंधित पीठ आणि शाखा मठ यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या हिताच्या रक्षणासाठी मार्गदर्शन केले पाहिजे. इतर पीठांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये.

११) वर्षातून एकदा पीठाचार्य आणि शिवाचार्यांचे महासंमेलन आयोजित करावे. वीरशैव लिंगायत परंपरेच्या आदर्श मूल्यांचे रक्षण करावे.

१२) उत्तर भारतातील दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर राज्यात वीरशैव समाज प्राचीन काळापासून वास्तव्यास आहे. त्यांच्यासाठी धार्मिक, सांस्कृतिक योजना तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.

Friday, July 18, 2025

बच्चू कडू यांची "शेतकरी मात्रा" "सातबारा कोरा करा" यात्रा प्रचंड प्रतिसाद

बच्चू कडू यांची "शेतकरी मात्रा" "सातबारा कोरा करा" यात्रा प्रचंड प्रतिसाद 
अमरावती/परभणी/सोनपेठ (दर्शन) :- 
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी गुरूकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन व त्यापाठोपाठ पापळ ते चिलगव्हाण ही 138 किलोमीटरची ‘सातबारा कोरा’ यात्रा काढली. जीवाचे हाल करून घेणारी ही पदयात्रा वजा ‘शेतकरी मात्रा’ आजारी सरकारवर कितपत आणि केव्हा उपायकारक होईल, ते आताच सांगता येणार नाही. परंतु जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलनांचे सिंहावलोकन होईल, तेव्हा या सातबारा कोरा यात्रेचा उल्लेख अनिवार्यतेने होईल, अशी ही ऐतिहासिक पदयात्रा आहे.
 
भारताच्या इतिहासात महात्मा गांधी यांची दांडीयात्रा प्रसिद्ध आहे. ब्रिटीश सरकारने जीवनावश्यक मिठावर कर लावल्याने महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रमातून 12 मार्च 1930 ला दांडीयात्रा काढली होती. 385 किलोमीटरची दांडीयात्रा 24 दिवस चालली. ही यात्रा समुद्रकिनारी 6 एप्रिल 1930 ला पोहोचली. गांधीजींनी चिमूटभर मिठ उचलून ‘कायदेभंग’ केला होता. अगदी अलिकडे अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत 136 दिवसांची 3,570 किलोमीटरची कन्याकुमारी ते काश्मिर, अशी संपूर्ण ग्रामीण भारताला ढवळून काढणारी ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. या यात्रेदरम्यान खा. राहुल गांधी यांनी असंख्य नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. तत्पूर्वी, 2011 मध्ये शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव मिळावा, यासाठी गुरूकुंज मोझरी येथून सेवाग्रामपर्यंत पायी कापूस दिंडी काढली होती. शेतकर्‍यांचे पंचप्राण दिवंगत खा. शरद जोशी यांनीसुद्धा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी कित्येक आंदोलने केलीत, आता बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग अन् लगेच पापळ ते चिलगव्हाण ही सातबारा कोरा यात्रा काढलेली आहे.
 
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या बाजूला गुरूकुंज मोझरी येथे 8 जूनपासून तब्बल सात दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती गठीत केली जाईल, असे लेखी आश्वासन सरकारच्या वतीने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. परंतु ‘सरकारी काम सहा महिने थांब’, ही सरकारची कार्यपद्धती असल्यानेच बच्चू कडू यांनी सरकारला 2 ऑक्टोबरची ‘डेडलाईन’ दिलेली आहे.
  
सरकारला आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी बच्चू कडू यांनी ‘सातबारा कोरा’ पदयात्रा 7 जुलैला प्रारंभ केली. 55 वर्षीय बच्चू कडू हे जन्मजात आणि जातीवंत आंदोलनकारी आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा पायाच जनआंदोलन आहे. बच्चू कडू यांची आंदोलने केवळ राज्यातच प्रसिद्ध नव्हे तर परराज्यात त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. गोरगरीब, दिव्यांग, शेतकरी, कष्टकरी लोकांचे हक्क व त्यांच्या प्रश्नाबद्दल मनात संताप येणे हा त्यांचा स्वभाव असून व्यवस्थेविरुद्ध मनात चिड आणून त्यासाठी लढणे, झगडणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. लढण्या झगडण्यासाठीसुद्धा जिगर लागते. तो कलेजा बच्चू कडू यांच्याकडे आहे.

सातबारा कोरा पदयात्रेची सुरूवात भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून करण्यात आली. तेव्हा अवघा महाराष्ट्र आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तीत तल्लीन होता. पांडुरंगाच्या नामस्मरणाने ओतप्रोत भरलेला होता. मार्गात ही पदयात्रा महाराष्ट्राच्या कृषीक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कर्मभूमीतून गेली.  बच्चू कडू यांनी वसंतराव नाईक यांना शेतकर्‍यांचा खरा ‘विठ्ठल’ संबोधून त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि अखेरच्या टप्प्यात पायी चालून चालून रक्ताळलेले तळपाय, पायाच्या नखातून रक्त बाहेर येण्याच्या असह्य वेदना सहन करीत बच्चू कडू यांची ही पदयात्रा 14 जुलैला नियोजितस्थळी चिलगव्हाण-आंबोडा (जि. यवतमाळ) येथे पोहोचली. या संपूर्ण यात्रेदरम्यान बच्चू कडू यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न, मन गहिवरून आणणार्‍या त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. 

महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून 18 जुलैपर्यंत नियोजित आहे. त्या मधोमध 7 ते 14 जुलै या कालावधीत ही सातबारा कोरा पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेच्या समारोपासाठी चिलगव्हाण-आंबोडा हे गाव निवडण्यालासुद्धा एक प्रमुख कारण आहे. चिलगव्हाण-आंबोडा येथील शेतकरी साहेबराव करपे, मालतीताई करपे या दाम्पत्याने त्यांच्या चार मुलांसह पवनार जवळच्या दत्तपूर या आश्रमात 19 मार्च 1986 ला नापिकी व कर्जबाजारीपणामुळे सामुहिक आत्महत्या केली होती. ती महाराष्ट्र सरकारने मान्य केलेली पहिली शेतकरी आत्महत्या होय. तेव्हापासून आजतागायत लाखो शेतकर्‍यांनी कर्ज व नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या आहेत. पण सरकारला त्याची कळ नाही. वसंतराव नाईक यांनी कृषीक्रांती घडवलेल्या महाराष्ट्राच्या माथ्यावर शेतकरी आत्महत्येचा लागलेला कलंक पुसता पुसला जात नाही. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना नाहीत. अर्धनग्न ‘स्मोकर मिनिस्टर’ सिगारेटचे झुरके घेत आहेत, दौर्‍यावरून बॅगमध्ये लाखो रुपयांचे बंडल घेऊन घरी पोहोचत आहे. सरकार यातच मस्त आहे. दुसरीकडे शेतकरी अन्यायाविरुद्ध पेटून तर उठतच नाही, व्यक्त व्हायलासुद्धा धजावत नाही. शिवाजी जन्माला यावा, पण तो शेजार्‍याच्या घरात, अशी स्थिती आहे. सरकारविरुद्ध कुणी आणि कसा आवाज उठवावा, हा प्रश्न विभागलेल्या शेतकर्‍यांच्या विखुरलेल्या मनाला पडलेला आहे, ही हतबलता दर्शविणारी बाब यात्रेदरम्यान बच्चू कडू आणि शेतकरी संवादातून प्रकर्षाने पुढे आलेली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 80 पेक्षा अधिक आमदार पराभूत झालेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारने आणलेल्या ‘फुकट’च्या योजनेला भाळून लाडक्या बहिणींनी कैक बहिण-भावांना फुकटात गारद केले. त्यात पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, हितेंद्र ठाकूर, यशोमती ठाकूर, बच्चू कडू आदिंसह कित्येक दिग्गजांना लॉटरी लागली. आता त्यापैकी बहुतेकजण घरी बसून पुढील निवडणुकीची प्रतिक्षा करीत आहेत. बच्चू कडू यांनासुद्धा घरी येणार्‍यांचे ऐकून व निवेदन स्विकारून बघतो म्हणून सांगता आले असते. पण हा भीडू लोकांसाठी, लोकांसारखा स्वस्थ बसत नाही. लोकांना विसर पडतो, पण लोक लक्षातही ठेवतात, हेही तेवढेच खरे आहे. लोकशाहीत लोकभावना, जनमताचा कौल याला खूप महत्त्व आहे. सातबारा कोरा करा, ही एक आर्त जनभावना आहे. लोकांच्या सामाजिक व आर्थिकतेशी संबंधित आहे. आमदार, खासदार, मंत्र्यांसारख्या सोयीसुविधा नव्हे तर दररोजच्या मरणातून सुटका करा, एवढेच शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्या आक्रोशाची मात्रा बच्चू कडू या यात्रेच्या निमित्ताने सरकारला देत आहेत.  सरकारने ऐकले नाही तर ‘नवा कायदेभंग’ अटळ दिसत आहे.

-गोपाल हरणे
94228 55496
अमरावती.

Saturday, July 12, 2025

जेव्हा भक्ती, श्रद्धा आणि सेवा एकत्र येते तेंव्हा अन्नछत्र निर्माण होतं ! श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट 12 व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

जेव्हा भक्ती, श्रद्धा आणि सेवा एकत्र येते तेंव्हा अन्नछत्र निर्माण होतं ! श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट 12 व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 
अन्नछत्राच्या सावलीत – परळीच्या सेवाभावाचं उगमस्थान परळी वैजनाथ या पवित्र नगरीबद्दल आपण अनेकदा ऐकत असतो. महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योर्तिलिंग असलेलं श्री वैद्यनाथ मंदिर, दररोज हजारो भाविकांची उपस्थिती, पावित्र्याचं, श्रद्धेचं आणि भक्तीचं केंद्र अशी परळी या शहराची ही ओळख फार जुनी आहे. पण गेल्या काही वर्षांत परळीची आणखी एक ओळख निर्माण झाली आहे ती म्हणजे "श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या" सेवाभावी कार्यामुळे. या ट्रस्टने केवळ उपाशी पोटांना अन्न दिले नाही, तर माणुसकीला अर्थ दिला आहे. कोणत्याही प्रसिद्धीच्या हव्यासाविना, निव्वळ एक विचार घेऊन सुरू झालेलं हे कार्य आज हजारो लोकांच्या जीवनात आधारवडासारखं उभं आहे. परळी येथील एक हरहुन्नरी समाजसेवक याने अन्नछत्राची संकल्पना मांडली परंतू केदारनाथ दुर्घटनेत त्यांचे स्वप्न त्यांच्या सोबत तिथेच राहिले त्यांच्या धाकट्या बंधुनी मित्र मंडळीसह अन्नदान कार्याची सुरुवात केली त्यास मिळालेल्या प्रतिसादाने सन 2013 मध्ये श्री अन्नपूर्णा ट्रस्टची स्थापना झाली. समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं, आपलं आयुष्य जनतेच्या सेवेच्या वाटेला द्यायचं असा निश्चय तरुणांनी केला. त्यांनी "अन्नछत्र" ही संकल्पना उराशी बाळगून ट्रस्टची नोंदणी केली व कै.ओमभाऊ लाहोटी यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाला पूर्तता देण्यासाठी त्यांनी आपलं उर्वरित जीवन या ट्रस्टला समर्पित केलं.याच क्षणी या अन्नछत्राच्या कार्याला खरी सुरुवात झाली.

2013 साली आलेल्या श्रावण महिन्यात त्यांनी प्रत्येक रविवारी मोफत अन्नदान सुरू केलं.ते निरंतर पुढे सुरुच राहिले.ही सेवा एका दिवशी किंवा एका महिन्यात संपणारी नव्हती.त्या अन्नदानात जो समर्पणाचा, समाधानाचा भाव अनुभवला, त्यानेच पुढचा मार्ग स्पष्ट केला. त्यांनी ठरवलं की वर्षभर प्रत्येक रविवारी मोफत अन्नदान चालू ठेवायचं.आणि मग दुसऱ्या वर्षी त्यांनी अन्नछत्राचं स्वरूप अधिक व्यापक केलं वर्षभर प्रत्येक शनिवार आणि रविवारी मोफत भोजन सेवा सुरू झाली.हे केवळ एक उपक्रम नव्हता,तर श्रद्धेचा, स्मरणाचा आणि समाजभानाचा प्रत्यय होता.अन्नछत्र हे भाऊ च्या आठवणींचं रूप होतं ज्यात दर रविवारी, दर शनिवारी केवळ भुकेच्या पोटात अन्न नव्हे,तर समाजाच्या अंतरात्म्यात माणुसकीचा अर्थ घालण्यात येत होता.

या अन्नछत्राची सुरुवात परळीतील श्री शनी मंदिर येथे झाली. तेव्हा त्यांच्याकडे ना मोठा निधी होता ना मोठा हॉल, ना आधुनिक किचन होते  होता तो सेवाभाव, कार्यनिष्ठा आणि लोकांचा पाठिंबा.काही वर्षांनी श्री शनी मंदिर चे बांधकाम सुरू झाल्यामुळे अन्नछत्र दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागलं आणि मग ते "श्री वैद्यनाथ अर्बन को ऑप बँक परळी" यांच्या जागेत स्थलांतरित झालं.गेली 8 वर्षे हे अन्नछत्र तिथे सकाळी आणि संध्याकाळी चालू आहे.दररोज सुमारे 1200 ते 1500 भाविक इथे मोफत भोजनाचा लाभ घेतात.देश विदेशातून प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनास येणारे शिवभक्त जेंव्हा इथला प्रसाद घेऊन जातात ते अन्नछत्रासह परळीचे गुणगान करतात.एका वेळेस दीडशे लोक बसू शकतात अशी या अन्नछत्राची व्यवस्था आहे.पण ही आकड्यांची गोष्ट नाही – ही गोष्ट आहे, रोज उगवणाऱ्या माणुसकीच्या सूर्यासारख्या कार्याची.

वैद्यनाथ बँके ने दिलेल्या जागेवर बांधकाम सुरू होणार असल्यामुळे आज पुन्हा एकदा अन्नछत्राचं स्थलांतर आता श्री वैद्यनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला श्री दत्त मंदिर, श्री राम मंदिर ( श्री बालाजी मंदिर ) येथे झाले आहे. मात्र हे स्थलांतर म्हणजे काही मागे जाणं नाही तर एका मोठ्या प्रवासाचा पुढचा टप्पा आहे.जिथं पोटभर जेवण मिळतं,तिथं प्रेमाची सावली आपसूकच तयार होते आणि ही सावली परळीकरांनी वाढवली आहे, जपली आहे.

श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टचं मोठेपण म्हणजे त्यांनी ‘माझं आणि तुझं’ असा भेद ठेवलेलाच नाही. इथं प्रत्येकजण ‘हे माझ्या परळीचं अन्नछत्र आहे’ असं म्हणतो. इथे कोणतेही पदं नाहीत, अधिकार नाहीत फक्त जबाबदाऱ्या आहेत. प्रत्येक काम करणारा माणूस मालक आहे आणि सेवकही. ही भावना इथल्या कार्यात खोलवर रुजलेली आहे. म्हणूनच हे अन्नछत्र केवळ अन्नदान करणारं ठिकाण नाही, तर परळीच्या समाजाची एक जबाबदारी बनून गेलं आहे.

या ट्रस्टने अन्नदानासोबतच अनेक समाजोपयोगी योजना सुरू केल्या आहेत. गरीब व निराधार महिलांसाठी ‘निराधार महिला सहाय्य योजना’ राबवली जाते. यात महिलांना दर महिन्याला जीवनावश्यक वस्तू, किराणा साहित्य, साडी-चोळी अशा वस्तू दिल्या जातात. आज या योजनेचा लाभ परळीतीलच नव्हे, तर परिसरातील महिला आणि निराधार लोकांपर्यंत पोहोचतो आहे.

‘विद्यार्थी सहाय्य योजना’तून गरीब विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, गणवेश, शालेय साहित्य, पेन, कंपास, शूज हे सगळं मोफत दिलं जातं. विशेषतः जे अनाथ आहेत, ज्यांना पालकही नाहीत, अशा मुलांसाठी ‘निराधार पालक-पाल्य योजना’ अंतर्गत ट्रस्ट संपूर्ण जबाबदारी घेतो अन्न, शिक्षण आणि कपडालत्ते यांची संपूर्ण व्यवस्था केली जाते . या व्यतिरिक्त ट्रस्टने 'ग्रंथदान ही योजना' राबवली आहे. शाळांना दर्जेदार वाचनीय पुस्तके दिली जातात. वाचन संस्कृती जपण्यासाठी आणि मुलांचं वैचारिक पोषण करण्यासाठी या योजनेचा उपयोग होतो. विद्यार्थ्यांच्या मनात विचारांचं बीज पेरणं ही खरंतर खूप मोठी सेवा आहे.

‘शुद्ध पेयजल’ हा विषय उन्हाळ्याच्या दिवसांत जिव्हाळ्याचा असतो. ट्रस्टने परळी परिसरात RO फिल्टर चे पाणी जार बसवून अनेक ठिकाणी मोफत शुद्ध पिण्याचे पाणी दिलं आहे. याचा लाभ फक्त भाविकांनाच नव्हे, तर जनावरं, पक्षी, रस्त्यावरची मंडळी सगळ्यांनाच होतो आहे तसेच अन्न हे पुर्णबृम्ह म्हणून अन्न वाचवा शपथ शालेय विद्यार्थी असो वा श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट च्या अन्नछत्रात येणारा प्रत्येक व्यक्ती घेतो.

ट्रस्टच्या या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांनी ट्रस्टचा गौरव केला आहे. पण या ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना पुरस्कारांची नाही, फक्त समाधानाची अपेक्षा आहे. कोणी उपाशी झोपलं नाही, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शिकण्यासाठी वह्या मिळाल्या, एखादी विधवा आई किराणाचा डबा घेऊन गेली हाच त्यांचा खरा पुरस्कार आहे.

परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगा पैकी पंचम ज्योतिर्लिंग असून या तीर्थक्षेत्राला शोभेल असेच या श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य आहे कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय, निव्वळ लोकसहभागातून १२ वर्षे चालावं, ही गोष्ट आज आश्चर्य वाटावी अशी आहे. पण खरंतर ही ताकद आहे लोकांची, त्यांच्या विश्वासाची, आणि अशा संस्थांच्या निष्ठेची.

आज हे अन्नछत्र हजारो जणांचं पोट भरतं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे अन्नछत्र माणसांची मनं जिंकतं आहे. जेव्हा एखादा भुकेला भाविक या अन्नछत्रात बसतो आणि समाधानाने जेवतो, तेंव्हा तो फक्त अन्न घेत नाही तर या समाजात अजूनही आपल्यासाठी कोणी आहे, हे अनुभवतो.

येणाऱ्या काळात परळीतल्या प्रत्येक नागरिकाने, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने  अन्नछत्र  "हे माझ्या परळीकरांचं आहे" या भावनेनं आपलं मानून पुढे आलं, तर या अन्नछत्राचं रूप आणखी भव्य होईल, हे नक्की. ही एक अशी संकल्पना आहे जी केवळ काही मंडळींच्या खांद्यावर न राहता, संपूर्ण परळीकरांनी मनोभावे उचलली, तर ही सेवा एका वेगळ्याच उंचीवर जाऊ शकेल. आज जरी दररोज सुमारे एक हजार ते बाराशे लोक इथं पोटभर अन्न घेत असले तरी ही संख्या केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही. ही संख्या हे दाखवत आहे की समाजात आजही माणुसकी जिवंत आहे, आणि ती इथे दररोज वाढते आहे. या अन्नछत्राचं भविष्यातील रूप आणखी मोठं व्हावं, यासाठी फक्त गरज आहे ती म्हणजे  प्रत्येक परळीकराने मनात ही सेवा ‘आपली’ समजणं. ही सेवा कुण्या एका व्यक्तीची, संस्थेची किंवा समूहाची नसून ती संपूर्ण परळीच्या संस्कृतीची ओळख बनली पाहिजे. अन्नछत्राचं पुढचं पाऊल म्हणजे केवळ जेवण देणं नव्हे, तर परळीतल्या गरजूंना, भाविकांना आणि समाजाला माणुसकीच्या सावलीत घेऊन जाणं ही जबाबदारी आपलीच आहे!
दिनांक १३ जुलै २०२५ ला ट्रस्ट चा १२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे.श्री अन्नपुर्णा चॅरिटेबल ट्रस्ट च्या सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

Friday, July 11, 2025

सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा एंव कलश यात्रा महाराष्ट्र - 2025 मराठवाडा ते विदर्भ

सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा एंव कलश यात्रा महाराष्ट्र - 2025 मराठवाडा ते विदर्भ 
मुख्य संयोजक आंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य श्री विवेकदासजी शास्त्री महाराज काशी वाराणसी (श्रीराम वृंदावन) यांना साप्ताहिक सोनपेठ दर्शन अंक भेट देताना संपादक किरण रमेश स्वामी दिसत आहेत...

सोनपेठ (दर्शन) :- सनातन हिंदू धर्म जागरण यात्रा एंव कलश यात्रा महाराष्ट्र-2025 मुख्य संयोजक आंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य श्री विवेकदासजी शास्त्री महाराज काशी वाराणसी (श्रीराम वृंदावन) यांच्या मार्गदर्शनात विशेष आकर्षण भगवा ध्वज धारी, मातृशक्ती कलश धारी, संतांचे मार्गदर्शन, मंदिर मुक्ती संकल्प घेऊन अनेक उद्देश घेऊन ही पदयात्रा दिनांक 11 जुलै 2025 औंढा नागनाथ ते परळी वैद्यनाथ मुक्काम, दिनांक 12 जुलै 2025 परळी वैद्यनाथ ते सोनपेठ, पाथरी मुक्काम, दिनांक 13 जुलै 2025 सेलू, मंठा मुक्काम, दिनांक 14 जुलै 2025 तळणी, लोणार मुक्काम, दिनांक 15 जुलै 2025 सुलतानपूर-सिद्धपूर, मेहकर, हिवरा आश्रम मुक्काम, दिनांक 16 जुलै 2025 लव्हाळा फाटा, चिखली मुक्काम, दिनांक 18 जुलै 2025 वाघ झाड, मोताळा समारोप दिनांक 22 जुलै 2025 जलाभिषेक एंव महाप्रसाद श्री रायरेश्वर महादेव मंदिर चिंचपूर मोताळा जिल्हा बुलढाणा, आयोजक श्री पुरुषोत्तम राजमल मापारी व सौ.वर्षा पुरुषोत्तम मापारी या यात्रेचा मुख्य उद्देश भारताला संविधानिक पद्धतीने हिंदू राष्ट्र घोषित करावे, भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा येथे मुघलकालीन अतिक्रमण मुक्त करून भव्य मंदिर निर्माण करावे, काशी विश्वनाथ ज्ञानवापी परिसर संपूर्ण पद्धतीने हिंदू धर्मियांना सुपूर्त करावा, गोमाता "राष्ट्रमाता" घोषित करावी व गोहत्या संपूर्ण बंदी करावी, सनातन हिंदू धर्म राष्ट्रीय बोर्डाची स्थापना करावी, आदी मागण्या घेऊन ही यात्रा मराठवाडा ते विदर्भ औंढा नागनाथ ते श्री रायरेश्वर महादेव मंदिर चिंचपूर मोताळा जिल्हा बुलढाणा येथे समारोप होणार आहे तरी तमाम हिंदू बांधवांनी या यात्रेत तन-मन-धनाने सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन मुख्य संयोजक अंतराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य श्री विवेकदासजी शास्त्री महाराज काशी वाराणसी (श्रीधाम वृंदावन) यांनी केले आहे.

Thursday, July 10, 2025

सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात सोमवारी महीलांसाठी कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर

सोनपेठ ग्रामीण रुग्णालयात सोमवारी महीलांसाठी कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय  येथे सोमवारी (दि.१४ जुलै 2025) महिलांसाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्जन डॉ.बोले हे लाभले आहेत,कुटूंब नियोजन करण्यासाठी सोनपेठ तालुक्यातील महिलांच्या बिन टाका कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया आता सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात केल्या जात आहेत. यासाठी पंचक्रोशीतील इच्छुक महिलांनी गावातील आशा कार्यकर्ती अथवा ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे पुर्व नाव नोंदणी करावी. सोनपेठ तालुक्यातील गरजवंत महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विठ्ठल कराड यांनी केले आहे.