Wednesday, April 24, 2024

महादेव जानकरांचा खासदार म्हणून ‘गृहप्रवेश’ करा धनंजय मुंडे यांचे आवाहन ; सोनपेठ येथे जग्गी सभा संपन्न

महादेव जानकरांचा खासदार म्हणून ‘गृहप्रवेश’ करा धनंजय मुंडे यांचे आवाहन ; सोनपेठ येथे जग्गी सभा संपन्न 

सोनपेठ (दर्शन) :-



वर्षानूवर्षापासून सर्वार्थाने मागास म्हणून ओळखल्या जाणार्‍या परभणी मतदारसंघास या निवडणूकीच्या माध्यमातून महादेवराव जानकर यांच्या रुपाने एक निःस्वार्थ अन् विकासाभिमुख असे नेतृत्व मिळत आहे, त्यामुळे भाग्यवान असणार्‍या परभणीकरांनी जानकर यांचा खासदार म्हणून गृहप्रवेश करुन घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
          परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी (दि.23) कृषिमंत्री मुंडे यांनी सोनपेठातील पद्मीनी मंगल कार्यालयात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई उत्तमराव विटेकर, माजी आमदार डाँ.मधूसूदन केंद्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आमदार मोहन फड, ज्येष्ठ नेते रमाकांत जहागिरदार, डॉ.केदार खटींग, दयानंद सौन्नर, रावसाहेब पांडुळे, ज्ञानेश्वर दातार, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा भावना नखाते, दशरथ सूर्यवंशी पाटील, दत्तात्रय भांडुळे पाटील, बाळासाहेब जाधव, ॲड.श्रीकांत विटेकर यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान होते.
           याप्रसंगी मुंडे यांनी महादेव जानकर या व्यक्तीमत्वाबद्दल मुक्तकंठाने कौतूक केले. परभणीकर हे निश्‍चितच भाग्यवान आहेत. 2024 च्या निवडणूकीच्या निमित्ताने का होईना, परभणीकरांना जानकर यांच्या रुपाने एक प्रामाणिक, निःस्वार्थ, सर्वसमावेश, स्वाभिमानी व विकासाभिमुख असं नेतृत्व उमेदवाराच्या माध्यमातून मिळत आहे. या व्यक्तीमत्वाने कधीही स्वहिताचा विचार केला नाही. अख्खं आयुष्य समाजसेवेकरीता वाहून घेतले. जानकर यांच्या मागे न पुढे कोणीही नाही. त्यामुळेच परभणीकर हेच जानकर यांच्या मागे व पुढे राहू शकतील. महायुतीच्या पक्षश्रेष्ठींनी जानकर यांच्या परभणीतील उमेदवारी संदर्भात जो विचार केला तो निश्‍चितच दुरदृष्टी ठेवून, परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवूनच केला आहे. त्यामुळे आपण महायुतीच्या श्रेष्ठींचे खरोखरच आभार मानतो, परभणीकरांना जानकर यांची किंमत कदाचित येईपर्यंत कळली नसावी. जानकर हे उमेदवार म्हणून आले, तुमचे ते कधी झाले हे कळलेच नाही, असे नमूद करतेवेळी मुंडे यांनी या जागेवर राष्ट्रवादीचा दावा होता, विटेकर यांना कामास लागा, असा सल्लाही दिला होता, परंतु श्रेष्ठींनी विटेकर यांना थोडेसे बाजूला करीत जानकर यांना संधी दिली. तोच निर्णय परभणीकरांचे भाग्य उजळविणारा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेतून जानकर यांना छोटा भाऊ असे संबोधून त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त केले आहे. त्यामुळेच आता परभणीच्या विकासाचे डायरेक्ट असे कनेक्शन जूळल्या गेले आहे, असे मुंडे यांनी म्हटले.
             परभणी मतदारसंघात सातत्याने निवडणूका या नात्यागोत्या, गणगोताभोवतीच फिरत राहिल्या. खान पाहिजे की बाण असाही नारा अधूनमधून होत होता. आता जाती पातीचे किळसवाणे राजकारणसुध्दा या मतदारसंघात सुरु झाले आहे. हे राजकारण घातक आहे. विरोधकांनी हेतुतः असे वळण देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. विरोधकांचे हे प्रयत्न सर्वसामान्य मतदार हाणून पाडतील, कधीही पार्लमेंटमध्ये शब्दसुध्दा न काढणार्‍यांना या निवडणूकीतून जागा दाखवून देतील, असाही विश्‍वास मुंडे यांनी व्यक्त केला.
           मंदिरांच्या जमिनी हडपण्याचे प्रकारसुध्दा या जिल्ह्याच्या नेतृत्वाने करावे या सारखे दुर्देव कोणते आहे, असा सवाल करतेवेळी मुंडे यांनी प्रत्येक इव्हेंटमधून व्यापार्‍यांना लुटण्याचे प्रकार असो, अलिकडे प्रभावाची चाहूल ओळखून व्यापार्‍यांना धमकावण्याचेही प्रकार हे निषेधार्ह आहेत. कोणीही या धमक्यांना भिक घालू नये, आम्ही सोबत आहोत, हे लक्षात ठेवावे, असे मुंडे म्हणाले.
            26 एप्रिल रोजी सर्वसामान्य मतदारांनी जानकर यांना मोठ्या मनाने, खुल्या दिलाने, कोणत्याही जाती पातीचा विचार न करता सद्सद्विवेक बुध्दीने विचार करीत प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, व जानकर यांना खासदार म्हणून या जिल्ह्यात गृहप्रवेश द्यावा, असे आवाहनही मुंडे यांनी केले.

No comments:

Post a Comment