Tuesday, April 30, 2024

इंजेगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे काम संत गतीने ; बस वाहतुक बंद

इंजेगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे काम संत गतीने ; बस वाहतुक बंद

सोनपेठ (दर्शन) :- 

साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.

परळी तालुक्यातील मौजे इंजेगाव येथील राष्ट्रीय महामार्ग 548 बी रस्त्याचे काम एक तर्फा झालेले आहे तर दुसरी बाजू संत गतीने रस्त्याचे काम चालू असल्याने हे काम एका गुत्तेदाराने घेऊन दुसऱ्या गुत्तेदाराला वर्ग केलेले आहे अशी चर्चा सुरू झाली व हे काम अतिशय संत गतीने चालू असून याचा परिणाम एस.टी.महामंडळाची बस एकतर्फा रस्त्यावरून जात असताना समोरून एखादी कार किंवा जीप आली तर ती एक ते दीड किलोमीटर रिव्हर्स मध्ये बस वापस काढावी लागते या कारणाने बस वाहतूक अनेक दिवसापासून बंद केल्या कारणाने विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत, नुकत्याच धामोणी ते सोनपेठ प्रवासी विद्यार्थी विद्यापीठ परीक्षा सुरू असल्याने वेळेवर परीक्षेसाठी न पोहोचणे, वाहनाची व्यवस्था नसणे अनेक कारणांनी त्रासून गेलेले दिसून येत आहेत तरी गुत्तेदार यांनी त्वरित काम समाप्त करून एस.टी. महामंडळाची बस वाहतूक सुरू करावी अशी मागणी होताना दिसत आहे, एस.टी. महामंडळाचे वाहतूक निरीक्षक यांना संपर्क साधले असता जोपर्यंत दोतर्फा रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत बस सोडता येणार नाही असे सांगण्यात आले.इंजेगाव रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती विद्यार्थी व प्रवासी बांधवांच्या वतीने होताना दिसत आहे.

Friday, April 26, 2024

बीड लोकसभा पंकजाताई मुंडे यांना धोक्याची घंटा ; रयत क्रांती संघटना हा मित्र पक्ष नाराज.....

बीड लोकसभा पंकजाताई मुंडे यांना धोक्याची घंटा ; रयत क्रांती संघटना हा मित्र पक्ष नाराज.....

बिड/परभणी/सोनपेठ(दर्शन):- 

साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठी संपर्क साधावा संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752..

लोकसभेचे बिगुल वाजल्यापासून महायुतीतील मित्रपक्ष पंकजाताईंच्या प्रचाराला लागले. मात्र प्रस्थापित पक्षाच्या आमदारांच्या जीवावर आपण लोकसभा भरघोस मतांनी निवडून येऊ या गैरसमजातून ताई निवडणूक लढताना दिसत आहेत . यातून मित्र पक्षांना डावलून ज्या पद्धतीने पंकजाताई प्रचार दौरे करत आहे त्याची परिणीती मित्रपक्षाच्या नाराजी मध्ये होत आहे.
परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांचा फॉर्म भरण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत बीड जिल्हा मार्गे परभणीला आले होते. त्यावेळी केज व माजलगाव या ठिकाणी रयत क्रांती संघटना तथा पक्षाच्या बैठका घेऊन बीड जिल्ह्यात मित्रपक्ष या नात्याने महायुतीचा धर्म पाळायचा आणि बीड लोकसभा उमेदवार पंकजाताई यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचा असा आदेश दिला. 
त्यानुसार बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील तालुकाध्यक्ष तथा सर्व आघाड्या कामाला लागल्या.  मात्र पंकजाताई व धनुभाऊ महायुती धर्म पाळायला कमी पडत आहेत का काय असा प्रश्न पडतो. कारण गेला महिनाभरापासून महायुतीचा प्रचार दौरा तथा ठीक ठिकाणी सभा होत आहेत मात्र महायुतीच्या बॅनरवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत तसेच राज्य प्रवक्ते तथा बीड जिल्हा अध्यक्ष शेतकरी नेते संदिप दादा वाहूळे यांचा फोटो कुठल्याच सभेच्या बॅनरवर दिसला नाही. यामुळे बीड जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी नाराज आहेत असे कळते.  
बीड जिल्हा अध्यक्ष यांच्या म्हणण्यानुसार महायुती किंवा त्याचे उमेदवार यांचा अजून कोणाचाही संपर्क झाला नाही किंवा त्यांचा स्वतः होऊन अजून कोणीही संपर्क केलेला नाही. जिल्हा अध्यक्ष म्हणतात पंकजा ताई यांना गेली 15 दिवस झाले संपर्क करण्याचा प्रयत्न  करत आहोत मात्र त्यांचे पदाधिकारी ,स्विय सहाय्यक तसेच जवळचे लोक त्यांचा संपर्क होऊ देत नाही. यामागे काय गौडबंगाल आहे देव जाणे. ताईच्या सोबतचे प्रतिनिधी ताईची सुपारी तर घेऊन नाहीत ना अशी शंका येत आहे,  किंवा श्रेय घेण्याचा स्पर्धेत इतरांना जवळ येऊ न देण्याची त्यांची भावना ताईंना पराभवाच्या छायेत टाकताना दिसत आहे.
पंकजाताई किंवा त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतलेले धनंजय मुंढे साहेब यांनी अजून संपर्क केलेला नाही उलट संघटनेचे पदाधिकारी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र समोरून कोणताच प्रतिसाद येत नाही यावरून त्यांना महायुती मधील घटपक्ष कोण कोण आहेत याची माहिती यांना नाही किंवा जाणीवपूर्वक टाळत आहेत हा प्रश्न पडतो. यामुळे पुढे ताईंच्या प्रचाराचे काम चालू ठेवायचे का  बंद करायचे  यावर सोमवारी सायंकाळपर्यंत संघटनेची बैठक घेऊन निर्णय होईल असे कळते.
आजपर्यंतच्या निरिक्षणानुसार असे जाणवते की पंकजाताई यांनी मित्रपक्षांना कुठलाही संपर्क केलेला नाही. फक्त रयत क्रांती संघटनाच नाही तर इतरही मित्रपक्ष ताईवर नाराज चाललेले आहेत .
रयत क्रांती संघटना बीड जिल्ह्यात अकरा तालुक्यात सर्व आघाड्यांवर कार्य करत आहे. बीड मधील सहा मतदारसंघाचा विचार केला तर प्रत्येक मतदार संघात  संघटनेचे  10,000+ एवढी म्हणजे सरासरी किमान 40,000+ ची लीड देऊ शकू एवढी आमची ताकत आहे. प्रत्येक मतदार संघातील आजी, माजी आणि उत्सुक आमदारकीचे उमेदवार यांनी आपापल्या मतदार संघात ताईच्या सभा घेतल्या मात्र त्यांच्या बॅनरवर आणि भाषणात संघटनेचा उल्लेख आला नाही तेव्हा यांना ही आमचे आव्हान आहे की तुम्ही आम्हाला डावलू शकत नाही. 
गेल्या 20 दिवसाच्या  निरीक्षणानंतर आणि फॉर्म भरतानाच्या प्रचार सभेत रयत क्रांती संघटनेचा झालेला अनुल्लेख तसेच  शेतकऱ्यांचे कैवारी सदाभाऊ खोत यांचा नसलेला फोटो असे महायुतीचे वर्तन पाहता असे जाणवत आहे की पंकजाताई यांना मित्र पक्षाची जी महाराष्ट्रातील सर्वात ॲक्टिव शेतकरी संघटना आहे यांची गरज नाही . 
रयत क्रांती संघटना ही शेतकरी संघटना आहे. शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना आहे. प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची बाजू मांडणारी , सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी, लोकशाही बळकट करण्यासाठी लढणारी संघटना आहे. कोरोना काळातील माझे घर हेच माझे आंदोलनाचे रणांगण या टॅग लाईन खालील आंदोलन, महविकास आघाडी काळात एस टी आंदोलन,  ऊसदर वाढीसाठीचे आंदोलन, एक रकमी FRP साठी आंदोलन , दोन कारखान्यातील हवाई अंतर कमी करण्यासंदर्भातील आंदोलन, शिंदे सरकार काळातील दूध दरवाढीसाठी चे  यशस्वी आंदोलन, सैन्यभरती, mpsc भरतीसाठी केलेले आंदोलन हे काही आणि यासारखी अनेक यशस्वी आंदोलने आहेत.
मात्र असे असताना तुम्ही आम्हाला जिल्ह्यात डावलत असाल तर आम्ही जिल्हा स्थरावर  वेगळा निर्णय घेऊ. कारण महायुती धर्म पाळण्याचा ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही .तुम्ही योग्य सन्मान दिला तर एकवेळ घरची भाकरी चटणी बांधून तुमचा प्रचार करू मात्र स्वाभिमानाशी तडजोड करायची नाही अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

Wednesday, April 24, 2024

महादेव जानकरांचा खासदार म्हणून ‘गृहप्रवेश’ करा धनंजय मुंडे यांचे आवाहन ; सोनपेठ येथे जग्गी सभा संपन्न

महादेव जानकरांचा खासदार म्हणून ‘गृहप्रवेश’ करा धनंजय मुंडे यांचे आवाहन ; सोनपेठ येथे जग्गी सभा संपन्न 

सोनपेठ (दर्शन) :-



वर्षानूवर्षापासून सर्वार्थाने मागास म्हणून ओळखल्या जाणार्‍या परभणी मतदारसंघास या निवडणूकीच्या माध्यमातून महादेवराव जानकर यांच्या रुपाने एक निःस्वार्थ अन् विकासाभिमुख असे नेतृत्व मिळत आहे, त्यामुळे भाग्यवान असणार्‍या परभणीकरांनी जानकर यांचा खासदार म्हणून गृहप्रवेश करुन घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
          परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी (दि.23) कृषिमंत्री मुंडे यांनी सोनपेठातील पद्मीनी मंगल कार्यालयात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई उत्तमराव विटेकर, माजी आमदार डाँ.मधूसूदन केंद्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आमदार मोहन फड, ज्येष्ठ नेते रमाकांत जहागिरदार, डॉ.केदार खटींग, दयानंद सौन्नर, रावसाहेब पांडुळे, ज्ञानेश्वर दातार, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा भावना नखाते, दशरथ सूर्यवंशी पाटील, दत्तात्रय भांडुळे पाटील, बाळासाहेब जाधव, ॲड.श्रीकांत विटेकर यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान होते.
           याप्रसंगी मुंडे यांनी महादेव जानकर या व्यक्तीमत्वाबद्दल मुक्तकंठाने कौतूक केले. परभणीकर हे निश्‍चितच भाग्यवान आहेत. 2024 च्या निवडणूकीच्या निमित्ताने का होईना, परभणीकरांना जानकर यांच्या रुपाने एक प्रामाणिक, निःस्वार्थ, सर्वसमावेश, स्वाभिमानी व विकासाभिमुख असं नेतृत्व उमेदवाराच्या माध्यमातून मिळत आहे. या व्यक्तीमत्वाने कधीही स्वहिताचा विचार केला नाही. अख्खं आयुष्य समाजसेवेकरीता वाहून घेतले. जानकर यांच्या मागे न पुढे कोणीही नाही. त्यामुळेच परभणीकर हेच जानकर यांच्या मागे व पुढे राहू शकतील. महायुतीच्या पक्षश्रेष्ठींनी जानकर यांच्या परभणीतील उमेदवारी संदर्भात जो विचार केला तो निश्‍चितच दुरदृष्टी ठेवून, परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवूनच केला आहे. त्यामुळे आपण महायुतीच्या श्रेष्ठींचे खरोखरच आभार मानतो, परभणीकरांना जानकर यांची किंमत कदाचित येईपर्यंत कळली नसावी. जानकर हे उमेदवार म्हणून आले, तुमचे ते कधी झाले हे कळलेच नाही, असे नमूद करतेवेळी मुंडे यांनी या जागेवर राष्ट्रवादीचा दावा होता, विटेकर यांना कामास लागा, असा सल्लाही दिला होता, परंतु श्रेष्ठींनी विटेकर यांना थोडेसे बाजूला करीत जानकर यांना संधी दिली. तोच निर्णय परभणीकरांचे भाग्य उजळविणारा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेतून जानकर यांना छोटा भाऊ असे संबोधून त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त केले आहे. त्यामुळेच आता परभणीच्या विकासाचे डायरेक्ट असे कनेक्शन जूळल्या गेले आहे, असे मुंडे यांनी म्हटले.
             परभणी मतदारसंघात सातत्याने निवडणूका या नात्यागोत्या, गणगोताभोवतीच फिरत राहिल्या. खान पाहिजे की बाण असाही नारा अधूनमधून होत होता. आता जाती पातीचे किळसवाणे राजकारणसुध्दा या मतदारसंघात सुरु झाले आहे. हे राजकारण घातक आहे. विरोधकांनी हेतुतः असे वळण देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. विरोधकांचे हे प्रयत्न सर्वसामान्य मतदार हाणून पाडतील, कधीही पार्लमेंटमध्ये शब्दसुध्दा न काढणार्‍यांना या निवडणूकीतून जागा दाखवून देतील, असाही विश्‍वास मुंडे यांनी व्यक्त केला.
           मंदिरांच्या जमिनी हडपण्याचे प्रकारसुध्दा या जिल्ह्याच्या नेतृत्वाने करावे या सारखे दुर्देव कोणते आहे, असा सवाल करतेवेळी मुंडे यांनी प्रत्येक इव्हेंटमधून व्यापार्‍यांना लुटण्याचे प्रकार असो, अलिकडे प्रभावाची चाहूल ओळखून व्यापार्‍यांना धमकावण्याचेही प्रकार हे निषेधार्ह आहेत. कोणीही या धमक्यांना भिक घालू नये, आम्ही सोबत आहोत, हे लक्षात ठेवावे, असे मुंडे म्हणाले.
            26 एप्रिल रोजी सर्वसामान्य मतदारांनी जानकर यांना मोठ्या मनाने, खुल्या दिलाने, कोणत्याही जाती पातीचा विचार न करता सद्सद्विवेक बुध्दीने विचार करीत प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, व जानकर यांना खासदार म्हणून या जिल्ह्यात गृहप्रवेश द्यावा, असे आवाहनही मुंडे यांनी केले.

Saturday, April 20, 2024

शिवसेना प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महंत नेहरू महाराजांच्या हस्ते संपन्न

शिवसेना प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महंत नेहरू महाराजांच्या हस्ते संपन्न

सोनपेठ (दर्शन) :- 



लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार संजय (बंडू) जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन बंजारा समाजाचे महंत श्री नेहरू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. 
सोनपेठ शहरातील गणेश नगर भागात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय (बंडू) जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पाथरी  विधानसभा प्रमुख डॉ. राम शिंदे, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय कदम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपने, काँग्रेस तालुका अध्यक्ष मुंजाभाऊ धोंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष दत्तराव कदम, शिवसेना तालुका प्रमुख भगवान पायघन, गंगाखेड येथील साधना ताई राठोड यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 
यावेळी  श्री.क्षेत्र पोहरादेवीचे महंत नेहरु महाराज पोहरादेवीकर यांच्या हस्ते उद्घाटन होऊन सोनपेठ महाविकास आघाडीच्या वतीने महंत नेहरू महाराज यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुंजभाऊ धोंडगे, डॉ राम शिंदे तसेच महंत नेहरू महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त करून लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन कार्यकर्ते तसेच जनतेला केले. 
या उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सोनपेठ येथील असंख्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 


काँग्रेसने मराठवाडा हेतुतः मागास ठेवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परभणीतून आरोप : काँग्रेसवर जोरदार हल्ला

काँग्रेसने मराठवाडा हेतुतः मागास ठेवला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परभणीतून आरोप : काँग्रेसवर जोरदार हल्ला

परभणी/सोनपेठ (दर्शन) : - 


मराठवाड्यासारख्या काळ्या आणि कसदार मातीच्या क्षेत्रास काँग्रेसजणांनी हेतुतः सर्वांगिण विकासापासून वर्षानूवर्ष कोसोदूर ठेवले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.20) परभणीत आयोजित केलेल्या जाहीर सभेतून केला.
            या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ पाथरी रस्त्यावरील लक्ष्मी नगरी परिसरात आयोजित केलेल्या प्रचंड जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भागवत कराड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे मंत्री अतूल सावे, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्यासह उमेदवार महादेव जानकर, आमदार सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुर्राणी, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, माजी खासदार अ‍ॅड.सुरेश जाधव, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, माजी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, ज्येष्ठ नेते डॉ.मिना परतानी, डॉ.विद्या चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.
           आपल्या 30 मिनीटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेच्या या निवडणूका केवळ सरकार बनविण्यापुरत्या मर्यादित नाहीत तर या निवडणूका विकसित भारत, आत्मनिर्भर भारत हे ध्येय व लक्ष्य ठेवूनच होवू घातल्या आहेत. या निवडणूकीतील मुद्देसुध्दा सामान्य नाहीत. प्रत्येक मुद्दा महत्वपूर्ण आहे. विशेषतः या जगात तीसरी अर्थव्यवस्था म्हणून भारत उभा राहू इच्छित आहे. चांद्रयान सारखी यशस्वी मोहिम 140 कोटी देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरली. भविष्यातील गगनयान मोहिमसुध्दा गौरवास्पद ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला.
            सैन्य दलास स्वदेशी शस्त्रास्त्राचा पुरवठा, कोरोनासारख्या आपत्तीत औषध निर्मिती वगैरे गोष्टी हे आत्मनिर्भर भारताचे प्रतिक आहे. जगभर या विषयीच प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे, असे नमूद करतेवेळी विकासाचा मोठा पल्ला आपणास गाठावयाचा आहे. त्यासाठी या निवडणूका अत्यंत महत्वपूर्ण आहेत, असे मोदी म्हणाले.
            गेल्या काही वर्षातील निवडणूका आपण अनुभवल्या आहेत. 2014 सालच्या निवडणूकीच्या वेळी अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट सारख्या मुद्यांवर चर्चा होत होती. पाच वर्षानंतर म्हणजेच 2019 च्या निवडणूकीत अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट, शहीदांच्या मालिका वगैरे चर्चा थांबल्या गेल्या. त्याऐवजी सर्जिकल स्ट्राईक सारख्या मुद्याने देशवासीयांना परिवर्तन दिसून आले. भारत देश हा हल्ले सहन करणारा नाही तर घरात घुसून प्रत्यूत्तर देणारा हा भारत आहे, हे पाच वर्षात दाखवून दिले, असे मोदी म्हणाले. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने सबका साथ सबका विकास हाच मूलमंत्र जपला. कोणत्याही जातीपातीचा, धर्माचा विचार न करता, कोणताही भेदभाव न करता केंद्र सरकारने अन्य भागाप्रमाणे परभणी जिल्ह्यातसुध्दा 40 हजार लाभार्थ्यांना पक्के घर दिले. त्यातून घरकुलाची चिंता मिटली. प्रत्येक घरकुलास पाणी पुरवठा सुरु केला, असे नमूद करतेवेळी मोदी यांनी तीसर्‍यांदा सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकार उर्वरीत सर्व कामे पूर्ण करेल, नव्या दिशेने भक्कमपणे अन्य कामांवर लक्ष केंद्रीत करेल, असे आश्‍वासित केले.
            परभणी जिल्ह्यात 12 लाखांपेक्षा जास्त नागरीकांना राशनचा पुरवठा होतो आहे. जनऔषधीच्या माध्यमातून स्वस्त दरात सुरळीतपणे औषधी उपलब्ध होत आहेत. उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचला आहे. पशूधनाच्या माध्यमातूनही छोटे मोठे उद्योग या जिल्ह्यात उभे राहत आहेत.
            वास्तविकतः कापूस, सोयाबीन सारखी नगदी पीके या भागात मोठ्या प्रमाणावर पिकत असतांना प्रक्रिया उद्योग नाही, सिंचनाचे प्रश्‍नसुध्दा दुर्लक्षित आहेत. परंतु या गोष्टीची निश्‍चितच दखल घेतली जाईल. मागास जिल्हा म्हणून परभणीची ओळख पूर्णतः पुसली जाईल. एक विकसित जिल्हा, विकसनशिल जिल्हा म्हणून परभणी भारताच्या नकाशावर झळकवू, असा विश्‍वासही मोदी यांनी दिला. वयोवृध्द नागरीकांकरीता आयुष्यमान योजना, मोठ्या प्रमाणावर अन्य मदत उपलब्ध केली जात आहे. महिलांनाही सर्वतोपरी मदतीचा हात पुरविला जातो आहे, असे स्पष्ट केले.
काँग्रेस ऐसी बेल है......
           ‘सबका साथ सबका विकास’ हा मंत्रच काँग्रेसजणांच्या पोटात गोळा उठविणार्‍या ठरू लागल्या आहेत, अशी टिका मोदी यांनी केली. मराठवाड्याच्या विकासात काँग्रेसजणांनीच वर्षानूवर्ष हेतुतः खोडा घातला. सर्वांगिण विकासापासून हे क्षेत्र पध्दतशीरपणे दूर ठेवले, असा आरोप करतेवेळी ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र के बीच आपको इंडिया आघाडीसे बहोत सतर्क रहेना  है, काँग्रेस ऐसी बेल है, जिसकी अपनी ना कोई जड है ना जमीन है, और इसे जो सहारा देता है ये ऊसेही सुका देती है’ या शब्दात काँग्रेस जणांवर तूफान हल्ला चढवला.
जानकर म्हणजे माझा छोटा भाऊ...
          या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे आपले छोटे भाऊ आहेत. सर्वसामान्य मतदारांनी जानकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन करतेवेळी मोदी यांनी जानकर यांना संसदेत पाठवा, तेसुध्दा प्रचंड मताधिक्याने. आपला खांदा बळकट करण्यासाठी जानकरांना भरभरुन आशिर्वाद द्या, असे मोदी म्हणाले.
@@@@@@@@@@@@@@@
साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती साठी संपर्क साधावा संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.
§§§§§§§§§§§§§§§§§§§§§§