Friday, July 21, 2023

परभणी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची नियुक्ती थोडक्यात परिचय

परभणी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची नियुक्ती थोडक्यात परिचय


मुंबई/औरंगाबाद/परभणी/सोनपेठ (दर्शन) :-

महाराष्ट्र शासनाने राज्यातील 41 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून आर.के.गावडे यांची नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून जिल्हाधिकारी, परभणी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर आंचल गोयल यांना जिल्हाधिकारी, परभणी पदावरून अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
परभणीचे नूतन जिल्हाधिकारी आर.के.गावडे हे पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील रहिवासी आहेत.त्यांचे संपूर्ण नाव रघुनाथ खंडू गावडे असे असून त्यांना  2020 मध्ये आयएएस केडर मिळाले आहे. श्री.गावडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली होती. त्यानंतर महसूल विभागात त्यांनी विविध ठिकाणी काम केले. नाशिक येथे दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची प्रथम नियुक्ती, शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे पुनर्वसन अधिकारी म्हणून तळोदा (जि.नंदुरबार) येथे करण्यात आली. तेथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला.
सन 2001 मध्ये त्यांची नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे प्रांताधिकारी पदावर नेमणूक झाली. या काळात राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या विविध दौऱ्यांसमयी ओझर विमानतळ येथे राजशिष्टाचार व त्या संबंधातील कामे त्यांनी चोखपणे पार पाडली. 2006 ते 2010 या कालावधीत त्यांनी नाशिक विभागात एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
2011 ते 2014 या कालावधीत त्यांनी अपर जिल्हाधिकारी, मालेगाव या अतिशय संवेदनशील व महत्वाच्या पदावर काम केले. महाराष्ट्र शासनाने सन 2014 साली नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी मेळा अधिकारी पदावर नियुक्ती केली. 2014 ते 2016 या कालावधीतील हा कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडला. या उत्कृष्ट नियोजनाची दखल अमेरिका देशात देखील घेतली गेली. या उत्कृष्ट कामासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले. 2017-2020 या कालावधीत त्यांनी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (महसूल) व उपायुक्त (सामान्य प्रशासन) या पदावर काम केले. या संपूर्ण सेवाकाळातील पंचवीस वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या लोकाभिमुख कामाची दखल घेऊन महाराष्ट्र व केंद्र शासनाने त्यांची 2020 मध्ये आयएएस पदी पदोन्नती केली आहे. एक शिस्तप्रिय व धडाडीचा सनदी अधिकारी म्हणून श्री.रघुनाथ गावडे यांची ओळख आहे.


No comments:

Post a Comment