ज्येष्ठ पत्रकार,सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती हेमाताई रसाळ यांना 'परभणी भूषण पुरस्कार' जाहीर
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती हेमाताई रवींद्र रसाळ यांना यंदाचा 'परभणी भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दैनिक गोदातीर समाचारच्या वतीने विविध क्षेत्रात आयुष्यभर कार्यरत राहून परभणीचा लौकिक वाढविणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव केला जातो.
दिनांक 1 जानेवारी 2022 ला श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यापूर्वी सुरमणी डॉ. कमलाकर परळीकर(2013), प्राचार्य डॉ. बी. एस. सोळुंके (2014), गोंधळमहर्षि राधाकृष्ण कदम (2015), स्वातंत्र्यसैनिक शाहीर प्रभाकर वाईकर (2016), शिक्षणतज्ञ लक्ष्मीकांत पांडे (2017), आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बी. एच. सहजराव (2018) या मान्यवरांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला आहे. कोरोनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गेली दोन वर्ष कार्यक्रमात खंड पडला होता. यावर्षीपासून पुन्हा 'परभणी भूषण' या पुरस्काराचे सातत्य राखले गेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्बंधांचे पालन करून हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गोदातीर समाचारचे संपादक रमेश गोळेगावकर यांच्यासह श्रीमती माधुरी क्षीरसागर, आसाराम लोमटे यांनी केले आहे.
श्रीमती हेमाताई रसाळ यांचा संक्षिप्त परिचय:
कराड, जिल्हा सातारा येथे दि. 26 नोव्हेंबर 1947 रोजी जन्म. सातारा व अहमदनगर येथून बीए बीकॉम, त्यानंतर एलएलबी . विवाहानंतर नांदेड येथे मराठवाड्यातील पहिले दैनिक म्हणून ओळख असलेल्या गोदातीर समाचार परिवारात दाखल.तब्बल पन्नास वर्षापूर्वी तंत्रज्ञान फारसे प्रगत नसताना बातम्या गोळा करण्यापासून ते प्रूफ रीडिंग आणि अंकाची पार्सले टाकण्यापर्यंतचे काम. नांदेड, लातूर या ठिकाणी काही काळ घालवल्यानंतर परभणीतच कायमचे वास्तव्य, गोदातीर समाचारच्या परभणी आवृत्तीच्या दीर्घकाळ संपादक, स्त्री मुक्ती संघटना, पथनाट्य, जिल्हा ग्राहक न्याय मंच, बाल न्यायालय, महिला दक्षता समिती, असंघटित महिला कामगार, मोलकरीण संघटना अशा विविध आघाड्यांवर सामाजिक कार्य. विविध क्षेत्रातील महिलांना संघटित करून महिला जागृती संघटनेची स्थापना, स्त्री मुक्ती संघटनेचे आंदोलन, परित्यक्ता हक्क परिषद, राज्यव्यापी हुंडाविरोधी परिषद, साक्षरता अभियान, शेतकरी चळवळ अशा महत्वपूर्ण उपक्रमांच्या आयोजनात कृतिशील सहभाग, राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानीत, संपादक संघटनेच्या दर्पण पुरस्कारासह अन्य संस्थांकडूनही सन्मान.

No comments:
Post a Comment