बेशिस्त अधिकारी-कर्मचार्यांना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची धास्ती : कामकाजात बदल
जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल या जिल्ह्यात रुजू झाल्यापासून महसूल यंत्रणेसह अन्य यंत्रणांतर्गत बेशिस्त अधिकारी - कर्मचारी चांगलेच हादरले आहेत.
जिल्हाधिकारी श्रीमती गोयल या मुंबईतून पदभार स्विकारल्या पाठोपाठ दुसर्या दिवशी परभणी गाठून दोन दिवस राज्यपालांच्या दौर्यात व्यस्त होत्या.राज्यपालांचा दौरा आटोपल्यानंतर श्रीमती गोयल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्ष केंद्रीत केले. विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध विभागांना भेटी दिल्या. तेथील विभाग प्रमुखांबरोबर, कर्मचार्यांबरोबर हितगूज केले. जिल्हाधिकार्यांच्या या विभागनिहाय भेटीगाठीने जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत बेशिस्त अधिकारी-कर्मचारी अक्षरशः हादरले. या भेटीतून श्रीमती गोयल यांनी त्या-त्या विभागांतर्गत भौतिक सुविधांचीसुध्दा पाहणी केली. विशेषतः अस्वच्छतेवर अधिकारी-कर्मचार्यांना चांगलेच सूनावले. आपण ज्या ठिकाणी तासन्तास काम करीत आहोत त्या जागा स्वच्छ व प्रसन्न असल्या पाहिजे, असे सूनावले.
श्रीमती गोयल यांनी गंगाखेड त्यापाठोपाठ पाथरी, मानवत तालुक्यांचाही दौरा केला. तेथील तहसील कार्यालयांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे पाथरी व मानवत नगरपालिका कार्यालयांनाही भेटी दिल्या. मुख्याधिकार्यांसह कर्मचार्यांबरोबर हितगूज केले. काही विकास कामांबाबत चर्चाही केली.
परभणी महापालिकेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासही भेट देवून जिल्हाधिकारी गोयल यांनी मनपाच्या अधिकार्यांना, संबंधित कंत्राटदारांना मोठा धक्का दिला. या उद्यानातील विकाास कामांवर, सौंदरीकरणावर महापालिकेने 1 कोटी 8 लाख रुपयांचे बिल अदा केले आहे. प्रत्यक्षात या उद्यानात त्या तुलनेत टिचभरसुध्दा कामे नाहीत. या पार्श्वभूमीवर श्रीमती गोयल यांची भेट महत्वपूर्ण ठरली आहे. बोरवंड भागातील घनकचरा प्रकल्पासही श्रीमती गोयल यांनी भेट दिली. तो प्रकल्प पूर्ण झाला आहे. परंतु, पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही. गंभीर बाब म्हणजे धार रस्त्यावरील अनाधिकृत अशा कचरा डेपोवर अद्यापही कचरा नेवून टाकला जातो आहे, मात्र कागदोपत्री मनपाद्वारे बोरवंडला कचरा जमा केला जात असल्याचे नमूद केले जात आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमती गोयल यांची भेट निश्चितच धक्कादायक ठरली आहे.
दरम्यान,श्रीमती गोयल या जिल्ह्यातील अन्य तालुक्यांना, नगरपालिका कार्यालयांना भेटी देतील, हे ओळखून महसूल अधिकारी तसेच संबंधित पालिकेतील अधिकारी-कर्मचारी चांगलेच हादरले आहेत.

No comments:
Post a Comment