Saturday, February 28, 2026

सोनपेठ नगर परिषदेच्या अर्थसंकल्पात शहराचा खरा विकास साधण्याचा प्रयत्न - नगराध्यक्ष परमेश्वर कदम विशेष सभेत सादर केला करवाढमुक्त पण विकासयुक्त अर्थसंकल्प !!

सोनपेठ नगर परिषदेच्या अर्थसंकल्पात शहराचा खरा विकास साधण्याचा प्रयत्न  -  नगराध्यक्ष परमेश्वर कदम विशेष सभेत सादर केला करवाढमुक्त पण विकासयुक्त अर्थसंकल्प !!
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ नगर परिषद निवडणूकीनंतरचा पहिलाच अर्थसंकल्प ; कोणतीही करवाढ नाही, सर्वसमावेशक विकासाचा सोनपेठ वासियांना दिला विश्वास ! 101 कोटी 49 लाख 20 हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर,
     सोनपेठ नगर परिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा तब्बल 101 कोटी 49 लाख 20 हजार रुपयांचा अर्थसंकल्प शनिवार 28 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. नगराध्यक्ष परमेश्‍वर कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असून शहरातील पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे बैठकीला नगराध्यक्ष परमेश्‍वर कदम यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी युवराज पौळ, उपनगराध्यक्ष निलेश राठोड, गट नेते सद्दाम हुसेन, गट नेते सारिका विटेकर, धम्मपाल किरवले यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या 101 कोटी 49 लाख 20 हजार रुपयांच्या या अर्थसंकल्पातून शहराच्या कायापालटासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने शहरातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण आणि शहराअंतर्गत रस्त्यांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे, "नगर परिषदेच्या वाचनालयासाठी नवीन पुस्तक खरेदीसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे", अनावश्यक खर्चांना फाटा देण्यात आलेला आहे तसेच पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बंदिस्त गटारांचे जाळे विस्तारले जाणार आहे.
          ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ घनकचरा व्यवस्थापन आणि शहराच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यावर भर दिला आहे. तसेच शहराच्या वाढत्या विस्तारानुसार प्रत्येक घरापर्यंत शुद्ध आणि मुबलक पाणी पोहोचवण्यासाठी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी निधी प्रस्तावित आहे. स्वच्छ पाणी देण्यासाठी विशेष तरतूद केल्यामुळे यापुढे शहराला अधिक स्वच्छ पाणी मिळणार आहे. नागरिकांच्या मनोरंजनासाठी सार्वजनिक उद्यानांचे सुशोभीकरण करण्यासही प्राधान्य दिले आहे.
मुख्याधिकारी युवराज पौळ यांनी अर्थसंकल्पातील तांत्रिक बाजू आणि जमा-खर्चाचा तपशील मांडत शहरातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी हा अर्थसंकल्प शहराच्या प्रगतीचा ठरणार असल्याचे सांगितले. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुरेशी तरतूद करण्यात आल्याने नागरिकांमधून सुध्दा समाधान व्यक्त होत आहे.

शहराचा खरा विकास साधण्याचा प्रयत्न  -  नगराध्यक्ष परमेश्वर कदम - हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा असून, कोणत्याही नवीन कराचा बोजा न टाकता शहराचा विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे सोनपेठ च्या जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखविण्यासाठी नगरपालिकेच्या एक ना एक रुपयाचा विनियोग जनकल्याणासाठीच व्हावा असा आपला निर्धार आणि संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले*
*सर्वांच्या सहकार्याने सोनपेठ नगरपरिषद अधिक सक्षम, समृद्ध व महाराष्ट्रात अव्वल ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केले राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून जास्तीत जास्त निधी खेचून आणून सोनपेठ शहराला आदर्श शहर बनवू, असा विश्‍वास यावेळी  नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांनी यावेळी व्यक्त केला*.

Wednesday, February 25, 2026

मराठी भाषा : संस्कृती आणि अस्मितेचा श्वास - डॉ. राजेंद्र बगाटे

मराठी भाषा : संस्कृती आणि अस्मितेचा श्वास - डॉ. राजेंद्र बगाटे
(सोनपेठ दर्शन) :- 
२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी समाजाच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेत केवळ औपचारिक उत्सव म्हणून नोंदला गेलेला नाही, तर तो आपल्या भाषिक आत्मभानाचा, स्मृतिधनाचा आणि अस्मितेच्या सातत्याचा साक्षीदार आहे. मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना आपण एका अर्थाने स्वतःकडे म्हणजेच आपल्या बोलण्यात, विचारात, संवेदनांत आणि सामाजिक वर्तनात खोलवर रुजलेल्या भाषेकडे पाहतो.भाषा ही फक्त संवादाचे साधन नसते; ती समाजाची सामूहिक स्मृती असते. पिढ्यान्‌पिढ्यांचे अनुभव, श्रम, आनंद, दुःख, संघर्ष, स्वप्ने आणि मूल्ये शब्दांच्या रूपाने भाषेत साठलेली असतात. मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या भूमीशी, लोकजीवनाशी आणि इतिहासाशी घट्ट बांधलेली आहे. म्हणूनच तिचा गौरव म्हणजे आपल्या अस्तित्वाचा गौरव आहे.
मराठी भाषेचा इतिहास हा हजारो वर्षांचा, अनेक टप्प्यांतून गेलेला प्रवास आहे. प्राचीन महाराष्ट्री प्राकृतपासून सुरू झालेली ही भाषा अपभ्रंशाच्या अवस्थेतून पुढे जात लोकभाषा म्हणून विकसित झाली. प्रारंभी मराठी भाषा ही सामान्य जनतेच्या दैनंदिन व्यवहाराची भाषा होती. शेतकरी, कष्टकरी, कारागीर, व्यापारी, स्त्रिया सगळ्यांच्या जीवनात ही भाषा सहजपणे मिसळलेली होती. तिच्या शब्दसंपत्तीतून लोकजीवनाचे प्रतिबिंब उमटते. म्हणी, वाक्प्रचार, लोकगीते, ओव्या, पोवाडे यांमधून मराठी भाषेने लोकसंस्कृती जपली आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली.
संत परंपरेने मराठी भाषेला एक नवे वळण दिले. संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून संस्कृतमधील गहन तत्त्वज्ञान मराठी भाषेतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. हा क्षण मराठी भाषेच्या इतिहासातील क्रांतिकारक टप्पा मानला जातो. ज्ञानेश्वरांनंतर नामदेव, एकनाथ, तुकाराम, समर्थ रामदास यांसारख्या संतांनी मराठी भाषेला अध्यात्मिक उंची दिली. त्यांच्या अभंगांमधून मराठी भाषा ही भक्तीची, समतेची आणि करुणेची भाषा बनली. जातीभेद, अहंकार आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध संतसाहित्याने मराठी भाषेतून मानवी मूल्यांचा संदेश दिला. त्यामुळे मराठी भाषा ही केवळ धार्मिक अभिव्यक्तीची भाषा न राहता, ती समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन बनली.
मध्ययुगीन काळात मराठी भाषेने राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातही आपले स्थान निर्माण केले. स्वराज्यनिर्मितीच्या काळात मराठी भाषेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. राज्यकारभार, दप्तरी व्यवहार आणि न्यायनिवाड्यात मराठी भाषेचा वापर करून भाषिक स्वाभिमान अधोरेखित करण्यात आला. त्या काळात मराठी भाषा ही केवळ साहित्यिक किंवा धार्मिक मर्यादेत न राहता, ती सत्तेची, नीतीनिर्मितीची आणि लोककल्याणाची भाषा बनली. भाषा आणि सत्ता यांचे नाते लोकाभिमुख झाले; मराठी भाषा जनतेशी थेट संवाद साधणारी ठरली.
ब्रिटिश राजवटीच्या काळात मराठी भाषेने नवजागरणाचा अनुभव घेतला. मुद्रणयंत्राच्या आगमनामुळे वृत्तपत्रे, मासिके आणि पुस्तके मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होऊ लागली. समाजसुधारकांनी मराठी भाषेतून लोकांशी संवाद साधला आहे.  स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, अस्पृश्यता निवारण, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या विषयांवर मराठी भाषेतून निर्भीड लेखन झाले आहे. मराठी भाषा ही परिवर्तनाची भाषा बनली. समाजमन ढवळून काढणारी, प्रश्न विचारणारी आणि नव्या मूल्यांची जाणीव करून देणारी भूमिका तिने बजावली. स्वातंत्र्यलढ्याच्या काळातही मराठी भाषेने जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्याने अनेक नवे प्रवाह अनुभवले. ग्रामीण साहित्याने खेड्यातील जीवन, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण संस्कृतीचे वास्तव मांडले. दलित साहित्याने सामाजिक विषमतेचे कटू वास्तव उघड केले आणि वंचितांच्या आवाजाला शब्द दिले. स्त्रीवादी लेखनाने स्त्रियांच्या अनुभवांना, वेदनांना आणि संघर्षांना अभिव्यक्ती दिली. आदिवासी साहित्याने मुख्य प्रवाहाबाहेरील समाजजीवन मराठी भाषेतून मांडले. या सर्व प्रवाहांमुळे मराठी भाषा अधिक व्यापक, समावेशक आणि लोकाभिमुख बनली आहे.
आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना वर्तमानकाळातील आव्हानेही समजून घेणे आवश्यक आहे. जागतिकीकरण, शहरीकरण आणि इंग्रजी भाषेचे वाढते प्राबल्य यामुळे मातृभाषेच्या वापरावर मर्यादा येत आहेत. अनेक कुटुंबांत मुलांशी मराठीत संवाद कमी होत आहे. सार्वजनिक फलक, जाहिराती आणि कार्यालयीन व्यवहारांमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात असल्याची उदाहरणे दिसतात. ही परिस्थिती मराठी भाषेच्या भविष्यासाठी चिंताजनक आहे, हे नाकारता येणार नाही.
तथापि, या आव्हानांबरोबरच काही आशादायक बदलही दिसून येतात. डिजिटल युगात मराठी भाषेला नवे व्यासपीठ मिळाले आहे. सोशल मीडिया, ब्लॉग्स, पॉडकास्ट्स आणि व्हिडिओ माध्यमांद्वारे मराठी भाषेतून मोठ्या प्रमाणावर आशयनिर्मिती होत आहे. तरुण पिढी मराठी भाषेतून कविता, कथा, सामाजिक भाष्य, इतिहास, विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक लेखन करताना दिसत आहे. ही बाब मराठी भाषेच्या सर्जनशील क्षमतेचे द्योतक आहे.
मराठी भाषेचा प्रवास केवळ ऐतिहासिक कालखंडांपुरता मर्यादित नसून तो सातत्याने बदलणाऱ्या समाजजीवनाशी जोडलेला आहे. मध्ययुगीन भक्तीपरंपरेनंतर मराठीने जेव्हा पेशवाई, इंग्रजी राजवट आणि नंतर स्वातंत्र्योत्तर काळ अनुभवला, तेव्हा तिच्या आशयात, अभिव्यक्तीत आणि शैलीत आमूलाग्र परिवर्तन घडत गेले. संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांच्या आध्यात्मिक भाषेपासून ते महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांपर्यंत मराठीने समाजमन घडवण्याचे कार्य केले. ही भाषा केवळ भावनांची वाहक राहिली नाही, तर ती शोषणाविरुद्ध लढ्याचे, विवेकाचे आणि माणूसपणाच्या मूल्यांचे प्रभावी साधन ठरली.
ब्रिटिश काळात इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव वाढत असताना मराठी भाषेसमोर अस्तित्वाचे आव्हान उभे राहिले. परंतु या काळातच मराठीने नवे बळ मिळवले. वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथनिर्मिती आणि आधुनिक शिक्षणसंस्था यांच्या माध्यमातून मराठी विचारविश्व अधिक व्यापक झाले. केसरी, मराठा, ज्ञानप्रकाश, मूकनायक, समता यांसारख्या पत्रांनी केवळ राजकीय जाणीव निर्माण केली नाही, तर भाषेला आधुनिक गद्यशैली बहाल केली. लोकमान्य टिळकांचे लेखन, आगरकरांचे विवेचन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि न्यायमूर्ती रानडे यांचे समाजचिंतन या सर्वांनी मराठी गद्याला तार्किकता आणि बौद्धिक खोली दिली.
स्वातंत्र्यलढ्यात मराठी भाषेने जनजागृतीचे महत्त्वाचे कार्य केले. सभा, भाषणे, घोषणा आणि लेखन यांच्या माध्यमातून सामान्य माणसाला राष्ट्रीय चळवळीशी जोडण्याचे कार्य मराठीने समर्थपणे पार पाडले. या काळात कविता, पोवाडे, कीर्तन आणि लोककला यांचा वापर करून स्वातंत्र्याचा संदेश गावोगावी पोहोचवला गेला. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती संघर्षाची शक्ती कशी ठरू शकते, याचे हे जिवंत उदाहरण होते.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात मराठी भाषेच्या विकासास नवे परिमाण लाभले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाषेची अस्मिता केंद्रस्थानी होती. अण्णा भाऊ साठे यांचे यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. मराठी माणसाच्या हक्कांचा, स्वाभिमानाचा आणि सांस्कृतिक अस्तित्वाचा प्रश्न या चळवळीतून उभा राहिला. याच कालखंडात साहित्य, नाटक, सिनेमा आणि पत्रकारिता या क्षेत्रांत मराठीने अभूतपूर्व प्रगती केली. ग्रामीण आणि शहरी अनुभवांचे मिश्रण मराठी साहित्यात दिसू लागले. दलित साहित्य, स्त्रीवादी लेखन, आदिवासी अनुभवकथनया सर्व प्रवाहांनी मराठीला सामाजिक वास्तवाचे व्यापक दर्शन घडवले.
मराठी कवितेने या काळात विशेष उंची गाठली. कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांसारख्या कवींनी मराठी कवितेला आधुनिक संवेदनशीलता दिली. विशेषतः विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांनी मानवी स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि भाषिक अभिमान यांचे जे दर्शन घडवले, ते मराठी साहित्याच्या इतिहासात मैलाचा दगड ठरले. त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा होतो, ही गोष्टच मराठी भाषेच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचे प्रतीक आहे.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीनेही भाषेच्या लोकप्रियतेत मोठी भर घातली. नाटकांनी समाजातील विसंगती, नैतिक प्रश्न आणि मानवी नातेसंबंध प्रभावीपणे मांडले. संगीत नाटकांपासून प्रायोगिक रंगभूमीपर्यंत मराठीने सातत्याने नवे प्रयोग स्वीकारले. चित्रपटांमधून ग्रामीण जीवन, शहरी संघर्ष, स्त्रीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे दुःख या विषयांना व्यापक प्रेक्षकांपर्यंत नेण्याचे काम मराठीने केले.
आजच्या डिजिटल युगात मराठी भाषेसमोर नवी आव्हाने आणि नव्या संधी उभ्या आहेत. इंग्रजीचे वर्चस्व, तंत्रज्ञानातील भाषिक मर्यादा आणि बाजारपेठेचा दबाव यामुळे मराठीचा वापर काही प्रमाणात कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. परंतु दुसरीकडे सोशल मीडिया, ब्लॉग्स, यूट्यूब, पॉडकास्ट्स आणि डिजिटल वृत्तपत्रे यांच्या माध्यमातून मराठी नव्या पिढीपर्यंत वेगळ्या स्वरूपात पोहोचत आहे. तरुण लेखक, कवी आणि विचारवंत मराठीला समकालीन प्रश्नांशी जोडत आहेत. तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना भाषेची मौलिकता कशी जपायची, हा प्रश्न आज अधिक महत्त्वाचा ठरतो.
मराठी भाषा गौरव दिन हा केवळ उत्सव नसून तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण दैनंदिन व्यवहारात मराठीचा किती सन्मान करतो, शिक्षणात, प्रशासनात, न्यायव्यवस्थेत आणि तंत्रज्ञानात मराठीला किती स्थान देतो, याचा विचार करण्याची ही संधी आहे. भाषा टिकते ती केवळ कायद्याने नाही, तर लोकांच्या जगण्यातून. घराघरांत, शाळांत, कार्यालयांत आणि सार्वजनिक जीवनात मराठीचा सहज, सन्मानपूर्वक वापर झाला तरच तिचे भवितव्य उज्ज्वल राहील.
मराठी ही केवळ भूतकाळाची आठवण नाही; ती वर्तमानाची गरज आणि भविष्याची आशा आहे. तिच्यातील लोकशाही मूल्ये, समतेची भावना आणि मानवी करुणा आजच्या ताणतणावाच्या काळात अधिक आवश्यक आहेत. म्हणूनच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण केवळ अभिमान व्यक्त न करता मराठी  भाषेचे संवर्धन, समृद्धी आणि सर्जनशील विस्तार करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मराठी भाषा जिवंत राहील ती आपल्या विचारांत,कृतीत आणि पुढच्या पिढीला दिलेल्या संस्कारांतून. 

डॉ.राजेंद्र बगाटे (लेखक, मराठी आणि समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत).
ईमेल - bagate.rajendra5@gmail.com

Friday, February 20, 2026

जिजामाता पब्लिक स्कूल व ज्यु.कॉलेजच्या विद्यार्थ्याचे जेईई मुख्य परीक्षेत यश

जिजामाता पब्लिक स्कूल व ज्यु.कॉलेजच्या विद्यार्थ्याचे जेईई मुख्य परीक्षेत यश 
सोनपेठ (दर्शन) :- जेईई या भारतातील आयआयटी, एनआयटीएस सरकारी आणि इतर खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी , राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NIA) द्वारा घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेत , जिजामाता पब्लिक स्कूल चा माजी विद्यार्थी उत्कर्ष रामेश्वर जाधव याने 99. 82 सर्वोच्च गुण प्राप्त केले. या या परीक्षेमध्ये अनिवार्य असलेल्या विषयापैकी फिजिक्स 99.82, केमिस्ट्री 99.92 व मॅथ 98.80 असे सर्वोच्च गुण प्राप्त केले . सोनपेठ येथील जिजामाता पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल शाळेचे सचिव,  प्रा.डॉ. मुंजाभाऊ धोंडगे , परभणी जिल्हा परिषद सदस्या, सौ विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे, शाळेचे प्राचार्य, मोहम्मद झहीर , प्राचार्य डॉ.गणेश जयंतपाळ , सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Friday, February 6, 2026

माता रमाबाई आंबेडकरांचे सामाजिक परिवर्तनाच्या पायाभरणीतील योगदान - डॉ. राजेंद्र बगाटे

माता रमाबाई आंबेडकरांचे सामाजिक परिवर्तनाच्या पायाभरणीतील योगदान - डॉ. राजेंद्र बगाटे
साप्ताहिक सोनपेठ दर्शन सौजन्य...
७ फेब्रुवारी हा दिवस भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अत्यंत अर्थपूर्ण, संवेदनशील आणि प्रेरणादायी ठरतो. हा दिवस म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनसाथी, त्यागमूर्ती, संघर्षशील आणि मौनात राहूनही सामाजिक क्रांतीची मशाल पेटती ठेवणाऱ्या माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांचा जयंती दिन होय. भारतीय समाजव्यवस्थेतील जातीय विषमता, सामाजिक अन्याय, स्त्रीदमन, आर्थिक दारिद्र्य आणि मानसिक गुलामगिरीच्या पार्श्वभूमीवर रमाबाईंचे जीवन केवळ एका महापुरुषाच्या पत्नीचे जीवन नव्हते. ते जीवन एका स्वतंत्र सामाजिक योद्ध्याचे, अपार सहनशीलतेचे, निःस्वार्थ त्यागाचे आणि मौनातून घडलेल्या क्रांतीचे जिवंत प्रतीक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक, शैक्षणिक आणि राजकीय संघर्षामागे रमाबाईंच्या कष्टांची, वेदनांची आणि शांत पाठबळाची भक्कम भिंत उभी होती, हे वास्तव समजून घेतल्याशिवाय आंबेडकरी चळवळीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही.
माता रमाबाई आंबेडकर यांचा जन्म अत्यंत साध्या, उपेक्षित आणि सामाजिकदृष्ट्या वंचित परिस्थितीत झाला. त्या काळातील दलित समाजाचे जीवन म्हणजे अपमान, अस्पृश्यता, दारिद्र्य, बहिष्कार आणि सततची असुरक्षितता यांचा संगम होता. स्त्री म्हणून जन्माला येणे म्हणजे दुहेरी अन्याय सहन करणे, हीच त्या समाजाची वास्तवता होती. शिक्षण, स्वातंत्र्य, निर्णयक्षमता, आरोग्य आणि आत्मसन्मान या मूलभूत हक्कांपासून स्त्रीला वंचित ठेवणारी सामाजिक रचना रमाबाईंच्या आयुष्यावरही खोलवर परिणाम करत होती. बालपणापासूनच कष्ट, काम, जबाबदाऱ्या आणि मौनातील सहनशीलता हेच त्यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले. लहान वयातच जीवनातील कठोर वास्तव स्वीकारावे लागल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व संयमी, सहनशील आणि आत्मसंयमी बनले.
अत्यंत लहान वयात रमाबाईंचा विवाह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला. हा विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींमधील कौटुंबिक नाते नव्हते, तर तो एका व्यापक सामाजिक संघर्षाचा प्रारंभ होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आयुष्य शिक्षण, विचार, आंदोलन, संघर्ष आणि सामाजिक विरोधाने भरलेले होते. या संघर्षांचा भार रमाबाईंनाही समानतेने पेलावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि समाजसुधारणेसाठी सातत्याने व्यग्र असताना रमाबाई घर, कुटुंब, मुले आणि सामाजिक वास्तव यांचा समतोल राखत होत्या. संसार सांभाळताना त्यांनी कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही, उलट त्या ध्येयांवर त्यांनी अढळ विश्वास ठेवला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च शिक्षण भारताबाहेर सुरू असताना रमाबाईंवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. आर्थिक टंचाई, अन्न-वस्त्राचा अभाव, आजारपण, सामाजिक उपेक्षा आणि मानसिक ताण हे त्यांचे रोजचे वास्तव होते. अनेक वेळा उपाशीपोटी दिवस काढावे लागले, साध्या वस्त्रांवर समाधान मानावे लागले. तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, हीच त्यांची ठाम भूमिका होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचनी मिळवलेले ज्ञान हे केवळ वैयक्तिक उन्नतीसाठी नसून संपूर्ण समाजाच्या मुक्तीसाठी आहे, याची रमाबाईंना पूर्ण जाणीव होती. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या वेदनांवर मौन धारण करून सामाजिक परिवर्तनाच्या स्वप्नाला बळ दिले.
माता रमाबाई आंबेडकरांच्या जीवनातील सर्वांत वेदनादायी आणि हृदयद्रावक अध्याय म्हणजे त्यांच्या मुलांचे अकाली निधन होय. मातृत्वाचा आनंद अनुभवण्याआधीच त्यांना असह्य दुःख सहन करावे लागले. एका मागोमाग एक अपत्य गमावणे ही कोणत्याही आईसाठी अकल्पनीय वेदना असते. रमाबाईंच्या आयुष्यात ही वेदना वारंवार आली. तरीही त्यांनी कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. स्वतःच्या दुःखाला बाजूला ठेवून समाजासाठी झटणाऱ्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हेच त्यांनी आपले जीवनधर्म मानले. रमाबाईंचा हा त्याग भारतीय स्त्रीच्या सहनशीलतेचा, मानसिक बळाचा आणि निस्वार्थ प्रेमाचा सर्वोच्च नमुना आहे.
माता रमाबाई आंबेडकर या जरी प्रत्यक्ष सामाजिक आंदोलनांच्या मंचावर दिसत नसल्या, तरी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे, मूलभूत आणि निर्णायक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना स्थैर्य देणारे, त्यांच्या संघर्षाला मानसिक आधार देणारे आणि त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळात खंबीरपणे साथ देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे रमाबाई आंबेडकर होत्या. अस्पृश्यता निवारण, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता, धर्मांतर चळवळ आणि भारतीय संविधाननिर्मिती यांसारख्या ऐतिहासिक कार्यांसाठी बाबासाहेबांना जे मानसिक बळ आवश्यक होते, ते रमाबाईंच्या निस्वार्थ त्यागातून मिळाले.
माता रमाबाईंचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधे, शांत, संयमी आणि आत्मसन्मानाने भरलेले होते. प्रसिद्धी, सन्मान, मान्यता किंवा सार्वजनिक गौरवाची अपेक्षा त्यांनी कधीच ठेवली नाही. समाजाने अनेकदा त्यांच्याकडे केवळ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी’ म्हणून पाहिले, परंतु प्रत्यक्षात त्या एका स्वतंत्र विचारसरणीच्या, मूल्यनिष्ठ आणि आत्मसन्मान जपणाऱ्या स्त्री होत्या. अपमान, दुर्लक्ष, अवहेलना आणि कष्ट सहन करूनही त्यांनी कधी तक्रार केली नाही. त्यांचे मौन हे कमजोरीचे नव्हे, तर अंतर्गत शक्तीचे, संयमाचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक होते.
भारतीय समाजातील स्त्री-पुरुष समानतेच्या चर्चेत रमाबाई आंबेडकर यांचे जीवन अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यांनी स्त्रीवादावर भाषणे केली नाहीत, लेखन केले नाही, परंतु त्यांच्या जीवनाने स्त्रीच्या सामाजिक भूमिकेची नवी व्याख्या केली. शिक्षणापासून वंचित असूनही त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक ध्येयांना त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. त्यांच्या जीवनातून हे स्पष्ट होते की स्त्री ही केवळ घरापुरती मर्यादित नसून ती सामाजिक परिवर्तनाची शांत पण प्रभावी वाहक असते.
माता रमाबाई आंबेडकरांच्या जीवनातील दारिद्र्य हे केवळ आर्थिक नव्हते, तर ते सामाजिक अन्यायाचे आणि संरचनात्मक विषमतेचे प्रतीक होते. जातीय भेदभाव, सामाजिक बहिष्कार, धार्मिक रूढी आणि स्त्री म्हणून दुय्यम स्थान या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर झाला. तरीही त्यांनी परिस्थितीला दोष देत बसण्याऐवजी आशेचा मार्ग स्वीकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर, मूल्यांवर आणि ध्येयांवर ठेवलेला विश्वास हेच त्यांच्या जगण्याचे बळ होते. त्यांच्या जीवनातून हे अधोरेखित होते की सामाजिक परिवर्तनासाठी फक्त पुढे उभे राहणारे नेतेच नव्हे, तर मागे उभे राहून आधार देणारे व्यक्तिमत्त्वही तितकेच महत्त्वाचे असते.
माता रमाबाई आंबेडकर यांचे जीवन स्त्रीवादाचा अप्रत्यक्ष पण प्रभावी आधारस्तंभ आहे. त्यांनी शब्दांतून स्त्रीवाद मांडला नाही, परंतु त्यांच्या जीवनप्रवासाने स्त्रीच्या दुहेरी संघर्षाचे वास्तव जगासमोर ठेवले. जातीय अन्याय आणि पितृसत्ताक व्यवस्था या दोन्हींचा सामना करत त्यांनी आपले जीवन जगले. आजच्या स्त्री-अभ्यासात रमाबाईंच्या जीवनाकडे केवळ सहनशीलतेचे प्रतीक म्हणून नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत मोलाचे योगदान देणाऱ्या स्त्री म्हणून पाहिले जाणे आवश्यक आहे.
आजच्या काळात रमाबाई आंबेडकर यांचे स्मरण केवळ औपचारिक जयंतीपुरते मर्यादित राहू नये. त्यांच्या जीवनाचा अभ्यास करताना स्त्री-संघर्ष, दलित प्रश्न, कुटुंबातील त्याग, मानसिक सहनशीलता, भावनिक श्रम आणि सामाजिक परिवर्तनातील अदृश्य योगदान या सर्व पैलूंवर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. रमाबाईंच्या जीवनकथेचा समावेश शिक्षणक्रमात, सामाजिक चर्चेत, स्त्री-अभ्यासात आणि दलित साहित्याच्या अभ्यासात होणे ही काळाची गरज आहे.
माता रमाबाई आंबेडकर यांचे जीवन हे भारतीय समाजाच्या वास्तवाचे आरसेपण आहे. त्या समाजाच्या कडेला उभ्या राहिलेल्या, पण परिवर्तनाच्या केंद्रस्थानी असलेल्या स्त्रीचे प्रतीक आहेत. त्यांनी कधीही स्वतःसाठी इतिहास लिहिला नाही, परंतु त्यांच्या त्यागाने इतिहास घडविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्यामागील अदृश्य शक्ती म्हणून रमाबाईंचे स्थान अढळ आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या मूल्यांना आत्मसात करणे, हेच त्यांच्या जयंतीचे खरे औचित्य ठरेल.
माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण केवळ अभिवादन न करता त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आजच्या सामाजिक प्रश्नांकडे नव्या दृष्टीने पाहिले पाहिजे. स्त्री सक्षमीकरण, सामाजिक न्याय, मानवी मूल्यांची जोपासना, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या अंमलबजावणीसाठी रमाबाईंचे जीवन मार्गदर्शक ठरते. त्यांचे मौन आजही आपल्याशी बोलते, त्यांचा त्याग आजही समाजाला प्रश्न विचारतो आणि त्यांचे जीवन आजही परिवर्तनाची प्रेरणा देते. म्हणूनच रमाबाई भिमराव आंबेडकर या केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नाहीत, तर त्या वर्तमान आणि भविष्याला दिशा देणाऱ्या विचारांची अखंड साक्ष आहेत.
डॉ. राजेंद्र बगाटे, (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत) ईमेल – bagate.rajendra5@gmail.com