Sunday, April 27, 2025

महाराष्ट्रातील जनतेचा तसेच प्रशासनाचा, 28 एप्रिल हा "सेवा हक्क दिन" - डॉ.किरण जाधव, (से.नि.भा.पो.से.) राज्य सेवा हक्क आयुक्त, छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्रातील जनतेचा तसेच प्रशासनाचा, 28 एप्रिल हा "सेवा हक्क दिन" - डॉ.किरण जाधव, (से.नि.भा.पो.से.) राज्य सेवा हक्क आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्र शासनाने दिनांक 1 एप्रिल, 2025 रोजी '28 एप्रिल' हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचा-यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक 28 एप्रिल,2015 रोजी महाराष्ट्र शासनाने विशेष करुन तत्कालीन मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणविस यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील जनतेला  नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क देणारा 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015' अंमलात आणला आहे. या अधिनियमातील कलम 4 अन्वये महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी व कर्मचा-यांवर अशा नियत कालमर्यादेतच जनतेला लोकसेवा देण्याची जबाबदारी दिली आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे त्याचे उत्तरदायित्व निश्चित केले आहे. हा कायदा प्रशासकीय अधिका-यांना कर्तव्य भावनेतून जनतेची सेवा करण्यासाठी प्रेरीत करत आहे. या कायद्याने नव्याने निर्मित केलेल्या राज्य सेवा हक्क आयोगाने आपले ब्रीदवाक्य "आपली सेवा आमचे कर्तव्य " असे निर्धारित केलेले आहे. 

शासनाने आयोगाच्या शिफारशी नुसार आयोगाने निर्धारीत केलेले बोधचिन्ह व ब्रीदवाक्य हे नागरीकांना दिल्या जाणा-या सर्व अधिसूचित सेवांच्या प्रमाणपत्रांवर मुद्रित केले जात आहे. हे बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्य शासकीय विभागांकडून त्यांच्या अधिका-यांचा व कर्मचा-यांचा सेवाभाव हेच कर्तव्य ही कर्मयोगाची भावना उर्धृत तर करतेच शिवाय ती त्यांनी अवलंबलेली पारदर्शकता, संवेदनशिलता व कार्यक्षम समयोचितता अशा सर्वेात्तम गुणवत्तेची ग्वाही सुध्दा देत आहे.
सेवा हक्क अधिनियमाची जडणघडण
महाराष्ट्र शासनाने सन 2005 मध्येच दफतर विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 अंमलात आणला. या कायद्यांतर्गत सुध्दा सर्व विभागांबाबत ते जनतेला देत असलेल्या सर्व लोकसेवांची नागरिकांची सनद त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर फलकाच्या स्वरुपात दर्शनी भागात प्रदर्शित करतील असे प्राविधान आहे.  या नागरीकांच्या सनदेमध्ये लोकसेवा देणा-या अधिका-यांचे पदनाम लोकसेवा देण्यासाठी विहित केलेला कमाल कालावधी तसेच अशा लोकसेवा देणा-या पदनिर्देशित अधिकारी यांचेकडून विलंब झाल्यास किंवा सेवा नाकारल्यास अपील करावयाच्या अधिका-यांचे म्हणजेच प्रथम अपीलीय प्राधिकारी यांचे पदनाम (त्याच विभागाचे गट-ब चे राजपत्रित अधिकारी) तसेच जर प्रथम अपीलामध्ये अपीलार्थिचे समाधान झाले नाही तर द्वितीय अपीलीय प्राधिका-याचे पदनाम (त्याच विभागाचे गट-अ चे राजपत्रित अधिकारी)   दर्शविण्यात यावे असे प्राविधान आहे.  परंतु विद्यमान मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणविस यांनी स्वत: पुढाकार घेऊन या दफतर विलंबास प्रतिबंध अधिनियम या कायद्याचा परिणाम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर दिनांक 28 एप्रिल, 2015 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कायदा अंमलात आणला.

 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015' कायद्याच्या कलम 5(2) नुसार पदनिर्देशित अधिकारी अर्ज मिळाल्यावर नियत कालमर्यादेत एकतर थेट लोकसेवा देईल किंवा ती सेवा मंजूर करील किंवा फेटाळण्याची कारणे लेखी नमूद करुन अर्ज फेटाळील. पदनिर्देशित अधिकारी, अर्जदाराला त्याच्या आदेशाविरुध्द अपील करण्याचा कालावधी आणि ज्याच्याकडे पहिले अपील दाखल करता येईल त्या प्रथम अपील प्राधिका-याचे नाव व पदनाम त्या कार्यालयीन पत्यासह लेखी कळविल अशी जबाबदारी पदनिर्देशित अधिका-यावर  निश्चित केलेली आहे. तसेच कलम-10 नुसार, या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये पदनिर्देशित अधिकारी व प्रथम अपिलीय प्राधिकारी यांनी कसूर केल्यास रु.500/- पेक्षा कमी नसेल परंतू रु.5000/- पर्यंत असू शकेल एवढी शास्ती चे प्राविधान आहे. 

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग
 या कायद्याने या कायद्यातील सेवा हक्क प्राविधानांच्या अंमलबजावणीचे सनियंत्रण करण्यासाठी एक निष्पक्ष,स्वतंत्र आयोगाची निर्मिती केली गेली.   हा आयोग मुख्य आयुक्त तसेच सहा महसूल विभागांसाठी प्रत्येकी एक आयुक्त यांचा बनलेला आहे. सदर आयुक्तांची नियुक्ती ही  सेवानिवृत्त असलेल्या शासन किंवा सार्वजनिक प्राधिकरण यातील प्रशासनाचे व्यापक ज्ञान व अनुभव असलेल्या सार्वजनिक जीवनातील प्रख्यात अशा व्यक्तींमधून केली जाते. या अधिनियमाच्या कलम 16 अनुसार या कायद्याची अंमलबजावणीची सुनिश्चिती करणे व अधिक चांगल्या रितीने लोकसेवा देण्याची सुनिश्चिती करण्यासाठी राज्य शासनाला सूचना करणे हे आयोगाचे कर्तव्यच असल्याचे नमूद केले आहे.  लोकसेवा देण्याच्या कार्यपध्दतीमुळे ज्यामुळे लोकसेवा देण्यामध्ये अधिकाधिक पारदर्शकता व सुलभता येईल असे बदल करण्याची शिफारस करणे तसेच लोकसेवा कार्यक्षमपणे देण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणांनी करावयाच्या उपाययोजनांसाठी शिफारस करणे अशा सर्व उपाययोजनां द्वारे आयोगाला सार्वजनिक प्राधिकरणांच्या लोकसेवा देण्याबाबत कामगिरीचे सनियंत्रण करणे असे अधिकार दिलेले आहेत.
आपले सरकार पोर्टल व मोबाईल ॲप
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे कलम 20(2) मध्ये पात्र व्यक्तींच्या अपेक्षांच्या प्रती पदनिर्देशित अधिका-यांना संवेदनशिल करणे आणि नियत कालमर्यादेत पात्र व्यक्तींना लोकसेवा देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करणे हे या कायद्याचे प्रयोजन व उद्दिष्ट असल्याचे नमूद केले आहे. याच कलमाचा अवलंब करुन महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांनी आपण देत असलेल्या जास्तीत जास्त सेवा या त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देण्याचे अवलंबिले आहे. अशा सर्व विभागांच्या सर्व ऑनलाईन सेवा दिनांक 28 एप्रिल, 2025 पर्यंत 33 विभागांच्या अधिसूचित करण्यात आलेल्या एकूण 1027 सेवांपैकी 583 सेवा आपले सरकार पोर्टल व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन देण्यात येत आहेत. अधिसूचित केलेल्या सेवांमध्ये नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक सेवा उदा.जन्म/मृत्यू प्रमाणपत्र,उत्पन्न दाखला,वाहन परवाना, जात प्रमाणपत्र, मृद व जल नमुना तपासणी, बियाणे नमुना चाचणी,किटकनाशके नमुना चाचणी, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र,शेतकरी दाखला, वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र,रेशनकार्ड,ध्वनिक्षेपण परवाना, सभा-मिरवणूकांची परवानगी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र,नमुना 8 अ चा उतारा देणे इ. लोकोपयोगी सेवा समाविष्ट आहेत.

सध्या प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध असलेल्‍या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत त्यांच्या विभागाच्या फक्त 7 अधिसूचित सेवांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु दिनांक 28 जानेवारी, 2025 च्या शासन निर्णयाद्वारे आता या ग्रामपंचायतीतील केंद्रांना, महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या ऑनलाईन सेवेचे लॉगीन क्रेडेन्शियल्स देऊन त्यांच्या मार्फत सर्व विभागांच्या सर्व ऑनलाईन सेवांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  यामुळे ग्रामिणांना हव्या असलेल्या कोणत्याही सेवेसाठी कोणत्याही विभागाच्या जिल्हास्तरीय वा तालुकास्तरीय कार्यालयात स्वत: जाऊन आपल्या अर्जाचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता उरली नाही.

तसेच दिनांक 27 मार्च, 2025 रोजी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सन्मा.मंत्री महोदय यांनी घोषणा केल्याप्रमाणे 100 रुपये अतिरिक्त शुल्क भरुन नागरीकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे त्यांच्या घरी जाऊन त्यांचा अर्ज त्यांच्या समक्ष ऑनलाईन भरण्याची तसेच सेवा मंजूर झाल्यानंतर त्या सेवेचे प्रमाणपत्र / मंजूरी आदेश त्यांच्या घरी वितरीत करण्याची "सेवादूत योजना "सुरु केली आहे.

28 एप्रिल "सेवा हक्क दिन "महोत्सव

शासनाच्या महसूल विभागाकडून 1 ऑगस्ट हा दिवस महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो, तसेच एप्रिल महिन्यामध्ये 21 एप्रिल रोजी नागरी सेवा दिन तर 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो परंतु या सर्व विभागांच्या विविध दिनांचा परिपाक म्हणजे 28 एप्रिल सेवा हक्क दिवस हा आहे. हा सेवा हक्क दिन महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक कार्यालयाकडून त्यांनी या वर्षभरात जनतेला दिलेल्या सेवांचा तसेच त्यांच्या सेवा हक्कांच्या अंमलबजावणीच्या कार्यवाहीचा वार्षीक लेखाजोखा त्यांच्या लाभार्थिाना बोलावून किंवा जनतेच्या लोकप्रतिनिधींना बोलावून साजरा करायचा आहे. या दिवशी सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये सर्व जिल्हाधिकारी आपल्या जिल्हयाचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांना विशेष आमंत्रित करुन तसेच सर्व जिल्हयांच्या विविध विभागांच्या अधिका-यांना बोलावून समारंभपूर्वक सर्व विभागांच्या विगत वर्षाच्या कामाचा आढावा घेतील.तसेच उपस्थित सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारीही या दिवशी त्यांच्या सेवानिष्ठेची,सचोटीची, सौजन्यतेची कटिबध्दता अधोरेखीत करणारी त्यांना नेमून दिलेली सेवा हक्क शपथ सुध्दा घेतील.
तसेच या महोत्सवी कार्यक्रमात ज्या अधिकारी /कर्मचा-यांनी या अधिनियमाच्या अनुसार सचोटीने व 100% प्रकरणांमध्ये नियत कालावधीत जनतेला अधिसूचित सेवा दिल्या असतील त्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन मा. पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात येईल. तसेच या दिवशी महाराष्ट्र शासनातर्फे मा. पालकमंत्री हे जनतेला तसेच शासकीय अधिका-यांना मार्गदर्शन करतील.
 महाराष्ट्र शासनाने आपले सरकार सेवा पोर्टल हे पात्र व्यक्तींसाठी बहुतांश विभागांच्या कोणत्याही अधिसूचित लोकसेवेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संयोजित व्यासपीठ आहे.  http://aaplesarkar:mahaonline.gov.in आजवर 01,07,51,000 नागरीकांनी या संकेतस्थळावर नोंदणी करुन सेवा घेतली आहे.  याखेरीज आरटीएस महाराष्ट्र हे मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर / ॲपल स्टोअर वर विनामूल्य उपलब्ध आहे.  अर्जदार मराठी किंवा इंग्रजी पर्याय निवडू शकतो.  पात्र व्यक्ती स्वत: अर्ज करु शकत नसल्यास महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये कार्यान्वित असलेल्या 39,783 आपले सरकार सेवा केंद्रांद्वारेही अर्ज करुन सेवा घेता येते.  ही केंद्रे खासगी केंद्रचालक चालवितात व  त्यांच्यावर त्यांच्या निवडीपासूनच जिल्हाधिका-यांचे नियंत्रण असते.  काही विभागांची स्वतंत्र पोर्टल्स आहेत उदा. महसूल विभागाचे महाभूलेख, परिवहन विभागाचे वाहन, सारथी इ. 
हा अधिनियम लागू झाल्यापासुन 17 एप्रिल, 2025 पर्यंत ऑनलाईन सेवांसाठी 18,76,52,113अर्ज प्राप्त झाले त्यांच्या निपटा-याचे प्रमाण 94.15% आहे. सन 2024-25 मध्ये एकूण 02,77,28011 सेवा अर्ज प्राप्त झाले असून निपटा-याचे प्रमाण 92.33% आहे.  अनेक अर्ज ऑफलाईन स्वरुपातही येतात.  मात्र आयोगाने अनेक प्रयत्न करुन सुध्दा ऑफलाईन प्राप्त झालेल्या व निपटारा केलेल्या अर्जांची आकडेवारी संबंधित विभागांकडून उपलब्ध झालेली नाही.  तथापी ही संख्या जवळपास  ऑनलाईन आकडेवारीच असल्याचा अंदाज आहे.  
मा.मुख्यमंत्री महोदयांनी अशा ऑफलाईन सेवा देण्याच्या प्रवृत्तींना आळा बसविण्यासाठी सर्व विभागांच्या सर्व सचिवांची विशेष बैठक घेऊन पुढील 31 मे,2025 पर्यंत सर्व विभागांच्या सर्व सेवा या आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करुन द्याव्यात तसे च उर्वरित 306 अधिसूचित सेवा ज्या सध्या ऑफलाईन आहेत त्या ऑनलाईन उपलब्ध करुन आपले सरकार या एकल पोर्टलवर संलग्न करुन 15 ऑगस्ट,2025 पर्यंत नागरीकांना उपलबध करुन देण्याविषयी निर्देश दिलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या तसेच आयोगाच्या वतीने मी महाराष्ट्राच्या सर्व जनतेला सेवा हक्क दिनाच्या शुभेच्छा देत आहे...!

लेखक- डॉ.किरण जाधव, (से.नि.भा.पो.से.) राज्य सेवा हक्क आयुक्त, छत्रपती संभाजीनगर

Friday, April 25, 2025

सर्व धर्मीय समाज बांधवांनी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अभिवादनास 30 एप्रिल बुधवार रोजी उपस्थित रहावे - सुभाषआप्पा नित्रुडकर

सर्व धर्मीय समाज बांधवांनी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अभिवादनास 30 एप्रिल बुधवार रोजी उपस्थित रहावे - सुभाषआप्पा नित्रुडकर
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीया दिनांक 30 एप्रिल 2025 बुधवार रोजी सकाळी ठीक 10 वाजता "छत्रपती शिवाजी महाराज चौक" येथील नित्रुडकर काॅम्प्लेक्स येथे सर्व धर्मीय समाज बांधवांनी "जगतज्योती महात्मा बसवेश्वर" यांच्या जयंती निमित्त अभिवादनास उपस्थित रहावे असे आवाहन सुभाषआप्पा नित्रुडकर मराठवाडा अध्यक्ष अखिल भारतीय विरशैव लिंगायत महासंघ यांनी केले आहे, बसवण्णांनी मंगळवेढा येथे “लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंडपाची’ स्थापना केली.या अनुभव मंडपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे.बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली.(बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक, समतेचे प्रणेते म्हणून "महात्मा बसवेश्वरांना" ओळखले जाते.) सर्व प्रथम लोकशाही मूल्याची सुरूवात ही "महात्मा बसवेश्वरांनी" 12 व्या शतकात "अनूभव मंडपाच्या" माध्यमातून केल्याचे वचन साहित्यातून दिसून येते.एकूणच त्यांनी वचन साहित्यात समता, मूल्य, न्याय, बंधूता,एकात्मता, स्वातंत्र्य, अधिकार, नियंत्रण, शिस्त, सूशासन आणि प्रशासन आदी बाबींवर हि सखोल विवेचन केले आहे,सोनपेठ शहरातील सर्व धर्मीय समाज बांधवांनी, सर्व राजकीय पक्ष प्रमुख, जय भवानी मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, इखरा मित्र मंडळ, जन सेवा मित्र मंडळ, आरंभ प्रतिष्ठान, जय सेवालाल मित्र मंडळ, श्री रंगनाथ महाराज प्रतिष्ठान, सार्वजनिक डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी, गुरुवार भजनी मंडळ, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, शिवशक्ती मित्र मंडळ, भीमगड मित्र मंडळ, लहुजी नगर मित्र मंडळ, छत्रपती संभाजीनगर मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, गुरुवार भजनी मंडळ, एकता मित्र मंडळ, रोटरी क्लब सोनपेठ, सुमित भैय्या पवार मित्र मंडळ, सर्व मित्र मंडळ, सर्व समाज संघटना, सर्व व्यापारी असोसिएशन,सर्व सामाजिक कार्यकर्ते व सर्व धर्मिय बसव प्रेमीं आदिंसह समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून "जगतज्योती महात्मा बसवेश्वर" यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ मराठवाडा अध्यक्ष सुभाषआप्पा नित्रुडकर यांनी केले आहे.

Monday, April 21, 2025

सोनपेठ भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी लक्ष्मण मारोतराव धोंडगे यांची नियुक्ती

सोनपेठ भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी लक्ष्मण मारोतराव धोंडगे यांची नियुक्ती
सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ तालुक्यातील मौजे तिवठाणा येथील भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते लक्ष्मण मारोतराव धोंडगे यांची नुकतीच निवड सोनपेठ भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी, परभणी जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे यांनी नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली, भारतीय जनता पार्टी मध्ये लक्ष्मण मारोतराव धोंडगे हे विविध पदावर कार्य करत असताना सामाजिक जाणीवेतून अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असतात तसेच विविध योजना तळागाळातील गरजू व्यक्तींना मिळून देण्यासाठी प्रयत्नशील असतात यांचे कार्य अधोरेखित करत सोनपेठ भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली, यासाठी भारतीय जनता पार्टी पालकमंत्री तथा आमदार मेघना दीदी बोर्डीकर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे, नुतन शहर मंडळ अध्यक्ष संतोष अंबुरे, भाजपा ग्रामीण पदाधिकारी तसेच भाजपा युवा मोर्चा ग्रामीण पदाधिकारी व भाजपा कार्यकर्त्यांसह सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.नवनियुक्त सोनपेठ भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष लक्ष्मणराव धोंडगे साप्ताहिक सोनपेठ दर्शन प्रतिनिधीशी बोलताना तालुक्यातील गावा गावात, वाडी तांड्यात भारतीय जनता पार्टी च्या शाखा भाजपा नविन जुन्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन पुनर्बाधणी करणार, पुढील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, पंचायत समिती व  जिल्हा परिषद निवडणुकीत वरिष्ठांच्या आदेशानुसार स्वतंत्र ताकद आजमावून तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले, शेवटी भारतीय जनता पार्टी नेते मंडळींचे नविन जबाबदारी दिल्या बद्दल आभार व्यक्त केले.

सोनपेठ भाजपा शहर मंडळ अध्यक्षपदी संतोष अनिल अंबुरे यांची नियुक्ती

सोनपेठ भाजपा शहर मंडळ अध्यक्षपदी संतोष अनिल अंबुरे यांची नियुक्ती
सोनपेठ (दर्शन) सोनपेठ शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते संतोष अनिल अंबुरे यांची नुकतीच नियुक्ती भारतीय जनता पार्टी शहर मंडळ अध्यक्षपदी, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली, भारतीय जनता पार्टी संतोष अनिल अंबुरे हे भारतीय जनता पार्टी च्या विविध पदावर कार्य करत असताना, सामाजिक जाणीवेतून अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असतात तसेच विविध योजना तळागाळातील गरजू व्यक्तींना मिळून देण्यासाठी प्रयत्नशील असतात यांचे कार्य अधोरेखित करत भाजपा शहर मंडळ अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली यासाठी भारतीय जनता पार्टी पालकमंत्री तथा आमदार मेघना दीदी बोर्डीकर, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे, नुतन तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव धोंडगे, भाजपा शहर पदाधिकारी तसेच भाजपा युवा मोर्चा शहर पदाधिकारी व भाजपा कार्यकर्त्यांसह सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.नवनियुक्त भाजपा शहर मंडळ अध्यक्ष संतोष अनिल अंबुरे साप्ताहिक सोनपेठ दर्शन प्रतिनिधीशी बोलताना शहरातील प्रत्येक वार्डा वार्डात भारतीय जनता पार्टी ची शाखा करत, पुढील नगर परिषद निवडणुकीत वरिष्ठांच्या आदेशानुसार स्वतंत्र ताकद आजमावून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले, शेवटी भारतीय जनता पार्टी नेते मंडळींचे नविन जबाबदारी दिल्या बद्दल आभार व्यक्त केले.
साप्ताहिक सोनपेठ दर्शन बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपादक किरण रमेश स्वामी संपर्क साधावा मो.9823547752.

Sunday, April 20, 2025

जिजामाता पब्लिक स्कूल येथे पालक मेळावा व फौंडेशन, NEET, JEE व CET क्लासेसचे उद्घाटन

जिजामाता पब्लिक स्कूल येथे पालक मेळावा व फौंडेशन, NEET, JEE व  CET  क्लासेसचे उद्घाटन 

सोनपेठ (दर्शन) : - दि १२/ ४/२०२४ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच, भविष्यातील करिअरच्या संधी, आणि आव्हानांची पूर्वतयारी या अनुषंगाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने आज जिजामाता पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज सोनपेठ येथे पालक मेळावा व नीट जेई सीईटी  , सहावी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन क्लास च्या तयारीसाठी जिजामाता Neet , JEE  CET अकॅडमी चे उद्घाटन संपन्न झाले 
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सोनपेठ पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थी प्रिय पोलीस उपनिरीक्षक मा. विनोद चव्हाण साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा. बाबुरावजी धोंडगे भाऊ , ( अध्यक्ष जिजामाता पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज सोनपेठ ). शाळेचे सचिव मा. प्रा. डॉ.  मुंजाभाऊ धोंडगे सर, शाळेचे प्राचार्य हे जे अजय सर, सहशिक्षिका, अश्विनी चव्हाण मॅडम, तसेच नीट जेई अकॅडमीचे तज्ञ शिक्षक, प्रा. मुकेश कुमार सरBiology (बिहार) , प्रा. जहीर सर  chemistry ( हैदराबाद), प्रा. राहुल राजपूत सर  physics ( उत्तर प्रदेश ) , प्रा. जीवन भोसले सर Maths तसेच मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पुरुष व महिला पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक  करत असताना शाळेचे प्राचार्य अजय सर यांनी शाळा आणि पालक यातील संवाद , विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील व्यावसायिक संधी पुढील वर्षा संदर्भात शाळेचे नियोजन याविषयी चर्चा केली. पालकांना मार्गदर्शन करताना  " सोनपेठ सारख्या ग्रामीण भागात नीट आणि जे ई  परीक्षेच्या तयारीसाठी जिजामाता पब्लिक स्कूल ने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा जास्तीत जास्त पालकांनी उपयोग करावा, यामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील  ," असे मत प्रमुख अतिथी मा विनोद चव्हाण साहेब यांनी व्यक्त केले.  त्यानंतर शाळेचे सचिव प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे सर यांनी " सोनपेठ सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लातूर नांदेड सारख्या शैक्षणिक सुविधा जिजामाता पब्लिक स्कूलच्या माध्यमातून याच ठिकाणी उपलब्ध करून  गुणवत्तेचा उच्चांक, दर्जेदार शिक्षण, व आधुनिक शैक्षणिक सुविधा याच ठिकाणी उपलब्ध करून देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. अकरावी व बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जे  ई व सीईटीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी क्लास ची सुरुवात झालेली आहे . व येत्या एक मे पासून सहावी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन क्लास सुरू होत आहेत. सोनपेठ व परिसरातील विद्यार्थ्यांना यापुढे लातूर नांदेड च्या ऐवजी याच ठिकाणी राहून अकरावी व बारावीच्या नीट जेई परीक्षेची पूर्वतयारी करता येणार आहे. परिसरातील विद्यार्थी आणि पालकांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची शैक्षणिक सुविधा जिजामाता अकॅडमी फाउंडेशन क्लास च्या निमित्ताने विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये सोनपेठ मधील गुणवंत विद्यार्थ्यांना याच ठिकाणी राहून आपले डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याची स्वप्न पूर्ण करता येणार आहे तरी जास्तीत जास्त पालकांनी सहावी ते दहावीपर्यंत असलेल्या फाउंडेशन क्लास व अकरावी बारावी साठी असलेल्या नीट जेईच्या सुविधेचा लाभ  घेण्यासंदर्भात पालकांनीही उत्साह पूर्ण प्रतिसाद नोंदवला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश जयतपाळ सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका अश्विनी चव्हाण मॅडम यांनी केले.