राजेश विटेकर यांच्या वतीने पक्षश्रैष्ठीच्या निर्णयाचे स्वागत
सोनपेठ (दर्शन) : -
परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून उमेदवारी बहाल करण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा संचालक परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व लोकसभेकरीता इच्छुक असणारे राजेश विटेकर यांनी मनःपूर्वक स्वागत केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून महादेव जानकर यांची परभणी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक सोनपेठ दर्शन शी बोलतांना राजेश विटेकर यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे स्वागत केले. पक्षाचे नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह श्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचे आपण मनःपूर्वक स्वागत करत आहोत, आपण जानकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहु व महायुतीच्या माध्यमातून जानकर यांना या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आणू, असा विश्वासही राजेश विटेकर यांनी व्यक्त केला. श्रेष्ठींचा हा निर्णय, आदेश हा शिरसावंद्य मानत आहोत, कोणतीही नाराजी नाही किंवा खंतही नाही. आपण इनामे इतबारे पक्षाकरीता काम करीत आलो आहोत. तर भविष्यात सुध्दा प्रामाणिकपणेच श्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे काम करत राहू,अशी ग्वाहीही राजेश विटेकर यांनी साप्ताहिक सोनपेठ दर्शन शी बोलताना दिली.


No comments:
Post a Comment