Saturday, April 4, 2026

संघटन सृजन अभियानाला परभणीत वेग ; काँग्रेसची मोठी संघटनात्मक पुनर्रचना सुरू जिल्हाध्यक्ष व ब्लॉक अध्यक्षांची निवड लवकरच

संघटन सृजन अभियानाला परभणीत वेग ; काँग्रेसची मोठी संघटनात्मक पुनर्रचना सुरू
जिल्हाध्यक्ष व ब्लॉक अध्यक्षांची निवड लवकरच

सा.सोनपेठ दर्शन सोनपेठ तालुक्यातील एकमेव सडेतोड वृत्तपत्र जाहिरात व बातमी संपर्क मो. 9823547752.
परभणी/सोनपेठ (दर्शन) :-
काँग्रेस पक्षाच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत परभणी जिल्ह्यात संघटनात्मक पुनर्रचनेला वेग देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्टेशन रोड येथील हॉटेल नीरज येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.
पत्रकार परिषदेपूर्वी परभणी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांनी केले. बैठकीत केंद्रीय निरीक्षक अझमतुल्लाह हुसेनी यांनी ‘संघटन सृजन अभियान’ची सविस्तर माहिती देत संघटन कसे बळकट करायचे, बूथ स्तरावर कामाची प्रभावी रचना कशी करायची आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका कशी निभवायची याबाबत मार्गदर्शन केले.
या बैठकीत निरीक्षक मा. जितेंद्र देहाडे, मा. दादासाहेब मुंढे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, बाळासाहेब देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंभीरे, मुजाहीद खान, उपमहापौर गणेश देशमुख, जिल्हा परिषद गटनेते अजित वरपूडकर, आलमगीर खान, भगवान वाघमारे,अमोल जाधव, रामभाऊ घाडगे, सत्तार इनामदार, मिन्हाज कादारी, अकबर जहागीरदार, रवी सोनकांबळे आणि सिद्धार्थ भराडे यांनी मनोगत व्यक्त करत संघटन बळकटीसाठी एकजूट आणि सक्रिय कामाची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिकउर रहमान खान यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुहास पंडित यांनी केले.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय निरीक्षक अझमतुल्लाह हुसेनी, जितेंद्र देहाडे, दादासाहेब मुंढे तसेच जिल्ह्यातील काँग्रेस नेते उपस्थित होते. यावेळी ‘संघटन सृजन अभियान’ची रूपरेषा, बूथ स्तरावरील संघटन मजबुतीकरण आणि जिल्ह्यातील आगामी संघटनात्मक बदल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
अभियानाअंतर्गत परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीसाठी शहर जिल्हाध्यक्ष तसेच ब्लॉक अध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या निवड प्रक्रियेत कार्यकर्त्यांचे मत, स्थानिक पातळीवरील प्रतिमा तसेच सामाजिक कार्याचा आढावा घेऊन योग्य उमेदवारांची निवड केली जाईल, असे निरीक्षकांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना अझमतुल्लाह हुसेनी यांनी सांगितले की, जिल्हाध्यक्ष व ब्लॉक अध्यक्ष पदासाठी उमेदवार किमान तीन वर्षे पक्षात सक्रिय असलेला कार्यकर्ता असणे आवश्यक आहे. तसेच सिव्हिल सोसायटीमध्ये त्यांची प्रतिमा आणि कामगिरी यालाही प्राधान्य दिले जाणार आहे. पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्यांना संधी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परभणी जिल्ह्यातील काँग्रेस संघटनात्मक बांधणीला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment