वै.उत्तमराव विटेकर स्मृती पुरस्कारांचे वितरण व विशेष कार्य गौरव सोहळ्याचे आयोजन
परभणी / सोनपेठ (दर्शन) : -
अथक परिश्रमाने प्रतिकूल परिस्थितीत कर्तबगारी सिध्द केलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याकरीता दरवर्षी दिल्या जाणार्या माजी आमदार वै. उत्तमराव विटेकर स्मृती पुरस्कारांचे मंगळवार दिनांक ५ डिसेंबर २०२३ विटा (खु.) येथील श्री. चिंतामणी कृषी तंत्र विद्यालयात (ता.सोनपेठ) मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
सामान्य घरातल्या वै. उत्तमराव विटेकर यांनी संघर्षातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावलौकिक केला. सर्वसामान्य लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी म्हणून ते सुपरिचित होते. या जिल्ह्यातील राजकारणाला विटेकर यांनीच समाजकारणाची जोड दिली. म्हणून ते सामान्यांना आपले आमदार नव्हे तर पाठीराखे वाटत होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतींचे स्मरण व्हावे म्हणून कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात येतो आहे.यंदाचे हे नववे वर्ष आहे. कार्यक्रमाचे औचित्य साधून हभप भागवताचार्य बाळू महाराज गिरगावकर यांचे रसाळपूर्ण कीर्तन सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार आहे. त्यानंतर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
मधल्या काळात कोरोनामुळे कार्यक्रम घेता आला नाही. मात्र, त्याही वर्षीचे पुरस्कार यंदा वितरीत केले जाणार आहेत. त्या माध्यमातून वडीलांची शिकवण आणि संस्कार जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत, असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांनी दिलासाशी बोलतांना व्यक्त केले.
दरम्यान २०२१ चे पुरस्कार मानकरी पंजाबराव डक, हभप भगवान महाराज इसादकर, जनार्धन आवरगंड, शिवाजीराव गयाळ, हभप पंढरीनाथ कदम, २०२२ चे मानकरी कृष्णा भोसले, पंडीतराव थोरात, हभप अर्जुन महाराज लाड गुरूजी, हभप तुकाराम महाराज यादव, हभप भारत महाराज कानसूरकर, २०२३ चे मानकरी हभप नरहरी महाराज निश्चळ, वसुंधरारत्न राष्ट्रसंत सदगुरू डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर, हभप साहेबराव महाराज कोठाळकर दादा, प्रतापराव काळे आणि मेघाताई देशमुख यांचा पुरस्कारार्थी मध्ये समावेश आहे.
या कार्यक्रमासाठी आपण सर्व हिच निमंत्रण पत्रिका समजून तमाम नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यासह नारायण भोसले विटेकर, मदनराव भोसले विटेकर, भागवतराव भोसले विटेकर, आबासाहेब भोसले विटेकर आणि अॅड. श्रीकांत भोसले विटेकर यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment