Sunday, November 6, 2022

वीरशैव सिद्धयोगी मन्मथ स्वामी...

वीरशैव सिद्धयोगी मन्मथ स्वामी...  

सोनपेठ (दर्शन) :-

वीरशैव म्हणजे लिंगधारी शिवभक्त. पूर्वी यांना वीरमाहेश्वर म्हणत. ' सिद्धांतशिखामणी ' ग्रंथानुसार, ' विद्याया रमते यस्मान्मायां हेयां श्ववद रहेत | अनेनैव निरुक्तेन वीरमाहेश्वर: स्मृत: || ( ५.१७) अर्थ : शिवजीवैक्य विद्येमध्ये जे रममाण होतात आणि संसाररूपी मायेला श्वान समजून, तिचा त्याग करतात त्यांना ' वीरमाहेश्वर ' या अन्वर्थक नावाने संबोधिले जाते. 
शिवागमांमध्ये लिंगांगसामरस्यात रममाण होणाऱ्या शिवभक्तांना ' वीर ' म्हटले आहे. शिवयोग आणि ब्रह्मविद्या एकच आहे. याबाबत स्पष्टीकरण देतांना महासिद्ध रेणुकाचार्य म्हणतात, " वेदान्तजन्य यज्ञानं विद्येति परिकीर्त्यते |
विद्यायां रमते तस्यां वीर इत्यभिधीयते || ( सि. शि. ५.१८ ) 
अर्थ : उपनिषदांच्या अध्ययनाने प्राप्त होणाऱ्या शिवजीवैक्यबोधक ज्ञानाला विद्या असे म्हणतात व त्या विद्येत रमणाऱ्यांना वीर असे म्हणतात. यावरून वीरशैवांचा हा भक्तीयोग म्हणजे ' शिवाद्वैत वेदांत ' होय. 
* शिवयोगी रेवणसिद्ध परंपरा : 
शिवयोगी रेवणसिद्ध हे बसवपूर्व लिंगाधारी ( वीर ) शैवसिद्धांच्या मांदियाळीत मोडणारे उदारचरित सिद्ध होते.( डॉ. रा.चिं. ढेरे) , रेवणसिद्ध यांनी वीरशैव धर्मप्रसार केला. वीरशैव धर्मप्रसार केंद्र म्हणजे ' अनुभवमंडप ' . या संदर्भात लिं. डॉ. फ. गु. हळकट्टी म्हणतात, " ...रेवणसिद्धेश्वरांनी सोलापूरच्या पश्चिमेला ३० मैलांवरील ' मंगळवेढा ' येथे वीरशैव धर्मप्रसाराचे चौथे केंद्र निर्माण केले. कर्नाटकात संचार करणाऱ्या रेवणसिद्धांच्या प्रेरणेने बसवण्णांची विचारक्रांती होऊन राज्यात एक अद्भुत क्रांती निर्माण झाली आणि ' कल्याण ' हे पाचवे केंद्र निर्माण झाले. 
रेवणसिद्धांनी कर्मकांडविरहित अशा भावाधिष्ठित शिवभक्तीचा प्रसार केला. यांच्याकडून समतावादी व भक्तीमार्गाची प्रेरणा घेतलेल्या बसवेश्वरांची वैचारिक क्रांती झाल्याने, त्यांनी कल्याण येथे स्थापन केलेल्या अनुभव मंडपाने वर्णवर्चस्वाविरुद्ध अद्भुत क्रांती केली. या क्रांतीच्या परिणामस्वरूप तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरादी संतांच्या विट्ठलभक्त - वारकरी संप्रदायाने देवाच्या दारातील समता स्वीकारलेली दिसून येते. 
* परमरहस्य शिवजीवैक्याचे : 
संत ज्ञानेश्वरकालीन शिवयोगी रेवणसिद्ध हे रंभापुरी वीरशैवपीठाचे जगद्गुरू यांना काडसिद्धेश्वर हे पर्यायनाम होते.  रेवगीरी जि. बीदर येथील . हे रेवणसिद्ध ' परमरहस्य ' या मूळ संस्कृतमधील ग्रंथाचे कर्ते आहेत. ( डॉ. पंडित आवळीकर, विवेकचिन्तामणी, प्रस्तावना) . रेवणसिद्ध - मरूळसिद्ध परंपरेतील रेवण ऊर्फ़ काडसिद्धेश्वर यांना गुरुस्थानी मानणारे व यांचा गाढ प्रभाव असणारे अनेक संप्रदाय आहेत. हे सर्व अद्वैत वेदांत मार्गाचे संप्रदाय आहेत. मुडलगी, चिम्मड, इंचगेरी इत्यादी यामध्ये नागेश संप्रदायाचाही समावेश होतो. 
नागेशांना परात्पर गुरुस्थानी मानणारे मन्मथस्वामी यांनी रेवणसिद्ध यांच्या ' परमरहस्य ' ग्रंथावरच मराठी टीका लिहिली आहे. शिवयोगी वडवळसिद्ध नागेश हे ' माणुरवासाय ' असून माणुरमठ हा रंभापुरी वीरसिंहासनपीठाचा शाखा मठ आहे. 
' परमरहस्य ' च्या शेवटी मन्मथशिवलिंग म्हणतात, 
' हा ग्रंथ स्वये ईश्वरमुखीचा | तोचि अवतार नागेश साचा | 
वीरशैव धर्म पाळावया | प्रकट कारविणार पै || 
तयाचे नामाभिधान | नागेशगुरु म्हणउन | 
प्रकट केले गुह्यज्ञान | लिंगधारी कळावया ||
यालागी शिव तोचि हा नागेश्वरु | परंपरेचि बसवराजगुरु | 
मानूरमठ सिंहासनाधिकारु | असे जाण जयाशी ||... 
परमगुरू नागेशांनीच हे गुह्यज्ञान लिंगधारी वीरशैवांसाठी प्रकट केले असून, त्याच परंपरेतील बसवराज गुरूंनी ही ' परमरहस्य ' टीका आपल्या कडून करवून घेतली असे स्पष्ट करतात. गुरु परंपरेतील एकात्मभाव प्रकट करतात. 
* उदारमतवादी वीरशैव : 
वीरशैव सिद्ध परंपरेतील शिवयोगी रेवणसिद्ध, मरूळसिद्ध, काडसिद्ध, सिद्ध नागेश यांच्या प्रमाणेच मन्मथस्वामींच्या शिष्य प्रभावळीतील संतकवींमध्ये लिंगेश्वर बार्शीकर, शिवदास बीडकर, सदाशिव नीनगूरकर, बसवलिंग, शिवलिंग, रामलिंग या वीरशैवांसह रामानंद मांजरसुंबेकर ( ब्राह्मण) , जीवनस्वामी ( मारवाडी) , मोहनदास ( धनगर) इत्यादी विविध जाती पंथाची शिष्यमंडळी आहेत.
सिद्ध नागेशांची दुसरी मिश्रपरंपरा असणाऱ्या अज्ञानसिद्ध शाखेतही सर्व जाती संप्रदायांच्या सत्पुरुषांचा समावेश आढळून येतो. शिखर शिंगणापूरचे शांतलिंगस्वामीही रेवणसिद्धांच्या शिष्यशाखेतले आहेत. ज्यांनी निजगुण  शिवयोगी यांच्या ' विवेकचिंतामणी ' ग्रंथाचा मराठी अनुवाद केला. हे समन्वयवादी म्हणून विख्यात आहेत. अशा वीरशैवांच्या उदारमतवादी परंपरेतील महासिद्धांचा उल्लेख करतांना सोळाव्या शतकातील शेख महमदाने ' महाआरतीत ' ' रवणमोराळसिध ' असा निर्देश केला आहे. मन्मथस्वामी याच परंपरेतील सिद्ध शिवयोगी आहेत. 
 " मन्मथ आलासे भूलोका | आता कोणी भिऊ नका |" अशा आत्मविश्वासाने त्यांनी तत्कालीन मराठी वीरशैवांमध्ये एक आत्मविश्वासपूर्ण चैतन्य निर्माण केले. परमरहस्य , गुरुगीता, ज्ञानबोध, अनुभवानंद इत्यादी काही प्रबोधनात्मक ग्रंथलेखन, अंभगादि स्फुट वाङ्ग्मय स्वतः निर्माण करून वीरशैव संतकवींची भक्कम फळी निर्माण केली. वीरशैवांचे सत्व, वीरत्व राखून अन्य मत - सांप्रदायिक शिष्यांना उदार मनस्कतेने जवळ केले. मन्मथस्वामींनी  शिवकीर्तनाची परंपरा पुनरुज्जीवित करून महाराष्ट्रातील वीरशैव धर्म परंपरेचे संरक्षण व संवर्धन केले आहे. या महत्कार्यामुळे मराठी वीरशैवांमध्ये मन्मथस्वामींचे स्थान अढळ असून तेच महाराष्ट्रातील वीरशैवांचे मानबिंदू आहेत. त्यांच्या महान कार्याला त्रिवार वंदन! 
@ श्री सिद्धमल्लय्या हिरेमठ, गुड्डापूर. ता. जत, जि. सांगली.

No comments:

Post a Comment