Tuesday, November 29, 2022

दिव्यांगासाठी सोनपेठ येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा शाळेत कार्यशाळेचे आयोजन

दिव्यांगासाठी सोनपेठ येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा शाळेत कार्यशाळेचे आयोजन


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातील दिव्यांगासाठी दिव्यांग दिनाच्या निमित्ताने विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी दि.१ डिसेंबर २०२२ गुरुवार रोजी जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.सक्षम व कृषी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने सोनपेठ तालुक्यातील दिव्यांग (विकलांग) व्यक्तींना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी दि. १ डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी १ वाजता सोनपेठ येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेच्या ई लर्निंग समागृहात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत दिव्यांगांना इंदीरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार असुन या योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळवुन देण्यासाठी अर्जांची प्रतीपूर्ती करण्यात येणार आहे.या कार्यशाळेचे उद्घाटन तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणुन विठ्ठल केदारे मुख्याधिकारी नगर परिषद, मधुकर कदम गट विकास अधिकारी, प्रदिप गायकवाड मुख्याध्यापक हे उपस्थित राहणार आहेत. या विविध तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी दिव्यांगांनी आपले अपंगत्वाचे प्रमाणपत्र,आधार कार्ड,बैंक पासबुक व फोटो सोबत आणावेत व यात सहभागी होऊन सोनपेठ तालुक्यातील दिव्यांगांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन सक्षमचे राकेश मेहता व हरीशचंद्र पांचाळ यांनी केले आहे.या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संपर्क राकेश मेहता मो. ९०९६६९९६९६ हरीशचंद्र पांचाळ ९९७०९७३५१७ साधावा.

Thursday, November 17, 2022

पट्टाभिषेक वर्धापन दिनानिमित्त रुद्राभिषेक,दीपोत्सव,शोभायात्रा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा प्रारंभ

पट्टाभिषेक वर्धापन दिनानिमित्त रुद्राभिषेक,दीपोत्सव,शोभायात्रा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा प्रारंभ
    
सोनपेठ (दर्शन) :-

श्री नंदिकेश्वर भक्त मंडळी व समस्त वीरशैव व ग्रामस्थ मंडळ सोनपेठ आयोजित अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य पारायण शिवदिक्षा संस्कार दीपोत्सव व संगीतमय भजन श्री.ष.ब्र.गुरु १०८ श्री गुरु नंदकिशोर शिवाचार्य महाराज यांच्या बाविसाव्या पट्टाभिषेक वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त मान्यवर परमेश्वर लांडगे,केदारलींग स्वामी, महालिंग स्वामी, सुभाष नित्रुडकर, विनोद चिमणगुंडे, उमेश नित्रुडकर, माणिकआप्पा निलंगे, रामेश्वर महाजन, एन.व्हि. स्वामी, रमेश स्वामी, राधाकृष्ण हिक्के पाटील, नागनाथ सातभाई, विठ्ठल पुरबुज, मोहन खोडवे, रमेशशेठ झंवर, प्रा. विठ्ठल जायभाये, धुळाप्पा जमशेट्टे, नागनाथ कोटुळे, वैजनाथ चोंडे, उमाकांत कोल्हेकर,बसलिंग मोडीवाले, बालाजी कुंभार,रवी स्वामी,किरण स्वामी,नागेश स्वामी,रतीकांत स्वामी आदिंच्या हस्ते दीप प्रज्वलन,ध्वज पुजन,कलश पुजन,विना पुजन,ग्रंथ पुजन व मृदंग पुजन करुन या सोहळ्याचा प्रारंभ कार्तीक वद्य ८ आज दिनांक १७/११/२०२२ गुरुवार रोजी करण्यात आला तसेच मान्यवरांचे स्वागत श्री नंदिकेश्वर मठ संस्थान च्या वतीने करण्यात आले, प्रास्ताविक महालिंग मेहेत्रे यांनी केले तर प्रा.विठ्ठल जायेभाये यांनी मनोगत व्यक्त केले तसेच आशिर्वचन श्री गुरु ष.ब्र.१०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे झाले व प्रारंभ करण्यात आला,या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती अनेक शिवाचार्य महाराजांची उपस्थिती लाभणार आहे.तसेच दि १७ पासुन दि.२३ पर्यंत अनेक शिवकिर्तनकार तर संगमेश्वर बिरादार वलांडीकर यांचे प्रसादाचे किर्तन होईल.दिनांक २१/११/२०२२ सोमवार रोजी सायंकाळी ६ ते ८ श्री गुरु ष.ब्र.१०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचा २२ वा पटाभिषेक वर्धापन दिन सोहळा तर २२ सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान होईल,दिनांक २२/११/२०२२ शिवदीक्षा सकाळी १० ते १२, धर्मलिंगार्चनात्मक वीरशैव जंगम पुरोहित संस्था परभणी यांचे संजिवनी समाधीस रुद्राभिषेक सकाळी ८ ते १० वाजता, ग्रंथराज परम रहस्य व गुरुवर यांची शोभायात्रा भव्य दिव्य मिरवणूक दीपोत्सव सोहळा सायंकाळी ७ वाजता होईल.श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सर्व ट्रस्ट सदस्य यांनी सोहळ्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन केले आहे.

Wednesday, November 9, 2022

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा उद्या जिल्हा दौरा

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा उद्या जिल्हा दौरा

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे उद्या गुरुवार, (दि. 10) रोजी सकाळी 7 वाजता परभणी येथे रेल्वेने आगमन होईल. त्यानंतर दुपारी 12 वाजेजर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 1 वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहून हिंगोलीकडे प्रयाण करतील.

*****

Sunday, November 6, 2022

वीरशैव सिद्धयोगी मन्मथ स्वामी...

वीरशैव सिद्धयोगी मन्मथ स्वामी...  

सोनपेठ (दर्शन) :-

वीरशैव म्हणजे लिंगधारी शिवभक्त. पूर्वी यांना वीरमाहेश्वर म्हणत. ' सिद्धांतशिखामणी ' ग्रंथानुसार, ' विद्याया रमते यस्मान्मायां हेयां श्ववद रहेत | अनेनैव निरुक्तेन वीरमाहेश्वर: स्मृत: || ( ५.१७) अर्थ : शिवजीवैक्य विद्येमध्ये जे रममाण होतात आणि संसाररूपी मायेला श्वान समजून, तिचा त्याग करतात त्यांना ' वीरमाहेश्वर ' या अन्वर्थक नावाने संबोधिले जाते. 
शिवागमांमध्ये लिंगांगसामरस्यात रममाण होणाऱ्या शिवभक्तांना ' वीर ' म्हटले आहे. शिवयोग आणि ब्रह्मविद्या एकच आहे. याबाबत स्पष्टीकरण देतांना महासिद्ध रेणुकाचार्य म्हणतात, " वेदान्तजन्य यज्ञानं विद्येति परिकीर्त्यते |
विद्यायां रमते तस्यां वीर इत्यभिधीयते || ( सि. शि. ५.१८ ) 
अर्थ : उपनिषदांच्या अध्ययनाने प्राप्त होणाऱ्या शिवजीवैक्यबोधक ज्ञानाला विद्या असे म्हणतात व त्या विद्येत रमणाऱ्यांना वीर असे म्हणतात. यावरून वीरशैवांचा हा भक्तीयोग म्हणजे ' शिवाद्वैत वेदांत ' होय. 
* शिवयोगी रेवणसिद्ध परंपरा : 
शिवयोगी रेवणसिद्ध हे बसवपूर्व लिंगाधारी ( वीर ) शैवसिद्धांच्या मांदियाळीत मोडणारे उदारचरित सिद्ध होते.( डॉ. रा.चिं. ढेरे) , रेवणसिद्ध यांनी वीरशैव धर्मप्रसार केला. वीरशैव धर्मप्रसार केंद्र म्हणजे ' अनुभवमंडप ' . या संदर्भात लिं. डॉ. फ. गु. हळकट्टी म्हणतात, " ...रेवणसिद्धेश्वरांनी सोलापूरच्या पश्चिमेला ३० मैलांवरील ' मंगळवेढा ' येथे वीरशैव धर्मप्रसाराचे चौथे केंद्र निर्माण केले. कर्नाटकात संचार करणाऱ्या रेवणसिद्धांच्या प्रेरणेने बसवण्णांची विचारक्रांती होऊन राज्यात एक अद्भुत क्रांती निर्माण झाली आणि ' कल्याण ' हे पाचवे केंद्र निर्माण झाले. 
रेवणसिद्धांनी कर्मकांडविरहित अशा भावाधिष्ठित शिवभक्तीचा प्रसार केला. यांच्याकडून समतावादी व भक्तीमार्गाची प्रेरणा घेतलेल्या बसवेश्वरांची वैचारिक क्रांती झाल्याने, त्यांनी कल्याण येथे स्थापन केलेल्या अनुभव मंडपाने वर्णवर्चस्वाविरुद्ध अद्भुत क्रांती केली. या क्रांतीच्या परिणामस्वरूप तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरादी संतांच्या विट्ठलभक्त - वारकरी संप्रदायाने देवाच्या दारातील समता स्वीकारलेली दिसून येते. 
* परमरहस्य शिवजीवैक्याचे : 
संत ज्ञानेश्वरकालीन शिवयोगी रेवणसिद्ध हे रंभापुरी वीरशैवपीठाचे जगद्गुरू यांना काडसिद्धेश्वर हे पर्यायनाम होते.  रेवगीरी जि. बीदर येथील . हे रेवणसिद्ध ' परमरहस्य ' या मूळ संस्कृतमधील ग्रंथाचे कर्ते आहेत. ( डॉ. पंडित आवळीकर, विवेकचिन्तामणी, प्रस्तावना) . रेवणसिद्ध - मरूळसिद्ध परंपरेतील रेवण ऊर्फ़ काडसिद्धेश्वर यांना गुरुस्थानी मानणारे व यांचा गाढ प्रभाव असणारे अनेक संप्रदाय आहेत. हे सर्व अद्वैत वेदांत मार्गाचे संप्रदाय आहेत. मुडलगी, चिम्मड, इंचगेरी इत्यादी यामध्ये नागेश संप्रदायाचाही समावेश होतो. 
नागेशांना परात्पर गुरुस्थानी मानणारे मन्मथस्वामी यांनी रेवणसिद्ध यांच्या ' परमरहस्य ' ग्रंथावरच मराठी टीका लिहिली आहे. शिवयोगी वडवळसिद्ध नागेश हे ' माणुरवासाय ' असून माणुरमठ हा रंभापुरी वीरसिंहासनपीठाचा शाखा मठ आहे. 
' परमरहस्य ' च्या शेवटी मन्मथशिवलिंग म्हणतात, 
' हा ग्रंथ स्वये ईश्वरमुखीचा | तोचि अवतार नागेश साचा | 
वीरशैव धर्म पाळावया | प्रकट कारविणार पै || 
तयाचे नामाभिधान | नागेशगुरु म्हणउन | 
प्रकट केले गुह्यज्ञान | लिंगधारी कळावया ||
यालागी शिव तोचि हा नागेश्वरु | परंपरेचि बसवराजगुरु | 
मानूरमठ सिंहासनाधिकारु | असे जाण जयाशी ||... 
परमगुरू नागेशांनीच हे गुह्यज्ञान लिंगधारी वीरशैवांसाठी प्रकट केले असून, त्याच परंपरेतील बसवराज गुरूंनी ही ' परमरहस्य ' टीका आपल्या कडून करवून घेतली असे स्पष्ट करतात. गुरु परंपरेतील एकात्मभाव प्रकट करतात. 
* उदारमतवादी वीरशैव : 
वीरशैव सिद्ध परंपरेतील शिवयोगी रेवणसिद्ध, मरूळसिद्ध, काडसिद्ध, सिद्ध नागेश यांच्या प्रमाणेच मन्मथस्वामींच्या शिष्य प्रभावळीतील संतकवींमध्ये लिंगेश्वर बार्शीकर, शिवदास बीडकर, सदाशिव नीनगूरकर, बसवलिंग, शिवलिंग, रामलिंग या वीरशैवांसह रामानंद मांजरसुंबेकर ( ब्राह्मण) , जीवनस्वामी ( मारवाडी) , मोहनदास ( धनगर) इत्यादी विविध जाती पंथाची शिष्यमंडळी आहेत.
सिद्ध नागेशांची दुसरी मिश्रपरंपरा असणाऱ्या अज्ञानसिद्ध शाखेतही सर्व जाती संप्रदायांच्या सत्पुरुषांचा समावेश आढळून येतो. शिखर शिंगणापूरचे शांतलिंगस्वामीही रेवणसिद्धांच्या शिष्यशाखेतले आहेत. ज्यांनी निजगुण  शिवयोगी यांच्या ' विवेकचिंतामणी ' ग्रंथाचा मराठी अनुवाद केला. हे समन्वयवादी म्हणून विख्यात आहेत. अशा वीरशैवांच्या उदारमतवादी परंपरेतील महासिद्धांचा उल्लेख करतांना सोळाव्या शतकातील शेख महमदाने ' महाआरतीत ' ' रवणमोराळसिध ' असा निर्देश केला आहे. मन्मथस्वामी याच परंपरेतील सिद्ध शिवयोगी आहेत. 
 " मन्मथ आलासे भूलोका | आता कोणी भिऊ नका |" अशा आत्मविश्वासाने त्यांनी तत्कालीन मराठी वीरशैवांमध्ये एक आत्मविश्वासपूर्ण चैतन्य निर्माण केले. परमरहस्य , गुरुगीता, ज्ञानबोध, अनुभवानंद इत्यादी काही प्रबोधनात्मक ग्रंथलेखन, अंभगादि स्फुट वाङ्ग्मय स्वतः निर्माण करून वीरशैव संतकवींची भक्कम फळी निर्माण केली. वीरशैवांचे सत्व, वीरत्व राखून अन्य मत - सांप्रदायिक शिष्यांना उदार मनस्कतेने जवळ केले. मन्मथस्वामींनी  शिवकीर्तनाची परंपरा पुनरुज्जीवित करून महाराष्ट्रातील वीरशैव धर्म परंपरेचे संरक्षण व संवर्धन केले आहे. या महत्कार्यामुळे मराठी वीरशैवांमध्ये मन्मथस्वामींचे स्थान अढळ असून तेच महाराष्ट्रातील वीरशैवांचे मानबिंदू आहेत. त्यांच्या महान कार्याला त्रिवार वंदन! 
@ श्री सिद्धमल्लय्या हिरेमठ, गुड्डापूर. ता. जत, जि. सांगली.

Saturday, November 5, 2022

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा सोनपेठ येथे समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा सोनपेठ येथे समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा
सोनपेठ (दर्शन) :-

नगर परिषद सोनपेठ आयोजित स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत "शहर स्वच्छता जनजागृती अभियान" निमित्त मा. श्री.भास्करराव पेरे पाटील (आदर्श सरपंच, ग्रामपंचायत पाटोदा, जि. औरंगाबाद) यांचा "समाज प्रबोधनाचा कार्यक्रमाचे" साक्षीदार व्हा.शुक्रवार दि.११ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह नगर परिषद सोनपेठ ता.सोनपेठ जि.परभणी येथे आयोजित केला आहे.प्रमुख पाहुणे मा.श्रीमती आंचल गोयल जिल्हाधिकारी परभणी,प्रमुख उपस्थिती मा.श्री.सारंग चव्हाण तहसिलदार सोनपेठ,मा.श्री.एस.बी. धाबे गटविकास अधिकारी पं.स.सोनपेठ,मा.श्री. संदिप बोरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.स्टे. सोनपेठ,तरी सर्व नागरिकांनी,सर्व पक्षीय नेत्यांनी,सामाजिक कार्यकर्त्यांनी,पत्रकार बांधवांनी,तमाम महिलांनी,
विविध संघटना,सर्व बचत गट तसेच सर्व मित्र मंडळांनी,या प्रबोधन कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती मा.श्री. विठ्ठल केदारे मुख्याधिकारी न.प.सोनपेठ.यांनी केली आहे.

Friday, November 4, 2022

सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता स्वतः च्या वाढदिवसाचा तमाशा दाखवतो तेव्हा ....

सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता स्वतः च्या वाढदिवसाचा तमाशा दाखवतो तेव्हा....


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता सोनपेठ शहरात दिनांक ४ नोव्हेंबर व दिनांक ५ नोव्हेंबर२०२२ असे दोन दिवस भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता स्वतः च्या वाढदिवसाचा तमाशा दाखवतो तेव्हा,यासाठी फार मोठा डाम डौल शहरात निर्माण केला आहे या वाढदिवसा वर स्वतः भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता यानेच लाखो रूपये खर्च केला आहे परंतू या वाढदिवसाचे कार्यक्रमाचे प्रायोजक हे वेगळे दाखविले आहेत म्हणून या वाढदिवसा वर झालेल्या खर्चाची आर्थिक गुन्हे विभाग यांचे कडून जिल्हाधिकारी परभणी यांनी चौकशी करावी व भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ दुर्भाग्य निर्माणकर्ता याचे वाढदिवसा वर खर्च केलेल्या लाखो रुपयांचे रकमेचे गौड बंगाल लोकांना कळले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सदस्य प्रभाकर शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.सोनपेठ येथे नगर परिषदेची दोन व खाजगी एक सभागृहे अशी तीन सभागृहे सोनपेठ शहरात असताना आठवडी बाजारातील लहान व्यापाऱ्यांचे विविध स्टॉल्स व हातगाडे जबरदस्तीने हटवून त्या ठिकाणी हा वाढदिवसाचा कार्यक्रम होत आहे हा अट्टाहास कशा साठी केला जात आहे तर भ्रष्टाचारातून मिळविलेल्या संपत्तीचा देखावा भर बाजारात दाखविण्या साठी केले जात आहे.हे जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही या जागेचे भाडे नगर परिषदेला दिले नाही ही जागा वापरण्यासाठी नगर परिषदे कडून नियमा प्रमाणे परवानगी घेतली नाही मग नगर परिषद कर्मचाऱ्यांनी कुणाचे आदेशावरून ही स्टॉल्स व हातगाडे जबरदस्तीने हटविले आहेत याची चौकशी झाली पाहिजे.या कार्यक्रमा साठी अनधिकृत पने चोरून वीज वापरली जात होती याची तक्रार होवून चोकशी होईल म्हणून सायंकाळी वीज जोडणी करून वेळ निभावून नेली आहे.या वाढ दिवसाचे कार्यक्रमाचे डिजिटल बॅनर शॉपिंग कॉम्प्ले्स वर नगर परिषदेला भाडे न देता व नगर परिषदेची परवानगी न घेताच लावले आहेत याची चौकशी झाली पाहिजे.या कार्यक्रमा साठी पोलीस स्टेशनचा वाद्य पास परवाना घेतला का ? कारण वाद्य संगीत आणि लाऊडस्पिकर रात्री १० वाजल्यानंतर ही वाजविले आहे.
या वाढदिवसा साठी मध्यरात्री मोठया मोठया आवाजाचे फटाके वाजवून आतिश बाजी करण्यात येते परंतु या साठी जिल्हादंडाधिकारी परभणी यांची रीतसर परवानगी घेतलेली नाही याची चौकशी झाली पाहिजे.या  वाढदिवसाचे कार्यक्रमा मुळे आठवडी बाजारा मध्ये पादचारी लोक व वाहन धारक यांचे रस्ते बंद केल्या मुळे अनेकांची गैर सोय झाल्यामुळे तारांबळ उडाली आहे.आठवडी बाजारातील हातावर पोट असणारे व्यापारी  व हातगाडे वाले यांना जबरदस्तीने दोन दिवसा साठी इतरत्र हटविल्या मुळे या हात गाडे वाले व व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे 
या शिवाय आगामी काळा मध्ये यांच्या धंद्याला फटका बसणार आहे तो वेगळाच या साठी जबाबदार कोण ? याची चौकशी झाली पाहिजे.ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे अशा दुःखी व वेदनामय परिस्थिती मध्ये भ्रष्टाचारी राक्षस उर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता वाढदिवस साजरा करून आसुरी आनंद घेत आहे. सोनपेठ शहराला गेल्या वीस वर्षांपासून शुध्द व स्वच्छ पाणी पुरवठा भ्रष्टाचारी राक्षस उर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता पुरवठा करू शकला नाही गेल्या वीस वर्षांत या भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता याने सोनपेठ नगर परिषदे मध्ये भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपयांची संपती मिळविली आहे व ही भ्रष्टाचारातून मिळविलेली संपती त्याला गप्प बसू देत नाही म्हणून भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता हा आयोजक दाखवून स्वतः वाढ दिवस साजरा करीत आहे.भ्रष्टाचारी राक्षस उर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता म्हणतो मला पहा अन् फुलं वाहा,भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ दुर्भाग्य निर्माणकर्ता हा काही आमदार खासदार यांचे दर्जाचा नाही म्हणून त्याचा वाढदिवस कोणी ही मनातून साजरा करीत नाहीत म्हणून हा लोकांना पैसे देवून व आयोजक दाखवून स्वतः चा वाढदिवस स्वतःचे पैशातून साजरा करतो जनता आता भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता याचा वाढदिवस स्वतःचे पैशातून साजरा करायला दूध खुळी राहिली नाही हे जनतेला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही .भ्रष्टाचारी राक्षसाला ऊर्फ दुर्भाग्य निर्माणकर्ता याला श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची खूप हौस आहे म्हणुन हा वाढदिवसाचा खटाटोप आहे.दिनांक ४ व ५ नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अभ्यास शिबीर चालू आहे त्या अभ्यास शिबिराला न जाता भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता सोनपेठ येथे वाढदिवस साजरा करण्यात मश्गूल झाला आहे याला कोणता अभ्यास येत नसल्यामुळे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभ्यास शिबिराला गेला नाही हे स्पष्ट आहे 
सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता यांचे कार्यकाळात सोनपेठ शहारा मध्ये अनेक ठिकाणी नाल्यांची साफ सफाई होत नव्हती मलनिःसारण योग्य रीतीने होत नव्हते म्हणूनच गेल्या ऐन दिवाळीत काबरा मार्केट येथे नाली ब्लॉक झाल्यामुळे बस स्टँड भागात लोकांना चालता येत नव्हते फिरता येत नव्हते जवळ पास 25 दिवस या रस्त्यावर दुर्गंधी पसरली होती हे सर्व भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता याचे मुळे झाले आहे हे सर्व शहर वासियाना माहीत आहे 
सोनपेठ शहरामध्ये गल्ली बोळा मध्ये वावरणाऱ्याला सोनपेठचा भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता या  शिवाय दूसरी कोणती ही उपाधी शोभून दिसणार  नाही किती रोजंदारी कर्मचारी बरबाद केले किती कंत्राटदार बरबाद केले किती व्यापारी बरबाद केले किती कार्यकर्ते बरबाद केले किती नगर सेवक बरबाद केले किती मिस्त्री बरबाद केले किती युवक बरबाद केले याची मोजदाद आहे काय ? याचा काही हिशेब नाही, गेल्या वीस वर्षा मध्ये स्वतः शिवाय कोणी ही आर्थिदृष्टया सक्षम होवू नये या साठी आवश्यक ती दक्षता घेतली आहे व वापर मात्र सर्व पक्षांचा सर्व नेत्यांचा व सर्व कार्यकर्त्यांचा केला आहे
परंतू एवढे मात्र सत्य आहे की भ्रष्टाचारी राक्षस उर्फ सोनपेठ चा दुर्भाग्य निर्माणकर्ता याचे मागे आता पूर्वी इतके जन समर्थन राहिले नाही लोकांनी त्याला पुर्ण पने ओळखले आहे तो काही ही सोंगे ढोंगे करून लोकांची दिशाभुल करून सोनपेठ नगर परिषद मध्ये बेकायदेशीर व नियमबाह्य कामे करून शहर लुटणार आहे म्हणून तो जनतेच्या मनातून उठला आहे.सदरचा वाढदिवस हा सर्व सामान्य लोकांचा कार्यक्रम नसून केवळ भ्रष्टाचारी राक्षस ऊर्फ सोनपेठचा दुर्भाग्य निर्माणकर्ता याचे स्तोम माजविणारा असुन त्याचा उदो उदो करणारा आहे
परंतू आता काही ही केल्याने काहीच फरक पडणार नाही म्हणतात ना बुंदसे गई हौद से नहीं आती हे सत्य आहे 
भ्रष्टाचार करणे आणि स्वतःची तुमडी भरणे हाच त्याचा धंदा झाला आहे म्हणून येणाऱ्या निवडणूकीत जनता त्याला मत पेटी द्वारे पायदळी तुडविणार आहे हे निश्चित आहे.असे रोखठोक मत सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सदस्य प्रभाकर शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.