पालघर नगर परिषद विरोधात "माजी सैनिकाचा" आमरण उपोषणाचा इशारा ; मुख्यमंत्री साहेब आता तरी जागे व्हा
पालघर/छत्रपती संभाजीनगर/परभणी/सोनपेठ (दर्शन) :- माजी सैनिक डॉ. भाऊराव पुंडलिक तायडे (रा. समर्थ निवास, पोलीस सोसायटी, रामनगर रोड, पालघर पूर्व) यांनी पालघर नगरपरिषदच्या कथित निष्काळजीपणा आणि मनमानी कारभाराविरोधात १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पाचबत्ती हुतात्मा चौक, माहिम रोड, पालघर येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
१९ वर्ष देशसेवा करताना कारगील युद्धात सहभागी झालेले डॉ.तायडे सेवानिवृत्तीनंतर पालघर पूर्व येथे वास्तव्यास आहेत. त्यांची मालमत्ता क्र. ४०२१ (‘सी’ झोन) कर माफीस पात्र असून, २०११ पासून वारंवार पत्रव्यवहार करूनही नगरपरिषदने त्यांचे प्रकरण निकाली काढले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उलट, संबंधित मालमत्तेची नोंद दप्तरातून गहाळ केल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. शिवाय, घोलविरा (वेवूर) येथे त्यांच्या नावावर चुकीच्या दोन प्रॉपर्टी नोंदी दाखवून त्यातील एक रद्द केल्याचेही त्यांनी सांगितले.
२०११ पासून २०२५ पर्यंत कर माफीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, परंतु उत्तर मिळाले नाही. कर मागणीपत्रक दरवर्षी नियमाप्रमाणे न देता त्यावर स्वाक्षरीची पोहचही घेतली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. शासन निर्णय २०२० दाखवत कर माफी नाकारली जात असली तरी त्यांच्या अर्जाची २०११ पासून दखल घेतली गेली नाही, यामुळे त्यांना मानसिक त्रास, अन्याय व जप्तीची नोटीस मिळाल्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ.तायडे यांनी स्पष्ट केले की, १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषणापर्यंत न्याय मिळाला नाही तर संभाव्य जीवितहानीसह सर्व परिणामांसाठी शासन जबाबदार असेल. या इशाऱ्याची प्रत जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पोलीस अधिक्षक, तहसिलदार, पालकमंत्री आणि माजी सैनिक कल्याण मंत्री यांना पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.